१.
उदकशुद्धी
यानंतर वधूपित्याच्या उपाध्यायाने कन्यादानासाठी मंत्रवलेले जल सिद्ध करावे. त्यासाठी वराच्या उजव्या हातास ’उदङ्मुख’ (=उत्तरेकडे तोंड करून) बसून उपाध्यायाने काही दर्भ पूर्वेस अथवा पश्चिमेस अग्रे करून स्वतःपुढे ठेवावेत. या दर्भावर तीर्थोदकाने (अथवा शुद्धोदकाने) भरलेले ताम्रपात्र ठेवावे. त्या पात्रात भाताच्या साळी अथवा गहू घालावेत. पात्राच्या मुखावर काही दूर्वा व आम्रपल्लव ठेवून त्या पात्राचे मुख आच्छादित करावे. पात्र बाहेरून गंध, पुष्पमाला आदींच्या साह्याने सुशोभित करावे.
तदनंतर ताम्रपात्रातील जल शुद्ध करण्यासाठी ऋग्वेदाच्या सुविख्यात अप्सूक्तातील
आपो हि ष्ठा मयोभुवः, ता न ऊर्जे दधातन ।
महे रणाय चक्षसे ॥१॥
यो वः शिवतमो रसस्तस्य भाजस्तंड नः ।
उशतीरिव मातरः ॥२॥
तस्मा अर गमाम वो, यस्य क्षयाय, जिन्वथ ।
आपो जनयथा च नः ॥३॥
मंत्र पठण करावेत.
२.
पत्रिकापूजन
यानंतर पत्रिकापूजन करण्याची चाल आहे. ऋग्वेदातील
प्र णो देवी सरस्वती, वाजेभिर्वाजिनीवती ।
धीनामवित्र्यवतु ॥४॥
मंत्र पठण करून पत्रिकापूजनाचा हा विधी करतात. हा एक लौकिक विधी आहे. याला धर्मशास्त्रात आधार नाही.
येथे कन्यादानार्थ उदकशुद्धी विधी संपला