रामा ! त्वद्भट मारुती करितसे गोपाद आपांपती
लंकेमाजि सती विलोकुनि महासंतोष दे तीप्रती ।
केला रावण तो तृणोपम पुरी ते कांचनी जाळिली
नेला अक्षय संक्षयासि महिमा तूझी जगीं दाविली ॥८८॥
जो कोट्यर्बुद योजनें नभपथें द्रोणागिरी आणिला
केला लक्ष्मण सावधान अणखी नेवोनि स्थापिला ।
जो एका निशिमाजि उद्भट अशा कर्मासि जो कां करी
रामा ! त्वकरुणाकटाक्षमहिमा दावी त्रिलोकांतरी ॥८९॥
कोठें रावण ! कैं सुवर्णनगरी लंका समुद्रोदरीं !
कोठें राक्षस ते महोद्भत सुरां संत्रासिती संगरीं ।
रामा ! ते कपि सत्वहीन असतां पालाफळें खायिरीं
त्यांपासोनि अशांसिही वधविलें ! तुझी कृपा हे खरीं ॥९०॥
रामा ! ते शबरी किरातकुळिची तीनें फळें अर्पिलीं
जें कां सांचुनि ठेविली बुरटलीं उष्टीं जुनीं आपुलीं ।
तीं त्वां स्वीकरिलीं म्हणोनि कळलें भक्तीं तुला अर्पिलें
दोषादोष न पाहतां प्रभुवरा ! आरोगिसी चांगलें ॥९१॥