रक्तवहस्त्रोतस् - मसूरिका

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.

व्याख्या

मसूराकृति संस्थाना: पिडकास्यु: मसूरिका: ।
मा. नि, मसूरिका-३ पा. ३५५

मसुरासारख्या दिसणार्‍या पिडका अंगावर येतात म्हणून या व्याधीस `मसूरिका' असें म्हणतात. यालाच लौकिकांत देवी असें म्हणतात.

स्वभाव

दारुण

मार्ग

बाह्य व अभ्यंतर

प्रकार

वातज, पित्तज, रक्तज, कफज, सान्निपातिक.

निदान
कट्‍वम्ललवणक्षारविरुद्धाध्यशनाशनै:
दुष्टनिष्पावशाकाद्यै: प्रदुष्टपवनोदकै: ॥१॥
क्रुरग्रहेक्षणाच्चापि देशे दोषा: समुद्धता: ।
जनयन्ति शरीरेऽस्मिन्  दुष्टरक्तेन संगता: ॥२॥

मा. नि. मसूरिका १-२ पा. ३५५
तिखट, आंबट, खारट, क्षार अशा गुणांची द्रव्यें व भाज्या ( पालेभाज्या हे पदार्थ अधिक प्रमाणात खाणें, विरुद्धाशन, अध्यशन,
विकृत झालेल्या वायूचें वा दुषित जलाचे सेबन, दुष्ट असे अन्न, यांच्यामुळें रोगाची व्याधिक्षमता कमी झाल्याने दोषप्रकोपही होतो. अशा स्थितींत विशिष्ट अशा वातावरणांत राहणार्‍या क्रूर स्वभावी भूतांचा उपसर्ग झाला म्हणजे रक्त दुष्ट होऊन हां व्याधी उत्पन्न होतो. मसूरिकापीडित व्यक्तीच्या संसर्गानेंही व्याधी उत्पन्न होतो

संप्राप्ति

" पित्त शोणितसंसृष्टं यदा द्‍षयति त्वचम् ।
तदा करोति पिडका: सर्वगात्रेषु देहिनाम् ॥
मसूरमुद्गमाषाणां तुल्या: कोलोपमा अपि ।
मसूरिकास्तु ता ज्ञेया: पित्तरक्ताधका बुधै: " -इति
मा.नि. ३ म. टीका पान ३५६

भूतोपसर्गानें प्रकुपित झालेले पित्तप्रधान दोष, रक्तास दुष्ट करुन तोंडावर व शरीराच्या इतर भागावर आणिं शरीराच्या अभ्यंतरीही स्फ़ोट उत्पन्न करतात. त्यांचा आकार मूग, उडीद, मसूर आणि कधीं कधीं लहान बोराएवढाहि (चिटबोर) असतो.

पूर्वरुप
तासां पूर्वं ज्वर: कण्डूर्गात्रभड्गोऽरतिर्भ्रम: ।
त्वचि शोथ: सवैवर्ण्यो नेत्ररागश्च जायते ॥३॥
मा. नि. मसूरिका पा. ३५६

मसूरिकेच्या पूर्वरुपांत ज्वर, अरति, भ्रम अंगभंग कंडू, नेत्ररक्तता अशीं लक्षणें असतात. त्वचेवर किंचित् वैवर्ण्य व शोथ दिसतो.

रुप
दाहज्वररुजावन्तस्ताम्रा स्फ़ोटा: सपीतका: ॥
गात्रेषु वदने चान्तर्विज्ञेयास्ता मसूरिका: ॥३८॥
सु. नि. १३-६८ पा. ३२२

ज्वरानंतर तीन ते सात दिवसांच्या अंतरांत शरीरात सर्वत्र लहान मोठया आकाराचे फ़ोड दिसूं लागतात. फ़ोडांचा रंग पिवळसर तांबूस असतो. त्यांत भरुन आलेला स्त्राव लौकरच पुवाळतो. स्फ़ोटासह दाह, कंडू, वेदना, ज्वर, अरति, तृष्णा हीं लक्षणें असतात.

