नासिकेतोपाख्यान - अध्याय १

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकृष्णनाथाय नमः ॥ अथ नासिकेतोपाख्यानप्रारंभः ॥

श्लोक ॥ नृसिंहाय ह्यचिंत्याय ह्यलक्ष्याय शिवाय च ॥ श्रीगोपालमुनींद्राय श्रीरामगुरवे नमः ॥१॥

ॐ नमोजी गणेशा ॥ ज्ञानरुपा स्वयंप्रकाशा ॥ अजरामरा अविनाशा ॥ विघ्नविनाशा गणनाथा ॥२॥

उदरी ब्रह्मांडे अपार ॥ यालागी नाम लंबोदर ॥ शांतिसिंदूर सुंदररंगाकारा ॥ शोभा अपार साजिरी ॥३॥

जयजयाजी जगन्नायका ॥ उदारा उन्मेषसुखदायका ॥ जन्मस्थान तूं कळाकौतुका ॥ कविनायकालागी देसी ॥४॥

तरी विनंति माझी अवधारी ॥ वसोनियां हृदयांबरी ॥ चिंतितार्थ पूर्ण करी ॥ हो साह्यकारी परमार्था ॥५॥

तुझेनि प्रसादे कविजन ॥ पावले सुखसिद्धिसमाधान ॥। हे जाणोनियां तुज अर्पण ॥ केले तनुमन निजभावे ॥६॥

आतां वंदूं सरस्वती ॥ चिन्मात्रैकस्वानंदस्फूर्ती ॥ व्यापूनियां त्रिजगती ॥ निजात्मस्थिती नांदत ॥७॥

जी चिद्रत्नाची मांदूस ॥ शब्दब्रह्माची जे मूस ॥ जिये पासोनि वाग्विलास ॥ नाना भास विस्तारला ॥८॥

ते नमोनी भारती ॥ सकळार्थसिद्धीची सुखमूर्ती ॥ माउली संतोषोनि बाळकाप्रती ॥ होय चालविती या ग्रंथा ॥९॥

आतां वंदूं श्रीगुरुनाथा ॥ जो निजानंदे पूर्णभरिता ॥ जयाचे कृपादृष्टीने सर्वथा ॥ जीव होती परब्रह्म ॥१०॥

जयाचे कृपेची अगाध थोरी ॥ अज्ञानतिमिरा तात्काळ वारी ॥ जीवपरमात्मा एकाकारी ॥ बीजनिर्धारी नांदवी ॥११॥

जयाचा स्वरुपाचा बोध ॥ वर्णितां चकित झाला वेद ॥ श्रुतिस्मृतिप्रबोधप्रद ॥ गाती अगाध कीर्तनी ॥१२॥

जयाते धुंडाया निरंतर ॥ शास्त्री धांव घेतली सैरवैर ॥ योगी तिष्ठती अष्टौप्रहर ॥ महिमा अपार नेणेची ॥१३॥

ऐसा सहजपणे समर्थ ॥ कैवल्यदानी श्रीगुरुनाथ ॥ तयाशी केला चरणी प्रणिपात ॥ दृढभावार्थ निजनिष्ठा ॥१४॥

तो सद्गुरु श्यामसुंदर भारती ॥ जो परमानंदाची ओतीव मूर्ती ॥ किंवा अज्ञानाचा अराती ॥ गभस्ती उदया स्वये आला ॥१५॥

तेणे करुनि ज्ञानबोध ॥ शुद्धस्वरुपी केला सावध ॥ बाप श्रीगुरुकृपा अगाध ॥ परमानंदे श्रीगुरुभजनी ॥१६॥

असो श्रीगुरुचे महिमान ॥ वर्णितां वेदी घेतले मौन ॥ तेथे अल्प मी अतिदीन ॥ धीटपणे अवगलो ॥१७॥

तरी उपहासभय त्यजितो आतां ॥ येरवी नये यथार्थता ॥ तुज आवडली हे कथा ॥ जे तुझिया कृपे मज वर्णवे ॥१८॥

तूं स्वधर्मरक्षणालागी ॥ अवतार घेसी युगानुयुगी ॥ स्वधर्मस्थापना करिसी जगी ॥ मुमुक्षु वीतरागी उद्धरावया ॥१९॥

आतां वंदूं ते संतसज्जन ॥ जे सदा सर्वदा आनंदघन ॥ जे वर्षती स्वानंदघन ॥ संतसज्जन निववाया ॥२०॥

आणिक श्रोतयां विष्णुभक्तां ॥ सज्जनचरणी ठेवूनि माथा ॥ तुमचिया अवधाने धर्मकथा ॥ सिद्धि तत्वतां पावेल ॥२१॥

वंदूं आदिकविमहानुभवा ॥ व्यास वाल्मीकि शुकदेवां ॥ नारदादि वैष्णवां ॥ जे कीर्तनी निशं : क निरंतर ॥२२॥

निवृत्ती ज्ञानदेव मुकुंदराज ॥ कबीर नामदेव चतुर्भुज ॥ त्यांचे मस्तकी वंदीन पादांबुज ॥ मग देखेन निजग्रंथाते ॥२३॥

आतां अवधान द्यावे श्रोता ॥ सायुज्यरुपी परमार्था ॥ वरावी हे धर्मकथा ॥ सहज चित्ता प्रियकर ॥२४॥

ते म्हणती धर्मकीर्तन ॥ वेगे चालवी सोडूनि स्तवन ॥ तुझ्या हृदयी श्रीनारायण ॥ स्वये प्रगटोनी वदताहे ॥२५॥

ऐसे ऐकोनि संतवचन ॥ झाले उन्मेषासि स्फुरण ॥ जैसे ऐकोनि घनगर्जन ॥ सुखसंपत्ति ये मयूरा ॥२६॥

एवं लाहोनि ज्ञानोन्मेष ॥ विनवी तुका सुंदरदास ॥ तुम्ही आज्ञापिले विशेष ॥ तरी हा इतिहास अवधारा ॥२७॥

शतसहस्त्र असे संहिता ॥ भारती इतिहास अनंतकथा ॥ तयामाजि अतिअपूर्वता ॥ पुण्यसरिता अवधारा ॥ २८॥

तरी पुण्यरुप गंगातीरी ॥ हस्तिनापुर नामे नगरी ॥ तेथे जनमेजय राज्य करी ॥ सोमवंशामाजी धर्मात्मा ॥२९॥

दानजय पुण्यजय ॥ आंगी असोनी परमजय ॥ यालागी नामे जनमेजय ॥ ऋषिवर्य ऐसे त्यासी म्हणती ॥३०॥

प्रजापालनी दयावंत ॥ गोब्राह्मणांचा नित्यांकित ॥ द्विजवृंदासी वेष्टित ॥ सुशोभित सिंहासनी ॥३१॥

गंगास्नाने अलंकृत ॥ ब्रह्मसभा बैसली तेथ ॥ वैशंपायन प्रज्ञावंत ॥ शिष्य समर्थ व्यासाचा ॥३२॥

तया वैशंपायनाप्रती ॥ जनमेजय करी विनंती ॥ जे पुण्यपरायण त्रिजगती ॥ ते कथा मजप्रती सांगिजे ॥३३॥

तूं प्रज्ञाप्रबुद्ध महापुरुष ॥ तुझे वचन परमपीयूष ॥ तो मज अर्थ चकोरास ॥ पाजी सावकाश कथामृत ॥३४॥

तुझिया वचने दोष हरती ॥ हे मज आहे सत्यप्रतीती ॥ ऐसी कर जोडुनिया विनंती ॥ करी नृपती अत्यादरे ॥३५॥

देखोनि रायाचा अतिआदर ॥ वैशंपायन झाला सादर ॥ तरी ऐके राजनिधे पुण्यचरित्र ॥ कथा पवित्र अनुपम्य ॥३६॥

व्यासप्रसादे मी आपण ॥ झालो वेदशास्त्रपरायण ॥ माजी हे सार संपूर्ण ॥ कथा गहन भारती ॥३७॥

पवित्र पापनाशिनी ॥ जैसी दिव्यरत्नांची खाणी ॥ ऐके राया सावधचित्त ॥ तुज मी सांगेन मर्मचरित ॥ जे विख्यात त्रिलोकी ॥३९॥

परियेसी राजचूडामणी ॥ जे पवित्र पापनाशिनी ॥ कथा वंद्य त्रिभुवनी ॥ जे पापहारिणी तत्वतां ॥४०॥

तरी ब्रह्मयाचा सूत ॥ उद्दालकनामे अतिविख्यात ॥ ऐक तयाचे आचरित ॥ यथास्थित सांगेन ॥४१॥

तपस्तेजे महाअद्भुत ॥ वेदशास्त्रपारंगत ॥ दाता दयाळु कृपावंत ॥ अतिविख्यात तिही लोकी ॥४२॥

श्रुतिस्मृति सकळ ॥ ज्यांचे ठायी करतळामळ ॥ आंगी तपाचे महाबळ ॥ जो सर्वकाळ रत अनुष्ठानी ॥४३॥

तयाचा वसता आश्रम ॥ अतिरमणीय मनोरम ॥ नानासंकीर्ण लताद्रुम ॥ अतिविश्राम तापसां ॥४४॥

तेथींच्या जळाचे अवगाहन ॥ देत श्रांतां समाधान ॥ करितां फळमूळांचे सेवन ॥ वैराग्य उत्पन्न कामुकां ॥४५॥

जेथे निःशब्दार्थ अतिगूढ ॥ सुखसंपदा अतिसुरवाड ॥ तेथे एकांती ऐकतां पंवाडे ॥ करीत चाड मनाते ॥४६॥

कोकिळा कूजती परमशब्द ॥ शुक सारिकाप्रति संवाद ॥ पक्षी करिती वेदानुवाद ॥ परमानंदे आश्रमी ॥४७॥

सदा सुफलित वृक्षवल्ली ॥ हंस परमहंस चाली ॥ देखोनि उपनिषदां भूल पडली ॥ शोभा शोभली आश्रमी ॥४८॥

तपोनिधि मुनिगण ॥ आश्रमी वसती सिद्ध चारण ॥ ऐकोनि तयाचे महिमान ॥ दर्शनार्थ आपण ऋषि आले ॥४९॥

गौतम भरद्वाज भुशुंडी ॥ अंगिरा रोमहर्षण मार्कंडी ॥ पिप्पलायन आदि ऋषिपरवडी ॥ आल्या आवडी आश्रमा ॥५०॥

परिसोनि त्याची तपःस्थिती ॥ पाहो आल्या ऋषींच्या पंक्ती ॥ उद्दालका उल्हास चित्ती ॥ परमप्रीतीने तयां पूजिले ॥५१॥

मधुपर्कविविधान ॥ षोडशोपचारे केले पूजन ॥ भावेकरुनि अभिवंदन ॥ कर जोडून बोलत ॥५२॥

आजि माझे सफळ जन्म ॥ आजि माझे सफळ कर्म ॥ आजि माझा सफळ धर्म ॥ सफळ नेम आजि माझा ॥५३॥

आजि माझे सफळ तप ॥ आजि माझा सफळ जप ॥ आजि सकळ क्रिया सफळरुप ॥ संत कृपानुरुप आले की ॥५४॥

सार्थक माझे व्रतदान ॥ सार्थक माझे ध्येयदान ॥ मी झालो परम पावन ॥ संतदर्शन झालिया ॥५५॥

अनंतपुण्यांचिया कोटी ॥ तुम्ही संत देखिलिया दृष्टी ॥ आजि मी सुभाग्यसृष्टी ॥ दुर्लभ भेटी साधूंची ॥५६॥

साधूसंतांचे आलिंगन ॥ करी सर्वांगपावन ॥ अगाध साधूंचे महिमान ॥ चरणरजे कार्यासी आगमन ॥ ते कृपा करुनी सांगावे ॥५७॥

भक्तिपुरःसर आपण ॥ परमप्रीतीने घाली लोटांगण ॥ कवण्या कार्यासी आगमन ॥ ते कृपा करुनी सांगावे ॥५८॥

ऐकोनि तयाची विनवणी ॥ जो तापसांमाजी मुकुटमणी ॥ तो पिप्पलायन महामुनी ॥ काय गर्जोनि बोलत ॥५९॥

तुझ्या तपाची अगाध ख्याती ॥ बहुतकाळ आम्ही ऐकली होती ॥ ते पहावया यथास्थिती ॥ आलो निश्चिती समुदाये ॥६०॥

तुझे तप अतिअद्भुत ॥ ऐकोनि ब्रह्मादिक विस्मित ॥ जे त्रिभुवनामाजी विश्रुत ॥ ते समस्त देखिले ॥६१॥

तरी ऐक गा मुनिवर्या ॥ स्वाश्रमी नसतां भार्या ॥ त्वां ही अगाध तपश्चर्या ॥ कवण कार्या साधिली ॥६२॥

जेथे संतती अर्थ आणि दारा ॥ तेथे सकळ स्वधर्माचा थारा ॥ ऐसी हे पूर्वपरंपरा ॥ ऐक मुनिवरा सांगेन ॥६३॥

चतुर्वर्ण चारी आश्रम ॥ वेद बोलिले नित्य नेम ॥ तयांमाजी गृहस्थाश्रम ॥ पावन परम वेदशास्त्री ॥६४॥

तिही आश्रमांमाजी तत्वतां ॥ गृहस्थाश्रमचि मातापिता ॥ जेथे वित्त सुत आणि कांता ॥ तया अनुकूळ सकळ धर्म ॥६५॥

पूर्वापार महाऋषि ॥ सपत्नीक आश्रमवासी ॥ एके दंड तपविला आकाशी ॥ एके चुळी समुद्र शोषिला ॥६६॥

अत्रि आश्रमी अभिनव ॥ भोजना आले तिन्ही देव ॥ केले अनुसूयेने अपूर्व ॥ तेही लाघव अवधारा ॥६७॥

अतिथिरुपे आपण ॥ म्हणती भोजन देई होऊनि नग्न ॥ तिणे पतिचरणतीर्थ घेऊन ॥ केले अभिषिंचन तिघांसि ॥६८॥

समासांची अहोरात्री ॥ अनुसूया बाळे रक्षिती ॥ लक्ष्मी पार्वती सावित्री ॥ पति मागती भिक्षार्थ ॥६९॥

त्यांसी देऊनि तयांचे पती ॥ उदरी देवांची संभूती ॥ विष्णु झाला दत्तात्रेय मूर्ती ॥ रुद्राकृति दुर्वासा ॥७०॥

अत्रिगोत्रसमुत्पन्न ॥ ब्रह्मा चंद्रमा झाला आपण ॥ संततिवंशोद्धारण ॥ वेदपुराणसम्मते ॥७१॥

कश्यप तेरा स्त्रियांचा दादुला ॥ सकळसृष्टि कश्यप व्याला ॥ जयासी कश्यपवंश लागला ॥ तो पावन झाला तिही लोकी ॥७२॥

पुत्रसंपति संसारी ॥ तो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी ॥ देव वानिती तयाची थोरी ॥ इतर प्रत्युपकारी तयाचे ॥७३॥

यालागी गा महामती ॥ पुत्रे देवपितरांसी तृप्ती ॥ जयासी नाही पुत्रसंतती ॥ देवपितर तया होती विमुख ॥७४॥

अर्यमादि मुख्य देवता ॥ तया निंदिती समस्ता ॥ वंश नष्ट ऋषिनाथा ॥ जाण सर्वथा पुत्राविण ॥७५॥

जयाचे कुळी सुपुत्र ॥ तयासी मान देती देवपितर ॥ पुत्रावीण निर्फळ संसार ॥ जाण साचार ऋषिवर्या ॥७६॥

श्लोक सम्मतीचा ॥ अपुत्रस्य जगच्छून्यमपुत्रस्य गृहं कुतः ॥ अपुत्रो नाप्नुयात्स्वर्गमिति श्रुतिविभाषितम ॥१॥ टीका ॥

जयासी नाही पुत्रसंतान ॥ तया निपुत्रिका त्रिजगती शून्य ॥ ऐहिकपरत्रासी मुकला जाण ॥ श्रुतिवचन हे ऐसे ॥७७॥

जयाचे वंशी नाही पुत्र ॥ तयाचा शून्य घरचार ॥ म्हणोनि अपुत्र्याला परत्रपु ॥ वंशी तत्पर पाहिजे ॥७८॥

यालागी तुवां आपण ॥ पुत्रार्थी करावा प्रयत्न ॥ हेंचि तुज सांगावया ज्ञान ॥ आलों आपण समुदाये ॥७९॥

तुवां केले तप प्रबळ ॥ ते पुत्रावीण होऊं पाहे निर्फळ ॥ देवपितर अग्नि सकळ ॥ तुज सर्वकाळ निंदिती ॥८०॥

यालागी सर्वप्रयत्ने तुवां ॥ पुत्रे वंश सिद्धीस न्यावा ॥ इतुके तपे मेळवा ॥ सिद्धी आघवा पावेल ॥८१॥

ऐसे ऐकोनि तयांचे वचन ॥ उद्दालक बोले हास्यवदन ॥ माझे तप अतिवर्धमान ॥ ऐका महिमान तयाचे ॥८२॥

शायशी सहस्त्रवर्षेंवरी ॥ तपश्चर्या ब्रह्मचारी ॥ बंद न पडली कैसियापरी ॥ वेदशास्त्रे बोलती ॥८३॥

पुत्र दारा आणि धन ॥ हे तापसाशी महविघ्न ॥ भवबंधनाशी कारण ॥ मुख्यत्वे जाण स्त्रीसंग ॥८४॥

विधात्याने रचिला मोह ॥ कनक कांतेपाशी जीव ॥ बांधोनिया स्वयमेव ॥ केला उद्भव प्रपंचाचा ॥८५॥

त्या संसाराची निवृत्ती ॥ करणे या नांव तपःस्थिती ॥ ते आचरोनि यथानिगुती ॥ संसारगुंती उगवावी ॥८६॥

तेथे धन दारा आणि संतती ॥ यांची यानांवे पुनरावृत्ती ॥ ते तंव न लागो गा मजप्रती ॥ जाण निश्चितीं मुनिवर्या ॥८७॥

ऐसे ऐकोनि तयाचे वचन ॥ पिप्पलायन म्हणे आपण ॥ बोलिलास ते अप्रमाण ॥ संततीविण पुण्य कैचे ॥८८॥

संतति अर्थ आणि दारा ॥ आहे चालली परंपरा ॥ देखसी या चराचरा ॥ निपुत्रिक नरा गति नाही ॥८९॥

महर्षि जे तपोधन ॥ संतति अर्थ दाराग्रहण ॥ करोनि तप वर्धमान ॥ झाले पावन तिही लोक ॥९०॥

स्मृति वेदांत वेदोक्ती ॥ बोलली आहे गा संतती ॥ देव पितर अग्नितृप्ती ॥ अभाग्य निश्चिंती ब्रह्मचर्या ॥९१॥

यालागी स्वधर्मानुष्ठान ॥ हे हरिहरादिकांसी प्रमाण ॥ आहे श्रृतिशास्त्राचे वचन ॥ बोलिले आपण महाऋषि ॥९२॥

ऐसे सांगोनि तयसी ॥ प्रतिपादिले आश्रमधर्मासी ॥ अभिवंदूनी येरयेरांसी ॥ निघाले ऋषि स्वाश्रमा ॥९३॥

वैशंपायन म्हणे आपण । ऐके राया सावधान ॥ केले तपासी महाविघ्न ॥ झाला उद्विग्न उद्दालक ॥९४॥

ऐकोनि त्यांचिया वचनासी ॥ चिंतातुर झाला मानसी ॥ बुद्धीने ग्रासिले विवेकासी ॥ अहर्निशी स्त्रीचिंता ॥९५॥

करितां स्नानसंध्यातर्पण ॥ स्त्रीविरहे व्याकुळ मन ॥ एकांती करितां ध्यान ॥ स्त्रीचिंतन सर्वदा ॥९६॥

नवल कामाची लगबग ॥ शब्दमात्रे निःसंगा संग ॥ लावोनि केला योगभंग ॥ नित्य उद्वेग स्त्रियेचा ॥९७॥

स्त्रीप्रीत्यर्थ आपण ॥ म्हणे कोणासी जाऊ शरण ॥ कोण देईल कन्यारत्न ॥ काय आपण करावे ॥९८॥

ऐसे चिंतितां मानसी ॥ युक्ति आठवली तयासी ॥ पुसावया ब्रह्मयासी ॥ सत्यलोकासी निघाला ॥९९॥

तपाचिया सामर्थ्यशक्ति ॥ जातसे त्वरे मनोगती ॥ क्षणार्ध सत्यलोकाप्रती ॥ अंतर्गती पै आला ॥१००॥

जेथे सत्याचीच प्रवृत्ती ॥ सत्य बोलणे यथास्थिती ॥ सत्यसंकल्पे सर्वार्थी ॥ भजावा भूती भगवंत ॥१॥

