विवाहानंतर वराने नववधूसह 'गृहप्रवेश' केल्यानंतर विवाहाग्नीला गृह्यत्व आणण्यासाठी 'गृहप्रवेशनीय होम' करावा. 'गृहप्रवेशाला' फार उशीर झाला असेल (म्हणजेच मध्यरत उलटून गेली असेल), तर हा होम दुसर्या दिवशी करावा. त्याबाबतचा शास्त्रार्थ पुढीलप्रमाणे -
अर्धरात्रै व्यतीते तु, परेद्युः प्रातरेव हि ।
गृहप्रवेशनीयास्यादिति यज्ञविदो विदुः ।
(गृहप्रवेशास मध्यरात्र उलटून गेली असता 'गृहप्रवेशनीय होम' दुसर्या दिवशी सकाळी करावा, असे यज्ञवेत्यांचे मत आहे.)
१.
प्रारंभिक
वराने सर्वप्रथम आचमन, प्राणायाम आणि देशकालादिकांचे स्मरण करावे.
२.
गणपतीपूजन
तदनंतर वराने वधूसह आसनावर बसून देशकालोच्चारण करून, नवपरिणीत वधूसह घरात प्रवेश करण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ, गृहप्रवेश विधीचा एक भाग म्हणून गणपतीपूजन, आणि पुण्याहवाचन करावे.
३.
महालक्ष्मीपूजन
गणपतीपूजन आणि पुण्याहवाचनानंतर
ॐ सक्तुमिव तितउना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रत ।
अत्रा सखायः सख्यानि जानते भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधि वाचि ॥
मंत्राने महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करावी.
४.
वधूचे नामकरण
नंतर वराने नवपरिणीत वधूचे वहिवाटीप्रमाणे सासरचे नवे नाव ठेवावे.
५.
आशीर्वचन मंत्र
नंतर ब्राह्मणांनी नवपरिणीत वधूवरांना उद्देशून
अविधवा भव वर्षाणि शतं साग्रं तु सुव्रता ।
तेजस्वी च यशस्वी च धर्मपत्नी पतिव्रता ॥
इन्द्रस्य तु यथेन्द्राणी श्रीधरस्य यथा श्रिया ।
शंकरस्य यथा गौरी तद्भर्तुरपि भर्तरि ॥
अत्रेर्यथानुसूया स्याद्वसिष्ठस्याप्यरुन्धती ।
कौशिकस्य यथा सती तथा त्वमपि भर्तरि ॥
ध्रुवैदि पोष्या मयि मह्यं त्वादाद्बृहस्पतिः ।
मया पत्या प्रजावति सं जीव शरदः शतम् ॥
जनयद्वहुपुत्राणि मा च दुःखं लभेत्कचचित् ।
भर्ता ते सोमपा नित्यं भवेद्धर्मपरायणः ॥
अष्टपुत्रा भव त्त्वं च सुभगा च पतिव्रता ।
भर्तुश्चैव पितुर्भ्रातु ह्रदयानंदिनी सदा ॥
आदि सहा आशीर्वचन मंत्र पठण करावेत.
येथे गृहप्रवेश विधी संपला.
गृहप्रवेश
१.
ऐरिणीप्रदान झाल्यानंतर वधूवरांनी वरगृही वाजतगाजत इष्टमित्रंसह समारंभाने यावे. घराजवळ आल्यावर वराने
इह प्रियं प्रजया ते समृध्यतामस्मिन् गृहे गार्हपत्याय जागृहि ।
एना पत्या तन्वं सृजस्वाऽधा जिव्री विदथमा वदाथः ॥
मंत्र म्हणत वधूसह स्वगृही प्रवेश करावा.
२.
संकल्प
तदनंतर वराने
मम विवाहाग्नेर्गृह्यत्वसिद्धिद्वार श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं गृहप्रवेशनीयहोमं करिष्ये ॥
३.
अग्निस्थापना
वराने आपल्या उजव्या हाताकडे बैलाचे एक ताजे चामडे पूर्वेकडे तोंड करून अंथरावे, आणि त्यावर वधूला बसवावी. नंतर चामड्यावर वधूशेजारी स्वतः बसवे.
येथून पुढे करावयाच्या यज्ञकार्यात वधूला सहभागी करण्यासाठी वराच्या हाताला हात लावण्यास तिला सांगावे.
अशा तर्हेने यथासांग आसनस्थ झाल्यानंतर वधूवरांनी अग्निस्थापना करावी.
४.
प्रधान होम
नंतर वधूवरांनी ऋग्वेद विवाहसूक्तातील
ॐ आनः प्रजां जनयतु प्रजापतिराजरसाय समनक्त्वर्यमा ।
अदुर्मङ्गलीः पतिलोकमा विश शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे स्वाहा ॥१॥
सूर्यासावित्र्या इदं न मम ।
ॐ अघोरचक्षुरपतिघ्न्येधि शिवा पशुभ्यः सुमनाः सुवचोः ।
वीरसूर्देवकामा स्योना शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे स्वाहा ॥२॥
ॐ इमां त्वमिन्द्र मीढ्वः सुपुत्रां सुभगा कृणु ।
दशास्यां पुत्रानां धेहि पतिमेकादशं कृधि स्वाहा ॥३॥
ॐ सम्राज्ञी श्वशुरे भव सम्राज्ञी श्वश्रवा भव ।
ननान्दरि सम्राज्ञी भव सम्राज्ञी अधि देवृषु स्वाहा ॥४॥
५.
ह्र्दयांजन
उपरोक्त आहुतीदानानंतर राहिलेले तूप वराने स्वतःच्या अंगुलीवर घ्यावे, आणि ऋग्वेद विवाहसूक्तातील
समञ्जन्तु विश्वे देवाः समापो ह्रदयानि नौ ।
सं मातरिश्वा सं धाता समु देष्ट्री दधातु नौ
मंत्राने स्वतःच्या आणि वधूच्या ह्रदयास लावावे. या मंत्राचा सूर्यासावित्री हा ऋषी, सूर्यासावित्री ही देवता, अनुष्टुभ् छंद आणि ह्रदयांजनासाठी विनियोग आहे.
६.
होमातील अवशिष्ट कर्मे
वधूवरांनी हात धुवून वैश्वदेव अथवा स्थालीपाक तंत्राने अवशिष्ट होम करावा.
नंतर घरातील सुवासिनींनी वधूवरांना ओवाळावे व त्यांची दृष्ट काढावी. घरातील कार्य निर्विघ्न पार पाडले, या आनंदाप्रीत्यर्थ ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे, आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
तदनंतर वधूवरांनी एकमेकांच्या सहवासात आनंदात उर्वरित दिवस व्यतीत करावा.
७.
अनेक देवतापूजन
विवाहाच्या दुसर्या दिवशी वधूवरांनी स्वतःस अप्सरा आणि गंधर्व मानून महादेवीचे पूजन करावे. विवाहाच्या तिसर्या दिवशी स्वतःस स्वाहा आणि अग्नि मानून कालिका देवीचे पूजन करावे. चौथ्या दिवशी पुनः एकवार मानवी पत्नी आणि पती बनून शांकरी देवीचे पूजन करावे. या सार्या विभिन्न देवतांचे नामोच्चरण करून षोडशोपचारे पूजा कराव्यात. त्यांना स्वतंत्र मंत्रांची आवश्यकता नाही.
गृहप्रवेशनीय होम झाल्यानंतर वधूवरांनी तीन दिवसांपर्यंत निरंतर उत्तम वस्त्रालंकार धारण करून वावरावे. याकाळात क्षार, धान्य आणि मीठ शक्यतो वर्ज्य करावे.
येथे गृहप्रवेशनीय होम संपला.
येथे विवाह संस्कार संपला.