त्वद्दानोदक वाहतें क्षितिवरी चौहीं समुद्राभरी
जें कां याचकदीनतेसि बुडवी कल्पांबु पृथ्वीपरी ।
देवेंद्रादि पदें तदां विकसतीं फुल्लांबुजासारखीं
जाती षटपदविप्रसेवन करुं षटकर्मकर्ते सुखी ॥७२॥
सिंहासी सम सूकरांसि तुळिजे हंसासवें कावळा
क्षीराब्धीसम पल्वलास ह्नणिजे ते गार मुक्ताफळा ।
श्रीमत्कल्पमहीरुहासम तुका आणूं नये बाबुळा
रामा ! सर्वगुणाकरा ! लघु नृपां येना तुझी ते तुळा ॥७३॥
राजेंद्रा धरणींत राज्य करितां जे तां प्रजा पाळिली
ते अद्यापि सुकीर्ति पावन तुझी आहेच विस्तारली ।
त्वां रात्रिंचर रावणादि वधिले संतोषवीले मुनी
देवांचे सकळार्थ सिद्ध घडले गेले तुला वंदुनी ॥७४॥
रामा ! सिंहासनीं तूं विलससि विपुला संपंदेशीं प्रियेशीं
बंधूसीं जुत्पतीसीं वरसचिवगणीं सर्वभूपाळकांसी ।
तेव्हा मानी असें मी शशिसकळकळीं रोहिणीसी प्रभेसीं
नक्षत्रांसीं ग्रहांसीं अतिविमळ दिसे शारदी पौर्णिमेसीं ॥७५॥
तूं सिंहासनरुढ होसिल तदां लोकांत ऐसें घडे
पाताळीं विवरीं शिरोनि सभयें दारिद्र्य तेथे दडे ।
येना काळकळीं तुझ्या भयवशें देशांतही राघवा
देखों उत्सव मात्र पुष्ट बरवा विश्वांत या आघवा ॥७६॥
निर्गधें सुमनें सुगंध घडली गोडें फळें सर्वही
झाल्या सर्वलता लवंगलतिका झाली सुवर्णा मही ।
झाले मर्त्य अमर्त्य दीनजन ते झाले धनेशापरी
झाल्या त्या सरिता सुधारसयुता सत्कीर्ति सर्वाधरीं ॥७७॥
वामे वैदेहकन्या सकळशुभगुणा भुषणालंकृतांगी
बंधू सौमित्र शोभे धनुशरधर तो सर्वदा दक्षभागीं ।
कैकेयीपुत्र साजे अरिदमनसवें चामरच्छत्रधारी
तिष्ठे तो अग्रभार्गी विनययुत महा मारुती ब्रह्मचारी ॥७८॥