सप्ताह अनुष्ठान - कृतज्ञतावचन
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शुक्रवार ता. १६-५-१९३०
करवीले तुवां निजकार्य दत्ता । सर्व तूझी सत्ता करीतसे ॥१॥
जे जे कांही होते सर्व तवाधिन । तेच दयाघन घडतसे ॥२०॥
करोनिया सारे निर्लेप रहासी । निराळा दिससी सर्व कांही ॥३॥
निर्विकार सदा तुझी स्वरुपस्थिती । घडामोडी होती जरी कांही ॥४॥
सर्गस्थितिलय घडत विश्वासी । सकळ जाणसी अभिज्ञ तूं ॥५॥
परि त्याचा तूज काही बाध नाही । स्वच्छचि तूं पाही सदोदित ॥६॥
अग्नि जाळीतसे सकळ वस्तूंसी । त्याच्या शुचित्वासी बाध नाही ॥७॥
तैसे तूझे रुप सदाच निर्मळ । साक्षीभूत केवळ वर्ततसे ॥८॥
सकळ करोनि रहासि निराळा । योग हा आगळा तुझा जाण ॥९॥
ब्रह्माण्डरचना ब्रह्माण्ड धारण । ब्रह्माण्ड जृंभण जे का चाले ॥१०॥
त्यांत तूझी सत्ता सकल वर्तत । कोणा न उमगत कदाकाळी ॥११॥
जैसे कमळ्दळ राहोनी जलांत । निर्लेप वर्तत तैशी सत्ता ॥१२॥
विशिष्टत्व ऐसे तूझिया सत्तेचे । जाणणार साचे कोण सांग ॥१३॥
अगम्य हे आहे आम्हांसि विन्दान । कैसे ते कळोन येईल की ॥१४॥
तुझ्याच इच्छेने जीव हे वर्तत । सकळ आचरत तुझ्या ठायी ॥१५॥
न जाणोनी तूज, धरिती अहंकार । आपण करणार म्हणताती ॥१६॥
हेच की जीवाचे परम अज्ञान । समरस मन होय तेथे ॥१७॥
कर्तृत्व देवाचे सकळ जाणोनी । स्वस्थ व्हावे मनी हाच मार्ग ॥१८॥
साधुमार्ग हाच तुझे तूज अर्पणे । स्वीय न सांगणे ममत्व तेथे ॥१९॥
ज्याचे त्या अर्पितां दोष न लागे मुळी । ममत्व कदाकाळी ठेवूं नये ॥२०॥
जे का परक्याचे, लोभ न धरावा । अभिलाष व्हावा कधी न कोणा ॥२१॥
तैसे आम्हा हाती जे जे करवीत । दत्त अवधूत कौतुकाने ॥२२॥
ते ते सर्व तया प्रेमाने अर्पावे । आशाबद्ध व्हावे कधी न तेथे ॥२३॥
कल्याण करणारा धनी तो समर्थ । पुरवील अर्थ, चिंती त्यासी ॥२४॥
व्यर्थ अहंकारी पडूं नको जीवा । तया दत्तदेवा ओळख रे ॥२५॥
कर्ता करवीता भोक्ता भोगवीता । ज्ञाता जाणविता दत्तात्रेय ॥२६॥
तेणे आहे शिरी घेतला सर्व भार । कां तूं चिंतातुर रहातोसी ॥२७॥
त्यास आहे तुझी सकळ बा चिंता । तया भगवंता, मज तरी ॥२८॥
आशाबद्ध काही करुं नको कर्म । जाण बा हे वर्म जीवराया ॥२९॥
विनायक म्हणे जे काय घडविले । अर्पण मी केले त्याचे पायी ॥३०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP