१.
वेदिका उपवेशन
वराने विवाहमंडपातील वेदी (बोहले) वर चढून, तीवरील आसनावर पूर्वाभिमुख बसावे. नंतर वधूला वेदीच्या पश्चिमेकडून यावयास सांगून, आणि वेदीच्या उत्तरेकडून तिला वर चढावयास सांगून, वराच्या उजव्या हातास तिला बसवावे. वेदीवर आल्यापासून वधूने मौन धारण करावे.
२.
प्रारंभिक विधी
वराने दोन वेळा आचमन करून, प्राणायाम आणि देशकालादिकांचे उच्चारण करणारा मंत्र म्हणावा
३.
संकल्प
तदनंतर वराने
प्रतिगृहीतायामस्या वध्वा भार्यात्वसिद्धये गृह्याग्नि सिद्धये च विवाहहोमं करिष्ये ॥
या मंत्राने विवाहहोमाचा संकल्प सोडावा.
४.
स्थण्डिलादिकरण
विवाहहोमाप्रीत्यर्थ वराने सर्वप्रथम स्थण्डिलाची (काळ्या मातीचे दोन चौकोनी ओटे) स्थापना करावी. स्थण्डिलाच्या पश्चिमेस पाटा व वरवंटा ठेवावा. ईशान्येस साळीच्या लाह्यांची रास रचून त्यावर पाण्याने भरलेला एक कलश ठेवावा. त्या कलह्सावर आंब्याच्या पानांच्या डहाळ्या (=पल्लव) ठेवून तो गंध, फुल आदींनी सुशोभित करावा. स्थण्डिलाच्या उत्तरेकडील बाजूस, तांदळाचे पूर्व-पश्चिम दिशावर्ती असे सात पुंज (=राशी) कराव्यात. नंतर वराने दोन समिधा हातात घेऊन विवाहहोमास प्रारंभ करावा.
५.
पात्रासादन
अग्नि, पवमान अग्नि, प्रजापति, अर्यमन् अग्नि, वरुणाग्नि, पूषन् अग्नि, प्रजापति आदि देवतांना लाह्या आणि 'आज्य' (घृत) अर्पण करण्यासाठी सहा पात्रे मांडावीत. त्यांच्या पश्चिमेस लाह्यांचे सूप ठेवावे. तूप आणि लाह्या यांचे भोवती अग्नि फिरवून, त्यांचे तीनवेळा प्रोक्षण करावे. नंतर 'लाजाहोम' विधी करावा.
६.
विवाहहोम
नंतर वराने
अग्न आयूंषि पवस आ सुवोर्जमिषं च नः ।
आरे बाधस्व दुच्छुना स्वाहा ॥
अग्नये पवमानायेदं न मम ।
ॐ अग्निऋषिः पवमानः पाचजन्यः पुरोहितः ।
तमीमहे महागवं स्वाहा ॥
ॐ अग्ने पवस्व स्वपा अस्मे वचैः सुषीयेम् ।
दधद्रर्थि मयि पोषं स्वाहा ॥
आदि पाच मंत्रानी क्रमाने विवाहहोम करावा. यापैकी प्रथम तीन मंत्रांचा शत वैखानस हा ऋषी, पवमान अग्नि ही देवता आणि गायत्री हा छंद आहे.
ॐ त्वमर्यमा भवसि यत् कनीनां नाम स्वधावन् गुह्य विभर्षि ।
अञ्जन्ति मित्रं सुधितं न गोभिर्यद् दंपती समनसा कृणोचि स्वाहा ॥
मंत्राचा वसुश्रुत आत्रेय हा ऋषी, अग्नि ही देवता, त्रिष्टुप छंद आणि विवाहातील प्रधान लाजाहोमासाठी विनियोग आहे.
ॐ प्रजापते न त्वदेतान्यन्यो विश्वा जातानि परिता बभूव ॥
यत् कामास्ते जुहुमस्तन्नो अस्तु वयं स्याम रयीणां स्वाहा ॥
मंत्राचा हिरण्यगर्भ प्राजापत्य हा ऋषी, प्रजापति ही देवता, आणि छंद व विनियोग आधीच्या मंत्राप्रमाणेच आहे.
७.
पाणिग्रहण
तदनंतर वराने उठून वधूच्या पुढे पश्चिमाभिमुख उभे रहावे. पाचही अंगुलींसह वधूचा उताणा उजवा हात उजव्या हाताने आपल्या हाती धरून
गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्या जरदष्टिर्यथासः ।
भगो अर्यमा सविता पुरंधिर्मह्यं त्वादुर्गाहपत्याय देवाः ॥
हा मंत्र म्हणावा. प्रस्तुत मंत्राचा सूर्या सावित्री हा रचनाकर्ता ऋषी, आणि सूर्यासावित्री हीच देवता असून, गायत्री हा छंद आणि वधूपाणिग्रहणासाठी विनियोग आहे.
