१.
'वाग्दान' (वाच् + दान) अथवा वाङ्निश्चय (वाच् + निश्चय) म्हणजे 'वधू आणि वर यांच्या पालकांनी विवाहनिश्चितीचे अभिवचन देणे' होय. अष्टविवाह प्रकारात प्रधान अशा परंपरागत 'ब्राह्मविवाह' विधीचा प्रारंभ वाङ्निश्चयाने होतो. प्रसुत्त वाङ्निश्चय विधी गृह्य परिशिष्टात सविस्तर वर्णिला असून, महाराष्ट्रात सर्वत्र तो श्रद्धापूर्वक केला जातो.
२.
वाङ्निश्चयास जाण्यापूर्वी म्हणावयाचे मंत्र
वाङ्निश्चयार्थ वधुगृही जाण्यास निघण्यार्वी वरगृही ऋग्वेदाच्या दशम मंडलातील सुप्रसिद्ध विवाह सूक्तातील
अनृक्षरा ऋजवः सन्तु पन्था येभिः सखायो यन्ति नो वरेयम् ।
समर्यमा सं भगो नो निनीयात् सं जास्पत्यं सुयममस्तु देवाः ॥१॥
प्र त्वा मुञ्चामि वरुणस्य पाशाद् येन त्वाबध्नात् सविता सुशेवः ।
ऋतस्य योनौ सुकृतस्य लोकेऽरिष्टा त्वा सह पत्या दधामि ॥२॥
प्रेतो मुञ्चामि नामुतः सुबद्धाममुतस्करम् ।
यथेयमिन्द्र मीढ्वः सुपुत्राः सुभागासति ॥३॥
पूषा त्वेतो नयतु हस्तगृह्याऽश्विना त्वा प्र वहतां रथेन ।
गृहान् गच्छ गृहपत्नी यथासो वशिनी त्वं विदथमा वदासि ॥४॥
इह प्रियं प्रजया ते अमृध्यतामस्मिन् गृहे गाहैपत्याय जागृहि ।
एना पत्या तन्वंसं सृजस्वाऽधा जिव्री विदथमा वदाथः ॥५॥
(ऋ. -१०.८५.२३-२७)
मंत्राने प्रारंभ होणारे वधू-वरांना आशीर्वचनपर असे पाच मंत्र पठण करतात.
३.
कन्यास्वीकृती प्रार्थना
वरपक्षाची सर्व मंडळी वधूगृही पोहोचल्यानंतर, आणि वधूपित्याने त्यांचे यथोचित स्वागत केल्यानंतर, वस्त्रालंकारभूषित वधूस वस्त्रभूषित पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवावी. वधूच्या हातात विडानारळ द्यावा तदनंतर वरपक्षी यांनी पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख बसून, गणपती आदि इष्ट देवतांचे स्मरण करावे.
तदनंतर वरपित्याने
अमुक प्रवरान्वितामुकगोत्रोत्पन्नाय, अमुक प्रपौत्राय, अमुकपुत्राय अमुक नाम्ने वराय, अमुक प्रवरोपेतां, अमुकगोत्रोत्पन्नाम्, अमुकप्रपौत्री, अमुकपौत्री, अमुकपुत्री, अमुक नाम्नी कन्याम् भार्यात्वाय वृणीमहे ॥६॥
मंत्र म्हणून 'अमुक वरासाठी अमुक कन्या आम्ही स्वीकारतो', असा मनोदय व्यक्त करावा.
वरपित्याचा उपरोक्त मनोदय ऐकून वधूपित्याने आपली पत्नी, तसेच अन्य ज्ञातिबांधव यांची संमती घ्यावी, आणि तदनंतर वरपक्षास 'वधूचा स्वीकार करावा; (वृणीध्वम्) अशी प्रार्थना करावी.
अशा तर्हेने आणखी दोन वेळा वरपक्षीयांनी वधूचा स्वीकार करण्याचा मनोदय व्यक्त करावा, आणि वधूपित्याने
(भार्याज्ञातिबन्ध्वनुमति कृत्वा वदेत् ) "वृणीध्वम्" । (एवं पुनर्द्विः प्रयुज्य चोच्चैस्त्रिर्वदेत्) "प्रदास्यामि"।
अशी प्रार्थना करावी. तदनंतर 'कन्यादान करतो'
( ततो वरपित्रादिर्गंधाक्षतवस्त्रयुग्म-भूषण-तांबूलपुष्पादिभिः कन्यां पूजयेत् । ततः कन्यादाता प्राड्मुखः कन्यावामत उपविश्य आचमनं देशकालस्मरणं च कुर्यात् )
असे वधू पित्याने मोठ्या आवाजात तीन वेळा म्हणावे.
तदनंतर वरपक्षीयांनी वधूचे हळदी-कुंकू, गंध, अक्षता, साडीचोळी,अलंकार सुगंधी पुष्पे, आणि शर्करादि भक्ष्य पदार्थ यांचे साह्याने पूजन करावे.
नंतर वधूपित्याने पूर्व दिशेस तोंड करून बसावे, आणि वधूस स्वतःचे डाव्या बाजूस बसवून देशकालादिकांचे स्मरण करावे.
४.
संकल्प
"करिष्यमाण-विवाहांगभूतं वाग्दानमहं करिष्ये । तदंगं गणपतिपूजनं वरुणपूजनं च करिष्ये ।
वधूपित्याने 'माझ्या कन्येच्या विवाहाच्या अंगभूत वाङ्निश्चय आणि गणपति व वरुणपूजन करतो', असा संकल्प सोडावा.
५.
गणपति-वरुणपूजन
प्रारंभी
गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥ (ऋ. २.२३.१)
मंत्राने गणपतीचे पूजन करावे. प्रस्तुत मंत्राचा रचयिता ऋषी शौनक गृत्समद हा असून, गणपती ही त्याची देवता, आणि जगती हा छंद आहे. गणपतिपूजनासाठी हा मंत्र म्हणतात.
नंतर
मही द्यौः पृथिवी च न इमं यज्ञं मिमिक्षताम् ।
पिपृतां नो भरीमभिः ॥ (ऋ. १.२२.१३)
मंत्राने कलशस्थित जलपूजन (कलशपूजन) करावे. प्रस्तुत मंत्राचा मेधातिथि काण्व हा रचयिता ऋषी, द्यावापृथ्वी या देवता, आणि गायत्री हा छंद आहे. जलपूजनासाठी हा मंत्र म्हणतात.
६.
वाङ्निश्चय मंत्र
नंतर वधूपित्याने स्वतःचे पाटावरून उठून त्या जागी वरपित्यास (अथवा वरपक्षातील मुख्य व्यक्तीस) बसवावे; आणि आपण स्वतः त्याच्यापुढे पश्चिमेकडे तोंड करून बसावे. नंतर वधूपित्याने वरपित्याची गंध, फुले, विडा इत्यादिकांनी पूजा करावी. तदनंतर वरपित्याने वधूपित्याची याच धर्तीवर पूजा करावी.
तदनंतर वधूपित्याने हातामध्ये पाच सुपार्या आणि हळकुंडे घ्यावीत, आणि
अमुक प्रवरान्विताय, अमुकगोत्राय, अमुकप्रपौत्राय, अमुकपौत्राय, अमुकपुत्राय, अमुकनाम्ने वराय-
अमुक प्रवरान्विताम् अमुक गोत्रोत्पन्नाम् अमुक प्रपौत्रीम् अमुकपौत्रीम् अमुकस्य मम पुत्रीम् अमुक नाम्नीम् इमां कन्यां ज्योतिर्विदादिष्टे शुभे मुहूर्ते दास्ये ॥
मंत्र म्हणून अमुक वराला माझी अमुक कन्या अमुक मुहुर्तावर देईन, असे वाणीने सांगतो', (वाचा संप्रददे = वचन देतो) असे म्हणावे. तदनंतर-
अव्यंगेऽपतितेऽक्लीबे दशदोषविवर्जिते ।
इमां कन्यां प्रदास्यामि देवाग्निद्विजसन्निधौ ॥
मंत्र म्हणून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरामय अशा वरास आपली कन्या देण्याच्या अभिवचनाचा पुनुरुच्चार करावा.
तदनंतर
तदस्तु मित्रावरुणा तदग्ने शं योरस्मभ्यमिदमस्तु शस्तम् ।
अशीमहि गाधमुत प्रतिष्ठां नमो दिवे बृहत सादनाथ ॥ (ऋ. ५. ४७.७)
आणि
गृहा वै प्रतिष्ठासूक्तं, तत्प्रतिष्ठित मया वाचा शंस्तव्यं, तस्मातद्यद्यपि दूर इव पशूंल्लभते गृहानैव वै नाना जिगमिषति, गृहा हि पशूनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा ॥
हे दोन मंत्र म्हणून, वधूपित्याने वरपित्याच्या पदरात स्वतःच्या हातातील सुपार्या आणि हळकुंडे बांधावीत, आणि त्या वस्त्राच्या गाठीवर गंधाक्षता वहाव्यात.
तदनंतर वरपित्यानेही हळकुंडे आणि पाच सुपार्या हाती घ्याव्यात. त्यावर गंधाक्षता आणि फूल वाहून, आणि
अमुकगोत्र अमुकवरविषये भवन्तो निश्चित भवन्त्विति, दातृवस्त्रप्रान्ते प्रक्षेपादि कुर्यात् ॥
हा मंत्र पठण करून या दोनही वस्तू वधूपित्याच्या पदरात बांधाव्यात.
कन्यापित्याने
वाचा दत्ता मया कन्या, पुत्रार्थं स्वीकृता त्वया ।
कन्यावलोकनविधौ निश्चितस्त्वं सुखी भव ॥
हा श्लोक म्हणावा, आणि तदनंतर वरपित्यानेही
वाचा दत्ता त्वया कन्या, पुत्रार्थं स्वीकृता मया । वरावलोकनविधौ निश्चितस्त्वं सुखी भव ॥
हा श्लोक स्वतः उच्चारावा.
वराचा पिता मृत असून त्याचा ज्येष्ठ बंधू अथवा मित्र पित्याचे जागी विवाहकार्य चालवीत असेल, तर त्याने 'आपल्या बंधूसाठी अथवा मित्रासाठी कन्येचा स्वीकार करतो', असे म्हणावे.
नंतर ब्राह्मणांनी
शिवा आपः सन्तु । सौमनस्यमस्तु । अक्षतं चारिष्टं चास्तु । दीर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । एतद्वः सत्यमस्तु ।
ॐ समानी व आकूतिः समाना ह्रदयानि वः ।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥ (ऋ. १०.१९१.४)
ॐ प्र सु ग्मन्ता धियसानस्य सक्षणि वरेभिर्वरा अभि षु प्रसीदतः ।
अस्माकमिन्द्र उभय जुजोषति यत् सोम्यस्यान्धसो बुबोधति ॥ (ऋ. १०.३२.१)
आदि आशीर्वचनपर मंत्र पठण करावेत.
७.
शचीपूजन
वधूपित्याने एका पात्रात तांदूळ घालून त्यावर शचीचे आवाहन करावे, आणि तिची षोडशोपचार पूजा करावी.
वधूने
देवेन्द्राणि नमस्तुभ्यं, देवेन्द्र-प्रियभामिनि ।
विवाहं भाग्यमारोग्यं, पुत्रलाभं च देहि मे ॥
श्लोकाने शचीची प्रार्थना करावी. सुवासिनींनी शचीला निरांजनाने औक्षण करावे.
८.
नंतर वर आणि वधू अशा उभयपक्षांनी ब्राह्मणांची गंधादिकांच्या साह्याने पूजा करून त्यास दक्षिणा द्यावी. त्यावर ब्राह्मणांनी
ॐ हिङ्कृण्वती वसुपत्नी वसूनां वत्समिच्छन्ती मनसाभ्यागात् ।
दुहामश्विभ्यां पयो अघ्न्येयं सा वर्धतां महते सौभगाथ ॥
ॐ वनस्पते शतवल्शो वि रोह सहस्त्रवल्शा वि वय रुहेम ।
यं त्वामयं स्वधितिस्तेजमानः प्रणिनाय महते सौभगाय ॥
ॐ इन्दुर्देवानामुप सख्यभायन् त्सहस्त्रधारः पवते मदाय ।
नृमिः स्तवानो अनु धाम पूर्वमगन्निद्रं महत सौभगाय ॥
ॐ अस्य पिब क्षुमतः प्रस्थितस्येन्द्र सोमस्च वरमा सुतस्य ।
स्वस्तिदा मनसा मादयस्वाऽर्वाचीनो रेवते सौभगाय ॥
ॐ घृतादुल्लुप्तं मधुमत्सुवर्ण धनंजयं धरुण धारयिष्णु ।
ऋणक्सपत्ना दधरंश्चकृण्वदारोह मां महते सौभगाय ॥
ॐ तदस्तु मित्रावरुणा तदग्ने शं योरस्मभ्यमिदमस्तु शस्तम् ।
अशीमहि गाधमुत प्रतिष्ठां नमो दिवे बृहते सादनाय ॥
आदि आशीर्वचनपर वैदिक मंत्रांचे पठण करावे.
उपरोक्त आशीर्वचन मंत्र पठण करून झाल्यानंतर वधुपक्षीय आणि वरपक्षीय मंडळींनी एकत्रपणे आपापल्या घरी जावे.
येथे वाङ्निश्चय विधी संपला.