१.
प्रारंभिक कृत्ये
विवाहाच्या दिवशी कन्येला मंगलस्नान घालून तिला नवे, एकदा धुतलेले वस्त्र नेसण्यास द्यावे. पाटा व वरवंटा यावर हळदीने गौरी व हर यांची चित्रे काढून, आणि त्यासभोवती कोरे सूत गुंडाळून त्यांची पूजा करावी.
२.
संकल्प
तदनंतर वधूने
'अविच्छन्न सौभाग्य-शुभसंतति-धनधान्यादि सिद्धये गौरीहरौ पूजायिष्य'
हा संकल्पमंत्र म्हणून गौरीहर पूजनाचा संकल्प सोडावा.
३.
गौरीहरपूजन
उपरोक्त गौरीहर स्वरूपी शिलाखंड घरात देवाजवळ किंवा दुसर्या निर्मळ जागी ठेवावे. त्यांच्या जवळ एका पात्रात तांदुळाचा पुंज करून ते ठेवावे. तेथे कन्येला पूर्वाभिमुख बसवून, गौरीहरांची व पात्रातील तांदुळाच्या कात्यायनी आणि महालक्ष्मीसहित इंद्राणीची पूजा करवावी.
४.
ध्यानमंत्र
प्रस्तुत पूजाविधीचा भाग म्हणून वधूने सर्वप्रथम
"सिंहासनस्थां देवेशी, सर्वालंकारसंयुताम् ।
पीताम्बरधरां देवी, चंद्रार्धकृतशेखराम् ॥
करेणाधः सुधापूर्ण, कलश दक्षिणेन तु ।
वरदं चाभय वामेनाश्लिष्य तदनुप्रियाम् ॥"
हा इंद्रायणी देवीचा ध्यानमंत्र म्हणावा.
५.
पूजामंत्र
तदनंतर वधूने
'गौरीहर महेशान सर्व मंगलदायक ।'
पूजां गृहाण देवेश, सर्वदा मङ्गलं कुरु ॥
हा शिवाचा पूजामंत्र म्हणावा.
६.
इंद्राणीपूजन
वधूने इंद्राणीपूजनार्थ सत्तावीस तंतूंनी बनविलेल्या वातीने दीप प्रज्वलित करावा. तदनंतर अक्षताराशीस्वरूपी इंद्राणीची पूजा आणि
'देवेन्द्राणि नमस्तुभ्यं, देवेन्द्र-प्रियभामिनी ।
विवाहं, भाग्यमारोग्यं, पुत्रलाभं च देहि मे ॥
मंत्राने तिच्याकडे सौभाग्यप्रार्थना करावी.
७.
सौभाग्यप्रार्थना
सर्व पूजा संपूर्ण झाल्यावर वधूने त्याच ठिकाणी 'आपल्याला निरंतर सौभाग्य प्राप्त होऊन, संसारातील सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ होवो,' अशी प्रार्थना करीत बसावे.
येथे गौरीहर पूजाविधी संपला