श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायन म्हणे गा भारता ॥ ऐसी धर्माधर्मव्यवस्था ॥ नासिकेत सांगे ऋषिसमस्तां ॥ दिव्य कथा स्वर्गीची ॥१॥ श्लोकः ॥
नासिकेत उवाच ॥ श्रूयतां यन्मना दृष्टं भयं संसारसागरात ॥ नानाप्रहरणा रौद्रा नानावर्णधराश्च ये ॥१॥
तस्मिंस्तु दक्षिणद्वारे दुःखं क्लेशश्च पापिनाम ॥ दूताश्चैव मया दृष्टा धर्मराजस्य सन्निधौ ॥२॥ टीका ॥
यानंतर अवधारा ॥ नासिकेत म्हणे ऋषीश्वरां ॥ महद्भये संसारसागरा ॥ कैसेन परपारा पावती प्राणी ॥२॥
तया यमपुरी माझारी ॥ परमसंकट दक्षिणद्वारी ॥ नानादुःखे क्लेशकारी ॥ होता भारी प्राणियां ॥३॥
धर्मराजाचिये सन्निधी ॥ विक्राळ दूतांची उभी मांदी ॥ रौद्रकर्मी महाक्रोधी ॥ पापियांसी पीडाकर ॥४॥
परमभयानक ते स्थान ॥ मार्ग दुस्तर महाकठिण ॥ महाघोर जे पीडा दारुण ॥ अन्नाविण ते ऐका ॥५॥
नानावर्ण नानाकृती ॥ नानाशास्त्रे घेऊनि हाती ॥ यमदूत तेथे चौताळती ॥ कृतांतशक्ति भयानक ॥६॥
महाभय तै दक्षिणद्वारी ॥ पापियां क्लेश करिती भारी ॥ विक्राळरुपे आयुधे करी ॥ नानापरी भ्रमताती ॥७॥
यमधर्मरायासन्निध ॥ उभे असती दूत सन्नद्ध ॥ त्यांची वाहने रुपे विशद ॥ ऐका सावध मुनीहो ॥८॥ श्लोक ॥
किंकोलिलसमानाश्च महिषास्कंधसंस्थिताः ॥ अपरे तत्र दृश्यंते गृध्रसारसवाहनाः ॥३॥
वानरेषु समारुढः श्रृगालवायसेषु च ॥ मृगाभिरुढा दृश्यंते धावंतो यमकिंकराः ॥४॥ टीका ॥
बीभत्स काळे कोकिळेपरी ॥ आरुढ जाहले महिषावरी ॥ विक्राळदंष्ट्र दीर्घशरीरी ॥ आयुधे करी मिरवती ॥९॥
नेत्र आरक्त अति विस्तीर्ण ॥ गृध्रसारस असती वाहन ॥ एक ते वानरांवरी आरुढोन ॥ धांवती संपूर्ण दशदिशां ॥१०॥
वृषभारुढ जाहले एक ॥ चपळ मृगावरी बैसले देख ॥ एकासी वाहन वृकजंबुक ॥ उष्ट्रीं कित्येक वळंघले ॥११॥
एक ते बैसोनि वायसां ॥ चपळ चौताळती दशदिशां ॥ पापियां करुनि थोर वळसा ॥ लावूनि पाश आणिताती ॥१२॥
परी सांगितल्या साक्षेपे ॥ जैसी होती त्यांची रुपे ॥ देखतां काळ चळी कांपे ॥ भये विव्हळ होउनी ॥१३॥
जयांचा अडदरु तापसां ॥ भेणे लंघिती ते दशदिशां ॥ एक सांडुनी गेहाआशा ॥ परमपुरुषा शरण गेले ॥१४॥
सर्वांस आकळी जो काळ ॥ जयाचा त्रैलोक्यी मांडला खेळ ॥ जगदाकार हा सकळ ॥ काळवेळ जाणिजे ॥१५॥
हे असो परी महाघोर ॥ यमदळीचे किंकर ॥ तयां देखतांचि प्राणिमात्र ॥ दुःसहभये त्रासती ॥१६॥ श्लोक ॥
दृश्यंते च महाघोरा महांतो रोमहर्षणाः ॥ केचिच्च विकरालास्या ऊर्ध्वकेशा महाबलाः ॥५॥
अग्निज्वाला भयाकाराः कृष्णवर्णाश्च दारुणाः ॥ शुभ्रवर्णा विरुपांगाः कठिनायुधधारिणः ॥६॥ टीका ॥
महाघोर अति विक्राळ ॥ अग्निवर्ण तांबडे जाळ ॥ उर्ध्वकेश जैसे शूळ ॥ रोंविले सबळ पर्वतासी ॥१७॥
एक ते काळे कृष्णवर्ण ॥ भयंकर अतिदारुण ॥ विरुपांगी भोर वर्ण ॥ शस्त्रे तीक्ष्ण झेलिती ॥१८॥
आंगी असे अमित बळ ॥ दूत काळाचे महाविशाळ ॥ नेत्रअग्नीचे कल्लोळ ॥ अतिविशाळ धगधगीत ॥१९॥
रक्तवर्ण महादारुण ॥ विरुपांगी दीर्घ वदन ॥ करी शस्त्रे अतितीक्ष्ण ॥ दैदीप्यमान उग्रमूर्ती ॥२०॥
पर्वताकार कोथळ ॥ भयासुरतनु उदर विशाळ ॥ रोम थरकती सर्वकाळ ॥ हलकल्लोळ प्राणियां ॥२१॥ श्लोक ॥
सिंहास्या ह्यपरे मात्र व्याघ्रास्या वृकसन्निभाः ॥ श्वानमुकुटामार्जारसंकाशाः कुत्सिताननाः ॥७॥
रक्तनेत्रा महारौद्रा कृष्णवक्राः कुगंधिनः ॥ पिंगलश्मश्रुसंयुक्ताः शूलहस्ताश्च किंकराः ॥८॥ टीका ॥
सिंहमुख व्याघ्रमुख ॥ भोरेवर्ण पीत सम्यक ॥ तरस तगर वृक जंबुक मुख ॥ सांगतां अनेक रुपे त्यांची ॥२२॥
श्वान मार्जार कुक्कुटमुख ॥ कुत्सितवर्ण दुःखदायक ॥ वदनविकृति अनेकानेन ॥ संक्षेपे देख सांगेन ॥२३॥
रक्तनेत्र महाघोर ॥ दुर्गंधयुक्त कृष्णवक्र ॥ पिंगळकेश लंबाकार ॥ अति उग्र भयानक ॥२४॥
काठ्या त्रिशूल झेलिती हाती ॥ क्रोधदृष्टी चपळ धांवती ॥ देखतां प्राणी त्रास घेती ॥ रुदन करिती सत्राणे ॥२५॥
शूलशक्ति दंडधारी ॥ गदा मुद्गल आयुधे करी ॥ पाशबंधने नानापरी ॥ विकटमारी मारक ॥२६॥
फरश पट्टीश तोमर ॥ एकाशी लोहदंड हतियार ॥ भिंदिपाल मुसळे अपार ॥ शस्त्रसंभार त्यापाशी ॥२७॥
ऐसिया भूषणी भूषित ॥ यमदूत असंख्यात ॥ ते म्यां देखिले सभेआंत ॥ महा अद्भुत प्रतापी ॥२८॥
धर्मराजाज्ञा प्रमाण ॥ करिती प्राणियांसी तर्जन ॥ एकासी दारुण कंदन ॥ पर्वतपतन एकासी ॥२९॥
प्राणी पावती परमक्लेश ॥ परी त्यां कदाही नुपजे त्रास ॥ घोररुपी अति कर्कश ॥ महादुर्धर निर्दय ॥३०॥
आणिक एक महासंकट ॥ तेथे देखिले अति दुर्घट ॥ असिपत्रे परम तिखट ॥ वन अचाट तयांचे ॥३१॥
तया असिपत्रांचे वनी ॥ दूत नेउनी पीडिती प्राणी ॥ तें म्यां देखिले आपुल्या नयनी ॥ ऐका मुनिहो सादर ॥३२॥
तया विशाळ वनामाझारी ॥ असिपत्रे घेऊनि करी ॥ दूत करिती महामारी ॥ क्रूरपणे प्राणियां ॥३३॥
दीर्घदंष्ट्र विशाळ कर्ण ॥ रौद्र ताम्राग्निलोचन ॥ सर्वांगी थरकती रोम संपूर्ण ॥ करिती कंदन प्राणियां ॥३४॥ श्लोक ॥
पापकर्मदुराचारा लोभमोहवंशगताः ॥ क्षिप्यंते यमदूतैस्ते ह्यसिपत्रवनांतरे ॥९॥
पतितैह्यसिपत्रैस्तु गात्रच्छेदोऽतिदारुणः ॥ प्रलापं करु ते तत्र पातकी खंडशः कृतः ॥१०॥ टीका ॥
कामलोभमोहसंगती ॥ जीव जाहले वशवर्ती ॥ असिपत्रवनी तयांप्रती ॥ नेउनी ताडिती यमदूत ॥३५॥
तेणे असिपत्रे करुन ॥ करिती गात्रमात्राचे छेदन ॥ दारुण होतसे कंदन ॥ पाहता मन कंटाळे ॥३६॥
जरामृत्युचे महाक्लेश ॥ पातकी सोशिती त्रासास ॥ नानाविलापती बहुवस ॥ निष्कृति त्यांस असेना ॥३७॥
प्राणी आक्रंदती भयभरे ॥ दूत मारिती असिपत्रे ॥ ताडफळा ऐसी पवित्रे ॥ शिरे अपार लोंबती ॥३८॥
ऐसे क्लेशकारी बहुत ॥ सहस्त्रोंसहस्त्र असंख्यात ॥ कूटसाक्षी स्वये देत ॥ कूटपापरत जे कोणी ॥३९॥
बलात्कारे भ्रष्टविती जाती ॥ तस्करकर्म जे कां करिती ॥ एकाचे निक्षेपिले हरिती ॥ एका मारिती निरपराधे ॥४०॥
ब्रह्मघ्न आणि विश्वासघातकी ॥ ऐसे जे परमपातकी ॥ त्यांसी आणोनी एकाएकी ॥ ताडिती अनेक असिपत्री ॥४१॥
कंठी श्रृंखळा बांधोनि आणिले ॥ कित्येक वृक्षावरी लोंबविले ॥ नानापक्षी तेथे मिळाले ॥ तयांसी वहिले भक्षिती ॥४२॥
एकाचे करुनि शिरच्छेदन ॥ नरककुंडी घालिती जाण ॥ देह करुनि छिन्नभिन्न ॥ पूयपंकी निमग्न करिती ॥४३॥
शालवृक्षी लोंबविले ॥ तै तुटोनी ग्रीवा कित्येक पडले ॥ पूयशोणितांचे कूप भरले ॥ त्यांत निक्षेपिले तयासी ॥४४॥
ऐसे विविध नानापरी ॥ गोहत्यादि पाप शरीरी ॥ बोलिले जे दुराचारी ॥ ते त्या वृक्षावरी लोंबविले ॥४५॥
कंठी बांधोनि श्रृंखळा ॥ ताडिती मुद्गले लोहर्गळा ॥ न देखवे ते दारुण डोळां ॥ येतसे कंटाळा बोलतां ॥४६॥
निक्षेपिले हरी जो दुर्बुद्धी ॥ तयांसी घालिती नरकनदी ॥ पूयपंक निबिड तियेमधी ॥ आकल्पावधि पचतसे ॥४७॥
यानंतर सर्व मुनीश्वरां ॥ नासिकेत म्हणे अवधारा ॥ यमवचने दुष्ट असुरा ॥ आणितां यमपुरी देखिले ॥४८॥
महारौद्र भयंकर ॥ तयाचे स्थान घोरांदर ॥ तेथे आहे तो तस्कर ॥ आणा बलात्कार करुनी ॥४९॥
ऐसे आज्ञापितां यमनाथे ॥ महाबळी पराक्रमी यमदूते ॥ दंड घेउनी दक्षिणहस्ते ॥ पाश मिरवत वामकरी ॥५०॥
आपुलाल्या वाहनी आरुढोन ॥ रागे रौद्र रक्तलोचन ॥ सवे परिवार घेऊन ॥ धर्मराजगण खवळले ॥५१॥
कृतांतनांवे दूत विख्यात ॥ तयांसी अज्ञापी यमनाथ ॥ वेगी जाऊनियां त्वरित ॥ आणावा दैत्य धरुनी ॥५२॥
यापरी यमवचनार्थ ॥ कीं बळेचि धरुनि आणा दैत्य ॥ भूतळी पर्वतदरी आंत ॥ तेथे तो दुष्ट वसतसे ॥५३॥
धर्मराज आज्ञेवरी ॥ दूत लोटले सहपरिवारी ॥ तै सुरासुरांत युद्ध भारी ॥ शस्त्रास्त्री जाणा होतसे ॥५४॥
मंत्रित अस्त्रे शस्त्रमार ॥ तेणे तर्जिले यमकिंकर ॥ युद्धी भंगले समग्र ॥ पळती जाण दशदिशा ॥५५॥
स्कंधी भग्न स्वये जाहले ॥ पळोनि यमधर्मापासी आले ॥ म्हणती तेणे विनाशकाळे ॥ दानवे जिंकिले आम्हासी ॥५६॥
असुर नाटोपे करणे काय ॥ हातोहाती केला विजय ॥ आम्ही पळालो करुनि त्राहे ॥ आलो लवलाहे स्वामीपासी ॥५७॥
ऐसे ऐकोनि दूत वचन ॥ धर्मराज क्रोधायमान ॥ महाकाळाते पाचारुन ॥ काय आपण बोलत ॥५८॥
अहो काळ महाबाहो ॥ घेउनी सैन्यसमुदावो ॥ तुवां आणावा दुष्टदानवो ॥ जय स्वयमेव पावसी ॥५९॥
स्वामीची आज्ञा वंदूनि शिरी ॥ काळ कृतांत निघाले झडकरी ॥ नाना आयुधे घेऊनि करी ॥ दंडपाशधारी निघाले ॥६०॥
तयां सकळांचा नायक ॥ कृतांतनामे महासैनिक ॥ करी चंद्रहासखड्गाची लखलख ॥ पाशही देखा वामकरी ॥६१॥
सर्वांगी थरकती रोम सकळ ॥ विक्राळदंष्ट्रा महाविशाळ ॥ नेत्री निघती अग्निज्वाळ ॥ कृतांत वीर खवळला ॥६२॥
पाल्हाणिला महेश वंदने ॥ सवे कोट्यानुकोटी यमसैन्य ॥ सुरासुरांत युद्ध दारुण ॥ घोरादर मांडले ॥६३॥
हांका बोंबांचे कल्होळ ॥ युद्ध मांडले हलकल्होळ ॥ शस्त्रे वर्षती अग्निज्वाळ ॥ महाबळ प्रतापी ॥६४॥
खड्गे खड्गा निवारण ॥ शस्त्रा अस्त्रांचे प्रेरण ॥ शिळा शिखरे द्रुम पाषाण ॥ वज्र दारुण हाणिती ॥६५॥
काठ्या त्रिशूळ तोमर ॥ भिंदिपाल चेंडू चक्र ॥ पाचारुनियां येरायेर ॥ युद्ध घोरांदर जाहले ॥६६॥
कृतांते लाविली महाख्याती ॥ दानव जिंकिला दुष्टमती ॥ भंगले सैन्य गळाली शक्ती ॥ काळ आकळी तात्काळ ॥६७॥
कृतांतसैन्ये लाविली ख्याती ॥ क्षणार्धे केला वशमूर्ती ॥ धर्मराजसभेप्रती ॥ बांधोनि आणिती किंकर ॥६८॥
मागे पुढे शस्त्रधारी ॥ कंठी पाश श्रृंखळा करी ॥ मंडप बांधोन महामारी ॥ बलात्कारी आणिला ॥६९॥
दूती धरिलासे आकळून त्यासी चित्रगुप्त पुसे आपण ॥ तुवां जे केले आचरण ॥ ते हे लेखन समूळ पाही ॥७०॥
बहुत दिवस करुनि चोरी ॥ स्वये जाहलासी पापाधिकारी ॥ आतां निस्तरसी कवणेपरी ॥ महामारी मोकलिली ॥७१॥
गीध धारी दीर्घ वायस ॥ तोडतोडूनि खांती मांस ॥ दूती बळकट धरिले त्यास ॥ कासावीस दुःखानळे ॥७२॥
महारौरव नरककुंडात ॥ तयासी घालिती यमदूत ॥ कृमियोनी असंख्यात तेथे जन्मावर्त भोगिती ॥७३॥
अनेक जन्म पृथक पृथक ॥ त्यासी भोगविती दुःखदायक ॥ ऐसी तेथील वर्तणुक ॥ ते म्यां सकळिक देखिली ॥७४॥
नासिकेत म्हणे अहो मुनि ॥ दुर्घट यातना यमभुवनी ॥ शास्त्रद्वारा ऐकिले श्रवणी ॥ ते म्यां प्रत्यक्ष नयनी देखिले ॥७५॥
म्हणोनि असार हा संसार ॥ पावोनियां उत्तम शरीर ॥ जाणोनि स्वप्नप्राय क्षणभंगुर ॥ कां पां ईश्वरा न भजती ॥७६॥
स्वप्नीचे तस्करी नेले चोरुन ॥ तैसा संसार मिथ्या भान ॥ कां पां न जाणती जन ॥ मायाभ्रांतीने भुलविले ॥७७॥
बाळ वृद्ध अथवा तरुण ॥ हे कांही न विचारितां जाण ॥ सकट सर्वस्वाचे भक्षण ॥ काळ आपण करीतसे ॥७८॥
न भरतांही बाळपण ॥ काळ ग्रासीतसे आपण ॥ संपूर्ण न लोटतां तारुण्य ॥ काळ भक्षण करिताहे ॥७९॥
ह्मणोनि आघवे साकार ॥ काळे भक्षिले चराचर ॥ असो प्रत्यक्षास काय परिहार ॥ वारंवार सांगावा ॥८०॥
जयाठायी न पावे काळ ॥ ऐसे उरले नाही स्थळ ॥ काळसंचित सर्वकाळ ॥ तेही सर्व भक्षिले ॥८१॥
गिरिगव्हरी रिघतां कपाटी ॥ काळ न सोडी त्यांची पाठी ॥ एक ते निघाले दिक्कपाटी ॥ तरीहि काळ मागे ठेला ॥८२॥
ह्मणोनि काळाविण जगत्रयी ॥ एकही स्थळ उरले नाही ॥ ऐसे जे जाणती तेही ॥ स्वहित कांही न करिती ॥८३॥
तेणे अज्ञान अंगीकारे ॥ मी माझे मानुनी दुसरे ॥ जन्ममरण एकसरे ॥ दुःखद्वारे कवळिली ॥८४॥
परी क्षणिक ऐसे तत्त्वतां ॥ जाणोनि न करिती मृत्युचिंता ॥ वेगी लागोनि भजनपंथा ॥ संसारव्यथा निरसिती ना ॥८५॥
कैसा त्यांचा अज्ञानभावो ॥ मी जन्मलो मरेन पाहाहो ॥ परी ते निरसावया उपावो ॥ सहसा कांहो न करिती ॥८६॥
संसारतरुची छाया ऐसी ॥ पांथिक बैसले विश्रांतीसी ॥ शेखी जाती स्वस्थानासी ॥ कोणी कोणासी न पुसतां ॥८७॥
तेंचि मानुनी शाश्वत ॥ प्राणी जाहले विषयासक्त ॥ आयुष्य गेले हातोहात ॥ पापे सुपंथ चुकोनियां ॥८८॥
ऐसे ऐहिक परत्राते मुकले ॥ ते ते दक्षिणद्वाराप्रती आले ॥ त्यांही यातना क्लेश भोगिले ॥ ते म्यां देखिले प्रत्यक्ष ॥८९॥
ऐसे सांगता नासिकेत ॥ महाकठिण तो दक्षिणपंथ ॥ प्राणी न विचारिती हिताहित ॥ पाप किमर्थ आचरिती ॥९०॥
यालागी नरदेह पावोन ॥ सर्वदा असावे सावधान ॥ कर्माकर्म विचारोन ॥ नामस्मरण करावे ॥९१॥
आतां ऐका या उपरी ॥ असोत ते पातकी दुराचारी ॥ धार्मिकां होय कैसी परी ॥ तेही निर्धारी अवधारा ॥९२॥
म्हणे तुका सुंदरदास ॥ माझी विनंती श्रोतयांस ॥ आतां येती पुण्यपुरुष ॥ तेंही सावकाश परिसावे ॥९३॥
॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने पातकवर्णनंनाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥ ओंव्या ॥९३॥ श्लोक ॥१०॥