नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै ।
ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥१४॥
प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षस्वभाव ।
अहंकारासकट `नव' । तत्त्ववैभव हे संख्या ॥६८॥
`एकादश' बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें ।
`पंच' ते पंचमहाभूतें । `तिनी' ते निश्चित तीन गुण ॥६९॥
हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण ।
इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥१७०॥
हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त ।
अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥७१॥
तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान ।
जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥७२॥
थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी ।
तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥७३॥
भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण ।
या नांव गा `शुद्धज्ञान' । माझाही जाण हा निश्चय ॥७४॥
आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥७५॥
एतदेव हि विज्ञानं न नथैकेन येन यत् ॥
पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें ।
व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥७६॥
जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश ।
तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥७७॥
ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण ।
ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥१८॥
ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या `ज्ञेय' म्हणिजे ।
ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥७९॥
जळीं रिघल्या लवण । लवणपणा मुके जाण ।
तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥१८०॥
ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक ।
तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥८१॥
जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती ।
तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥८२॥
ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग ।
आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥८३॥
शुद्ध शब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण ।
वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥८४॥
त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत ।
सांगाताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥८५॥