नासिकेतोपाख्यान - अध्याय २

महीपति महाराजांनी कथन केलेली नासिकेत ग्रंथावली साधु तुकाराम महाराजांनी लिहून घेतली .


श्रीगणेशाय नमः ॥

जनमेजय म्हणे महामुनी ॥ तूं योगियांमाजी अग्रगणी ॥ धनधन्य तुझी वाणी ॥ कथामृतपानी निवालो ॥१॥

भार्येविण जन्मला पुत्र ॥ हे कोणी नाही कथिले चरित्र ॥ तरी ते सांगावे सविस्तर ॥ परम पवित्र अनुपम्य ॥२॥

वैशपायन म्हणे गा भारता ॥ सादर परिसावे नृपनाथा ॥ उद्दालक आश्रमी असतां ॥ अपूर्व कथा वर्तली ॥३॥

स्नानसंध्यातर्पण ॥ जपहोम अनुष्ठान ॥ करितां ईश्वराचे आराधन ॥ सावधान निजनिष्ठे ॥४॥

पुत्रार्थी अति उद्युक्त ॥ संशयाविष्ट जाहले चित्त ॥ म्हणे प्रजापतीचा वाक्यार्थ ॥ अघटितार्थ केवी घडे ॥५॥

भार्येविण पुत्रसंतान ॥ केवी घडे हे अघटितमान ॥ मिथ्या वदला चतुरानन ॥ न घडे ते आपणा केवी घडे ॥६॥

आदौ पुत्र पश्चात पत्नी ॥ जे दृष्ट ना श्रुत त्रिभुवनी ॥ ऐसे चिंतितां अनुदिनी ॥ विचित्र करणी तेथे जाहली ॥७॥

प्रजापतीचे वचनी ॥ भार्यार्थी चिंतितां अनुदिनी ॥ ध्यानी मनी चिंतनी ॥ जागृती स्वप्नी निदिध्यास ॥८॥

स्त्रीचिंता सर्वकाळ ॥ जाहला विरहातुर विकळ ॥ काम खवळला प्रबळ ॥ जाहला तत्काळ वीर्यस्त्रावी ॥९॥

नष्ट झाली देहस्मृती ॥ वीर्य स्ववले क्षिती ॥ स्त्रीकामाची हे ख्याती ॥ पाडी अधःपाती क्षणार्धे ॥१०॥

कामातुर पुरुषासी ॥ हिताहित नाठवे त्यासी ॥ कामे घोळियेले देवांसी ॥ पाडी तोंडघशी ॥ तापस ॥११॥

जपी तपी आणि मुंडी ॥ कामे मारिले तोंडच्या तोंडी ॥ अतर्क्य कामाची परवडी ॥ कोडीच्या कोडी नागविले ॥१२॥

काम खवळल्या महाबळी ॥ क्षणार्धे तपाची करी होळी ॥ मोडोनि सत्यधर्माच्या ओळी ॥ करी रांगोळी धैर्याची ॥१३॥

कामाच्या ढळलिया तवका ॥ आवरुं न शकती ब्रह्मांदिका ॥ काम दुःसह तिही लोकां ॥ तेणे उद्दालका नाडिले ॥१४॥

उद्दालक पाहे सावधस्थिती ॥ तंव वीर्यस्त्राव देखिला क्षिती ॥ तो कमलामाजी घालोनि यथा निगुती ॥ दर्भे ग्रंथी बांधिली ॥१५॥

ते कमळ घेऊनियां आपण ॥ गंगेमाजी केले निमग्न ॥ पुनरपि करोनियां स्नान ॥ आला आपुल्या आश्रमासी ॥१६॥

ऐशी ऋषीची व्यवस्था ॥ पुनश्चरण करी मागुता ॥ पुढे काय वर्तली कथा ॥ सावध नृपनाथा अवधारी ॥१७॥

मोक्षाची जे प्रथमपुरी ॥ अयोध्या नामे पुण्यनगरी ॥ तेथे रघुराजा राज्य करी ॥ जो सूर्यवंशामाझारी धर्मात्मा ॥१८॥

गोब्राह्मणांचा प्रतिपाळक ॥ स्वधर्मशीळ शुद्ध सात्विक ॥ परस्त्रीविषयी नपुंसक ॥ अलौकिक पुरुषार्थी ॥१९॥

ऐसा तो अयोध्यापति नृपवर ॥ धर्मरक्षणी अति तत्पर ॥ उदार यशस्वी गुणगंभीर ॥ कन्या सुंदर चंद्रावती तया ॥२०॥

रघुरायाचे कन्यारत्न ॥ चंद्रप्रभा गुणलावण्य ॥ सुस्वरुपे अति घनस्तनी अति संपन्न ॥ मदनमोहिनी कामिनी ॥२१॥

चंद्रवदना चापेगोरटी ॥ कमळनयना विशाळ भृकुटी ॥ घनस्तनी अति गोरटी ॥ माज मुष्टी सामावे ॥२२॥

अमृतप्राय तिची बोली ॥ ओंठ पोवळियांच्या वेली ॥ हंसगतीसम चाले चाली ॥ सौभाग्ये शोभली सुंदर सौंदर्ये ॥२३॥

तप्तकांचनाचा गाभा ॥ तैसी अंगीची दिव्य प्रभा ॥ तेज उजळित असे नभा ॥ परमशोभा शोभत ॥२४॥

ठाणमाण गुणलावण्य ॥ लेइले अलंकार भूषण ॥ केले पीतांबर परिधान ॥ सुलक्षण अति साजिरी ॥२५॥

ऐशी ते अत्यंतसुंदर ॥ रत्नालंकारी मनोहर ॥ चरणी नूपुरांचा गजर ॥ अति सुकुमार वेल्हाळी ॥२६॥

देवी गंधर्वी निशाचरी ॥ यक्षिणी मानवी विद्याधरी ॥ नागकन्या अति सुंदरी ॥ तिची सरी नपावती ॥२७॥

रंभा उर्वशी तिलोत्तमा ॥ लक्ष्मी सावित्री आणि उमा ॥ सकळसौंदर्या जाहली सीमा ॥ तिचा महिमा देखोनि ॥२८॥

ऐसी सौंदर्य ओतिली ॥ केवळ मदनाची पुतळी ॥ पाहतां स्वर्गमृत्युपाताळी ॥ ऐसी वेल्हाळी असेना ॥२९॥

यापरी तिचे स्वरुप सुंदर ॥ सवें राजकन्या दशसहस्त्र ॥ नानाभूषणी सालंकार ॥ क्रीडा मनोहर राजगृही ॥३०॥

ऐशापरी ते रुपसंपन्न ॥ सर्वाभरणी सुलक्षण ॥ नित्य करी गंगास्नान ॥ पूजी ब्राह्मण दानसन्माने ॥३१॥

शोभायमान अयोध्यापुरी ॥ राव प्रतिपाळीत बरी ॥ यापरी दीनजनांचा साह्यकारी ॥ नाही नगरी दैन्यदुःखे ॥३२॥

जो ब्राह्मणभक्त परम सत्यव्रत ॥ प्रजापालनी सुकीर्तिगुणगंभीर ॥ सकळगुणांचे माहेर ॥ राजा पवित्र तिही लोकी ॥३४॥

यापरी राजा उत्तमोत्तम ॥ सकळराष्ट्र स्वस्तिक्षेम ॥ कोणासी नाही दैन्यदुर्गम ॥ सौख्ये संभ्रम सकळांसी ॥३५॥

लोक चिरायु समस्त ॥ गद वाधर्क्य नाही तेथ ॥ वृक्षवल्ली सदा सुफलित ॥ गाई दुभती सर्वकाळी ॥३६॥

सकळ सुखश्रिया विराजमान ॥ कोणी नाही हीन दीन ॥ घरोघरी हरिकीर्तन ॥ वेदाध्ययन घोषतसे ॥३७॥

सडे रंगमाळा चौका द्वारी ॥ द्विज संतुष्ट सदाचारी ॥ नित्यकर्मी अग्निहोत्री ॥ शौचाचारीए ब्राह्मण ॥३८॥

जो कां न करी हरिभजन ॥ त्यासी राजदंड घडे दारुण ॥ सकळही भगवत्परायण ॥ सुखसंपन्न सर्वदां पै ॥३९॥

ऐशी ते मोक्षपुरी ॥ आयोध्या नांदे शरयूतीरीं ॥ जे तीनवेळां सहपरिवारी ॥ वैकुंठनगरी प्रवेशली ॥४०॥

प्रथम हरिश्चंद्रे वाहिली ॥ दुजेन रुक्मांगदे नेली ॥ तिसरेने रघुनाथे ख्याती केली ॥ सहपरिवारे गेली वैकुंठा ॥४१॥

ती चौथेन मागुती ॥ अयोध्या जाईल वैकुंठाप्रती ॥ ऐशी ही पुराणे वदती ॥ ऐक निश्चिती कुरुवर्या ॥४२॥

असो हा नगरीचा विस्तार ॥ सांगता ग्रंथ वाढेल अपार ॥ तेथे राजा रघुवीर ॥ नांदे पवित्र धर्मात्मा ॥४३॥

चंद्रप्रभा त्याची कन्या ॥ पद्माक्षी सुंदर पद्मवदना ॥ सवे राजकन्या देवांगना ॥ नित्य गंगास्नानासी जाय ॥४४॥

घेऊनि शतानुशत दासी ॥ प्रतिदिनी जाय स्नानासी ॥ करोनियां जलक्रिडेसी ॥ जाय गृहासी मागुती ॥४५॥

कवणे एके दिवसी ॥ सखियांसमवेत गंगास्नानासी ॥ निघाली ते लावण्यराशी ॥ सवे दासी शतानुशत ॥४६॥

ध्वज पताका चामरे ॥ वरी श्वेतछत्रे चंद्राकारे ॥ दुंदुभी गर्जती नानातूर्ये ॥ वाद्ये अपार लागली ॥४७॥

सवे राजकन्या सालंकारी ॥ देवगंधर्वाच्या कुमारी ॥ रागोद्धार करिती सप्तस्वरी ॥ वीणा करी घेऊनी ॥४८॥

पुढे नाचती नाचणी ॥ गीतनृत्य वाद्यध्वनी ॥ नाद न समाये गगनी ॥ लागली निशाणी एकघाई ॥४९॥

सकळ सौभाग्ये सुंदर ॥ स्वानंदे आली शरयूतीर ॥ जळक्रीडा करिती समग्र ॥ देती द्विजवरां सुवर्णदान ॥५०॥
चंद्रप्रभा करोनि स्नान ॥ केले पीतांबर परिधान ॥ द्विजां देवोनि स्वर्णदान ॥ तीरी आपण बैसली ॥५१॥

तंव शरयूमाजी वाहत ॥ कमळ देखिले अकस्मात ॥ दिव्यतेजे लखलखित ॥ देखोनि विस्मित चंद्रप्रभा ॥५२॥

ते सुवर्णपंकज लखलखित ॥ जवळी आले अकस्मात ॥ तंव ते चंद्रप्रभा हर्षयुक्त ॥ ऐसे बोलत सखियांसी ॥५३॥

दिव्यतेजाचा उमाळा ॥ पैल कमळ पाहा डोळां ॥ अत्यानंदे वेळोवेळां ॥ दावी अबला सखियासी ॥५४॥

दूतिकांसी ह्मणे सुंदरी ॥ पैल कमळ आणावे झडकरी ॥ वेगे धांवोनि परिचारी ॥ त्वरे करी आणियेले ॥५५॥

पद्म आणोनिया दूती ॥ दिधले स्वामिणीचे हाती ॥ येरी पाहे अतिप्रीती ॥ तंव दर्भे दिसे बांधिली ॥५६॥

उकलोनियां दर्भग्रंथी ॥ अवघ्राण केले अतिप्रीती ॥ तंव रेतकणिका अवचिती ॥ नासिकेमाजी उसळली ॥५७॥

उद्दालकऋषीचे रेत ॥ कमळामाजी होते गुप्त ॥ श्वास ओढितां आमोदार्थ ॥ ते उदराआंत प्रवेशले ॥५८॥

रेत उसळोनी नासिकाद्वारी ॥ आले नाभिकमळा भीतरी ॥ पुन्हा स्नान करुनि सुंदरी ॥ आली झडकरी गृहासी ॥५९॥

ऐसे अपूर्व वर्तल्यावरी ॥ गर्भ संभवला तिचे उदरी ॥ समाधान नाही अहोरात्री ॥ जाहला यापरी मास एक ॥६०॥

उदरी आलेसी जडता ॥ श्वास रुंधे उठतां बसतां ॥ प्रभावतीसी परम चिंता ॥ म्हणे भगवंता काय केले ॥६१॥

द्वितीयमासी राजकन्ये ॥ अंगप्रत्यंगी झाली गर्भचिन्हे ॥ तृतीयमासी घनस्तन ॥ गर्भलक्षणे मंडित पै ॥६२॥

चतुर्थमासी ते वेल्हाळी ॥ स्थूळ दिसे नाभिकमळी ॥ पांचवे मासी राजबाळी ॥ स्वगर्भसोज्वळी दिसो आली ॥६३॥

षण्मासांची साउली ॥ पडतां मातेने देखिली ॥ मूर्च्छित भूमीवरी आंग घाली ॥ म्हणे अपकीर्ति झाली वंशाची ॥६४॥

दुःखे शोक करीत माता ॥ म्हणे त्वां निंद्यकर्म केले तत्वतां ॥ सूर्यवंशाचिया माथां ॥ आणिली सर्वथा अपकीर्ति ॥६५॥
तिही लोकींचे भूपाळ ॥ तुज पर्णावयासी असती उताविळ ॥ ते सोडोनिया सकळ ॥ तुवां कुळशीळ बुडविले ॥६६॥

कन्या नव्हती तूं वैरिणी ॥ उभयकुळविनाशिनी ॥ तुवां केली दुष्ट करणी ॥ दुःखे धरणीवर लोळीत ॥६७॥

केश सुटले मोकळे ॥ दुःखे गडबडां लोळे ॥ अश्रुधारी स्त्रवती डोळे ॥ म्हणे बाळे त्वां केले वोखटे ॥६८॥

तंव चंद्रप्रभा असे बोलत ॥ माते क्षणभरी होई सावधचित्त ॥ होणार ते न चुके बळिवंत ॥ समूळ वृत्तांत अवधारी ॥६९॥

सावध ऐके अहो जननी ॥ पुरुषमात्र न देखे मी स्वप्नी ॥ परी विपरीत कर्माची करणी ॥ ती मी तुजलागी सांगेन ॥७०॥

माते गंगास्नान करुं गेले ॥ ते जळी कमळ वाहत आले ॥ ते म्यां दासीहस्ते आणविले ॥ परिमळार्थ लाविले नासिकेसी ॥७१॥

ते नेऊनि नासाग्री ॥ अवघ्राण करितां नासिकाद्वारी ॥ काय गेले उदरामाझारी ॥ ते मी निर्धारी जाणे ना ॥७२॥

नाही पुरुषासी अंगसंग ॥ माझिया कर्माचा जो फलभोग ॥ तो म्यां भोगिला यथासांग ॥ आतां प्राणत्याग करीन मी॥७३॥

तूं कां खेद करिसी वृथा ॥ होणार ते न चुके सर्वथा ॥ माथां लिहिली अधर्मता ॥ तिजसी आतां काय करुं ॥७४॥

मरमर विधात्या अश्रेष्ठा ॥ त्वां काय हे लिहिले अदृष्टा ॥ मरमर कर्मा पापिष्टा ॥ भोग ओखटा भोगिला ॥७५॥

त्रैलोक्यीं विख्यात सूर्यवंश ॥ त्यासी मी जन्मून लाविला दोष ॥ ऐहिक परत्र पडिले वोस ॥ कर्म निःशेष बळवंत पै ॥७६॥

मातृपित्यांचे उभयकुळ ॥ सूर्यवंशी अति निर्मळ ॥ त्यासी म्या दोषाचा विटाळ ॥ अति अमंगळ लाविला ॥७७॥

कैसे शांतवन करुं आतां ॥ काय मुख दाखवूं नृपनाथा ॥ थोर अपकिर्ति आली माथां ॥ दुःखावस्थे तळमळत पै ॥७८॥

कोण पापाचे हे फळ ॥ कर्मे वाहत आणिले कमळ ॥ ही मज आली काळवेळ ॥ इच्छे परिमळ घेऊं गेले ॥७९॥

केले गोहत्ये ब्रह्मघाता ॥ किंवा विमुख जाहल्ये अतीता ॥ तेणे पापे ही दुःखावस्था ॥ मी सर्वथा भोगीतसे ॥८०॥

जैसी मी रघुकुलविनाशिनी ॥ ऐसी त्रिभुवनी नाही कोणी ॥ कटकटां माझी विरुद्ध करणी ॥ निंद्य त्रिभुवनी मी झाले ॥८१॥

माझिये दुष्टकर्मा सारिखी ॥ पाहातां स्त्री नाही तिही लोकी ॥ देवी असुरी मनुष्यादिकी ॥ तैशा अनेक नागकन्या ॥८२॥

यक्षगंधर्वाच्या कुमारी ॥ आणि दानवी निशाचरी ॥ यांत मजऐसी दुराचारी ॥ नाही दुसरी सर्वथा ॥८३॥

प्राणत्याग करावा आतां ॥ तरी पात्र होईन गर्भघाता ॥ सौख्य नाही देह ठेवितां ॥ काय म्यां आतां करावे ॥८४॥

नेणों काय केला दोष ॥ तेणे भोगिते महादुःख ॥ पुन्हां गर्भघाताचे पातक ॥ कोण आणिक सोशील ॥८५॥

ऐसी ते दुःखसागरी ॥ पडली आक्रंदे नानापरी ॥ शोकाकुलित ते सुंदरी ॥ तंव राव तेथे पातला ॥८६॥

तों ती शोके व्याकुळ सुंदरी ॥ राये कन्या देखिली गरोदरी ॥ हाहा काय केले कुमारी ॥ पडे भूमीवरी मूर्छित ॥८७॥

पुन्हां होवोनि सावचित्त ॥ राजा पुसे सद्गदित ॥ कन्ये सांगे कैसा वृत्तांत ॥ केवी दुष्कृत आचरलीसी ॥८८॥

सूर्यवंशासी लांछन ॥ तुवां लाविले संपूर्ण ॥ निंद्यकर्मे कृष्णवदन ॥ तुवां आपण मज केले ॥८९॥

काय करावे कोठे जावे ॥ काय विचार कोणास पुसावे ॥ ऐसी कैसी निर्मिलीसी दैवे ॥ कुळ अवघे बुडविले ॥९०॥

ऐसे बोलत बोलत ॥ पुन्हा राजा झाला मूर्च्छित ॥ निजप्राण त्यागूं पाहत ॥ दुःख अद्भुत साहवेना ॥९१॥

तंव चंद्रप्रभा म्हणे राया ॥ तूं का प्राण देसी वायां ॥ मी निर्लांच्छन तुझी तनया ॥ परी दैवी माया कळेना ॥९२॥

साक्षी चंद्र सूर्य धरणी ॥ म्यां नाही केली दुष्टकरणी ॥ कर्मे वेढिले मजलागुनी ॥ सत्य हे वाणी नृपनाथा ॥९३॥

अंग झाले रोमांचित ॥ भये थरथरां कांपत ॥ राव वचन मानी सत्य ॥ वृत्त यथार्थ सांगेन ॥९४॥

पूर्वी मी गेले गंगास्नानार्थ ॥ दैवे कमळ आले वाहत ॥ ते म्यां अवघ्राणिले परिमळार्थ ॥ नेणे उदरांत काय गेले ॥९५॥

ऐसी झाली दैवगती ॥ अधम घडला नाही नृपती ॥ सत्यसत्य वचनोक्ती ॥ दिव्य सांगाल ते करीन ॥९६॥

मी तर निष्पाप निर्भय ॥ दैवगतीसी करुं काय ॥ तूं साक्षी वो धरणी माय ॥ मोकलूनि धाये ती रडे ॥९७॥

मागुती म्हणे जी हो ताता ॥ सत्य मानी या वचनार्था ॥ मी निर्लांच्छन तुझी दुहिता ॥ दोष सर्वथा मज नाही ॥९८॥

माझिया प्राक्तनकर्माचा ठेवा ॥ तो मज लागला अवश्य भोगावा ॥ आतां आपल्या हाते पितृदेवा ॥ घात करावा या देहाचा ॥९९॥

ऐसे बोलोनियां सुंदरी ॥ अट्टहासे रुदन करी ॥ हाहाकर्माची थोरी ॥ केले दुःखसागरी निमग्न ॥१००॥

ऐसा जीवींचा वृत्तांत ॥ पितया सांगितला यथार्थ ॥ ऐकोनि कोपला नृपनाथ ॥ म्हणे अघटित मात काय वदसी ॥१॥

मी सूर्यवंशीचा भूपती ॥ त्रैलोक्यी विस्तीर्ण मम कीर्ती ॥ माझी कन्या तूं गुणवती ॥ केलासी उपहास कुलाचा ॥२॥

ऐसे बोलोनियां नृपनाथ ॥ क्रोधे नेत्र झाले आरक्त ॥ मनामाजी विचार करित ॥ म्हणे काय म्यां करावे ॥३॥
आतां इच्या करितां घाता ॥ स्त्री दोष बैसेल माझियां माथां ॥ भ्रूणहत्या स्त्रीहत्या सर्वथा ॥ दुःखदायक घडेल ॥४॥

स्त्रीब्राह्मणांपासूनि अनुचित ॥ घडल्या न करावा त्यांच्या घात ॥ ऐसा आहे धर्मशास्त्रार्थ ॥ तरी त्याग निश्चिती करावा ॥५॥

ऐसे विचारुनियां चित्ती ॥ राये पाचारोनियां दूतांप्रती ॥ तयांसी नेऊनियां एकांती ॥ गुज मनातील सांगत ॥६॥
चंद्रप्रभा व्यभिचारिणी ॥ इजला तुम्ही निर्जन वनी ॥ जेथे मनुष्यमात्र नसे कोणी ॥ ऐशीया स्थानी नेइंजे ॥७॥

व्याघ्रसिंहांची असे दाटी ॥ उध्वस्त अरण्ये घोर मोठी ॥ मनुष्यमात्र न देखे दृष्टी ॥ ऐशा दरी दिग्पाटी त्यागावी ॥८॥

मोहे कंठ झाला सद्गतित ॥ राव दूतांसी आज्ञापित ॥ माताही झाली मूर्च्छित ॥ आकांत राणिवंशात थोर झाला ॥९॥

दूती धरुनि प्रभावती ॥ सवेचि नेली शीघ्रगती ॥ पापकर्माची हे ख्याती ॥ दुःखावर्ती पडे चंद्रप्रभा ॥११०॥

एकाएकी ते राजबाळा ॥ धरुनि दूत नेती तयेवेळां ॥ देखतां सुहृदा सकळां ॥ नेली विशाळ वनातरी ॥११॥

वने उपवने दुर्धर ॥ चरणी चाले ते सुकुमार ॥ अतिदीन शोकातुर ॥ झाली सुंदर राजबाळी ॥१२॥
क्रमोनियां गहनवने ॥ अति भयानक ब्रह्मारण्ये ॥ ओलांडुनि अनेक कानने ॥ टाकिली राजकन्या ॥१३॥

ऐसिया विक्राळ स्थळी ॥ दूती त्यागूनि राजबाळी आपण येऊनियां तात्काळी । राया वर्तमान सांगितले ॥१४॥

स्वामीची वंदूनि आज्ञा ॥ महावनी त्यागिली राजकन्या ॥ ऐसे ऐकतां दूतवचना ॥ आली मूर्च्छना रायासी ॥१५॥
अतिदुःखे गडबडां लोळे ॥ केश सुटले मोकळे ॥ अश्रु स्त्रवती नेत्रकमळे ॥ म्हणे राजबाळे काय केले ॥१६॥

ऐकूनि माता करी रुदन ॥ दुःखे तळमळे अति दारुण ॥ जैसे आटतां जीवन ॥ होरपळे मासोळी ॥१७॥

जैसी कां चोराचे माय ॥ भाळ पिटूनि मोकली धाय ॥ ते दुःख वर्णितां न जाय ॥ महाघोर अनिवार ॥१८॥

इकडे वनी राजबाळी ॥ दुःखशोकाचे खळाळी ॥ पडोनि वाहे चिंताजळी ॥ दुःखानळे तळमळे ॥१९॥

अट्टहासे फोडूनि हांक ॥ रुदन करी अधोमुख ॥ करतळे पिटी मस्तक ॥ नये दुःख बोलताचि ॥१२०॥

म्हणे हाहा कर्मा विपरीता ॥ दूरी अंतरली मातापिता ॥ मज काय निर्मिले विधाता ॥ दुःख होतसे दारुण ॥२१॥
नाही तयासी पारावार ॥ शोके आक्रंदे अति दुर्धर ॥ नेणो काय जाहला जगदीश्वर ॥ माझा कां विसर पडियेला ॥२२॥

ऐकूनियां तियेचे दुःख ॥ पशुपक्षी करिती परम शोक ॥ हरिण चितळे वृक जंबुक ॥ स्फुरती शोक ऐकोनी ॥२३॥

करुणा भाकितां नानापरी ॥ वृक्ष कोमाइले वनांतरी ॥ दुःखे उलूं पाहे धरित्री ॥ शोकसागरी निमग्न ॥२४॥

असो सांगता सविस्तर ॥ ग्रंथ वाढेल अपार ॥ यापरी ते सुंदर ॥ त्यागिली दुस्तर महावनी ॥२५॥

वैशंपायन म्हणे गा नृपनाथा ॥ जैसी श्रीरामे त्यागिली सीता ॥ ऋषि वाल्मिकी त्या आश्रमी तत्वता ॥जनकदुहिता राहिली ॥२६॥

यापरी ते राजदुहिता ॥ वनी त्यागिली नृपनाथा ॥ पुढे काय वर्तली कथा ॥ सावधान ते अवधारी ॥२७॥

म्हणे तुका सुंदरदास ॥ जाहला प्रभावतीसी वनवास ॥ पुढील कथा अति सुरस ॥ श्रोती सावकाश परिसावी ॥१२८॥

इति श्रीनासिकेतोपाख्याने चंद्रप्रभाप्रयाणं नाम द्वितीयोऽध्यायः

॥ इति नासिकेतोपाख्याने द्वितीयोऽध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP