व्याख्या
फिरंगसंज्ञके देशे बाहुल्येनैव यद्भवेत् ॥
तस्मात्फिरंग इत्युक्तो व्याधिर्व्याधिविशारदै: ।
भावप्रकाश पान ६७३
फिरंग देशांत उत्पन्न झाल्यामुळें या व्याधीला फिरंग अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे.
गन्धरोग: फिरंगोऽयं जायते देहिनां ध्रुवम् ॥
फिरंगिणोऽड्गसंसर्गात्फिरंगिण्या प्रसंगत: ॥
व्याधिरागन्तुजो ह्येष दोषाणामत्र संक्रम: ।
भवेत्तल्लक्षयेदेषां लक्षणैर्भिषजां वर: ॥
भावप्रकाश पान ६७३
हा व्याधी आगंतू स्वरुपाचा व संसर्गानें बाधणारा आहे. फिरंगानें पीडित स्त्री-पुरुषांच्या संसर्गानें परस्परांना होणारा असा हा व्याधी (आगंतु) आहे.
संप्राप्ति
या व्याधीमध्यें दोषदुष्टी ही आगंतु कारणाचे मागून होते. या आगंतू कारणानें तीनही दोष प्रकुपित होतात. त्यांत कफाचें प्राधान्य असतें. ते रक्तास दुष्ट करुन स्फोट उत्पन्न करतात. हा स्फोट संसर्गस्थलींच उत्पन्न होतो. व्याधीचा उद्भव रक्तामध्यें होतो. अधिष्ठान, व्याधीच्या गंभीरतेला अनुसरुन त्वचा, रक्त, मांस, अस्थि, मज्जा या धातूंच्या ठिकाणीं असतें व संचार सर्व शरीरांत होऊं शकतो.
प्रकार
फिरंगस्त्रिविधो ज्ञेयो बाह्य आभ्यन्तरस्तथा ॥
बहिरन्तर्भवश्चापि तेषां लिंगानि च ब्रुवे ॥४॥
तत्र बाह्यफिरंग: स्याद्विस्फोटसदृशोऽल्परुक् ।
स्फुटितो व्रणवद्वेद्य: सुखसाध्योऽपि स स्मृत: ॥५॥
संधिष्वाभ्यन्तर: स स्यादामवात इव व्यथाम् ।
शोथश्च जनयेदेष कष्टसाध्यो बुधै: स्मृत: ॥६॥
भावप्रकाश ६७४
फिरंग या व्याधीचे बाह्य, अभ्यंतर, आणि बाह्याभ्यंतर असे तीन प्रकार आहेत. यांतील बाह्य फिरंगामध्यें त्वचेवर स्फोट उत्पन्न होतात. त्यामध्यें वेदना फारशा नसतात. बाह्यफिरंग हाच कालांतरानें वा उपेक्षेनें अभ्यंतर होतो, सर्व संधींत राहतो आणि त्यामध्यें आमवाताचीं सर्व लक्षणें दिसतात. बाह्याभ्यंतर फिरंगामध्यें त्वचेवर कुष्ठासारखीं लक्षणें दिसतात. ग्रंथी उत्पन्न होतात व बाह्य आणि अभ्यंतर फिरंगाईं इतर लक्षणें उत्पन्न होतात. अभ्यंतरफिरंगाचा परिणाम म्हणून शुक्रदुष्टी होते. त्यामुळें स्त्री व गर्भ वा दोघांनाही पीडाच होते. गर्भस्त्राव, गर्भपात, मृतापत्यता, वंध्यत्व, नपुंसकत्व प्राप्त होतें.
उपद्रव
कार्श्य बलक्षयो नासाभंगो यह्नेश्च मंदता ॥
आस्थिशोषोऽस्थिवक्रत्वं फिरंगोपद्रवा अमी ॥
भावप्रकाश ६७४
या फिरंगामध्यें अभ्यंतर या अवस्थेनंतर धातुगतावस्था उत्पन्न होते व तिचा परिणाम म्हणून कार्श्य, वेदना, संधिशूल, बलक्षय, नासाभंग, अग्निमांद्य, अस्थिशीष, आणि अस्थिवक्रत्व असे उपद्रव होतात.
बहिर्भवा भवेत्साधो नवीनो निरुपद्रव: ।
आभ्यन्तरस्तु कष्टेन साध्य: स्यादयमामथ: ॥
बहिन्तर्भवो जीर्णो क्षीणस्योपद्रवैर्युत: ॥
व्याप्तो व्याधिरसाध्योऽयमित्याहुर्मुनय: पुरा ॥
भावप्रकाश ६७४ पान.
फिरंग बाह्य अवस्थेंत अगदीं नवीन व निरुपदव असतांना साध्य असतो. इतर प्रकार कष्टसाध्य आहेत. जीर्ण व उपद्रवयुक्त फिरंग असाध्य आहे.
चिकित्सा
रसकर्पूर, समीरपन्नग, मल्लसिंदूर, व्याधिहरण, सुवर्णराजवंगेश्वर, चोपचिनी सारिवा, मंजिष्टा, हरिद्रा, निंब, कज्जलीमलम, गंधकरसायन.
अपथ्य
विदाही व अभिष्यंदी पदार्थ बंद करावे.