१.
विवाहदिनाच्या रात्री वधूपित्याने वरपूजनाचा, तसेच वरमातेला 'ऐरिणी' (=झाल) अर्पिण्याचा विधी करावा. वराची माता जीवित नसल्यास ऐरिणीचे हे दान वराची आजी अथवा चुलती यांना द्यावे. विवाहदिनी भद्राव्यतिपातादि दुर्योग असल्यास 'ऐरणीप्रदान' विधी दिवसा-उजेडीच करावा.
'ऐरणी' म्हणजे वेळूची केलेली सोळा सुपे, आणि वेळूंचीच मोठी डाली (=झाल) होय. ही डाली वरमातेच्या डोक्यावर देणे, हा मोठा मान समजला जातो. या विधीला धार्मिक आधार नाही. परंतु वरपक्षाच्या मानाच्या दृष्टीने लौकिक दृष्ट्या तो महत्त्वाचा मानतात.
२.
वरपूजन
वधूपित्याने विवाहमंडपात पूर्वाभिमुख बसून, आणि आचमन-प्राणायामादि प्रारंभिक कृत्ये करून,
अद्य शुभपुण्यतिथौ मम उमामहेश्वरप्रीतीद्वारा कन्यादानसंपूर्णतायै वंशाभिवृद्धये च ऐरिणीपूजनं, वरमात्रे ऐरणीदानं च करिष्ये ॥
या मंत्रने वराचे माता-पिता व अन्य वरपक्षीय यांच्या पूजनांचा संकल्प सोडावा. यानंतर सुवासिक द्रव्ये, वस्त्रे, अलंकार आदि अर्पण करावेत.
३.
ऐरिणीदानसंकल्प
वधूपित्याने पुन्हा एकदा देशकालादिकांचे स्मरण करून
'अद्य शुभपुण्यतिथौ' हा ऐरणीपूजनाचा आणि वरमातेस तिच्या दानाचा संकल्प सोडावा.
४.
ऐरिणीपूजन
तदनंतर वधूपित्याने
ऐरिणि त्वमुमा देवी महेशो गिरिजापतिः
अतस्वां पूजायिष्यामि ऐरिणीं सर्वकामदाम ॥१॥
५.
ऐरिणीदान
तदनंतर वेळूचे ऐरिणी नामक पात्र वरमातेला दान करण्याचा
सवस्त्रां च सदीपां च शूर्पेः षोडशभिर्युताम् । वरमात्रे प्रदास्यामि कन्यादानस्य सिद्धये ॥२॥
हा संकल्पमंत्र वधूपित्याने पठण करून वरमातेच्या हातावर उदक सोडावे. हे वंशपात्र वरमातेच्या आणि वरपक्षीय मुख्य स्त्रीपुरुषांच्या सन्मानार्थ त्यांच्या मस्तकावर क्रमाने ठेवावे.
नंतर वधूपित्याने वरपित्याच्या सम्मुख वधूस बसवून
पूर्णवर्षा त्वियं कन्या पुत्रवत्पालिता मया ।
इदानीं तव पुत्राय दत्ता स्नेहेन पाल्यताम् ॥
या मंत्राने त्यांची प्रार्थना करावी. नंतर वधूद्वारा उपस्थित ब्रह्मवृंदास दानधर्म करावा.
ऐरिणीदानाच्या दिवशी वधूच्या मातापित्यांनी उपोषण करावे. ऐरिणी दानाचा विधी संपल्यानंतर त्यांनी भोजन करावे.
येथे ऐरिणीप्रदान विधी संपला