८
लाजाहोम
'लाजाहोम' आणि 'सप्तपदी' हे विवाहविधीतील दोन सर्वाधिक महत्त्वपूर्ण धार्मिक विधी समजले जातात. 'लाजाहोम' विधीसाठी वराने पूर्वस्थानि येऊन वधूला उभे करावे, आणि तिचे दोनही हात स्वच्छ करण्यास सांगावे मग तिला हातांची ओंजळ करण्यास सांगून, त्या ओंजळीत दर्भाच्या 'स्रुक' (पळी) ने थोडे तूप घालावे. वधूच्या भावाकडून, अथवा सख्खा भाऊ नसल्यास चुलत अथवा मामेभावाकडून तिच्या ओटीत दोन वेळा एक-एक मूठ लाह्या घालाव्यात.
वराने सुपातील अथवा ओंजळीतील लाह्यांवर 'अभिधार' (तूप शिंपडणे) करावा. नंतर वराने उभे राहून, आणि
अर्यमणं नु देवं कन्या अग्निमयक्षत ।
स इमां देवो अर्यमा प्रेतो मुञ्चातु नामुतः स्वाहा ॥
मंत्र म्हणून आपल्या दोन्ही हातांची ओंजळ धरावी, आणि त्या ओंजळीतील सर्व लाह्या ओंजळीच्या टोकाकडून, अथवा बाजूने घालाव्यात.
( 'अर्यमणं नु' मंत्राचा वामदेव हा ऋषी, अर्यमन् आणि अग्नि या देवता, अनुष्टुभ् छंद आणि विवाहातील मुख्य लाजाहोमासाठी विनियोग आहे.)
नंतर वराने
ॐ अमोहमस्मि सा त्वं सा त्वमस्यमोहं द्यौरहं पृथिवो त्वं सामाहमृक्त्वं तावेव विवाहावहै । प्रजाम प्रजनयावहै । संप्रियो रोचिष्णू सुमनस्यमानो जीवेव शरदः शतम ॥
हा मंत्र म्हणत बोहोल्यावरील पाटावरवंटा वगळून होमपात्र आणि उदककुंड यासह अग्नीस प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालीत असता वधूचा हात धरून स्वतः पुढे चालावे, आणि वधूने त्याच्या मागोमाग जावे.
नंतर वराने वधूस दोनही पाय पाट्यावर ठेवून उभे रहाण्यास सांगावे आणि वधू तसे करीत असत असता वराने
ॐ इममश्मानमारोहाश्मेव त्वं स्थिरा भव ।
सहस्व पृतनायतोभितिष्ठ पृतन्यतः ॥
हा मंत्र म्हणावा.
पुनः पूर्वी सांगितल्याप्रमाणे वधूच्या ओंजळीत लाह्या घेऊन, त्या लाह्यावर तूप टाकून (उपस्तरण) आदि विधी करावेत, आणि मग वधूच्या ओंजळीतील या लाह्या
ॐ वरुणं नु देवं कन्या अग्नियक्षत ।
स इमां देवो वरुणः प्रेतो मुञ्चातु नामुतः स्वाहा ॥
वरुणाग्नय इदं न मम ।
या मंत्राने होमात टाकाव्यात.
'वरुणं नु' मंत्राचा वामदेव गौतम हा ऋषी, वरुण, अग्नि या देवता, अनुष्टुभ् हा छंद, आणि विवाहातील प्रधान होमासाठी विनियोग आहे.
तदनंतर मागीलप्रमाणे
ॐ अमोहमस्मि सा त्व सा त्वमस्यमोहं द्यौरहं पृथिवी त्वं सामाहमृक् त्व तावेव विवहावहै । प्रजां प्रजनयावहै सप्रियौ रोचिश्णू सुमनस्यमानो जीवेव शरदः शतम् ॥
हा मंत्र म्हणत वर आणि वधू यांनी अग्नीला प्रदक्षिणा करावी, आणि पूर्वीप्रमाणेच वधूला पाट्यावर उभे करून
ॐ इममश्मानमारोहाश्मेव त्वं स्थिरा भव ।
सहस्व पृतनायतोभितिष्ठ पृतन्यतः ॥
हा मंत्र म्हणावा.
पुन्हा पूर्वी सांगितल्याप्रमाणे वधूच्या ओंजळीत लाह्या घेऊन, आणि त्या लाह्यांवर तूप टाकून वधूच्या ओंजळीतील लाह्या
ॐ पूषणं नु देवं कन्या अग्निमयक्षत ।
स इमां देवः पूषा प्रेतो मुञ्चातु नामुतः स्वाहा ॥
या मंत्राने होमात टाकाव्यात, आणि पूर्वीप्रमाणेच
ॐ अमोहमस्मि सा त्वं सा त्वमस्यमोहं द्यौरहं पृथिवो त्वं सामाहमृक्त्वं तावेव विवाहावहै । प्रजाम प्रजनयावहै । संप्रियो रोचिष्णू सुमनस्यमानो जीवेव शरदः शतम ॥
या मंत्राने अग्नीस प्रदक्षिणा घालावी.
'पूषणं नु' मंत्राचा वामदेव गौतम हा ऋषी, पूषन् आणि अग्नि ही देवता, अनुष्टुभ् छंद, आणि विवाहातील मुख्य लाजाहोमासाठी विनियोग आहे.
नंतर वधूला पाट्यावर उभे करून,
ॐ इममश्मानमारोहाश्मेव त्वं स्थिरा भव ।
सहस्व पृतनायतोभितिष्ठ पृतन्यतः ॥
हा श्लोक पुन्हा म्हणावा. नंतर पूर्वस्थानी बसून लाह्यांचे सूप, त्याचे तोंड स्वतःकडे येईल अशा पद्धतीने धरून, आणि 'प्रजापतये स्वाहा' असे म्हणून, सुपाच्या कोनाने सर्व लाह्या होमात टाकाव्यात. यावेळी 'प्रदक्षिणा' आणि 'अश्मारोहण' हे विधी करू नयेत.
९.
सप्तपदी
होमाच्या उत्तरेस घातलेल्या तांदळाच्या सात राशीवरून वराने वधूस हात धरून चालवावे. वधूने प्रत्येक राशीवर आपला उजवा पाय ठेवावा. तांदळाच्या सात राशींवर वधू अशा तर्हेने पदक्षेप करीत असता वराने,
इष एकपदी भव, सा मामनुव्रता भव,पुत्रान्विंदावहै बहूस्ते सन्तु जरदष्टयः ॥१॥
ऊर्जे द्विपदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहै बहूस्ते सन्तु जरदष्टयः ॥२॥
रासस्पोशाय त्रिपदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहै बहूंस्ते सन्तु जरदष्टयः ॥३॥
मा यो भव्याय चतुष्पदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहे बहूंस्ते सन्तु जरदष्टयः ॥४॥
प्रजाभ्यः पंचपदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहै बहूंस्ते सन्तु जरदष्ट्यः ॥५॥
ऋतुभ्यः षट्पदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहै बहूंस्ते सन्तु जरदष्टयः ॥६॥
सखा सप्तपदी भव, सा मामनुव्रता भव, पुत्रान्विंदावहै बहूंस्ते सन्तु जरदष्टयः ॥७॥
आदि आश्वलायन गृह्यसूत्रातील सप्तपदीचे सात मंत्र म्हणावेत.
१०.
उदक अभिषेक
वराने वधूच्या मस्तकाचा स्वमस्तकाला स्पर्श करावा, आणि नंतर ईशान्येस ठेवलेल्या कलशातील उदकाने
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते ।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥
आणि
शान्तिरस्तु । पुष्टिरस्तु । तुष्टिरस्तु ।
मंत्रांनी स्वतःच्या आणि वधूच्या मस्तकावर अभिषेक करावा.
११.
नक्षत्रदर्शन
तदनंतर वराने आसनस्थ होऊन 'स्थालीपाक'पद्धतीने अथवा 'वैश्वदेव' तंत्राने होम करावा, आणि मग उभयतांच्या वस्त्राची गाठ सोडावी.
नंतर वराने वधूसह ध्रुव, अरुंधती, सप्तर्षि आदि पुण्यनक्षत्रांचे दर्शन करावे, आणि वधूला
जीवपत्नी प्रजां विन्देय
असा मंत्रार्ध म्हणावयास सांगावे. नंतर वधूने मौन सोडावे.
विवाहसमारंभ प्रातःकाली झाला असल्यास, सायंसंध्या केल्यानंतर ध्रुवदर्शन विधी करावा. विवाह रात्री झाला असल्यास, सायंसंध्या न करताच ध्रुवदर्शन करावे. या दिवसापासून वराने 'विवाहाग्नि' राखावा.
येथे विवाहहोम संपला