दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् ।
स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥३७॥
सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख ।
`महादान' तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥४७॥
दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी ।
हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥४८॥
जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख ।
याचि नांवें `दान' देख । अलौकिक उद्धवा ॥४९॥
या नांव गा `परमदान' । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥४५०॥
करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग ।
हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥५१॥
सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी ।
तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥५२॥
त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती ।
अखंड लागे माझी स्मृती । `शुद्धतप' प्राप्ती या नांव ॥५३॥
माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा `शुद्ध' तप ।
कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें `परमतप' तपांमाजीं ॥५४॥
ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर ।
जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥५५॥
प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर ।
त्यातें जिंके जो महावीर । तो `परम शूर' बोलिजे ॥५६॥
``माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो ।
माझा पवित्र ब्राह्मणदेहो'' । हा `जीवभावो' जीवाचा ॥५७॥
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥५८॥
जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव ।
भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥५९॥
ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित ।
सम ब्रह्म देखणें संतत । तें `परम सत्य' उद्धवा ॥४६०॥
वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम ।
तेंचि असत्य अतिदुर्गम । `सत्य' तें ब्रह्म समसाम्य ॥६१॥
केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण ।
तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६२॥