``रुजस्तीव्रा: ससन्तापा वैवर्ण्य कृशताऽरुचि: ।
गात्रे चारुंषि भुक्तस्य स्तम्भश्चासृग्गतेऽनिले ॥१६॥
असृग्गवातलक्षणमाह - रुज इत्यादि । अरुंषि व्रणा:
भुक्तस्य स्तम्भो भुक्तवतो गात्रस्तम्भ:, संतर्पणेन
रक्तस्य वृद्धे: । अन्ये त्वसृग्गतवातलक्षणं न पठन्ति
वातरक्तेन सहाभेदात्; तन्न, अत्र दुष्टो वायू रक्तेनावृत:
कुप्यति, वातरक्ते तु स्वकारणादुभावपि हस्त्यादिगमन-
कुपितौ विशिष्टसंप्राप्त्या हस्तपादगतावेव वातरक्ताख्यं
विकारं जनयत इति ॥१६॥
मा. नि. वातव्याधि म. टीकेसह पान १९७
वायू रक्तगत झाला असतां तीव्र स्वरुपाच्या वेदना, संताप, वैवर्ण्य, कृशता, अरुची, शरीर व्रणयुक्त होणें व खाल्लेलें न पचणें अशीं लक्षणें असतात. टीकाकारानें `भुक्तस्य स्तंभ: । या शब्दानें खाल्ल्यानंतर संतर्पनाणानें रक्ताची वृद्धी होऊन शरीरावय ताठतात असा अर्थ केला आहे. गात्र शब्दाने टीकाकाराने रक्तवाहिन्या गृहीत धरल्या असल्या व स्तंभ शब्दानें त्यांचा लवचिकपणा उणावतो असें सुचविले असावें. रक्ताचा आणि अग्नीचा संबंध असल्यामुळें अन्न पचत नाहीं, तसेंच पडून राहतें असा अर्थ करणेंहि योग्य वाटतें. रक्तगतवातामध्यें रक्तदुष्टी ही महत्त्वाची नसल्यामुळें वातरक्तांतील संप्राप्तीपेक्षां येथील संप्राप्ती निराळी आहे. या ठिकाणीं वाताचा प्रकोप व रक्ताचें वैगुण्य असतें. रक्तगतवात हें वर उल्लेखिलेल्या तीव्र स्वरुपाच्या वेदना इत्यादि लक्षणसमुच्चय ज्या वेळीं स्वतंत्र असेल त्या वेळीं रक्तगतवात हा एक व्याधी ठरेल. परंतु व्रण उत्पन्न होणें, कृशता येणें, अन्नाला रुची नसणें, अन्न न पचणें, तसेंच पडून राहणें, अवयव ताठणें इत्यादि लक्षणें ज्या वेळीं इतर व्याधीच्या लक्षणसमुच्चयांत उत्कटतेनें असतील, त्यांना विशिष्ट अवस्थेंचे वा उपद्रवाचें स्वरुप प्राप्त झालें असेल त्या वेळीं वरील लक्षणांना वात रक्तगत होणें, ही संप्राप्ती आहे असें म्हणतां येतें. रक्तगतवात हा स्वतंत्र व्याधी म्हणून आढळतो त्यापेक्षां, उपद्रवांची या अवस्थांतराची संप्राप्ती या स्वरुपांतच त्याचा प्रत्यय अधिक वेळां येतो असें म्हटलें पाहिजे. या रक्तगत वाताच्या प्रकरणामध्यें आम्हीं जें वरील वर्णन केलें आहे तें सर्वच धातुगतवाताच्या प्रकरणींही सत्य आहे असें आम्हांस वाटतें, हा व्याधी कष्टसाध्य वा असाध्य आहे.
चिकित्सा
सारिवा, शतावरी, सर्पगंधा, मंजिष्ठा, कारस्कर, सुंठी, पिप्पली, पिप्पलीमूळ, गंधकरसायन, सू. त्रिफळा, शतावरीमंडूर, तिक्तकघृत, बलातेल, सूतशेखर.