रक्तवहस्त्रोतस् - शीतला

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


देव्या शीतलया क्रांता मसूर्य: शीतला बहि: ॥
ज्वरयेयुर्थधा भूताधिष्ठितो विषमज्वर: ।
सा च सप्तविधा ख्याता तासां भेदान् प्रचक्ष्महे ॥
ज्वरपूर्वा बृहत्स्फोटै: शीतला बृहती भवेत् ।
सप्ताहान्नि:सरत्येव सप्ताहात्पूर्णतां व्रजेत् ॥
ततस्तृतीये सप्ताहे शुष्यति स्खलति स्वयम् ।
तासां मध्ये यदा काचित्पाकं गत्वा स्फुटेत् स्त्रवेत् ।
भावप्रकाश पान ६८२

शीतला नांवाच्या ग्रहबाधेनें उत्पन्न होणारा मसूरिकेच्या विस्फोटाप्रमाणें व कांहीसें स्वरुप असलेला असा हा व्याधी आहे. लौकिकांत या व्याधीस कांजिण्या असें म्हणतात. व्याधीचें स्वरुप बहुधा सौम्य, आणि बहिर्वेगी असें असतें. या व्याधीचें सात प्रकार सांगितलेले आहेत.

(१) त्यांतील पहिला प्रकार बृहती शीतला या नांवाचा असून त्यांत पूर्व रुपामध्यें व रुपामध्येंही ज्वर असतो. इतर लक्षणें विशेषशीं नसतात. अंगावर आलेले विस्फोंट आकारानें मोठे असतात. हे स्फोट पहिल्या आठवडयांत उत्पन्न होतात, दुसर्‍या आठवडयांत अंगावर राहतात आणि तिसर्‍या आठवडयांत सुकून नाहींसे होतात. अगदीं क्वचित् यांचेमध्यें पाक होऊन फोड फुटून त्यांतून स्त्राव वहातो.

(२) मसूरिकेंतील कोद्रवाचें वर्ण हा शीतलेचा दुसरा प्रकार आहे.

उष्मणा तूष्मजारुपा सकण्डू: स्पर्शनप्रिया ॥
नाम्ना पाणिसहाख्याता सप्ताहाच्छुष्यति स्वयम् ॥
चतुर्थी सर्षपाकारा पीतसर्पवर्णिनी ॥
नाम्ना सर्पपिका ज्ञेयाऽभ्यड्गमत्र विवर्जयेत् ।
एषा भवति बालाना मुखे शुष्यति च स्वयम्
भावप्रकाश पान ६८१

(३) तिसरा प्रकार `पाणिसहा'. उष्णतेमुळें उत्पन्न झालेली ही शीतला कंडूयुक्त व मोहोरीच्या आकाराची असते. सात दिवसांमध्यें ही सुकते.

(४) सर्पपिका हा चवथा प्रकार होय. ही आकारानें व स्वरुपानें किंचित् पीतवर्ण असलेल्या पांढर्‍या मोहरीसारखी असते.

(५) उष्णतेमुळें उत्पन्न होणारी `राजिका' ही शीतला, उष्णतेमुळें विशेषत: बालकांच्यामध्यें तोंडावर उत्पन्न होते. हिचें स्वरुप तांबडया मोहोरीसारखे असतें. ही आपोआप सुकते. (हिलाच `दु:खकोद्रवा' असें नांव आहे. नानल)

कोष्ठवत् जायते षष्ठी लोहितोन्नमण्डला ॥
ज्वरपूर्वा व्यथायुक्ता ज्वरस्तिष्ठेद्दिनत्रयम् ॥
स्फोटानां मेलनादेषा बहु स्फोटाऽपि दृश्यते ॥
एकस्फोटे च कृष्णा च बोद्धव्या चर्मजाभिधा ॥
भावप्रकाश पान ६८२

(६) ही शीतला कोठाप्रमाणें किंचित् उंच, चपटी व आकारानें मोठी व आरक्तवर्ण अशी असते. तिच्यामध्यें ज्वर व वेदना अशीं लक्षणें असतात. ज्वर तीन दिवसांनीं उतरतो. (या शितलेस मगध देशामध्यें `हाम' असें म्हणतात. )

(७) शीतलेचा सातवा प्रकार `चर्मला' असा आहे. यामध्यें निरनिराळे फोड एकत्र येऊन मिळून, त्यांचा एकच मोठा फोड बनतो. क्वचित् कृष्णवर्णाचे फोड सुटेही राहतात.

काश्चिद्विनाऽपि यत्नेन सुखं सिध्यन्ति शीतला: ॥५॥
दुष्टा: कष्टतरा: काश्चित्काश्चित्सिध्यन्ति वा न वा ॥
काश्चिन्नैव तु सिध्यन्ति यत्नतोऽपि चिकित्सिता: ॥६॥
यो. र. पान ७२६

बहुतेक सर्व शीतला सुखसाध्य असून त्यांना उपचारांची गरज असत नाहीं. त्या आपोआपच बर्‍या होतात. ज्वरादिलक्षणें जास्त असल्यास या व्याधींवर उपचार करावे. क्वचित् बहुस्फोटा, चर्मजा प्रकाराची शीतला असाध्यही होते.

चिकित्सा

मसूरिकेप्रमाणें करावी. मसूरिका, रोमांतिका व शीतला (देवी, गोंवर कांजिण्या) हे तीनही व्याधी बालकांना अधिक प्रमाणांत होतात आणि त्यांचा प्रसार संसर्गानें होतो, हे रोग साथीनेंही येतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP