मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शुक्रवार ता. १७-१०-१९३०

चित्त-निरोधासी साधणे कठीण । म्हणोन चरण धरीय़ेले ॥१॥
भजनपूजनी होवोनी सादर । स्थिर हे अंतर करु इच्छी ॥२॥
जितुके होईल तितुके मी स्थैर्य । आणाया गुरुराय झटतसे ॥३॥
साह्य करणार तुम्हीच मजला । बनाव माझा भला करणार ॥४॥
काम्य माझे नाथ त्वरित पुरवावे । निश्चल करावे मजलागी ॥५॥
विनायक म्हणे माझी भयभीति । घालवा श्रीपति त्वरितची ॥६॥
==
धांवा
माझे कर्तव्य मी आचरित आहे । तुज भजता हे प्रेमभरे ॥१॥
धरोनी विश्वास तुजला सेवितो । गुह्य हे सांगतो तुजपाशी ॥२॥
जैसे ह्र्दय तैसे तुज निवेदितो । ताप शमवितो तुजपाशी ॥३॥
धरोनी कामना तुज मी सेवितो । अभय मागतो तुझ्यापाशी ॥४॥
भयभीत नाथा लपाया पाठीसी । मागे आश्रयासी तुझ्यापाशी ॥५॥
कठिण प्रसंग, संकट दुर्धर । ब बाधत साचार मजलागी ॥६॥
तरि आतां मज पाठीसी घालावे । संकटांत पावे मजलागी ॥७॥
उपाय मजसी दुजा नसे कांही । म्हणोनिया पाहि शरणागत ॥८॥
दुर्धर प्रसंगा तोंड द्यावयासी । दुजा न सजसी कोणी त्राता ॥९॥
तूंच प्रतिभट शोभसी संकटा । योद्धा तूं गोमटा अग्नितुल्य ॥१०॥
विनायक म्हणे मज रक्षायासी । घालावे पाठीसी दत्तानाथा ॥११॥
==
धांवा
माझ्या संकटांचा करावा विनाश । मुळी अवकाश देऊं नका ॥१॥
सत्वर प्रगटा वांचवाया दीना । कारण मन्मना धीर नाही ॥२॥
नाही कोणी माझा लाज राखणारा । श्रीगुरु उदारा तुजवीण ॥३॥
नको पाहूं माझे कांहीच तूं आतां । कुलशील ताता जगन्नाथा ॥४॥
पूर्वीचे आताचे नको पाहूं कर्म । पावोत विराम संकटेही ॥५॥
चुकलोच आहे आजवरी नाथा । मुकलोसें अर्था बहूतची ॥६॥
परि ते कांही आतां नको मनी आणूं । भक्तीचे प्रमाणू मोजुं नका ॥७॥
भक्त की अभक्त मी न कांही असे । उभय होतसे भक्ताभक्त ॥८॥
परी त्याचा आतां न करि विचार । सद्गुरु उदार कृपाघन ॥९॥
विनायक म्हणे करावे धाबणे । अनमान करणे युक्त नसे ॥१०॥
==
धांवा
कांही झाले तरी शरण असे झालो । तुजपाशी आलो असे आतां ॥१॥
ढोंग सोंग किंवा कोणत्याही मिषे । तुज स्तवीतसे कृपावंता ॥२॥
पापाचीया योगे संकटी पडलो । परम असे भ्यालो अंतरांत ॥३॥
पडलो अग्नित पडलो जलांत । पडत खोलांत तैसे झाले ॥४॥
झडकरी धांव घेई रे सखया । माझी या ह्र्दया धीर द्याया ॥५॥
विनायक म्हणे अगा जगदाधारा । करा साक्षात्कारा सत्वरची ॥६॥
==
धांवा
पळ पळ पळ जैसा काळ जातो । गळ्यासी पडतो फ़ांस माझ्या ॥१॥
नको करुं आतां माझे तूं निर्वाण । कासावीस प्राण माझे आतां ॥२॥
मज मूर्खालागी देवा कैचे ज्ञान । सकळ अज्ञान माझे ठायी ॥३॥
तेणे भयभीत शरण चरणी । मज चक्रपाणी वांचवावे ॥४॥
विनायक म्हणे उडी घाली त्वरे । यालागी सत्वरे तारी आतां ॥५॥
==
धांवा
पदर पसरीला नाथा तुझे पुढे । मज आतां गाढे वांचवावे ॥१॥
निराशेचे मना झटकेच येती । ऐशी परिस्थिती झाली आहे ॥२॥
डचमळोनियां रडे येत मज । माझी आतां लाज राखीराखी ॥३॥
स्फ़ुंदोनीस्फ़ुंदोनी देवा मी रडतो । तुजसी पाहतो केविलवाणा ॥४॥
साहायार्थ नाथा मुखाअवलोकितो । भाव मी कथितो माझा स्पष्ट ॥५॥
माझे दैन्य हरा दोषां क्षमा करा । करा साक्षात्कारा लवलाहे ॥६॥
दीन गरीब हा विनायकदास । याजला प्रीतीस करावे की ॥७॥
==
धांवा
जे जे कांही मनी ते ते मी बोलिलो । शरण जाहलो तूझे पायी ॥१॥
नाही धीर मज झालो उतावळा । मज आतां स्नेहाळा संवधावे ॥२॥
संकटांचा व्हावा पूर्णचि निरास । शुभचि विशेष घडुनी यावे ॥३॥
विनायक म्हणे बोलायाचे जे का सद्गुरु तारका कळविले ॥४॥
==
धांवा
माझे बोलण्याचा हेतु समजोनी । उडी त्वां घेऊनी प्रगटावे ॥१॥
करावा दु:खाचा सकल परिहार । श्रीगुरु उदार कृपासिंधू ॥२॥
साक्षात्कार करा येथे जगन्नाथा । पुरवावे अर्था मनीचिया ॥३॥
विनायक म्हणे कष्ट निवारण । करा नारायण सत्वरेसी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP