मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नरकस्तम‍उन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे ।

गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥४३॥

कामक्रोधलोभ‍उद्रेक । तेणें खवळे महामोह देख ।

तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥३६॥

अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार ।

न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥३७॥

यापरी गा निजचित्तीं । अंधमते वाढे वृत्ती ।

कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥३८॥

ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण `महानरक' ।

परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥३९॥

यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे ।

याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥५४०॥

काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक ।

तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥४१॥

इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे `तम‍उन्नाहो' ।

ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥४२॥

जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये ।

`तम‍उन्नाह' ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥४३॥

ऐशी तम‍उन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चितीं ।

ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥४४॥

ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो ।

बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥४५॥

ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं ।

जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । `गुरु' नाम तयासी बोलिजे ॥४६॥

त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां ।

ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्‍हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥४७॥

अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित ।

हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्‍गुरूंनीं येथ विस्तारिली ॥४८॥

ऐशी ऐकतां सद्‍गुरुकीर्ती । जडजीव उद्धरती ।

`गुरु' नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥४९॥

त्या सद्‍गुरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण ।

निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥५५०॥

सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्‍गुरु प्रसिद्धु ।

निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥५१॥

आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।

माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥५२॥

मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम ।

तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥५३॥

ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती ।

वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥५४॥

निज `गृह' जें साचार । तें जाणावें नरशरीर ।

आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥५५॥

जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन ।

तोचि `आढ्यतम' जाण । येर तें धन नश्वर ॥५६॥

नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता ।

ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP