१.
उपाध्यायाने एका पात्रात शुभ्र तांदूळ, आणि दुसर्यात दूध व तूप एकत्र करून घ्यावे. नंतर वधूवरांनी आपले हात धुवावेत, आणि तदनंतर वराने वधूच्या ओंजळीत दूध व तुपाचे मिश्रण ओतावे. वधूने हे मिश्रण स्वतःच्या ओंजळीत धरून ठेवावे.
वधूपित्याने वराच्या ओंजळीत प्रथम दोनदा दूधतुपाचे मिश्रण, मग तांदूळ, आणि मग अखेरीस पुन्हा दोनवेळा दूधतुपाचे मिश्रण ओतावे. तदनंतर वधूपित्याने वधू आणि वर अशा उभयतांच्या ओंजळीतील तांदुळांर थोडेथोडे सुवर्ण ठेवून, वधूची ओंजळ वराच्या ओंजळीवर ठेवावी, आणि
कन्या तारयतु ।
दक्षिणाः पांतु ।
बहुधेयं चास्तु ।
पुण्यं वर्धताम् शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ।
तिथिकरणमुहूर्तनक्षत्रसंपदस्तु ।
हे मंत्र म्हणावेत.
नंतर वधूला उठवून तिच्याकरवी तिच्या ओंजळीतील अक्षता वराच्या मस्तकावर टाकाव्यात असे करीत असता तिला
भगो मे कामः समृध्यताम्
हा मंत्र म्हणावयास सांगावे.
नंतर वराने
यज्ञो मे कामः समृध्यताम् ॥
या मंत्राने वधूच्या मस्तकावर आपल्या ओंजळीतील अक्षता टाकाव्यात. अशा तर्हेने वधूवरांच्या पुन्हा एकवार ओंजळी तयार झाल्यावर, वधूने
श्रियो मे कामः समृध्यताम् ॥
या मंत्राने वराच्या मस्तकावर अक्षता टाकाव्यात.
पूर्वी सांगितलेल्या विधीची पुनरावृत्ती करून वर आणि वधू यांनी अनुक्रमे
धर्मो मे कामः समृध्यताम् ॥
प्रजा मे कामः समृध्यताम् ॥
यशो मे कामः समृध्यताम् ॥
हे मंत्र म्हणावेत
नंतर वधूवरांनी ओंजळ तयार करण्यापासूनचा विधी फिरून दोनदा करावा. त्यापैकी पहिला विधी
यशो मे कामः समृध्यताम् ॥
आदि मंत्रोच्चारपूर्वक करावा. दुसरा विधी अमंत्रक म्हणजे मंत्रोच्चार न करता करावा.
२.
पुष्पमाला समर्पण व अष्टपुत्री प्रदान
नंतर वराने आपल्या मस्तकावरील एक पुष्प घेऊन ते दूध आणि तूप यांचे मिश्रण केलेल्या पात्रात बुडवावे, आणि त्यचा तिलक वधूच्या कपाळावर लावावा. वधूनेही आपल्या मस्तकावरील एक पुष्प दुग्ध-घृत मिश्रणात बुडवून वराच्या कपाळी लावावे, आणि एक पुष्पमाला वराच्या गळ्यात घालावी. नंतर वरानेही वधूच्या गळ्यात एक पुष्पमाला घालावी.
वरप्क्षीय सुवासिनीनी वधुरवरास 'प्राङ्मुख' (=एकमेकासमोर) बसवून 'अष्टपुत्री' संज्ञक दोन उत्तम वस्त्रे (साड्या), चोळी आणि मंगळसूत्र वधूस द्यावीत. वस्त्रापैकी एक वधूस नेसावयास सांगून चोळी घालण्यास द्यावी. दुसरे वस्त्र वधूस पांघरण्यास सांगावे.
३.
मंगलसूत्र बंधन
नंतर वराने इष्ट देवतेचे स्मरण करून
माङ्गल्यतन्तुनानेन, भर्तृज्वनहेतुना ।
कंठे बध्नामि सुभगे, सा ज्व शरदः शतम् ॥
या मंत्राने वधूच्या गळ्यात मंगलसूत्र बांधावे.
४.
सुवर्णालंकार प्रदान
नंतर वराने
आयुष्यं वर्चस्यं रायस्पोषमौद्भिदम् ।
इदं हिरण्यं वचस्वज्जैत्राया विशतादिमाम् ॥
उच्चैर्वाजि पृतनाषाट् सभासाहं धनंजयम् ।
सर्वाः समग्रा ऋद्धयो इरण्येऽस्मिन् समाहिताः ॥
शुनमहं हिरण्यस्य पितुर्मानव जग्रभ ।
तेन मां सूयत्वचमकरं पुरुशु प्रियम् ॥
सम्राज च विरज चाभिष्टिर्या च मे ध्रुवा ।
लक्ष्मी राष्ट्रस्य या मुखे तया मामिन्द्र सं सृज ॥
अग्नेः प्रजातं परि यद्धिरण्यममृत यज्ञे अधि मर्त्येषु ।
य एनद्गेद स इदेनमर्हति जरामृत्युर्भवति यो बिभति ॥
यद्वेद राजा वरुणो यदु देवी सरस्वती ।
इन्द्रो यद्वृत्रहा वेद तन्मे वर्चस आयुषे ॥
न तद्रक्षासि न पिशाचाश्चरन्ति देवानामोजः प्रथमजं ह्ये तत् ।
यो भिभति दाक्षायणा हिरण्यं स देवेषु कृणुते दीर्घमायु; स मनुष्येषु कृणुते द्र्घमायुः ॥
यदाबधनन् दाक्षायणा हिरण्यं शतानीकाय सुमनस्यमाना ।
तन्न आ बधनामि शतशारदायायुष्मान् जरदष्टिर्यथासत् ॥
घृतादुर्लप्तं मधुमत्सुवर्ण धनंजयं धरुणे धारयिष्णु ।
ऋणक् सपत्नाधरांश्च कॄण्वदाऽऽरोह मां महते सौभगाय ॥
प्रियं मा कुरु देवेषु प्रियं राजसु मा कुरु ।
प्रियं विश्वेषु गोप्त्रेषु मयि धेहि रुचा रुचम् ॥
अग्निर्येन विराजति सूर्यो येन विराजति ।
विराज्येन विराजति तेनास्मान् ब्रह्मणस्पते विराज समिधं कुरु ॥
या मंत्राने वधूस अलंकार घालावेत.
५.
गणपतिपूजनम्
नंतर एका पात्रात पाच सुपार्या, हळकुंडे आणि लाडू ठेवून पुरोहिताने वधूवरांच्या हस्ते गणेशाची षोडशोपचारे पूजा करवावी. पूजा झाल्यानंतर गणपतीच्या संतोषार्थ ब्राह्मनास यथाशक्ती दक्षिणा द्यावी.
गणपतिपूजनार्थ
गणानां त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत, आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
हा मंत्र पठण केल्यानंतर
आ तू न इन्द्र क्शुमन्तं चित्रं ग्राभं सं गृभाय ।
महाहस्ती दक्षिणेन
या मंत्राचे पठण करावे
६.
वधूवरवस्त्रबन्धन
पुरोहिताने पूजा केलेल्या सुपार्या वधूवरांच्या अंगावरील वस्त्राच्या पदरात बांधाव्यात. वधूवरांनी विवाह आटोपेपर्यंन्त त्यांची गाठ सोडू नये.
तदनंतर पुरोहिताने
नीललोहितं भवति कृत्यासक्तिर्व्यज्यते ।
एधन्ते अस्या ज्ञातयः पतिर्बन्धेषु बध्यते ॥
या मंत्राने वधूवरांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर एकत्र करून त्यांची गाठ बांधावी.
७.
अक्षतारोपण
वधूचे पिता आणि माता, वृद्ध सुवासिनी, आप्त आदींनी वधूवरांच्या कपाळी अक्षता लावून, त्यास आशीर्वाद द्यावेत.
८.
महालक्ष्मीचे पूजन
कौस्तुभप्रयोगरत्न ग्रंथमते तदनंतर वधूवरांनी एका पात्रात शुभ्र तांदळाच्या तीन राशी करून, या तीन राशीस्वरूपी महालक्ष्मी, पार्वती आणि शची देवींची नामोच्चारपूर्वक षोडशोपचारे पूजा करावी. या देवींचा क्रमशः नामोच्चार, हेच या पूजेचे मंत्र समजावेत. पूजा संपल्यानंतर वधूवरांनी या तीनही देवींची सौभाग्यादि प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. तदनंतर पूजा केलेल्या महालक्ष्मी आदि देवतांच्या तुष्ट्यर्थ वधूने सुवासिनी स्त्रियांना'वायने' (=वाणे) द्यावीत.
९.
दाक्षायणीपूजन
तदनंतर वधूवरांनी देशकालादिकांचे स्मरण करून, 'आजपासून चार दिवसपर्यंत विवाहव्रताचे आचरण करणार,' असा संकल्प सोडावा. या विवाहव्रताच्या प्रथम दिवशी (= विवाहाच्या दिवशी) वधूवरांनी, आपण क्रमशः रोहिणी आणि सोम आहो, असे समजून दाक्षायणी देवीची पूजा करावी.
तदनंतर वधूचा हात धरून वराने विवाहहोम करण्यासाठी विवाहमंडपातील यज्ञवेदीप्रत जाण्यासाठी घरातून बाहेर पडावे.
येथे अक्षतारोपण विधी संपला.