श्रीगणेशाय नमः ॥
यानंतर तो मुनि नासिकेत ॥ म्हणे ऐका ऋषि हो समस्त ॥ परमदुःख परमाद्भुत ॥ देखिले तेथे यमलोकी ॥१॥
महाभय संसारी वर्तता ॥ परी न करिती मृत्युचिंता ॥ अधर्मे वर्तती न विचारितां ॥ संत सांगता नाइकती ॥२॥ श्लोक ॥
नासिकेत उवाच ॥ ऋषयः श्रूयतां यन्मे स्थानमेकं महत्तरम ॥ दारुणं प्राणिनां दृष्टं यमपुर्या भयानकम ॥१॥ टीका ॥
ऋषिहो ऐका सावधान ॥ तिये यमपुरीमाजी आपण ॥ देखिले एक विशाल स्थान ॥ महा दारुण विक्राळ ॥३॥
भयंकर पिशाचस्थळ ॥ घोरारण्य विक्राळकाळ ॥ देखितां छळिती प्राणी सकळ ॥ भये विव्हळ होताती ॥४॥
एक विशाळ महा थोर ॥ केवळ अग्नीपरी वृक्षाकार ॥ उंची एकयोजन विस्तार ॥ रुंदीचा पसर एकयोजन ॥५॥
दिसे जेवी वृक्षाकारु ॥ परी तो अग्नीचा विस्तारु ॥ शिखाकुलित तेज अपारु ॥ बीभत्सतरु अग्नीचा ॥६॥
तया वृक्षावरी प्राणिगण ॥ असती खिळिले पानोपान ॥ लोहश्रृंखळे कंठ बांधोन ॥ लोंबती तेथे असंख्य ॥७॥
एक ते शृंखळा बांधोनी पायी ॥ प्राणी खिळिले ठाई ठायी ॥ वृक्ष कोठेंहि रिता नाही ॥ चौपासी पाही खिळिलासे ॥८॥
वृक्षाकार महाविशाळ ॥ वरी धडधडती अग्निकल्लोळ ॥ त्यांमाजी प्राणियां सकळ ॥ मारिती सबळ वज्रदंडे ॥९॥
तेथे शस्त्रांची खणखण मोठी ॥ वज्रघायांपरी तिडका उठती ॥ ऐसे प्राणी कोट्यानुकोटी ॥ वृक्षसंकटी देखिले ॥१०॥
दुष्टकर्मास्तव जाण ॥ तैसे दुःख भोगित प्राणीगण ॥ हरहर चे दुःख दारुण ॥ वाचे आपण न बोलवे ॥११॥
याही उपरी तेथ ॥ तप्तनरक देखिला उतत ॥ प्राणी गळोनि पडती आंत ॥ महाअद्भुत रौरवी ॥१२॥
तप्तवाळुवेची भूमिका ॥ धडधडीत जैसी अग्नीशिखा ॥ तियेमाजी नेउनी देखा ॥ पुरिती अनेकां पापियां ॥१३॥
वोढिती तोडिती तडतडां ॥ पाडिती लोळविती गडबडां ॥ प्राणी भाजती भडभडां ॥ जैसा कां हुरडा कृषीवळू ॥१४॥
काळपाशी बांधोनि गळा ॥ दूत आणिती प्राणी दुबळा ॥ वरी मारिती लोहार्गळा ॥ ते म्या डोळां देखिले ॥१५॥
घे घे शब्द अतिक्रूर ॥ दूर धांवती भयासूर ॥ ऐसा दुष्टकर्माचा परिहार ॥ तेथे अपार देखिला ॥१६॥
क्षुधातृषाक्रांत भूत ॥ पाणी पाणी म्हणोनी रडत ॥ तरी घेऊं न देती उसंत ॥ प्राणियां पीडिती निर्दय ॥१७॥
दीनवदन काकुळती ॥ पायां लागोनि शरण येती ॥ करुणा भाकिती दूतांप्रती ॥ पुरे म्हणती स्वामिया ॥१८॥
पापिये ते निराश्रित ॥ दुःखे शरण येती कुंथत ॥ बिनविती जोडोनि हात ॥ त्राहे म्हणती पुरे आता ॥१९॥
परी ते न होती दयापरा ॥ पट्टिश मुद्गल मारिती तोमर ॥ कुंतकाठ्या आणि कटार ॥ तीक्ष्ण मार शस्त्रांचे ॥२०॥
जर्जर घाये आक्रंदती एक ॥ तेथे हाहाकार प्रवर्तला देख ॥ एक करिती महाशोक ॥ न ये ते दुःख बोलता ॥२१॥
एक घायी तळमळती ॥ एक मोठ्याने हांक देती ॥ दिर्घस्वरे एक रडती ॥ मूर्छित पडती पै एक ॥२२॥
प्राणी पडतां निचेष्टित ॥ तयांप्रती ते यमदूत ॥ स्वये बोलती दया द्रवित ॥ तोचि श्लोकार्थ अवधारा ॥२३॥ श्लोक ॥
भोभो पापा दुराचाराः पापामाचरितं कुतः ॥ मानुषं दुर्लभं प्राप्य न दत्तं दानमल्पकम ॥२॥
ग्रासार्ध न च वासोर्ध नदेवेभ्यो न चार्थिषु ॥ नहुतं वह्निवक्रे वा न श्वाने नापि वायसे ॥३॥ टीका ॥
प्राणी पडता निचेष्टित ॥ तयासी म्हणती यमदूत ॥ रे रे पापिया हतजीवित ॥ पाप किमर्थ आचरले ॥२४॥
पावोनि मनुष्यदेहाची प्राप्ती ॥ दुष्टकर्म कां आचरलेती ॥ सुलभचि दाने सुटका होती ॥ मूढमति हो चुकलेती ॥२५॥
यमराजाचे दृढशासन ॥ तुम्हांसी काय नव्हते श्रवण ॥ नोळखतां पापपुण्य ॥ नष्टाचरण आचरले ॥२६॥
आतां व्यर्थ भाकिता करुणा ॥ पहिलेंचि कांहो ऐसे नेणा ॥ केलिया भोगीतसां पतना ॥ कोण यातना निवारी ॥२७॥
आधींच नेणा आपुले हित ॥ कां नाही केले पुण्यसंचित ॥ सुलभचि दाने येथ ॥ सुख त्वरित पावते ॥२८॥
ग्रास हो का ग्रासार्ध अन्न ॥ नाही दिधले क्षुधिता पाहोन ॥ वासवासार्ध नूतन हो कां जीर्ण ॥ आर्तालागोनि नाही दिधले ॥२९॥
नाही तृषार्त जीवन ॥ नाही अग्निमुखी केले हवन ॥ श्वान हो कां वायसालागोन ॥ कांरे अन्न नाही दीधले ॥३०॥
अतीतासी आदरु ॥ नाही केला नमस्कारु ॥ आतां हे पतन महाथोरु ॥ कवण निवारुं शकेल ॥३१॥
नाही केले पितृतर्पण ॥ नाही तीर्थासी केले गमन ॥ पुण्यपर्वकाळी स्नान ॥ गंगेसी जाऊनि नाही केले ॥३२॥
थोर चुकलेती सर्वथा ॥ नाही संतोषविले देवतां ॥ गृहस्थाश्रमी असतां ॥ पंचाग्नितृप्तता नाही केली ॥३३॥
एकाएकी मिष्टान्न भोजन ॥ कांरे भक्षिले साक्षीविण ॥ अतीताते विमुख दवडून ॥ पातक संपूर्ण जोडिले ॥३४॥
सत्य सांगारे विचारुन ॥ पहिले केले नव्हते की श्रवण ॥ हे यमयातना दारुण ॥ शास्त्रे गर्जोनि सांगती ॥३५॥
ते अमान्य करोनी वेदवचन ॥ स्वये केले भोगितां पतन ॥ ऐसे यमदूत बोलून ॥ करिती खंडन मागुती ॥३६॥
दूत स्वरुपे अतिक्रूर ॥ पुनरपि करिती घोर मार ॥ क्लेशिये करिती अपार ॥ दुःखे दुर्धर दोषिया ॥३७॥
तेही स्थळ अति भयाण ॥ तप्त नरक उतती कठिण ॥ नाही प्राणियां निर्गम जाण ॥ दुःखे निमग्न तळमळती ॥३८॥
नानापरीचे कृमि कीटक ॥ तयामाजी तोडिती देख ॥ सर्प विंचू दुःखदायक सर्वांग सकळिक कवळिती ॥३९॥
कूटसाक्षी स्वये देती ॥ मिथ्यावादी पापमूर्ती ॥ तयांसी जळतखांबी बांधती ॥ वरी ताडिती जळत मुद्गले ॥४०॥
ऐसे ते नेणो किती ॥ अग्निस्तंभी बांधिले आहेती ॥ कित्येक कुंभीपाकी उकडती ॥ ते म्यां निश्चिती देखिले ॥४१॥
गुरु नृपति आणि ब्राह्मण ॥ गुरुभार्या आणि संत सज्जन ॥ इत्यादि जे जन जाण ॥ ते जाणावे विष्णुतुल्य ॥४२॥
यांचे केलिया पूजन ॥ पूजिले देव अग्नि ईशान ॥ यक्ष गंधर्व ऋषिजन ॥ तयाने जाणा पूजिले ॥४३॥
मातापिता देव तीर्थ ॥ आलिया समयासी अतीत ॥ तो पूजावा यथोचित ॥ ऐसा शास्त्रार्थ बोलिला ॥४४॥
