एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः ।
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥४५॥
उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण ।
जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥५७०॥
संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण ।
यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥७१॥
गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं ।
गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥७२॥
ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण ।
श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥७३॥