रामा ! तूं रणरंगधीर समरीं कोदंड घेतां करीं
ब्रह्मांडोदर सर्वही तव शरीं झांकोळलें तैं हरी ।
कैंचा सागर ? कैं गिरी ? क्षितिनभा देखों न येतां सुरीं
होता दिग्भ्रम सत्प्रतापतपनें केला उदो अंबरीं ॥३०॥
जेव्हां राघवसत्प्रतापतपनें उद्योतिल्या या दिशा
तेव्हां शत्रुयशःशशी मलिनता पावोनि घे दुर्दशा ।
दीर्घापत्ति घनांधकार सरतां गीर्वाणवक्रांबुजें
झालीं फुल्ल तदा सुकीर्ति कमला विश्रांति तेथें भजे ॥३१॥
रामा ! स्यंदन वेंघतां रथरजें सार्या दिशा स्पशिंल्या
देवा ! त्वत्तरुणप्रतापसह त्या संयोगही पावल्या ।
झाल्या गर्भवती उभौ प्रसवल्या प्राची प्रतीची वधू
एकी ते रविबिंब आणि दुसरी संपूर्ण व्याली विधू ॥३२॥
त्रैलोक्येश्वर रावणें हटविले तो हैययें जिंतिला
त्यातें मर्दुनि सत्प्रताप जगतीं श्रीभार्गवें स्थापिला ।
त्याचें सद्यश तां समस्त हरिलें अक्लेश एकाक्षणीं
यासाठीं तुज सर्वलोक म्हणती तूं एक वीराग्रणी ॥३३॥
सांगे ते चक्रवाकी गुज निजपतिला ऐक कांता खगेंद्रा
दीनाचा पक्षपाती रविकुलमणि हा देखसी रामचंद्रा ।
आहे भानू दिसां तो निशि उदित असे सत्प्रतापार्क याचा
आतां नाहीं वियोगाब्धिजभय सहसां आपणांतें त्रिवाचा ! ॥३४॥
कूर्माधार तळीं फणींद्र वरुता तो दीर्घदंडाकुती
पृथ्वी त्यावर पात्ररुप घडली तत्सुत्र भागीरथी ।
स्नेंहे पूर्णसमुद्र सप्तसलिलें सूर्याचिं हा आयिता
रामा ! त्वत्तरुणप्रताप विलसे दीपाकृती भूभृता ॥३५॥
सूर्याच्या उदयीं सतोष मिळती तें चकवाकें जशी
तैशी कीर्तिमहत्प्रताप तुझिया शौर्योदयीं सौरसीं ।
त्वहानोदसरित्तटीं विहरते हे युग्म राजेश्वरा
याते देखुनि तोष फार विकसे मत्योंरगां निर्जरां ॥३६॥
रामा ! त्वत्तरुणप्रताप विलसे कुंभोद्भवाचे परी
मोठा रात्रिचराब्धि शोषुनि बरा जो शोभला भूवरीं ।
वाली इल्वल भक्षिला बळनिधी सत्ख्याति केली जनीं
तद्भारें धरिली असेंचि अजुनी राजेश्वरा मेदिनी ॥३७॥