निरंजन माधव - यशवर्णन

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा ! जे सगरान्वयीं उपजले राजे धरामंडळीं

त्यांचें सद्यश आजुनी प्रकट तें आहेचि सर्वास्थळीं ।

एकें निर्जर रक्षिले सुरनदी एकें जगीं आणिली

एकें दीर्घशिलोच्चयें विरचिला अक्षोभ्य सेतू जळीं ॥३८॥

रामा ! त्वद्यशसाम्यतेसि सगळा कैलास तो तोलिला

आला जोख उणा ह्नणोनि वरुता नंदीशही ठेविला ।

गौरीशीं शिव त्यावरी बसविला गंगाफणींद्रें बरा

येना पूर्ति म्हणोनि इंदुशकलें संपूर्ण केले हरा ॥३९॥

रामा ! तां क्षितिमंडळीं विचरतां कृत्यें अनेकापरी

केली दुर्घट आजुनी विलसते सत्कीर्ति लोकांतरीं ।

मेरु एक दिल्हा नसे द्विजवरां क्षीराब्धि राहे तसा

ना केला शशि पूर्ण हेंचि न कळे कां नाणिलें मानसा ? ॥४०॥

पूर्वी भूपति जाहले बहुतसे कर्मै तयांनीं बरीं

केली भूवरि आझुणी विलसती तत्कीर्ति लोकोत्तरी ।

ब्रह्मांडोदरपोकळी न भरली एका नृपाळें कधीं

रामा ! त्वांचि यशें समस्त भरली देखों दिठी धीरधी ॥४१॥

पाताळीं भय दुष्ट दानवकुळां आनंद स्वर्गी सुरा

पृथ्वीमाजि तुझी सुकीर्ति विलसे तारावयातें नरा ।

ब्रह्मांडांतरिं राघवा ! तव गुणांवांचोनि कोठें रितें ?

नाहीं साच मला मनासि गमलें हें शोधितां पूरतें ॥४२॥

रामा ! पूर्वील राजेश्वर गयनहुषातुल्य जे शत्रुतापी

त्यांचें आहे पुराणीं यश अझुनिवरी श्रेष्ठ पुण्यप्रतापी ।

तूझ्या कीर्तीस त्यांचें यश सम तुळितां भानुखद्योतमानें

किंवा पक्षींद्रसाम्या मशकगणन तें सज्जना काय माने ? ॥४३॥

रामा ! त्वत्कीर्तिचिंतामणिविमलशिला या जगीं प्राप्त झाली

तीची ते सज्जनांनीं मदनशतसमा मुर्ति निर्माण केली ।

दों हस्तीं तीस साजे शरधनुष बरें जानकीलक्ष्मणासीं

केली हत्पद्यगेहीं स्थिति म्हणुनि सदा सर्वचिंता विनाशी ॥४४॥

रामा ! श्रीमंतगेहोद्भव तरि कथिजे वृत्त आम्ही कशाला !

तत्रापी राहवेना म्हणुनि विनवितों ऐक तूं सत्यशीला ।

तूझी ते कीर्तिकांता दिशि दिशि फिरते स्वर्गपाताळधात्री

देवा ! दैत्येंद्रराजेश्वरमुनिसदनीं राहते दीसरात्रीं ! ॥४५॥

रामा ! सत्कीर्तिगंगा तव भुजयुगुळा मेरुमंदारगोत्रीं

झाली उत्पन्न यीणें त्रिभुवनसहिता व्यापिली भूतधात्री ।

गेली हे पूर्वपंथें तवगुणसरिता नायकासी मिळाली

नोहे अद्यापि झाले बहु दिवस तरी केधवांही निराळी ॥४६॥

रामा ! त्वत्कीर्तिकांता प्रसवत बरवें युग्म तें सत्यसंधा

कन्या धन्या दया ते सुत तरि ह्नणिजे सत्प्रतापा विशुद्धा ।

यीला अद्यापि कोणी वर सदृश नसे ते गृहीं तिष्ठताहे

नाहीं पुत्रा मिळाली युवति समगुणा तो दिशा धुंडिताहे ! ॥४७॥

रामें त्वद्यशकापुरें धवळिलें ब्रह्मांडगर्भी सदां

झालें श्वेतचि एकरुप दुसरें कांही दिसेना तदा ।

विष्णु क्षीरसमुद्र शेष हुडकी कैलास गंगाशशी

शंभू धुंडितसे मराळवहना धुंडी विधीऽहर्निशी ॥४८॥

रामा ! त्वत्कीर्तिवल्ली प्रकट उगवली मेदिनीआलवालीं

पाहों वृद्धिंगता ते तरि गगनमहामंडपीं व्याप्त झाली ।

नक्षत्रें रम्यपुष्पें सरस विकसली तें फळें दोनि आलीं

भानू पूर्णैदु ऐसीं निरखिति जन जे आझुनी पर्वकाळीं ॥४९॥

लोकीं या मृगनाभिकेशर तसें कर्पूरही वानिती

पाटीरागरुकेतकीसुरभिता सर्वत्र सम्मानिती ।

रामा ! त्वद्यशसाम्य एकहि नये ब्रह्मांडभांडोदरीं

आहे वास विशेष आजुनि युगें लोटोनि गेलीं तरी ॥५०॥

रामा ! त्वद्यशचंद्रमा उगवतां लोकांत ऐसें घडे

उल्हासे गुणसिंधु मोहमय तो अंधार सारा दडे ।

शत्रूच्या वदनारविंदनिकरीं ये म्लानता रोकडी

खद्योतोपम तत्समृद्धि समुदी पावे लया त्या घडी ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP