श्रीगणेशाय नमः॥
यानंतर म्हणे नासिकेत ॥ ऐका ऋषिजनहो समस्त ॥ जे म्यां देखिले अत्यद्भुत ॥ ते प्रस्तुत अवधारा ॥१॥
महाघोर महाविशाळ ॥ तेथे देखिले म्यां इंद्रजाळ ॥ कैसे ते तरी ऐका सकळ ॥ अग्निमंडळ धडधडित ॥२॥
चहूंकडोनि भडकला वह्नी ॥ तीव्र तेजे करुनी ॥ त्यामाजी यमदूत आणुनी ॥ टाकिती प्राणिगण असंख्यात ॥३॥
एका ठेंचिती एका टाकिती ॥ एक येती काकुळती ॥ दूत निर्दय नाइकती ॥ आणूनियां कवळिती अग्निमंडळ ॥४॥
आणिक तया विषमस्थानी ॥ जळत स्तंभाचिया अनेक श्रेणी ॥ तेथे आणुनी ताडिती प्राणी ॥ दे ये म्हणोनी आलिंगन ॥५॥
विरुप विक्राळ यमदूत ॥ अति भयानक महाअद्भुत ॥ एका भाजिती अग्नीत ॥ एका कवळिती कुंभीपाकी ॥६॥
यमदूत नानाकृती ॥ केलिया कर्माची झडती घेती ॥ एका छेदिती एका भेदिती ॥ एक त्राहाटिती सत्राणे ॥७॥
दीर्घकाया ऊर्ध्व केश ॥ तीक्ष्ण दंष्ट्र अतिदुर्धष ॥ विक्राळवदन देखतां त्रास ॥ प्राणी कासाविस स्वये होती ॥८॥
जिव्हा तांबडी लखलखित ॥ नेत्र दिसती अति आरक्त ॥ तीक्ष्ण नखी रोम थरकत ॥ रागे विदारिती प्राणियांसी ॥९॥
तेथे दूत बहुताकृती ॥ विकट विरुपी दुष्टमती ॥ धांवोनिया पवनगती ॥ पापिया आणिती बांधोनी ॥१०॥
हाती पायी लोहश्रृंखळा ॥ प्राणियाचा बांधोनि गळा ॥ वरी मारिती लोहार्गळा ॥ आणिती विशाळ वनामाजी ॥११॥
प्राणी भयभीत बहुत होती ॥ नानापरी करुणा भाकिती ॥ वरी यमदूत मुद्गले तादिती ॥ घे घे म्हणती सत्राणे ॥१२॥
एक आरडती ओरडती ॥ दीर्घस्वरे रुदन करिती ॥ वर्जितांदूत क्लेशी होती ॥ परी न सोडिती प्राणिया ॥१३॥
ऐसे ताडितां यमदूत ॥ एक पडती मूर्च्छागत ॥ त्यासी करोनि सावचित ॥ उठविती दूत मागुती ॥१४॥
सवेचि धांवोनि चौताळती ॥ वनामाजी प्राणियां नेती ॥ एका घनाचे घाये पीटिती ॥ एका घालिती अग्निकुंडी ॥१५॥
लोहदंडाची आटणी ॥ तेथे प्राणिमांसाची घाटणी ॥ प्राणि ये न येती वांटणी ॥ असंख्य दाटणी दूतांची ॥१६॥
ऐसे घन घायांतळी ॥ प्राणिया पीडितो तया स्थळी ॥ सवेचि टाकिती अग्निमंडळी ॥ ते म्यां तत्काळी देखिले ॥१७॥
अरेरे पातकिया मूढा ॥ दूत म्हणती देरे झाडा ॥ जळत अग्निकुंड धडधडां ॥ प्राणी भडभडा घालिती त्यात ॥१८॥
प्राणी करुणा भाकिती तेथ ॥ क्लेशी होती यमदूत ॥ स्वये बोलती कृपायुक्त ॥ तोची श्लोकार्थ अवधारा ॥१९॥ श्लोक ॥
रेरेपापाकारा मूढवर द्रोहपरायण ॥ तेनेमांभुजसे घोरां यातना परपीडनात ॥१॥ टीका ॥
रेरेपापरुपियामूढा ॥ केला परद्रोह परपीडा ॥ तेणेही यातना अतिपीडा ॥ भोग रोकडा भोगिसी ॥२०॥
ऐसे बोलोनि ते किंकर ॥ सवेचि करिती दुस्तर मार ॥ केलिया कर्माचा परिहार ॥ भोगिती समग्र आपुला ॥२१॥
केले परदाराभिगमन ॥ तयासी होतसे जे पतन ॥ तेही ऐका सावधान ॥ अति दारुण देखिले ॥२२॥
निखिल लोहाचिया घाटून ॥ लक्षानुलक्ष स्त्रिया निर्मून ॥ तप्ताग्नि दैदिप्यमान ॥ तेथे आणूनि प्राणियां ॥२३॥
दूत करिताती ताडन ॥ म्हणती द्यावे आलिंगन ॥ प्राणी सहसा न देती जाण ॥ बळेचि आपण देवविती ॥२४॥
शतधा ताडिती दंडावरी ॥ घोर पीडा करोनि भारी ॥ भोगी कारे हे दिव्यनारी ॥ परद्वारी तूं पापिष्ठा ॥२५॥
ऐशा कोट्यानुकोटी कामांगना ॥ दूत देवविती आलिंगना ॥ करविती मुखचुंबना ॥ तैसेच कुचमर्दना करविती ॥२६॥
तप्तलोहतनूसी जाणा ॥ प्राणी न देता आलिंगना ॥ यमदूत निग्रहे करिती ताडना ॥ ऐसी यास अनिवार ॥२७॥
शतानुशते यमदंड ॥ ठोकिती मस्तकावरी प्रचंड ॥ पापिया गांजिती उदंड ॥ म्हणती पुरवी कोड कामिका ॥२८॥
ऐशा अनेक कामांगना ॥ प्राणिया देवविती आलिंगना ॥ करावया कर्माचा उगाणा ॥ यापरी जाण देताती ॥२९॥
सवेच धांवोनि चौताळती ॥ प्राणियाते बांधोनि आणिती ॥ तंव ते भयभीत स्वये होती ॥ येती काकुळती यमनथा ॥३०॥
ऐशिया परी कामिकांसी ॥ दूत गांजिती क्रोधावेशी ॥ यावरी बोलिले मद्यपान करी त्यासी ॥ तेही सकळिक ऋषी अवधारा ॥३१॥
तेलाच्या कढईमाजी जाण ॥ तयासी करविती स्नान ॥ प्राणियाची जिव्हा ओढून ॥ जळत तेल प्राशन करविती ॥३२॥
प्राणी न करिती क्लेशकारी ॥ दूत मारिती दंडावरी ॥ ऐसे ताडिती नानापरी ॥ बलात्कारी यमदूत ॥३३॥
धगधगीत लोह करुन ॥ तेणे करिती ह्रुदयदहन ॥ प्राणी पडती मूर्च्छा येऊन ॥ दुःख निमग्ननिचेष्टित ॥३४॥
प्राणी पडता भूमीवरी ॥ दंडे ताडिती नानापरी ॥ मग ओढूनियां प्रेतानुकारी ॥ विशाळ वनांतरी टाकिती ॥३५॥
तेथे ताड वृक्ष ते उपटून ॥ करिती गात्रमात्राचे छेदन ॥ निःशेष निमालिया प्राणीगण ॥ मांसभक्षण करविती श्वाना हाती ॥३६॥
ऐसियापरी त्या वनांत ॥ म्यां देखिले अतिअद्भुत ॥ सवेचि चौताळती दूत ॥ घे घे म्हणती सत्राणे ॥३७॥
यापरी असंख्य सहस्त्रांश ॥ प्राणियां होतां देखिले क्लेश ॥ पापियां नुपजे चित्रास ॥ दुःख दुर्धर भोगिती ॥३८॥
कूटसाक्षी म्हणजे लटकी ग्वाही ॥ जेणे पापिये दिधली पाही ॥ तयाते घोर नरकाचे ठायी ॥ उसंत नाही कल्पांती ॥३९॥
प्राण घातकी जो पामर ॥ त्याचे तत्काळ छेदिती शिर ॥ नरकी टाकिती सत्वर ॥ महाघोर ते ठायी ॥४०॥
दुःखदायक निरपराधी ॥ जाळे घालोनि मृगां वधी ॥ तयांसी मोकळिती महाव्याधी ॥ कल्पावधी पुरे तव ॥४१॥
घृताची जो चोरी करी ॥ तयासी तळिती घृता माझारी ॥ तैल तस्कराते अवधारी ॥ तैला माझारी तळिताती ॥४२॥
दधिक्षीर आणि तक्र ॥ या क्षुद्र अर्थाचा जो तस्कर ॥ तयासी करोनि पीटमार ॥ घालिती रुधिर पूयपंकी ॥४३॥
ते शोणित अति कुत्सित ॥ प्राणियासी पाजिती दूत ॥ म्हणती केवि आचरलेसी दुष्कृत्य ॥ ताडिती अमित दंडावरी ॥४४॥
सर्वांग बांधले पाश बंधनी ॥ त्यावरि करिती थोर जाचणी ॥ दुःखे हाहाकार करिती प्राणी ॥ नाही कोणी सोडविता ॥४५॥
तया ठायी सोडविता ॥ धर्म बंधु माता पिता ॥ निजधर्म दवडिला आतां ॥ यातना सर्वथा हे भोगी ॥४६॥
ऐसे बोलोनि यमकिंकर ॥ प्राणियां पीडिती महाक्रूर ॥ यालागी पावोनियां नरशरीर ॥ न करावा अव्हेर कर्माचा ॥४७॥
जेणे केले वनछेदन ॥ तयासी दूत आणिती बांधोन ॥ अग्नि मंडळामाजी जाण ॥ करुनि ताडन टाकिती ॥४८॥
यात्रा मोडिती देवालय ॥ तयासी होत ते सांगू काय ॥ तळी आरणीवरी घणांचे घाय ॥ पीटिती तयां पापियीं ॥४९॥
एथे श्रोते म्हणतील ऐसे ॥ तो देह हे साहेल कैसे ॥ तरी कर्मानुसरिसे ॥ देह असे निर्मिला ॥५०॥
पूर्वदेह टाकितां जाण ॥ कीटकन्या - येते प्राणिगण ॥ मागील पाय सोडून ॥ देह नूतन अंगिकारिती ॥५१॥
ऐसे देह असंख्यात ॥ पडिले आहेत बहुताबहुत ॥ भलते घालोनि भलतियांत ॥ मग भोगविती यातना ॥५२॥
भोजनी जो विघ्नकरी ॥ पादत्राण कोणाचे चोरी ॥ अथवा कोणी वस्त्रहरी ॥ त्यास कोणे परी दंडन ॥५३॥
त्यासी असिपत्राचा मारु ॥ करिती दारुण दुर्धरु ॥ शालवृक्ष महाथोरु ॥ अपारु टाकिती ॥५४॥
जे कां हरिती खाद्यपान ॥ विविध फळे चोरिती आपण ॥ तयांते नरकनदीमाजी आणून ॥ करिती पान पूयशोणितांचे ॥५५॥
कर्णनासिका पर्यंत ॥ चिरकाळ पचती तिये आंत ॥ श्वासोश्वासी निर्बुजत ॥ कृमिकीटक तयां तोडिती ॥५६॥
गृही अथवा वनांतरी ॥ अग्निदाह कोणी करी ॥ तया तोडोनि नानापरी ॥ अग्निमंडळा भीतरी निक्षेपिती ॥५७॥
भ्रतारवंचका ज्या नारी ॥ पतिद्रोह कलहहारी ॥ त्यांसी शालवृक्षावरी ॥ ऊर्ध्व वाघुळांपरी लोंबविल्या ॥५८॥
त्यांसी ठोकिताती महा मुद्गले ॥ ऐसे अनन्य तेथे देखिले ॥ याहीवरी जे वर्तले ॥ तेहिले वहिले अवधारा ॥५९॥
ऐसिया स्त्रिया नेणो किती ॥ शालवृक्षी टांगिल्या आहेती ॥ पतिद्रोह केला त्याची विपत्ती ॥ घे घे म्हणती यमदूत ॥६०॥
तप्तलोहाचिया पुरुषतनू ॥ अग्नीने प्रांजळिल्या दैदिप्यमानू ॥ तयां व्यभिचारिणींलागून ॥ आलिंगना देवविती ॥६१॥
पतिद्रोहाची परमभीती ॥ जीभ ओढुनि छेदिताती ॥ नानापरी विदारिती ॥ दंड हाणिती उदंड ॥६२॥
यापरी तेथे जाणा ॥ केलिया कर्माचा घेती उगाणा ॥ प्राणी नानापरी भाकिती करुणा ॥ परी ते न सोडिती निर्दय ॥६३॥
पुरुष अगम्यागमन करी ॥ तयासी दंडिती ऐशापरी ॥ त्यासी तर्जूनियां असिपत्री ॥ अग्निमंडळाभीतरी टाकिती ॥६४॥
जयाचे हृ दयी क्रूर चिंता ॥ निरपराधे गांजी पतिव्रता ॥ तयासी बोलिले शास्त्रार्था ॥ तेही तत्त्वता अवधारा ॥६५॥