दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् ।
समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥१०॥
संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण ।
त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥१२०॥
त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख ।
अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥२१॥
नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु ।
गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥२२॥
विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक ।
विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥२३॥
विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख ।
विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥२४॥
ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण ।
म्हणशील `हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी' ॥२५॥
स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा ।
तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥२६॥
ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा ।
तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥२७॥
तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख ।
भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥२८॥
`सकळ जनांच्या विषयीं' । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं ।
जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥२९॥
अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा ।
तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥१३०॥
जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी ।
यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥३१॥
ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥३२॥
ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती ।
उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥३३॥
जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी ।
तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥३४॥
ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ ।
श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥३५॥
ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण ।
श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥३६॥