विमुख दवडितां अतिथी ॥ गेली गृहस्थाची पुण्यसंपत्ती ॥ तेचि धार्मिक संरक्षिती ॥ त्यांते वंदिती सुरवर ॥४५॥
जयांसी घडे अतिथिपूजन ॥ तेणे पूजिला नारायण ॥ जया हरीचे घडे पूजन ॥ तेणे त्रिभूवन संतर्पिले ॥४६॥ श्लोक ॥
श्रेष्ठं धर्मस्य माहात्यं चित्रगुप्तोऽवदत्फलम ॥ ब्रह्मण्याः सर्वभूतेषु सदयाः सूरपूजिताः ॥४॥ टीका ॥
धर्माचे श्रेष्ठ माहात्म्य गहन ॥ सकळ पुण्यामाजी प्रधान ॥ वदे चित्रगुप्त आपण ॥ साधारण पुण्यफळ ॥४७॥
ब्राह्मणाकाजी वेंचिती शरीर ॥ जे सर्वभूतदयापर ॥ तयांते वंदिती सुरवर ॥ करिती जयजयकार स्वर्गस्थ ॥४८॥
ऐसे बोलती श्रृतिस्मृती ॥ तें न मानुनी रे मूढमती ॥ नाही पूजिला अतिथी ॥ आतां हे पीडा भोगितां ॥४९॥
ऐसे बोलोनि यमदूत ॥ प्राणिया गांजित अत्यद्भुत ॥ कांरे चुकलेती स्वहित ॥ दोष किमर्थ आचरलेती ॥५०॥
कां त्यागिला सदाचार ॥ केला सत्यधर्माचा अव्हेर ॥ केले कुकर्म अनाचार ॥ ऐहिक परत्रा मुकलेती ॥५१॥
ऐसे तयां प्राणियांप्रती ॥ यमकिंकर अनुवादिती ॥ परी ते सहसा न सोडिती ॥ सवेंचि ताडिती सत्राणे ॥५२॥
दीर्घकाय महाप्रचंड ॥ हाती घेवोनियां यमदंड ॥ यमासमान धावती उदंड ॥ ते म्यां वितंड देखिले ॥५३॥
एक धावतां चौताळती ॥ पापिष्ठाते घेवोनि येती ॥ स्वामीच्या आज्ञेने वर्तती ॥ केले भोगविती प्राणियां ॥५४॥
ऐसे अमित यमभुवनी ॥ धांवती विक्राळ दंडपाणी ॥ पापी आणिती बांधोनी ॥ करिती जाचणी अनिवार ॥५५॥
जाणूनि पातकी आत्यंतिक ॥ धरोनि आणिती यमांतक ॥ जैसे सांगती ऋषि धार्मिक ॥ तें तें पातक भोगविती ॥५६॥
कुंभीपाकादि महानरक ॥ कित्येक काळ भोगिती एक ॥ ऐसी तेथांची वर्तणुक ॥ अनेक दुःसह देखिली ॥५७॥
उसंत नाही अहोरात्री ॥ केलिया कर्माची झडती घेती ॥ हे जाणोनियां मूढमती ॥ त्रास न घेती सर्वथा ॥५८॥
अल्पकाळ भोगिती भोग ॥ संसारसुख मानिती चांग ॥ पापियां नावडे संतसंग ॥ नुपजे वैराग्य अनुतापे ॥५९॥
पंचभूतांचा जाइजाणा ॥ जेणे देह आणिला उसना ॥ स्वहित आपुले न करी जाणा ॥ तो वैरी आपण जाहला ॥६०॥
आणिक पापिये पुण्यसंचित ॥ न करितां छळिती यमदूत ॥ यालागी सांडूनियां परमार्थ ॥ कां झाले रत कुकर्मी ॥६१॥
बापुडे ते काय करिती ॥ तप्तपाशी बांधिले आहेती ॥ सुटका नोहे कल्पांती ॥ कैसेनि मुक्ति होईल ॥६२॥
संतसमागम हरिकथा ॥ जयांसी नावडे धर्मवार्ता ॥ जे येताती दक्षिणपंथा ॥ ते म्यां तत्त्वतां देखिले ॥६३॥
ऐसा यमपुरींचा वृत्तांत ॥ सांगे ऋषि नासिकेत ॥ परिसोन ते ऋषि समस्त ॥ झाले रोमांचित सर्वांगी ॥६४॥
ऐसे धर्माधर्मकीर्तन ॥ ऋषि नासिकेतोपाख्यान ॥ जे नर करिती आवडीने श्रवण ॥ पुण्ये पावन ते हाती ॥६५॥
तुकासुंदर रामी शरण ॥ श्रोती द्यावे अवधान ॥ पुढे परिसावे निरुपण ॥ पुण्य पावन धर्मकथा ॥६६॥
श्रीनासिकेतोपाख्यान द्वादशोऽध्यायः ॥१२॥