सत्य बोलणे चालणे ॥ सत्य स्वधर्मानुसंधाने ॥ जेथे सत्यचि घेणेदेणे ॥ सत्यार्थी पावन परमात्मा ॥२॥

जयाठायी सर्व सत्य चाले ॥ विश्रांतसुख विसाव्यासी आले ॥ जे सत्यधर्माचे पाले ॥ यालागी बोलिला सत्यलोक ॥३॥

ऐशिया सत्यलोकप्रदेशी ॥ आराम रमविताहे जीवांसी ॥ तेथींचा महिमा वर्णावयासी ॥ नाही वाचेसी गति होय ॥४॥

तेथ चिंतामणीचे पर्वत ॥ ठायीठायी कल्पतरु पारिजात ॥ कामधेनूंची खिल्लारे जेथ ॥ घरोघरी समस्त पाळिती ॥५॥

सदा वोळंगे वसंत ॥ फलपुष्पी वृक्ष संकुलित ॥ घरोघरी वेदार्थ ॥ असे नांदत मूर्तिमंत ॥६॥

कोकिळा कुंजती पंचमशब्द ॥ पक्षी करिती वेदानुवाद ॥ शास्त्रे हुंकारती षट्पद ॥ प्रकट प्रेमानंद ते ठायी ॥७॥

नगरी पताका तोरणे ॥ जैसी मेरुभोवती तारागणे ॥ की ते चहुंपुरुषार्थाचे धांवणे ॥ असे पाल्हाण मुक्तीसी ॥८॥

ऐशियापरी ब्रह्मभुवन ॥ सकाळसामर्थ्ये विराजमान ॥ जेथे वसे चतुरानन ॥ ते मी पामर काय वर्णू ॥९॥

सिंहासनी चतुरानन ॥ दिव्यतेजे विराजमान ॥ रत्नखचित ब्रह्मभुवन ॥ शोभा संपूर्ण शोभत ॥११०॥

देव दानव यक्ष किन्नर ॥ ऋषि गंधर्व विद्याधर ॥ नानास्तोत्री जयजयकार ॥ जोडूनि कर स्तविताती ॥११॥

महामंडप बैसला लोकनाथ ॥ घातले उद्दालके दंडवत ॥ पूजाविधी विधानोक्त ॥ करोनि स्तवी स्वानंदे ॥१२॥

म्हणे जयजय देव स्वयंभा ॥ जयजय देव कमळारंभा ॥ जयजय देव सृष्टिस्तंभा ॥ जयजय देव आदिमूर्ती ॥१३॥

जयजय सकळलोकनायका ॥ जय कमळसृष्टिआदिकारका ॥ जयजय सकळ मंगलदायका ॥ चतुर्मुखा ईशाना ॥१४॥

जयजय देव प्रजापती ॥ जयजयदेव विश्वमूर्ती ॥ पितामह तूं त्रिजगती ॥ ब्रह्मांडस्थिती तुजपासून ॥१५॥

ऐसे ऐकोनि तयाचे स्तवन ॥ संतोषला चतुरानन ॥ ध्यानोन्मीलितयनयन ॥ पाहे तयाकडे कृपादृष्टी ॥१६॥

ऋषि आल्हादे गर्जे परम ॥ म्हणे आजि माझे सफळ जन्म ॥ सकळ माझे क्रियाकर्म ॥ यज्ञादिधर्म सफळ आजि ॥१७॥

ऐसी ऐकोनि त्याची स्तुती ॥ प्रसन्नवदन प्रजापती ॥ पुत्रस्नेहे अति प्रीती ॥ काय त्याप्रती बोलत ॥१८॥

म्हणे कल्याण गा ऋषिसत्तमा ॥ निर्विघ्न आहे स्वश्रमा ॥ बहुतां दिवसी भेट दिली आम्हां ॥ काय तुम्हां अपेक्षित असे ॥१९॥

कोणत्या कार्यासी तुझे आगमन ॥ ते तुवां सांगिजे पूर्ण ॥ ऐसे पुसतां चतुरानन ॥ ऋषि आपण सांगत ॥१२०॥

जोडोनिया करांजुळी ॥ मृदुमधुर वाणी मंजुळी ॥ बोलता झाला ते वेळी ॥ जे सकळऋषी आज्ञापिले ॥२१॥

