(वाङ्निश्चय विधी यथासांग पार पडल्यानंतर विवाहमूहुर्तापूर्वी थोडे आधी वधूगृही पोहोचता येईल अशा पद्धतीने वरपित्याने सर्व तयारी करून वरास घेऊन निघावे.
वधूपित्यानेही सर्व तयारीनिशी गावाच्या सीमेवर जावे, आणि तेथे वरपक्षीय मंडळींच्या आगमनाची वाट पहात थांबावे. तेथे वरपक्षीय मंडळी येताच त्यांचा सत्कार करावा.)
१.
संकल्प
अद्य शुभपुण्यतिथौ करिष्यमाण कन्याया विवाहाङ्गभूतं सीमान्ते वरपूजनं करिष्ये । तदङ्गं गणपति-वरुणपूजनं च करिष्ये ॥
असा संकल्प सोडून गणपती आणि जलदेवता वरुण यांचे पूजन करावे. तदनंतर वरपक्षीयांस वस्त्रे आणि सुगंधी द्रव्ये द्यावीत; वराचे पाय धुवून त्यासही वस्त्र-भूषणे द्यावीत. कर्मफलाच्या सांगतेप्रीत्यर्थ ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी, आणी विष्णूला नमस्कार करावा.
येणेप्रमाणे गावाच्या सीमेवर वराचे पूजन झाल्यानंतर, वराने गावात येऊन रहावे. वधूपित्यानेही स्वगृही परत जावे.
नव्या कालमान परिस्थितीनुसार सीमान्त पूजन विधीचे स्वरूप पुष्कलच बदलले आहे. सद्यःकाली हा विधी गावाच्या सीमेवर न करता वधूगृही अथवा मंगलकार्यालयात वाङ्निश्चयानंतर करतात. या उभय विधीनंतर वधूपक्षातर्फे वरपक्षीयांना भोजन दिले जाते. लौकिक भाषेत त्यास 'कढीभाताचे भोजन' म्हणतात.
येथे सीमान्तपूजन विधी संपला.