बालत्वींच कसा पराक्रम तुवां केला जगन्नाटका
दुष्टा एकशरेंचि ते निवटिली रात्रिंचरी ताटका ।
मारीचां गजरक्तआसव दिलें तां ( त्वां ) प्राशना सायका
विश्वामित्रमखासि रक्षण तधीं केलें रमानायका ! ॥१८॥
केला त्र्यंबकचापभंग ह्नणतां हें तों न माने मला
भूपालोद्भटगर्वभंग रचिला रामा ! घनः श्यामला ।
नाहीं ते जनकात्मजा परिणिली सत्कीर्ति पथ्वीसुता
घाली माळ तुला जगत्त्रयगुरो ! सार्या जगादेखतां ॥१९॥
कोदंडाप्रति जेधवां लवविसी जैं सायका योजिसी
तेव्हां त्या सुरसुंदरी अतिशयें खिन्नावती मानसीं ।
श्रीरामें अतिमत्त राक्षस रणीं संहारिले या क्षणीं
ते येतील अम्हांस भोगकरणीं स्वर्गासि या कारणीं ॥२०॥
रामा ! तूं धरितां शरासन करीं तैं कांपती ते अरी
जेव्हां जैत्ररथाधिरोह करिती तैं मज्जती सागरीं ।
कोणी धीट घडे समोर समरीं शासी महेंद्री पुरी
लोळे भूमितळीं विदारित शरीं तो मुक्तिकांना वरी ॥२१॥
रामा ! तूं करवाल दिव्य करिचा जैं कांपवीसी तदां
होती कंपित शत्रुभूप कर ते वंदोनि देती सदां ।
तूं आशा अवलोकितां त्यजुनियां ते जीविताशा प्रभू
होती म्लान तदा तयांसि न सुचे कैं देश कैं कोशभू ! ॥२२॥
रामा ! कोप तुझा कृपेहुनि दिसे लक्षागुणें आगळा
जे लोकघ्न सुराप रात्रिचर ते खाते मुनीच्या कुळा ।
ऐसेही मदमत्त संगरवरीं निर्दाळिले त्वां शरीं
जाती ऊर्ध्व सुखें विमाननिकरीं ते सत्यलोकाशिरीं ॥२३॥
रामा ! तां वधिले निशाचर भलें स्वर्गी सुखे राहिले
देवींसीं रतले सुनंदनवनीं क्रीडा करों लागले ।
जैसे ते पहिले सुरेंद्र सगळे सेवावयां लाविले
केले त्वां तरि कृत्य काय न कळे कां संगरीं मारिले ॥२४॥
वीराग्रेसर रामचंद्र तुझिया बाणानळें शोषिला
सापत्नांबुधि तेधवां क्षितितळीं तो कोरडा जाहला ।
तद्गेहस्थितसंपदा शफरिका नेल्या तया धीवरीं
देखों तदगुणरत्नपंक्ति अजुनी धुळींत लोळे बरी ॥२५॥
रामा ! शत्रुकुळें तुझीं हतबळें झालीं महाव्याकुळें
कोठें त्यां न मिळेचि आश्रय तदां ते हिंडती भूतळें ।
ज्या खांदी कडियें मुलें द्रुमफळ भक्षावया केवळें
छायावृक्षमुळें तयांसि सदनें होती गुहा देउळें ॥२६॥
रामा ! धन्य तुझी विचित्र करणी संहारिले तां रणीं
ते गेले तुज देखतांचि रविच्या सन्मंडला भेदुनी ।
संन्यासी विजनीं जिणोनि पवनी झाले तपस्वी जनी
तेहीं विघ्नगर्णी पिडोनि पडिले अछिन्न मायागुणी ॥२७॥
रामा ! तां दशकंधरा निवटिले आश्चर्य तैं वाटलें
धात्याचें वरदान काय न कळे कोणीकडें आटलें ।
देवा ! मस्तक तूटलें तव पदां जावोनियां भेटलें
झालें अंग पतंगसें तव महातेजानळीम लोटलें ॥२८॥
शंभू विस्मित जाहला वरद तो ब्रह्मा उगा राहिला
रामा ! हा सुरवृंद पुष्ट घडला मोठ्या श्रमा मूकला ।
होता तो शशि पूर्ण सर्वसमयीं तो एकला सूकला
एका सौख विषाद एक पवती कैं साम्य काळा खळा ॥२९॥