वातज
स्फ़ोटा: श्यावारुणा रुक्षास्तीव्रवेदनयाऽन्विता: ॥४॥
कठिनाश्चिरपाकाश्च भवत्यनिलसंभवा: ।
सन्ध्यस्थिपर्वणां भेद: कास: कम्पोऽरति: क्लम: ॥५॥
शोषस्ताल्वोष्ठजिह्वानां तृष्णा चारुचि संयुता ।
मा.नि. मसूरिका ४,५, पा. ३५६.

वातज मसूरिकेमध्यें मसूरिकेचे फ़ोड श्याव व अरुण वर्णाचे, रुक्ष, असे असतात. त्यांचेमुळें तीव्र स्वरुपाच्या वेदना होतात. फ़ोड स्पर्शाला कठीण असून त्यांचा पाक लवकर होत नाहीं. संधी, अस्ति, पर्व (पेरी) यांच्या ठिकाणी फ़ुटल्यासारख्या वेदना होतात. यांत पाठीचा कणा व कटि यांचे ठिकाणी अतिशय शूल असतो. कांस, कंप, अरति, क्लम, ओष्ट, तालू, जिव्हा कोरडें होणें, तृष्णा, अरुची अशीं लक्षणें असतात.

पित्तज व रक्तज
रक्ता: पीतासिता: स्फ़ोटा: सदाहास्तीव्रवेदना: ॥६॥
भवन्त्यचिरपाकाश्च पित्तकोपसमुद्भवा: ।
विड्भेदश्चाड्गमर्दश्च दाहस्तृष्णाऽरुचिस्तथा ॥७॥
मुखपाकोऽक्षिरागश्च ज्वरस्तीव्र: सुदारुण: ।
रक्तजायां भवन्त्येते विकारा: पित्तलक्षणा: ॥८॥
रक्तजामाह- रक्तजायामित्यादि । एते विकारा: ।
पित्तलक्षणा इति पित्तजमसूरीलक्षणत्वेन उक्ता
'रक्ता: पीतासिता: स्फ़ोटा ' इत्यादयो ये ये विकारास्ते
रक्तजायां भवन्ति। अत्र कफ़जामनुक्त्वैव पित्तजाया
अनन्तरं रक्तजाया उक्ति: पित्तलक्षणस्यातिदिष्ट-
स्याव्यवहितत्वेन सुखग्रहणार्थं, रक्तरससमत्वाद्रक्तमल-
त्वाद्वा पित्तस्य पित्तजामभिधायास्या: कथनं, सर्वत्र
कृतस्य संमर्थनाय ।
भा. नि. मसूरिका १० म. टीका पा. ३.५६

पित्तज मसूरिकेमध्यें उत्पन्न होणारे फ़ोड वर्णानें लाल पिवळे, काळसर असे असतात. त्या ठिकाणीं तीव्र स्वरुपाच्या अशा वेदना असतात व आग होते. फ़ोड लवकर पिकतात तसेंच द्रवमल प्रवृत्ति, अंगमर्द, दाह, तृष्णा, अरुचि, मुखपाक, नेत्ररक्तता, तीव्र ज्वर अशीं लक्षणें असतात.
रक्तज मसूरिकेमध्यें सर्व लक्षणें पित्तज मसूरिकेसारखीच असतात.

कफ़ज मसूरिका
कफ़प्रसेक: स्तैमित्य शिरारुग्गात्रगौरवम् ।
ह्रल्लास: सारुचिर्निद्रा तन्द्रालस्यसमन्विता: ॥९॥
श्वेता: स्निग्धा भृशं स्थूला: कन्डूरा मन्दवेदना: ।
मसूरिका: कफ़ोत्थाश्च चिरपाका: प्रकीर्तिता: ॥१०॥
मा. नि. मसूरिका ।९-१०। पा. ३५६.

कफ़ज मसूरिकेमध्यें उत्पन्न होणारे फ़ोड, श्वेतवर्ण, आकारानें मोठे, स्निग्ध, व कंडुयुक्त असतात. तसेंच वरचेवर थुंकी येणें, थंडी वाजणें, अंग जड होणें, डोकें दुखणें, मळमळणें, तोंडाला चव नसणें, निद्रा तंद्रा, आलस्य अशीं लक्षणें असतात.

सान्निपातिक
नीलाश्चिपिटविस्तीर्णा मध्ये निम्ना महारुज: ।
चिरपाका: पूतिस्त्रावा: प्रभूता: सर्वदोषजा: ॥११॥
कण्ठरोधारुचिस्तम्भ प्रलापारतिसंयुता: ।
दुश्चिकित्स्या: समुद्दिष्टा: पिडकाश्चर्मसंज्ञिता: ॥१२॥
मा.नि. मसू. ११-१२ पा. ३५७

सान्निपातिक मसूरिकेमध्यें उत्पन्न होणारे फ़ोड आकारानें मोठे, चपटे, मध्यें किचित्  खोल असलेले, अत्यंत वेदनायुक्त, पूयस्त्राव होणारे, संख्येनें अधिक व लवकर न पुवाळणारे असतात. तसेंच कंठरोध, अरुचि, भ्रम, प्रलाप, अरति, ज्वर अशीं लक्षणें अधिक प्रमाणांत होतात. सान्निपातिक मसूरिकांचे स्फ़ोट त्वचेवर फ़ार विकृत असा परिणाम करीत असल्यानें या स्फ़ोटांना चर्म किंवा चर्मदल (मधुकोश) अशी विशिष्ट संज्ञा आहे. आंतकदर्पणकारानें चाघमांस अशा लौकिक नावाचा उल्लेख केला आहे.

धातुगत अवस्था
मसूरिकेमध्यें शरीराच्या अभ्यंतर भागावर परिणाम करणारा असा जो गंभीर प्रकार असतो त्यामध्यें पुढची पुढची धातुगत अवस्था विशेषेंकरुन आढळते.

तोयबुद्‍बुदसंकाशास्त्वग्ग्तास्तु मसूरिका: ।
स्वल्पदोषा: प्रजायन्ते भिन्नास्तोयं स्त्रवन्ति च ॥१४॥
रक्तस्था लोहिताकारा: शीघ्रपाकास्तनुत्वच: ।
साध्या नात्यर्थदुष्टाश्च भिन्ना रक्तं स्त्रवन्ति च ॥१५॥
मांसस्था: कठिना: स्निग्धाश्चिरपाका घनत्वच: ।
गात्रशूलतृषाकण्डूज्वरारात समन्विता: ॥१६॥
मेदोजामण्डलाकारा मृदव: किंचिदुन्नता: ।
घोरज्वरपरीताश्च स्थूला: स्निग्धा: सवेदना: ॥१७॥
संमोहारतिसंतापा: कश्चिदाभ्यो विनिस्तरेत् ।
मा. नि. मसूरिका १४ ते १७ पा. ३५७.

(१) त्वग्‍गत मसूरिकेंत पाण्याच्या बुडबुड्यासारखे दिसणारे फ़ोड त्वचेवर उत्पन्न होतात. यांतील दोषांची दुष्टी अल्प असते आणि हे फ़ोड फ़ुटले असतां त्यांतून पाण्यासारखा स्त्राव येतो.
(२) रक्तगत मसूरिकेमध्यें तांबडया रंगाचे, लवकर पिकणारे व वरची त्वचा पातळ असलेले असे फ़ोड उत्पन्न होतात. हे फ़ोड फ़ुटले असतां त्यांतून रक्तवर्ण स्त्राव येतो.
(३) मांसगत मसूरिकेतींल फ़ोड कठिण, स्निग्ध, जाड त्वचा असलेले चिरपाकी असतात. निरनिराळ्या अवयवांमध्यें शूल होणें, कडूं,ज्वर, तृष्णा, अरती, अशीं लक्षणें असतात.
(४) मेदोगत मसूरिकेंतील फ़ोड आकारानें मोठे, गोल, स्पर्शाला मृदु, किंचित् उंच, स्निग्ध व वेदनायुक्त असतात, मोह अरति व संताप अशीं लक्षणें होतात.

क्षुद्रा गात्रसमा रूक्षाश्चिपिटा: किंचिदुन्नता: ॥१८॥
मज्जोत्था भृशसंमोहवेदनारतिसंयुता: ।
छिन्दन्ति मर्मधामानि प्राणानाशु हरन्ति हि ॥१९॥
भ्रमरेणेव विद्धानि कुर्वन्त्यस्थीनि सर्वत: ।
पक्काभा: पिडका: स्निग्धा: सूक्ष्माश्चात्यर्थ वेदना: ॥२०॥
स्तैमित्यारतिसंमोहदाहोन्मादसमन्विता: ।
शुक्रजायां मसूर्यां तु लक्षणानि भवन्ति हि ॥२१॥
निर्दिष्टं केवलं चिह्‍नं द्दश्यते न तु जीवितम् ।
दोषमिश्रास्तु सप्तैता द्रष्टव्या दोषलक्षणै: ॥२२॥
क्षुद्रा इत्यादिना अस्थिमज्जगतयो: समानं
लिड्ग अस्थिमध्यस्थितत्वान मज्ज्ञ: ।
मा. नि. मसू. १८-२२ पा. ३५७.
पक्काकारा अननुपक्का । अन्ये " पड्काभा: "
इति पठन्ति तत्र कर्दमाभा: ।
मा. नि. मसू. २३ आ. टीका. पा. ३५८.

(५।६) अस्थिमज्जागत मसूरिकेमध्यें उत्पन्न होणारे फ़ोड किंचित्  उचललेले, चपटे, आकारानें लहान, रूक्ष व कातडीच्याच वर्णाचे असतात. भुंगा हाडांना कोरतो आहे अशा तर्‍हेच्या वेदना सर्व शरीरभर होतात. मर्मामध्यें अत्यंत वेदना होतात, मोह, अरति, वेदना यांचे प्रमाण फ़ार असतें.
(७) शुक्रगत मसूरिकेमध्यें उत्पन्न होणारे फ़ोड आकारानें लहान व स्निग्ध, पिकलेले नसतांना पिकल्यासारखे दिसणांरे, चिखलाच्या रंगाचे, अत्यंत वेदनायुक्त असे असतात. थंडी वाजणें, अरति, मोह, दाह, उन्माद (प्रलाप बीभत्स चेष्टा) अशीं लक्षणें असतात.
शुक्रगत मसूरिकेमध्यें क्रमानें, होतात तीं लक्षणें सांगितलीं आहेत इतकेच, या अवस्थेंत रोगी फ़ार वेळ जगत नाहीं.
आत्तापर्यंत सांगितलेस्या धातुगतावस्थेंतील लक्षणांच्या जोडीनें त्या त्या दोषांची लक्षणें दिसतात.

कफ़वातादि संभूत: कोद्रवो नाम संज्ञित: ।
लोके वदन्ति: कक्षाक: स पाकं न च गच्छति ॥३३॥
वंगसेन मसूरिका ३३ पा. ६७५.
कफ़मारुतसंभूत: कोद्रवो नामतो गद: ।
अपाक: कोद्रवाकार: सूचीनिस्तोदकारक: ॥१॥
जलशूक इवाड्गेषु विध्यतीव विशेषत: ।
सप्ताहाद्धा दशाहाद्धा शान्तिं याति विनौषधै: ॥२॥
यो. र. पा. ७२६.

वंगसेगानें कफ़वातामुळें उत्पन्न होणारा कोद्रव या नांवाचा एक व्याधी सांगितला आहे. तो मसूरिकेचा प्रकार म्हणून वर्णन केलेला असावा, असें संदर्भावरुन वाटेंल. योगरत्नाकरानें यालाच शीतला रोगाच्या संदर्भात वर्णिलें आहे. औषधावांचून  बरें (भा प्र) होण्याची शक्यता असणें या वर्णनावरुन तो शीतलेचा प्रकार असणे अधिक शक्य वाटतें. वंगसेनानें यालाच लौकिकामध्यें कक्षाक या नांवानें संबोधितात असें सांगितलें आहे. यामध्यें जे विस्फोट उत्पन्न होतात, त्यांचा पाक होत नाहीं. ज्या ठिकाणीं व्याधीच्या पीटिका उत्पन्न होतात त्या ठिकाणी सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. या व्याधीचें स्वरुप निश्चितपणें सांगतां येत नाहीं. योगरत्नाकारानें एक प्रकारचे पाणकिडे चावल्यासारखे याचें स्वरुप असतें असें म्हटलें आहे तर वंगसेनानें या पिडका यवशूकासारख्या दिसतात असें वर्णन केलें आहे.

उपद्रव

कासो हिक्का प्रमेहश्च ज्वरस्तीव्र: सुदारुण: ।
प्रलापश्चारतिर्मूर्च्छा तृष्णा दाहोऽतिर्घूर्णता ॥२७॥
मुखेन प्रस्त्रवेद्रक्तं तथा घ्राणेन चक्षुषा ।
कण्ठे घुर्घुरकं कृत्वा श्वसित्यत्यर्थवेदनम् ॥२८॥
मसूरिकाभिभूतस्य यस्यैतानि भिषग्वरै: ।
लक्षणानि च दृश्यन्ते न दद्यादव भेषजम् ॥२९॥
मा. वि. मसूरिका पान ३५९.

सर्वमसूरिकाया आवस्थिकं लिड्गमाह - कास इत्यादि ।
ज्वरस्तीव्र: सुदारुण इति अत्र सुदारुण इति परेण
संबध्यते, तेन सुदारुण: प्रलाप: । अतिघूर्णता: जिह्यायनम् ।
तया घ्राणेन चक्षुष्येत्यत्र रक्तं स्त्रवेदिति संबध्यते ।
श्वसितीति श्वासो भवति ॥२७ ते २९॥

मा. नि. मसूरिकानिदान म. टीका पा. ३५९

कास, हिक्का, प्रमोह, तीव्रज्वर, प्रलाप, अरति, मूर्च्छा, तृष्णा, दाह, डोकें हातपाय सारखे हलविणें (घूर्णता), तोंड, नाक, डोळे यांतून रक्त येणें, घशामध्यें घुरघुर असा आवाज होणें, श्वास घेतांना अतिशय कष्ट होणें, हे विकार मसूरिका व्याधींत उपद्रव म्हणून होतात. मूळ वचनांत जरी या विकारांना लक्षण म्हटलें असलें तरी औषधांचा उपयोग न होण्याइतकी तीव्रता त्यांना असते हेंही सांगितलें आहे. टीकाकार त्यांना आवस्थिक मानतो. त्यावरुन त्याचें विशेष स्वरुप छक्षांत येतें. हे विकार उपद्रव स्वरुप आहेत असें आम्हांस वाटतें.

उदर्क

विरुपता, इंद्रियघात, विशेषकरुन अंधत्व.

साध्यासाध्यविवेक

त्वग्गता रक्तजाश्चैव पित्तजा: श्लेष्मजास्तथा ।
श्लेष्मपित्तकृताश्चैव सुखसाध्या मसूरिका: ॥२३॥
मा. नि. मसूरिका २३ पा. ३५८

वातजा वातपित्तोत्था: श्लेष्मवातकृताश्च या: ।
कृच्छ्रसाध्यतमास्तस्माद्यत्नादेता उपाचरेत् ॥२४॥
असाध्या: सन्निपातोत्थस्तासां वक्ष्यामि लक्षणम् ।
प्रवालसदृशा: काश्चित् काश्चित् काश्चिज्जम्बूफलोपमा: ॥२५॥
लोहजालसमा: काश्चिदतसीफलसंनिभा: ।
आसां बहिविधा वर्णां जायन्ते दोषभेदत: ॥२६॥
मा. नि. मसूरिका २४ ते २६ पा. ३५९

पित्तज, कफज आणि कफपित्तज मसूरिका साध्य असतात. त्वग्‍गत आणि रक्तगतमसूरिकाही साध्य ठरतात. वातज, वातपित्तज, वातकफज, आणि मांसगत मसूरिका या कष्टसाध्य असतात. सान्निपातिक, मेदोस्थिमज्जागत, शुक्रगत मसूरिका असाध्य असतात. ज्या मसूरिकांचा वर्ण दोषभेदानें पोवळे, जांभूळ, लोखंडी खडें, जवसाचीं बोंडें यांच्या-सारखा असतो, त्या मसूरिकाही असाध्य होतात.

रिष्ट लक्षणें

मसूरिकाभिभूतो यो भृशं व्राणेन नि:श्वसेत‍ ।
स भृशं त्यजति प्राणान् तृषार्तो वायुदूषित: ॥३०॥
मसूरिकान्ते शोथ: स्यात् कूर्परे मणिबन्धके ।
तथांऽसफलके चापि दुश्चिकित्स्य: सुदारुण: ॥३१॥
मा. नि. मसूरिका ३०-३१ पा. ३६०

तृष्णा, श्वास, मोह, अरति, घोरज्वर, कोपर मनगट व खांदे या ठिकाणीं शोथ, हीं लक्षणें तीव्र स्वरुपानें झाल्यास रोगी वांचत नाहीं. वातप्रकोपाचीं इतर लक्षणेंही रिष्टच समजावींत.


चिकित्सा सूत्रें

विसर्पशान्त्यै विहिता क्रिया या तां तेषु कुष्ठेशु हितां
विदध्यात् ।
च. चि. १२-९३

मसूरिकायां कुष्ठोक्ता प्रलेपादि क्रिया हिता ।
पित्तश्लेष्मविसर्पोक्ता क्रिया चात्र प्रशस्यते ॥३५॥
वंगसेन पा. ६७६

सर्वासां वमनं पूर्वंं पटोलारिष्टवासकै: ।
कषायैश्च वचावत्सयष्टयाह्वफलकल्कितै: ॥४१॥
वंगसेन पा. ६७६

कृमिपातभयाच्चापि धूपयेत्सरलादिभि: ।
वेदनादाहशान्त्यर्थ स्त्रुतानां च विशुद्धये ॥
वंगसेन पा ६८१

मसूरिकेमध्यें कुष्ठ आणि विसर्पाप्रमाणें व पित्तकफ दोषांना अनुसरुन चिकित्सा करावी. तिक्तरसात्मक वमन द्यावें व धूपन करावें, मसूरिका स्त्रावयुक्त होऊन त्या ठिकाणीं व्रण उत्पन्न झाल्यानंतर लेप करावा. मसूरिका पित्तप्रधान असल्यास त्या ठिकाणीं शोधन न करतां तर्पण करावें (यो. र. ७२२ पान)

कल्प

निंब, गुडूचि, सारिवा, मंजिष्ठा, कुटकी, चंदन खदिर, आमलकी, हरितकी जेष्टिमध, पटोल, परिपाठा (गुग्गूळ निंबपत्र यवानी, चंदन, देवदार धूपनासाठीं) तिक्तपंचक, प्रवाळ, मौक्तिक, केळीचें बी. परिपाठादि काढा, श्लेष्मांतक, पर्पटादि काढा, चंद्रकला रस, सूतशेखर, आरोग्यवर्धिनी.

पथ्यापथ्य

विसर्पाप्रमाणें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP