निरंजन माधव - सामर्थ्यवर्णन

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा ! त्वज्जयदुदुंभीघनरवें सप्तांबुधी आटती

त्वद्वैरीमृगलोचनाश्रुसरिता जेव्हां भरें लोटती ।

तेव्हां ते भरती पुन्हां प्रतिदिनी वर्ते असें या जनीं

बोलावें भरतेंचि वोहट असें नेणोनियां कारणीं ॥५२॥

रक्षेंद्रें अमरेंद्रभाग हरिले यज्ञीं द्विजीं अर्पिले

रोडेले अतिजीर्ण होउनि तुझ्या दृष्टीपुढें पातले ।

त्यातें तां करुणारसार्द्रनयनें आलोकिलें राघवा !

तेव्हां रावण नष्टला तव कृपे ते पावले वैभवा ॥५३॥

रामा ! त्वदहदयारविंद म्हणती लोण्याहुनि कोंवळें

तें कार्ष्णायससाम्य कर्कश अम्हीं दृष्टीं यया देखिलें ।

जें कां दुष्टदुरुक्तिवज्रपतनें भेदेचिना तें कदा

येईना द्रवही अधर्मपथगा संहारिसी तूं तदा ॥५४॥

लोकीं हेच वृथा पृथा तव सती नेली वनीं रावणें

होती त्वदहदयारविंदभुवनीं त्वच्छक्ति मी ते म्हणे ।

तद्विश्लेष तुला नसे म्हणुनियां दुर्घर्ष संहारिला

त्वां बीभीषण दास केवळ तुझा लंकापदीं स्थापिला ॥५५॥

रामा ! तां जड तारिल्या अतिशयें मोठ्या समुद्रीं शिळा

केलें सागरलंघणें सहज त्या शाखामृगांच्या कुळा ।

हे तों दाखविली प्रतीति अपुल्या नामेंचि सीतापती

मी तारीन जडां असंख्य चपलां संसारआपांपती ॥५६॥

मायावी मृगकांचनी निवटिला मोहावया पातला

तो साक्षात् तुजला म्हणोनि सुजना हा भाव तां दाविला ।

जे तूतें भजती तयांस न घडे एणांबुसी कांचनी

मायभ्रांति म्हणोनि निश्चय असा तूं सांगसी सन्मणी ॥५७॥

रामा ! त्वद्धनुदंडमंडल जसें चंडार्क साम्यें दिसे

जे कां सायकरश्मिनें रिपुमहातामिश्र नाशीतसे ।

देवांचीं वदनांबुजें विकसवी सौरभ्य दाहीं दिशा

फांके सद्यश सेवितां बुधजना संतोष दे मानसा ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP