श्रीगणेशाय नमः ॥
ऐसा भारतींचा इतिहास ॥ वैशंपायन सांगे जनमेजयास ॥ श्रवणमात्रे हरती दोष ॥ अति सुरस धर्मकथा ॥१॥
मुनि म्हणे गा भारत ॥ पुढील परिसावी पावनकथा ॥ पुत्रस्नेहे तळमळली माता ॥ झाली तात्काळ अतिदुःखी ॥२॥
जावोनिया गंगातीरा ॥ रुदन करी ते सुंदरा ॥ म्हणे कोठे गेलासिरे पुत्रा ॥ गुणसमुद्रा माझिया ॥३॥
क्रोधे करोनी आपण ॥ जेथे गंगामाजी केले निमग्न ॥ तये स्थळी येऊनि जाण ॥ करी रुदन प्रतिदिनी ॥४॥
सुंदरा सुकुमारा डोळसा ॥ कोठे गेलासिरे राजसा ॥ न्याहळीतसे दाही दिशा ॥ म्हणेरे वत्सा काय करुं ॥५॥
चंद्रप्रभा आक्रंदोनी ॥ रुदन करी अधोवदनी ॥ पुसते श्वापदां लागुनी ॥ देखिला कोणी की बाळ माझा ॥६॥
रे रे पुत्रा दाखवी मुख ॥ अट्टहासे मारीत हाक ॥ धांवोनि वनचरां संमुख ॥ म्हणे सांगा बाळक कोठे माझा ॥७॥
हाहा पुत्रा म्हणूनी ॥ आक्रोशे आंग टाकी धरणी ॥ सवेचि म्हणे वो माय मेदिनी ॥ पुत्र कोण्या वनी आहे सांगा ॥८॥
चंद्रप्रभा यापरी ॥ पुत्रमोहे व्याकुळ भारी ॥ कथा कैसी वर्तली पुढारी ॥ ती अवधारी नृपनाथा ॥९॥
रडत रडत आक्रंदत ॥ अट्टहासे रुदन करित ॥ तंव तेथे आला नासिकेत ॥ गंगास्नानार्थ पर्वकाळी ॥१०॥
ऐकूनियां शोकध्वनी ॥ विस्मय पावला बालमुनी ॥ जेथे आक्रंदे जननी ॥ आला तत्क्षणी त्या ठायां ॥११॥
चंद्रप्रभा जंव पाहे ॥ तंव पुत्र पुढे उभा आहे ॥ धांवूनियां लवलाहे ॥ आली बाळासमीप ॥१२॥
मातेने पुत्र देखिला दृष्टी ॥ प्रेमे कंठी घाली मिठी ॥ हाती धरुनियां हनुवटी ॥ चुंबी गोरटी मुखकमळा ॥१३॥
जीवे करुनियां निंबलोण ॥ म्हणे कोठे केले होते गमन ॥ कवण आश्रम कवण स्थान ॥ प्रतिपालन कोणी केले ॥१४॥
नासिकेत म्हणे वो माते ॥ पुण्याश्रमी माझा पिता ॥ तेणे प्रतिपाळिले तत्त्वतां ॥ जनकजननी होऊन ॥१५॥
ब्रह्मयाचा मानससुत ॥ उद्दालक नामे विख्यात ॥ तेणे नदीमाजी वाहत ॥ मज त्वरित काढिले ॥१६॥
प्रतिपाळिले बरवियापरी ॥ तोचि माता पिता हो सुंदरी ॥ आश्रम आहे गंगातीरी ॥ तो ब्रह्मचारी तापस ॥१७॥
तयाचा वसता आश्रम ॥ सर्वे महर्षि वसती उत्तमोत्तम ॥ परम विश्रांति मनोरम ॥ स्वानंदाराम तापसा ॥१८॥
गूढ घोर महावन ॥ तर्कवितर्क नाही ते स्थान ॥ विपुल फळमूळ गंगाजीवन ॥ सुखसंपन्न तापसां ॥१९॥
तेथे आहे तो तपोराशी ॥ मज पाठविले कुशदर्भासी ॥ जरी तूं मज आज्ञा देशी ॥ जाईन सेवेसी विलंब झाला ॥२०॥
माता म्हणे नासिकेतासी ॥ तुवां नवजावे तयापासी ॥ निर्मोनियां स्वाश्रमासी ॥ सुखसंतोषे रहावे ॥२१॥
करुनियां यज्ञशाळा ॥ दोघे सेवूं फळमूळां ॥ येथूनिया न जावे बाळा ॥ सुखे स्वलीले वसावे ॥२२॥
नासिकेत म्हणे वो माते ॥ मज तंव राहतां नये येथे ॥ द्रोह घडेल पितृसेवेत ॥ पिता निश्चये कोपेल ॥२३॥
घेऊनि पित्याचे आज्ञापन ॥ मागुता येईन मी आपण ॥ करुनि मातेसी नमन ॥ निघाला जाण तेथुनी ॥२४॥
येऊनियां आश्रमासी ॥ नमन केले पितयांसी ॥ उशीर लागला देवार्चनासी ॥ कोठे गुंतलासी ते सांग ॥२५॥
नासिकेत म्हणे जी ताता ॥ वनामाजी हिंडता ॥ गंगातीरी भेटली माता ॥ अतिदुःखिता वनवासी ॥२६॥
तियेसी देऊनि शांतवन ॥ घेऊनियां आज्ञापन ॥ येथे आलो मी आपण ॥ क्षमा संपूर्ण करा स्वामी ॥२७॥
ऐसी ऐकोनि त्याची वार्ता ॥ उल्हास जाहला आलिंगितां ॥ म्हणे अपूर्व सांगितली कथा ॥ कोठे माता आहे तुझी ॥२८॥
कोण राष्ट्र कोण देश ॥ कोणे कुली जन्म तियेसी ॥ समूळ सांगे वृत्तांतास ॥ पुसे तापस पुत्रासी ॥२९॥
ऐकोनि पितयाचा वचनार्थ ॥ स्वये सांगत नासिकेत ॥ ती शोक करितां वनांत ॥ मी आकस्मात तेथे गेलो ॥३०॥
मज देखोनियां दृष्टी ॥ धांवूनि कंठी घातली मिठी ॥ ऋषीचा आश्रम गंगातटी ॥ तेथे गोरटी वसताहे ॥३१॥
तुमचे सेवे लागी जाण ॥ मी त्वरे आलो आपण ॥ ऐकोनि पुत्राचे वचन ॥ सुखसंपन्न ऋषि जाहला ॥३२॥
उद्दालक म्हणे नासिकेता ॥ तुवां शुभ आणिली वार्ता ॥ वेगे जाऊनियां आता ॥ आणी तुझी माता आश्रमी ॥३३॥
समूळ पुसुनियां वृत्तांतासी ॥ वेगे आणावे तियेसी ॥ शिरी वंदूनि पितृवचनासी ॥ बाळ ऋषि निघाला ॥३४॥
येऊनियां मातेपासी ॥ साष्टांगी नमिले तियेसी ॥ सांगूनिया वृत्तांतासी ॥ म्हणे आश्रमासी चलावे ॥३५॥
ऐकोनि पुत्राचे वचन ॥ माता जाहली कोपायमान ॥ कैंचा सांगसी तपोधन ॥ मजलागोनि पाचारिसी ॥३६॥
माता पिता उभयकुळ ॥ सूर्यवंशी अतिनिर्मळ ॥ त्रैलोकीचे भूपाळ ॥ सदा सर्वकाळ वानिती ॥३७॥
त्या रघुरायाची मी नंदिनी ॥ दोषास्तव तेणे त्यागिले वनी ॥ केवी करुं विरुद्धकरणी ॥ होईल हानी तपाची ॥३८॥
उभयकुळे माझी निर्दोष ॥ कैचा नेणे सांगसी तापस ॥ केवी स्वच्छंदे मेळवूं पुरुष ॥ दोषी निश्चये होईन मी ॥३९॥
जरी स्वइच्छे मेळविला वर ॥ तरी मज घडेल व्यभिचार ॥ सकळ दोषांसी माहेर ॥ होईन साचार पुत्रराया ॥४०॥
अधर्मकर्माची काहणी ॥मी न देखे जागृती स्वप्नी ॥ कैचा देखिला ना ऐकिला मुनी ॥ मजलागोनि पाचारितोसी ॥४१॥
ऐसा सत्य धर्म आपुला ॥ पुत्राप्रति निवेदिला ॥ ऐकोनि मातेचिया बोला ॥ मागुती आला पितयापासी ॥४२॥
मातेविण आपुला सुत ॥ एकला आला नासिकेत ॥ ऋषि पुसे त्यासी वृत्तांत ॥ कां रिक्त आलासी ॥४३॥
पुत्राते म्हणे मुनी ॥ कां आली नाही तुझी जननी ॥ येरु म्हणे हे अयुक्तकरणी ॥ विचारावे मनी आपुलियां ॥४४॥
म्यां जावोनियां त्वरित ॥ समूळ सांगीतला वृत्तांत ॥ माता होऊनियां संतप्त ॥ सत्य धर्मार्ध अनुवदे ॥४५॥
अप्रणीत मी राजनंदिनी ॥ कैंचा दृष्ट ना श्रुत मुनी ॥ केंवी पाचारितो मजलागुनी ॥ विरुद्धकर्णी सर्वथा ॥४६॥
उभयकुळ माझे शुद्ध ॥ मी राजकन्या प्रसिद्ध ॥ करितां कर्म धर्मविरुद्ध ॥ दोष घडेल मजलागी ॥४७॥
मज निंदिता मातापिता ॥ स्वइच्छे भ्रतार मेळवितां ॥ अधर्म बैसेल माथा ॥ वेदशास्त्रा अतिनिंद्य ॥४८॥
ऐसी आपुली धर्मता ॥ मजप्रति बोलिली माता ॥ ऐकोनि तयाच्या वचनार्था ॥ ऋषि मागुती बोलत ॥४९॥
पुत्राते म्हणे ब्रह्मऋषी ॥ तूं मागुती जाय तियेपासी ॥ साक्षेपे पुसावे तियेसी ॥ कवणे वंशी जन्म तुझा ॥५०॥
तुझा पिता तो सांग कवण ॥ कवण नगर कवण स्थान ॥ केवी जाहला गर्भ उत्पन्न ॥ तुज वनप्रयाण केवी जाहले ॥५१॥
तूं प्रथमवयसा वेल्हाळी ॥ कासया सेविली वनस्थळी ॥ हे पुसोनि तियेजवळी ॥ यावे तात्काळी पुत्रराया ॥५२॥
ऐकोनिया पितृवचनासी ॥ सवेग आला मातेपासी ॥ वृत्तांत पुसतां तियेसी ॥ सांगे वृत्तांत अंबिका ॥५३॥
सूर्यवंशींचा भूपती ॥ रघुराज अयोध्यापती ॥ त्याची कन्या मी प्रभावती ॥ राये परमप्रीतीने पाळिले ॥५४॥
निजपुत्राचियाचारी ॥ राव मजवरी कृपा करी ॥ सुखसंपदा रायाघरी ॥ नानापरी राज्यभोग ॥५५॥
वस्त्राभरणी भूषित ॥ गंधर्व गायन गीत नृत्य ॥ मी राजकन्या सालंकृत ॥ असे क्रीडत राजगृही ॥५६॥
सवे सखिया सुंदरी ॥ तैशाच देवगंधर्वकुमारी ॥ सुखसंपदा नानापरी ॥ राजमंदिरी नांदत ॥५७॥
सवे दासी शतानुषत ॥ नित्य जातसे गंगास्नानार्थ ॥ जलक्रिडा करुनि तेथ ॥ येई त्वरित गृहासी ॥५८॥
वसंतकाळी एके दिवसी ॥ करुं गेल्ये गंगास्नानासी ॥ क्षणैक करुनि जळक्रिडेसी ॥ गंगातीरी बैसल्ये ॥५९॥
तंव शरयूमाजी वाहत ॥ कमळ देखिले अकस्मात ॥ दिव्य तेजे लखलखित ॥ ते म्यां परिमळार्थ आणविले ॥६०॥
दर्भे वेष्टित कमलग्रंथी ॥ सोडूनियां अतिनिगुती ॥ अवघ्राणिले अति प्रीती ॥ विपरीतगति तेथे जाहली ॥६१॥
श्वास वोढितां आमोदार्थ ॥ शुद्धदुग्ध ऐसा श्वेत ॥ कण गेला नासिकेत ॥ मज ते निश्चित कळोआले ॥६२॥
पुन्हा करोनियां स्नान ॥ गृहासी आल्ये आपण ॥ विचित्रकर्मास्तव जाण ॥ राहिला गर्भ ममोदरी ॥६३॥
तेथूनियां दिवसेंदिवस ॥ गर्भा भरले पांच मास ॥ वृत्तांत जाणिला पितयास ॥ म्हणे केला दोष कुमारिके ॥६४॥
पिता कोपला विलोकितां ॥ करुं पाहे माझिया घाता ॥ न करावी स्त्रीहत्या सर्वथा ॥ शास्त्रधर्मता रक्षिली ॥६५॥
राया पाचारोनिया दूत ॥ मज त्यागिले या वनांत ॥ दुःखे शोक करितां येथ ॥ आला अकस्मात धर्मऋषी ॥६६॥
तेणे मज देखूनि शोकसंतप्त ॥ पुसता जाहला वृत्तांत ॥ म्यांही सांगितला यथार्थ ॥ जो तुजप्रति निवेदिला ॥६७॥
भूतकृपे अंतर द्रवले ॥ मज आश्रमासी तेणे आणिले ॥ कन्येपरी प्रतिपाळिले ॥ यापरी भरले नव मास ॥६८॥
पूर्ण दिवस भरल्यावरी ॥ तुझा जन्म झाला नासिकाद्वारी ॥ तया स्वकथा ऐशियापरी ॥ पूर्वापार सांगितली ॥६९॥
ऐकोनि मातेचे वचन ॥ नासिकेत निघाला तेथून ॥ पित्यापासी येऊनि आपण ॥ समूळ कथन सांगितले ॥७०॥
मातामुखींचा वृत्तांत संपूर्ण सांगता नासिकेत ॥ ऐकूनिया त्याची मात ॥ जाहला विस्मित उद्दालक ॥७१॥
म्हणे चिंतिला जो मनोरथ ॥ तो मी पावलो यथार्थ ॥ ब्रह्मदेवाचा वचनार्थ ॥ जाहला सत्यार्थ पै आजी ॥७२॥
आदौ पुत्र पश्चात पत्नी ॥ ऐसे ब्रह्मवरदान मजलागुनी ॥ जे दृष्ट ना श्रुत त्रिभुवनी ॥ ते प्रत्यक्ष नयनी देखिले ॥७३॥
वैशंपायन म्हणे राया ॥ अति उल्हास ऋषिवर्या ॥ नवल पहाहो दैवी माया ॥ करीत विस्मया वेळोवेळां ॥७४॥
उद्दालक म्हणे पुत्रासी ॥ तुवां जावे मातेपासी ॥ मी जाऊनियां अयोध्येसी ॥ रघुरायासी भेटतो ॥७५॥
शिरी वंदुनी पितृवचन ॥ नासिकेत परतला तेथून ॥ पुढे काय जाहले कथन ॥ सावधान अवधारी ॥७६॥
तुकासुंदर रामी शरण ॥ उद्दालकासी उल्हास पूर्ण ॥ पुढे प्रभावतीपाणिग्रहण ॥ कथा पावन अवधारी ॥७७॥
॥ इति नासिकेतोपाख्याने उद्दालकोल्हासे नाम चतुर्थोऽध्याय समाप्त ॥