सप्ताह अनुष्ठान - प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
अनुष्ठान करवीले । पूर्णत्वासी तुवां नेले ॥१॥
सांगतेने सिद्ध व्हाया । आम्हां प्रसाद मिळाया ॥२॥
आज्ञा देई आतां नाथा । तव प्रसाद ग्रहणार्था ॥३॥
प्रसाद ग्रहणासीं आज्ञा । देई आतां तूं सर्वज्ञा ॥४॥
प्रसाद करी आम्हांवरी । गुरुराज नरहरी ॥५॥
यज्ञशिष्टाचे सेवन । घडवी आम्हां दयाघन ॥६॥
जो का यज्ञ करविला । सांग तुवां नाथा भला ॥७॥
त्यांतील शिष्ट प्रसाद जो । परम इष्ट आम्हांला जो ॥८॥
यज्ञ शिष्ट आम्हां देई । वरद तूं आम्हां होई ॥९॥
रोगराई सर्व जावी । अज्ञाने जी ती हरावी ॥१०॥
ज्ञानप्रकाश की व्हावा । बोध आम्हां प्रकाशावा ॥११॥
आम्ही व्हावे पूर्ण ज्ञानी । मुक्त व्हावे फ़ेर्यांतूनी ॥१२॥
जन्ममरणाचा फ़ेरा । चुकवावा गुरु उदारा ॥१३॥
म्हणुनि आतां आज्ञा व्हावी । प्रसाद ग्रहणार्थ बरवी ॥१४॥
तूझे चरण वंदून । पदतीर्थ तूझे घेवोन ॥१५॥
ह्रदयांत तुज स्मरोनी । तूजलागी तेथे पूजोनी ॥१६॥
तुझ्या ताटीचे उच्छिष्ट । जे का पूर्व यज्ञ शिष्ट ॥१७॥
परमादरे आम्ही सेवूं । तुझ्या कृपे तृप्त होऊ ॥१८॥
तरी ह्या योगा साधावया । आम्हांलागी तारावया ॥१९॥
आज्ञा देई श्रीसमर्था । तव प्रसाद ग्रहणार्थ ॥२०॥
सकळ हेतू पूर्ण व्हावे । तव कृपे नाथा बरवे ॥२१॥
न्यून कांहीही नसावे । आम्ही समर्थची व्हावे ॥२२॥
हीन दीन आम्ही नसावे । वैभवेसी युक्त असावे ॥२३॥
ऐसे करा दयाधना । करितो मी पदवंदना ॥२४॥
विनायकचा भावार्थ । पुरवावा मनिंचा अर्थ ॥२५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP