कामाचे शर पांच एकशर तूं; तो सर्व पीडा करी
तूं दुष्टांप्रति मात्र पीडिसी दया संपूर्ण भूतांवरी ।
तो आहे रतिकांत तूं विरतिचा प्राणेश राजेश्वरा
रामा ! त्वन्महिमा कसी वरिल बा क्रूरा अनंगा स्मरा ? ॥१००॥
इंद्राचे बहुनेत्रही द्विनयनापांगासि ते इच्छिती
सुर्याचे बहुपादही तवपदांभोजासि ते स्पर्शिती ।
शेषाची बहुतें मुखें तव मुखा एकासि ते वर्णिती
ऐशी राम ! तुझी विचित्र महिमा या जाणवेना मती ॥१०१॥
विष्णु श्रेष्ठ समस्तनिर्जरगणीं तो पादपीं
धेनुश्रेष्ठ समस्तगोधनकुळीं ते श्रेष्ठ शंभु तपीं ।
तारानायक पूज्य तारकगर्णी ग्रावांत चिंतामणी
तैसा या धरणीतळीं विलससी श्रीराम भूपाग्रणी ॥१०२॥
स्वर्गी देवगुरु बृहस्पति जसा शैलांत मेरु गुरु
रत्नीं तो गुरु पद्मराग मिरवे आपीं गुरु सागरु ।
धातूंमाजि गुरु सुवर्ण म्हणिजे ज्योतिर्गणीं भास्करु
तैसा राम मनोभिराम जगतीं कोदंडदीक्षागुरु ॥१०३॥
मीं सत्यव्रत मत्स्यरुपधर तूं तारी भवीं दुस्तरीं
मी झालों जड मंदराद्रि कमठाकारें स्वपृष्टीं धरी ।
होयीं यज्ञवराह मदहदयिंचा हेमाक्ष पापी विरीं
मी प्रल्हाद म्हणोनि तूं नरहरी रक्षीं मला लौकरी ॥१०४॥
माझें कर्म बळी म्हणोनि वटु हो घाली तळीं पालथा
माझ्या षड्रिपुनाशनीं भृगुपती हो राम तूं भूभृता ।
माझा मोहदशास्य नाशन करी तूं ज्ञानबाणानळीं
केशी कंस मदांध काळकळि ते कृष्णात्मका निर्दळी ॥१०५॥
हिंसाकर्म अधर्म बुद्ध चुकवी पाखंड नाशी बळें
म्लेंच्छप्राय सुदुष्टभाव निवटी कल्की महा तुंबळें ।
आतां तूं कृतकृत्य सत्वर करीं ध्यानीं नियोजीं मला
रामा ! ध्यापिन मी अहर्निश तुझ्या पादांबुजा कोमला ॥१०६॥
हातीं चाप अनूप बाण शरधी पाठीं असे बांधिला
माथां रत्न किरीट कौस्तुभ गळां बालार्कसा शोभला ।
कांचीदास सहेमवास मिरवे ज्याच्या कटीं पीवळा
सीतालक्षणयुक्त म्यां निरखिला श्रीरामजी सांवळा ॥१०७॥
झाली सौंदर्यसीमा तव वपु घडतां शिल्पसीमा विधीची
झाली माधुर्यसीमा मुखकमळभवा वाक्यमुक्ताफळांची ।
दोर्दडीं शौर्यसीमा पदकमळवरीं दीनसंतारणाची
झाली मद्भाग्यसीमा तव गुणगणनीं योजितां बुद्धि साची ॥१०८॥
रामा ! श्लोकें अनंतें स्तविति मुनि तुला व्यासवाल्मीक ऐसें
पुण्यश्लोका ! तुझ्या या स्तवनिं पुरवती हे शतश्लोक कैसे ? ।
सूर्यातें काडवाती करुनि उजळिजे सागरा अर्घ्य दीजे
तैसा सद्भाव अंगीकरुनि मज विभू या जगीं धन्य कीजे ॥१०९॥
झाली हे धन्य वाणी रघुपतिचरणीं अर्पिली पद्ममाळा
काव्यामोदें विराजे नवरसभरिता तोष दे सज्जनाला ।
यीतें कंठीं धरावें ह्नणुनि बुधवरां प्रार्थितों मी बनाजी
श्रीरामीं भक्ति ज्याची अतुळ विलसते मान्य हो त्या जनां जी ॥
श्रीरामकर्णपीयूषस्तोत्र योगीनिरंजनें
ग्रथिलें भावगंबीरें राघवार्पितसन्मनें ॥१११॥
॥ इतिश्रीनिरंजनमाधविरचितं श्रीरामकर्णामृतस्तोत्रं संपूर्ण ।
श्रीरामार्पणमस्तु ॥ शके १६९१ विरोधि संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा
भृगुवासरे लिखितमिदं समाप्तम् ॥ श्रीरस्तु ॥