म्हणे असतां आपुले देशी ॥ पिप्पलायनादि आले आश्रमासी ॥ तिही सांगितले साक्षेपेसी ॥ की पुत्रसंतति मेळवावी ॥२२॥

पुत्राविण निष्फळ वंश ॥ पितृदेवता होती उदास ॥ संततीविण तप अशेष ॥ केल्या पुण्य जोडेना ॥२३॥

ऐसे सांगोनि मजपासी ॥ ऋषी गेले स्वाश्रमासी ॥ विघ्न झाले तपासी ॥ चिंता मानसी अनिवार ॥२४॥

स्नानसंध्यातर्पण करितां ॥ अहर्निशी प्रबल चिंता ॥ तुज शरण आलो जी ताता ॥ जाणसी आतां ते करी ॥२५॥

ऐकोनि पुत्राचे वचन ॥ प्रसन्न झाला चतुरानन ॥ तुज मी देतो दान ॥ सावधान अवधारी ॥२६॥

आदौ पुत्र पश्चात भार्या ॥ सत्य पावसी ऋषिवर्या ॥ तुझ्या पुत्राची ऐकतां चर्या ॥ लोकत्रय उद्धरे पै ॥२७॥

इक्ष्वाकुकुळनंदिनी ॥ पाठी पावसी सुंदर पत्नी ॥ ऐसे ब्रह्मवरदान ऐकोनि ॥ झाली मनी आशंका ॥२८॥

म्हणे कोणी दृष्ट ना श्रुत ॥ हे केवी घडे विपरीतार्थ ॥ तंव म्हणे सत्यलोकनाथ ॥ नसे अन्यथा भाष माझी ॥२९॥

आधी पावसी पुत्रसंतती ॥ पश्चात भार्या गुणवती ॥ कदापि विकल्प न धरावा चित्ती ॥ सत्य वचनोक्ति हे माझी ॥१३०॥

विश्वासोनि मद्वचनासी ॥ सुखे जावे आश्रमासी ॥ आराधोनियां सदाशिवासी ॥ अहर्निशी निजनिष्ठे ॥३१॥

सत्य मानूनी माझे वचन ॥ करी ईश्वराचे आराधन ॥ ऐकोनि ब्रह्मदेवाचे वचन ॥ केले नमन साष्टांगी ॥३२॥

अभिवंदूनी ब्रह्मदेवासी ॥ आज्ञा मागोनि तयासी ॥ उल्हासयुक्त मानसी ॥ स्वाश्रमासी तो आला ॥३३॥

ऐसे लाहोनि ब्रह्मवरदान ॥ करितां ईश्वराचे आराधन ॥ पुढे काय झाले वर्तमान ॥ ते सावधान अवधारा ॥३४॥

वैशंपायन म्हणे नृपनाथा ॥ तुझिया प्रश्नादरे तत्वतां ॥ अनादि हे जुनाट कथा ॥ आली वाक्पथा माझिया ॥३५॥

पुण्यप्रसंगाचा प्रश्न ॥ ऐकोनि उल्हासले माझे मन ॥ तुज ऐसा पुण्यपरायण ॥ न दिसे अन्य तिही लोकी ॥३६॥

जगदुद्धारण पुण्यसरिता ॥ पापतापहारिणी तत्वता ॥ विभळभक्तीने श्रवण करितां ॥ नाशी दुरिता तत्काळ ॥३७॥

तरी तुझे निमित्त जाण ॥ झाले जगतत्रयाचे उद्धरण ॥ तरी ऐक राया हो सावधान पुढील कथन ऋषीचे ॥३८॥

स्त्रियेवीण पुत्रसंतती ॥ केवी झाली तयाप्रती ॥ ते कथा कौतुकसंगती ॥ ऐके नृपते सुभाग्यया ॥३९॥

महाभारतींचा इतिहास ॥ नासिकेतोपाख्यान सुरस ॥ विनवी तुका सुंदरदास ॥ सुजनी अवकाश मज द्यावा ॥१४०॥

माझे सोइरे संतसज्जन ॥ त्यांच्या पुढे हे धर्मकीर्तन ॥ श्रोती द्यावे अवधान ॥ पुढे निरुपण अति गोड ॥१४१॥

इति श्रीनासिकेतोपाख्याने उद्दालकचिंता नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ॥ शुभं भवतु ॥

॥ इति नासिकेतोपाख्याने प्रथमो ध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP