१.
प्रास्ताविक
'मधु (मध) आणि दही यांचे एकजीव एकत्र मिश्रण म्हणजे 'मधुपर्क' होय. अशा या मधुपर्काच्या साह्याने वधूपित्याने केलेले वराचे पूजन म्हणजे 'मधुपर्क पूजन' होय.
या विधीसाठी वधूपित्याने स्वच्छ उदकाने भरलेला एक तांब्या, तसेच वराचे पाय धुण्यासाठी एक, अर्घ्यासाठी एक, अशी एकूण चार पात्रे घ्यावीत. याखेरीज एक मधुपर्क पात्र, कास्यपात्र (काशाचे भांडे), धेनू आणि 'विष्टर' (= पंचवीस दर्भाची खाली अग्रे करून डाव्या हाताकडे पीळ घातलेली दोरी) आदि साहित्यही सिद्ध ठेवावे.
वधूपित्याने स्वपत्नीसमवेत पूर्वाभिमुख बसावे. मंगलस्नान केलेल्या, नूतन वस्त्रमंडित, अलंकृत सुगंधी द्रव्ये आणि पुष्पमालाभूषित, तसेच भोजन करून तृप्त झालेल्या वधूला स्वतःच्या शेजारी 'प्रत्यङ्मुख' (= पूर्वाभिमुख) बसवावे. तदनंतर लग्नमंडपात आलेल्या वराला स्वतःसमोरील आसनावर पश्चिमाभिमुख बसवून त्याच्या शाखेनुसार त्याची 'मधुपर्क पूजा' करावी.
त्यासाठी सर्वप्रथम विवाह संस्कार विधीमध्ये मधुपर्क पुजनसमयी वधूला वराच्या समोर बसवण्यास सांगितले असले, तरी सद्यःकाळी तसे बसविण्याची चाल आढळत नाही. वधूपिता आणि त्याची पत्नी ही उभयताच 'मधुपर्क पूजन' करतात.
२.
संकल्प
वधूपित्याने आचमन आणि प्राणायाम करून देशकालादिकांचा उच्चार करावा. नंतर
"कन्यार्थिने गृहागतायास्मै स्नातकाय वराय कन्यादानाङ्गभूतं मधुपर्कं करिष्ये ॥१॥
असा मधुपर्कपूजनाचा संकल्प सोडावा.
३.
विष्टरप्रदान (आसन प्रदान)
तदनंतर पूर्वी सांगितलेला विष्टर घेऊन, आणि 'विष्टरो, विष्टरो,विष्टरः’ असा मंत्र म्हणून तो सन्मानपूर्वक वराला बसण्याकरिता वराच्या हातात द्यावा. तो हातात घेऊन वराने
ॐ अहं वर्ष्म सजातानां, विद्युतामिव सूर्यः ।
इदं नमधितिष्टामि यो माकश्चाभिदासति ॥२॥
असा मंत्र म्हणावा, आणि विष्टराची अग्रे उत्तरेस करून त्यावर बसावे, (अथवा, विष्टर हाती न घेता पायांनी अलिकडे घेऊन त्यावर बसावे.) 'अहं वर्ष्म' मंत्राचा वामदेव हा ऋषी, विष्टर ही देवता, अनुष्टुप् छंद, आणि विष्टरोपवेशनासाठी विनियोग आहे. 'विष्टर' म्हणजे 'आसन' होय.
४.
पाद्यप्रदान
वधूपित्याने पाय धुण्याच्या (पाद्य) जलाचे पात्र हाती घेऊन ते वराच्या स्वाधीन करावे. तदनंतर वराच्या हातून ते घेऊन स्वपत्नीच्या हाती ते द्यावे, आणि तिच्याकडून वराच्या पायावर पाणी घालावे.
तदनंतर वधूपित्याने स्वतः
अस्मिन राष्ट्रे श्रियमावेशाम्यतो देवीः प्रतिपश्याम्यापः ।
दक्षिणं पादमवनेनिजेस्मिन् राष्ट्र इन्द्रियं दधामि ॥
सव्यं पादमवनेनिजेऽस्मिन् राष्ट्र इन्द्रियं वर्धयामि ।
पूर्वमन्यमपरमन्यं, पादाववनेनिजे ॥
देवा राष्ट्रस्य गुप्त्या, अभयस्यावरुध्यै ॥
आपः पादावनेजनीर्द्विषन्तं, निर्दहन्तु मे ॥
मंत्र म्हणून वराचा अगोदर, उजवा, आणि मग डावा पाय धुवावा. पाय धुतल्यानंतर कोर्या वस्त्राने तो पुसावा.
५.
अर्घ्यप्रदान
वराने शुद्ध उदकाने आचमन करावे. वधूपित्याने अर्घ्याच्या पात्रात गंध, पुष्प, फल (सुपारी) घालून ते अर्घ्य वराच्या ओंजळीत
(गंधमाल्यफलादिसंयुक्तं पूर्ववत् ) "अर्घ्य, अर्घ्यं, अर्घ्यं प्रतिगृह्यताम्" (इति वराञ्जलो प्रक्षिपेत्)
मंत्र म्हणून घालावे.
६.
आचमनीयप्रदान
वधूपित्याने
'आचमनीय, आचमनीय, आचमनीय प्रतिगृह्यताम्'
असे तीनदा म्हणून आचमन करण्याचे पात्र वरापुढे ठेवावे. वराने
'प्रतिगृह्णामि'
असे म्हणून त्याचा स्वीकार करावा. तदनंतर वराने पात्रातील थोडे उदक आपल्या हातावर घेऊन, आणि
प्रतिगृह्णामि अमृतोपस्तरणमसि ।
हा मंत्र म्हणून ते प्राशन करावे. नंतर शुद्ध उदकाने पुन्हा एकवार आचमन करावे.
७.
मधुपर्क
वधूपित्याने वराला आणण्यासाठी मधुपर्कपात्र आपल्या हाती घयवे. तसे ते वधूपित्याच्या हाती असतानाच वराने
मित्रस्य त्वाचक्षुषा प्रतीक्षे ॥
म्हणून पात्रातील मधुपर्क पहावा. तदनंतर वधूपित्याने मधुपर्कपात्र
'मधुपर्को, मधुपर्को, मधुपर्कः'
म्हणून वराचे सम्मुख करावे.
वराने
'देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् ॥'
मंत्र म्हणून ते पात्र स्वतःच्या ओंजळीत घ्यावे, आणि
ॐ मधुवाता ऋतायते, मधु क्षरन्ति सिन्धवः ।
माध्वीर्नः सन्त्वोषधीः ॥
मधु नक्तमुतोषसो, मधुमत् पार्थिवं रजः ।
मधु द्यौरस्तु नः पिता ॥
मधुमान्नो वनस्पतिर्मधुमॉ अस्तु सूर्यः ।
माध्वीर्गावो भवन्तु नः ॥
मंत्र म्हणून हातातील मधुपर्काकडे पहावे.
(प्रस्तुत मंत्राचा गौतम राहूगण हा ऋषी, विश्वदेव ही देवता, गायत्री हा छंद आणी मधुपर्कवेक्षणासाठी विनियोग आहे.)
नंतर वराने मधुपर्क डाव्या हातात घ्यावे, आणि उजव्या हाताचा अंगठा आणि मधले बोट (अनामिका) यांचे साह्याने तो मधुपर्क तीन वेळा प्रदक्षिणेसमान दिशेने ढवळावा.
मग वराने उपरोक्त दोन बोटांन मधुपर्क विभिन्न दिशांना अर्पिण्याचा विधी करावा. त्यासाठी
'वसवस्त्वा गायत्रेण छंदसा भक्षयन्तु' मंत्र म्हणून पूर्वेकडे,
'रुद्रास्त्वा त्रैष्टुभेन छंदसा भक्षयन्तु"
मंत्र म्हणून दक्षिणेकडे,
'आदित्यास्त्वा जागतेन छंदसा भक्षयन्तु'
मंत्र म्हणून पश्चिमेकडे, आणि
'विश्वे त्वा देवा आनुष्टुभेन छंदसा भक्षयन्तु"
मंत्र म्हणुन उत्तरेकडे तीन वेळा मधुपर्क उडवावा.
नंतर वराने
'भूतेभ्यस्त्वा भूतेभ्यस्त्वा भूतेभ्यस्त्वा'
मंत्र म्हणून मधुपर्कपात्रातील मध्यभागीचा मधुपर्क तीन वेळा वर उडवावा.
नंतर वराने ते पात्र भूमीवर ठेवावे, आणि त्यातील थोडासा मधुपर्क हातावर घेऊन, आणि
'विराजो दोहऽसि'
मंत्र म्हणून तो प्राशन करावा. नंतर शुद्ध उदकाने आचमन करावे.
अशाच प्रकारे
'विराजो दोहमशीय'
आणि
'मयि दोहः पद्यायै विराजः'
मंत्र क्रमाने म्हणून मधुपर्क प्राशन करावा, आणि हरएक मंत्रपठणानंतर शुद्ध उदकाने आचमन करावे.
अशा प्रकारे तीन वेळा मधुपर्क प्राशन करून झाल्यानंतर उर्वरित मधुपर्क ब्राह्मणास द्यावा. परंतु तसे करणे लोकाचारदृष्ट्या अप्रशस्त असल्याने तो पाण्यामध्ये टाकावा.
नंतर वराने आचमनपात्रातील उदक हातावर घेऊन, आणि
'अमृतपिधानमसि'
मंत्र म्हणून तो प्राशन करावा.
वराने आचमनपात्रातील उदक घेऊन, आणि
'सत्यं यशः' श्रीर्मयि श्रीः श्रयताम् ॥
मंत्र म्हणून ते प्राशन करावे. नंतर शुद्ध उदकाने पुन्हा एकवार आचमन करावे.
८.
गोदान
वधुपित्याने
'गौः, गौः, गौः,
मंत्र म्हणून वराला एक धेनू दान द्यावी. वराने
ॐ माता रुद्राणां दुहिता वसूनां, स्वसांदित्यानाममृतस्य नाभिः
प्र नु ओचं चिकितुषे जनाय, मा गामनागामादिति वधिष्ट ॥
मंत्र म्हणून तिचा स्वीकार करावा. प्रस्तुत मंत्राचा जमदग्नि भार्गव हा ऋषी, गौ ही देवता, त्रिष्टुभ् हा छंद आणि गोत्सर्जन हा विनियोग आहे.
तदनंतर 'धेनूला आता विमुक्त कर (उत्सृजेत्) असे वधूपित्यस सांगावे.
९.
सत्कार
तदनंतर वधूपित्याने गंध, अक्षता, दोन यज्ञोपवीते आदि पूजोपकरणे, वस्त्रे, तसेच अंगठी आदि सुवर्णालंकार स्वतःच्या आर्थिक अनुकुलतेनुसार वराला देऊन त्याची पुजा करावी. वराच्या समवेत आलेल्या त्याच्या बंधूंनाही यथाशक्ती वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान करावा. मधुपर्कात दह्याच्या अभावी दूध अथवा जल, तसेच मधाच्या अभावी तूप आणि गूळ वापरला तरी चालेल.