श्रीगणेशाय नमः ॥
कर जोडूनियां यमदूत ॥ धर्मराजाप्रती विनवित ॥ स्वामींनी निरुपिले सांप्रत ॥ ते सकळही श्रुत आम्हां जाहले ॥१॥
आतां जी याउपरी ॥ अभक्तजन जे अनाचारी ॥ त्यांची लक्षणे निज निर्धारी ॥ कैशापरी जाणावी ॥२॥
तेंचि सांगा जी आपण ॥ म्हणोनि घातले लोटांगण ॥ परिसोनि यमदूतांचा प्रश्न ॥ सांगे संपूर्ण यमधर्म ॥३॥
ऐका दूत हो सावचित्त ॥ महापातकी जे मूर्तिमंत ॥ उग्रकायी झाले रत ॥ तेही समस्त सांगेन ॥४॥
असत्यवाणी वदे सदा ॥ ईश्वरभजनी नाही श्रद्धा ॥ उल्लंघी वेदाची मर्यादा ॥ त्यासी आपदा करावी ॥५॥
मत्सराचे भरते जेथे ॥ मार्गामार्ग न ठावे ज्याते ॥ ब्रह्मद्वेष वाहे चित्ते ॥ दूत हो तयाते दंडावे ॥६॥
जो ब्राह्मणप्रतिपाद्यवेदा ॥ त्यांची करी जो स्वमुखे निंदा ॥ जो कां क्रूरकर्मी सर्वदा ॥ प्रवर्ते वादा भलतेचि ॥७॥
पातकियांमाजी शिरोमणी ॥ शूद्र भोगी ब्राह्मणपत्नी ॥ तयासी हिंडवोनि जळत योनी ॥ करावी जाचणी अनिवार ॥८॥
सात्विक सज्जन जे संन्यासी ॥ त्यांसी द्वेषी अथवा उपहासी ॥ अवश्य न्यावा तो पतनासी ॥ असिपत्रेसी दंडावा ॥९॥
भूतदया नाही शरीरी ॥ अमित जीवांची हिंसा करी ॥ सुरापानी दुराचारी ॥ नानापरी दंडावा ॥१०॥
सुवर्ण चोरी नरकासी मूळ ॥ ते दूत जाणा तुमचे कुळ ॥ पतनी घालावे सर्वकाळ ॥ आज्ञा प्रबळ हे माझी ॥११॥
परद्रव्य परनारी ॥ यांचा अभिलाष जो स्वये करी ॥ तो पातकी दुराचारी ॥ घाला अघोरी चिरकाळ ॥१२॥
सद्गुरुची निजपत्नी ॥ ते शिष्याची केवळ जननी ॥ तियेचा अभिलाष जो धरी मनी ॥ तोही बांधोनि आणावा ॥१३॥
अश्व विकोनी पोट भरी ॥ कन्येचा जो विक्रय करी ॥ विश्वासघातकी दुराचारी ॥ नानापरी दंडावा ॥१४॥
मातापिता ही केवळ तीर्थ ॥ यांचा त्याग करी जो पतित ॥ तो दक्षिणपंथे स्वपुरीत ॥ आणा दंडित यमदंडे ॥१५॥
श्रीगुरु केवळ ईश्वर ॥ त्याचा अभ्यासुनी नाममंत्र ॥ त्याग करी जो अपवित्र ॥ आणावा सत्वर घोरमार्गे ॥१६॥
अनाश्रित त्यागी जो भगिनी ॥ ज्येष्ठ बंधु वार्धक्यपणी ॥ त्यांसी जळतस्तंभाचिये श्रेणी ॥ दृढ आणोनि बांधावा ॥१७॥
सज्जनसंगती शेजारी ॥ त्यांसी द्वेषी नानापरी ॥ आणि दुर्जनांचा संग धरी ॥ तो यमप्रहरी दंडावा ॥१८॥
कुलस्त्री त्यागून घरी ॥ शिष्यसंप्रदाये वरी परनारी ॥ मंत्र उपदेशी शांबरी ॥ तोही दुराचारी आणावा ॥१९॥
आणिक ऐका त्यांची परी ॥ गुरुची आज्ञा स्वये न करी ॥ कीर्तन होत असतां नगरी ॥ निजे घरी निदसुरा ॥२०॥
विष्णुव्रत एकादशी ॥ जो नाचरे पापराशी ॥ त्याही आणावे निंदकासी ॥ काळपाशी बांधोनि ॥२१॥
ब्राह्मणजन्म अनाचारी ॥ शूद्राशी स्त्री बुजी घरी ॥ हो कां वैश्य अथवा क्षत्री ॥ असिपत्री दंडावा ॥२२॥
मांसभक्षी सुरापानी ॥ पारध करी वेश्यागमनी ॥ पाखंड वदे ज्याची वाणी ॥ मिथ्याज्ञानी वादक ॥२३॥
शठ नष्ट आणि दांभिक ॥ अमंत्रवादी कामुक ॥ किती सांगावे अनेकानेक ॥ दुःखदायक जे प्राणी ॥२४॥
आणिक दोषी ते ऐसे ॥ गुरुदीक्षा स्वये नसे ॥ साधक भ्रष्टवी अविचारमिसे ॥ करुं बैसे महापूजा ॥२५॥
आपण नीचयोनी अनाचारी ॥ विप्रपत्नी बुजी घरी ॥ मना ये ते कर्म करी ॥ नाही शरीरी कंटाळा ॥२६॥
मद्यपान करी सदा ॥ उल्लंघी वेदांची मर्यादा ॥ कीर्तनद्वेषी करी निंदा ॥ नेणे कदा धर्मवार्ता ॥२७॥
गुरुदीक्षा नसतां जवळां ॥ रुद्राक्ष तुळसी गळां माळा ॥ तो दोषियांमाजी आगळा ॥ आणा श्रृंखळा बांधोनिया ॥२८॥
भूतदया नाही ज्यासी ॥ पापलोभी अंतर्दोषी ॥ अशुद्ध मळिन मानसी ॥ तोहि नरकवासी आणावा ॥२९॥
स्त्रीअधीन जयाचे जीवित ॥ नेणे देव नेणे तीर्थ ॥ गुरुसी मानी प्राकृत ॥ तो मूर्तिमंत दोषाढ्य ॥३०॥
असोत ऐसिया लक्षणी ॥ जे जे वर्ततां दिसती प्राणी ॥ तयांसी आणुनि घाला पतनी ॥ करा जाचणी अनिवार ॥३१॥
ऐसी भक्तांची लक्षणे ॥ यमधर्मराजे तेणे ॥ निरुपिली दूतांकारणे ॥ अभक्तचिन्हे जाणावया ॥३२॥
ऐसे सांगे प्रेतनाथ ॥ ते आज्ञा मस्तकी वंदिती दूत ॥ मग करुनियां प्रणिपात ॥ प्रश्न करिती तो ऐका ॥३३॥
अहो जी स्वामी धर्ममूर्ती ॥ भक्तां अभक्तांची स्थिती ॥ निरुपिली यथानुगती ॥ ते आम्हांप्रती मानली ॥३४॥
आतां विचरतां महीतळी ॥ आम्ही वसावे कवणे स्थळी ॥ ते आज्ञा करावी भूपाळी ॥ बद्धांजळी विनविती ॥३५॥
ऐकोनियां दूतांचा प्रश्न ॥ धर्मराज म्हणे आपण ॥ तुम्हांसी विश्रांतीचे स्थान ॥ ऐका सांगेन दूतहो ॥३६॥
केश मोकळे शरीरी ॥ सोडूनि वर्ते जी कां नारी ॥ अहोरात्र कलह करी तये घरी असावे ॥३७॥
पदर न घे उघडा माथा ॥ श्वास घाली उठतां बसतां ॥ तेथे राहोनी तत्वतां विश्रामता पावावी ॥३८॥
नसे सडा ना संमार्जन ॥ बुभुक्षित दिसे जेथे अंगण ॥ जेथे नाही तुळसीवृंदावन ॥ तेथे आपण रहावे ॥३९॥
रांधितांचि खाय अन्न ॥ भग्नपात्री करी भोजन ॥ जे जे कुत्सित दिसे स्थान ॥ तेथे आपण सुखे रहावे ॥४०॥
आणि जे रजस्वाला ॥ खाटेवरी निद्रा करी ॥ विश्रांती तियेचे घरी ॥ तुम्हांसी निर्धारी नेमिली ॥४१॥
कांटे बोरट्या पांजरी ॥ दीपपडसाउली माझारी ॥ केराच्या उकिरड्यावरी सुखे करोनि रहावे ॥४२॥
तैशीच नर हो कां नारी ॥ अखंड बैसे उंबर्यावरी ॥ अग्नि नसे जयाचे घरी ॥ तेथे निरंतर असावे ॥४३॥
श्वान मार्जार आणि कुक्कुट ॥ जेथे पडे यांचे उच्छिष्ट ॥ अहोरात्र करी कटकट ॥ तेथे निकट वसावे ॥४४॥
शुक जयाघरी पाळी ॥ मलिन असे सदाकाळी ॥ दीप सरसावी अंगुळी ॥ तये स्थळी असावे ॥४५॥
निळीचे वस्त्र वसे जेथे ॥ डोई खाजवी दोही हाते ॥ बैसोनि पर वरी मुते ॥ दूतहो तेथे वसावे ॥४६॥
श्मशानभूमिका निरवडी ॥ शुष्कवृक्षाचिये खोडी ॥ जेथे आड विहीर कोरडी ॥ ते स्थळ आवडी शोधावे ॥४७॥
जेथे देखाल निळीचा कूड ॥ वोसघर मद्याचे भांडे ॥ जेथे गोचर्म वाळत पडे ॥ तेथे सुखाने वसावे ॥४८॥
यमधर्म दूतांप्रती ॥ स्वये आज्ञापी त्रिजगती ॥ जेथे नाही भगवद्भक्ती ॥ तेथे निश्चित रहावे ॥४९॥
साधु नसे जये गांवी ॥ ते तुमची मिराशी जाणावी ॥ ऐसे न माने जयाचे जीवी ॥ तेणे पहावी यमगीता ॥५०॥
हे पद्मपुराणींची कथा ॥ पुण्यपावन यमगीता ॥ यमधर्मे तियेचा दूतां ॥ केला तत्त्वतां उपदेश ॥५१॥
ऐसे नारद देखतां ॥ यमधर्म आज्ञा करी दूतां ॥ ते हे पद्मपुराणी यमगीता ॥ असे तत्त्वतां निरुपिली ॥५२॥
ऐसा यमपुरींचा वृत्तांत ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ तुका सुंदरशरणागत ॥ असे विनवित श्रोतयां ॥५३॥
॥ इति नासिकेतोपाख्याने यमगीतोपदेशो नाम विंशोऽध्यायः ॥२०॥ ओंव्या ॥५३॥