सप्ताह अनुष्ठान - धर्मग्लानि
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
मंगळवार ता. १३-५-१९३०
सिद्ध मज करी अत्रिच्या तनया । वरद होवोनियां मजलागी ॥१॥
माझे जे कां पुण्य फ़ळासी आणावे । नाथ प्रगटावे तुझे कार्यी ॥२॥
पापपुण्य कोणा भेद न कळत । स्वैरचि वर्तत जन जाणा ॥३॥
नीतितत्वे सारी हरपूनि गेली । दयामाया झाली नष्ट सारी ॥४॥
भूतदया जगी पार मावळली । बंधुता लोपली जनांची की ॥५॥
धर्म नष्ट होता ऐसी हे दु:स्थिती । पावली श्रीपति असे जाण ॥६॥
उपासनाबुद्धि प्रसृत व्हावया । भजना लावाया जन सारे ॥७॥
पुण्याई जागृत करी दत्तनाथा । फ़लाते समर्था आणी येथे ॥८॥
फ़लोन्मुख करी झाली जे का सेवा । तुझी रमाधवा आजवरी ॥९॥
प्रगट करी स्थान दावी साक्षात्कार । प्रेमोद्भम थोर प्राप्त व्हावा ॥१०॥
प्रेममय व्हावे देवा सारे जग । भजनांत दंग व्हावे नाथा ॥११॥
तुझा अनुभव सकळांस यावा । प्रगटी वैभवा आपुल्या तूं ॥१२॥
बौद्धरुप आतां टाकोनि दयाळा । प्रगट स्नेहाळा होई येथे ॥१३॥
विनायक म्हणे करी जयजयकार । धर्माचा विस्तार करी दत्ता ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP