तूझ्या सदगुणदुर्गुणांप्रति नव्हे संख्या कधीं राघवा ।
मोठाले मुनिवेदराशि अजुनी तो शोधिती आघवा ।
मोजावे गुण अंत त्यासि नलगे, दोषासि ठावो नसे,
यासाठी उगलेचि मौन धरिती होवोनि मूके पिसे ॥५९॥
रामा ! त्वत्कुळदोष एक विलसे अत्यंत दुर्वार कीं
तूझा तूचि विचार यासि करिजे आणूं नये लौकिकीं ।
जे तूझ्या कुळिचे नृपाळ अपुल्या सत्पूर्वजांच्या यशा
सरि लोपिति आपुली प्रकटिती सत्कीर्ति दाही दिशा ॥६०॥
मेरुच्याही शिळा त्या गणवतिल जना मोजवे रश्मिजाळा ।
मांजूं येती हिमाचे कण गणन घडे या क्षितीच्या रजाचें
रामा ! तुझ्या गुणांचें गणन न करवें वाक्य ऐसें श्रुतीचें ॥६१॥
रामा ! त्वदगुणकीर्तना न करितां जे दुष्ट राजे जनीं
त्यांचें सेवनकीर्तनीं वय वृथा नेलें तया दुर्जनीं
जें लोकीं स्मरतांच पाप हरि त्या गंगोदका टाकुनी
जे भंगोदक सेविती जडमती त्यां साम्य मीं तें गणी ॥६२॥
रामा ! तूं गुणवंत संत तुजला ध्याती मनोमंदिरीं
ते तों त्वत्पद पावतां विलसती तुझ्या महामंदिरीं ।
जे जैंसें करिती तसेंचि करिसी देवा रमानायका
नाहीं त्वत्सम दूसरा सुरवरीं मोक्षाचिया दायका ॥६३॥
गंभीरत्व तसेंचि तें परगुणग्राहींच आस्था जया
देणें दान समान पात्र सम तें दुर्लेघ्य भूतांसि या ।
अंतः शीतल सद्रसें विलसतें पीयूषकूपापरीं
रामा ! त्वहदयारविंद निववी सन्मार्गवंतांतरीं ॥६४॥