(वरघोडा)
१
वराची मिरवणूक
विवाहाच्या दिवशी विवाहमुहूर्तावर थोडे आधी, स्नानसंध्यादि नित्यकर्म आटोपावेत. ब्राह्मण आणि इष्टमित्र यांच्यासह भोजन करावे (अथवा स्वतः अभुक्त रहावे). एकदा धुतलेली, श्वेत, दुसर्याने न वापरलेली, ज्यांना दशा आहेत अशा दोन वस्त्रांपैकी एक नेसावे, आणी एक उत्तरील म्हणून अंगावर घ्यावे. अलंकार, मुंडवळी धारण करावीत.
तदनंतर वराने इष्टदेवता, वडील माणसे यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घ्यावी. घोडा, पालखी, (मोटार) आदि सामर्थ्यानुरूप वाहनात बसून श्वेतच्छत्र घेऊन वधूगृही निघावे. उत्तम पोषाख केलेले इष्टमित्र बरोबर असावेत.
मिरवणूकीत उदकपूर्ण कलश, आरसा, कुमारिका, पुष्पे, अक्षता, दीप, पुष्पमाला, ध्वज, साळीच्या लाह्या यांनी युक्त असा सुवासिनीही असाव्यात. वाटेने जाताना गाणी गात व मंगलवाद्ये वाजवीत जावे.
ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलातील
कनिक्रदज्जनुषं प्रबुवा इयर्ति वाचमरितेव नावम् ।
सुमङ्गलश्च शकुने भवासि मा त्वा का चिदभिभा विश्व्या विदत् ॥१॥
मा त्वा श्येन वधीन्मा सुपर्णो, मा त्वा विददिषुमान् वीरो अस्ता ।
पित्र्यामनु प्रदिशं कनिक्रदत् सुमङ्गलो भद्रवादी संदेह ॥२॥
मा नः स्तेन ईशत माघर्शसो, बृहद वदेम विदथे सुवीराः ॥३॥
आणि
प्रदक्षिणिर्दाभ गृणान्ति कारवो, वयो वदन्त ऋतुथा शकुन्तयः ।
उभे वाचौ वदति सामगा इव, गायत्रं च त्रैष्टुभं चानु राजति ॥४॥
उद्गातेव शकुने साम गायसि, ब्रह्मपुत्र इव सवनेषु शंससि ।
वृषेव वाजी शिशुमतीरपीत्या सर्वतो नः शकुने भद्रमा वद ।
विश्वतो नः शकुने पुण्यमा वद ॥५॥
आवदंस्त्वं शकुने भद्रमा वद, तूष्णीमासीनः सुमति चिकिद्धि नः ।
यदुत्पतन् वदसि कर्करिर्यथा, बृहद् वदेम विदथे सुवीरः ॥६॥
मंत्रानी प्रारंभ होणारी, प्रवासातील अपशकुन दूर करणारी शकुनसूक्ते (ऋ. २.४२-४३) पठण करीत ब्राह्मणांनी वरासमवेत जावे.
२.
शकुन सूक्ते
आश्वलायन गृह्यसूत्रमते ऋग्वेदातील ही दोन सूक्ते प्रवासास निघतेवेळी झालेला अशुभ पक्ष्यांच्या आवाजाचा अपशकुन दूर करण्यासाठी परंपरेने म्हणतात. (आश्व. गृ. ३.१०.९) येथे ती वराच्या मिरवणुकीतील अपशकुन (दुश्चिन्हे) निवारण्यासाठी योजिले आहेत.
वधूगृही आगमन
अशी मिरवणूक वधूगृहाच्या प्रवेशद्वारी आल्यानंतर वराने मंडपाच्या द्वाराच्या पूर्वेकडे तोंड करून उभे रहावे. कन्यापक्षीय सुवासिनींनी उदकयुक्त कलश आणि पंचारती घेऊन त्यास सामोरे जावे व वरास आरतीने ओवाळावे. मग वराने मंडपात जाऊन शुभासनावर बसावे.
येथे वधूगृही गमनविधी संपला