दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः ।
गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥४४॥
ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन ।
ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम `दरिद्री' जाण या नांव ॥५८॥
ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं ।
तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥५९॥
गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण ।
सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥५६०॥
यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण ।
जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥६१॥
निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण ।
तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥६२॥
मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर ।
त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर `कृपणत्व' ऐसें ॥६३॥
निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें ।
अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥६४॥
या नांव गा `कृपणपण' । तुज म्यां सांगितले जाण ।
आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥६५॥
कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि `ईश्वर' त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥६६॥
तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण ।
त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥६७॥
कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी ।
तोचि `अनीश्वरु' जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥६८॥
शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण ।
तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥६९॥