श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायन म्हणे नृपती ॥ ऐके पुढील कथासंगती ॥ वनामाजी ते प्रभावती ॥ शोके व्याकुळ संतप्त ॥१॥
महाघोर ब्रह्मारण्यी ॥ शांत करावया नाही कोणी ॥ शोके व्याकुळ पद्मनयनी ॥ दुःखे वदनी विलपत ॥२॥
क्षणक्षणे होय व्याकुळ ॥ चिंता मानसी अतिप्रबळ ॥ म्हणे कोण्या पापाचे हे फळ ॥ म्यां तात्काळ भोगिले ॥३॥
विमुख दवडिले अतीता ॥ कीं विश्वासघात केला नेणतां ॥ भजल्ये नाही श्रीगुरुनाथा ॥ तेणे दुःखावस्था भोगितसे ॥४॥
समयासी येतां क्षुधित ॥ विन्मुख दवडिला अतीत ॥ तेणे पापे दुःखाद्भुत ॥ म्यां निश्चिती भोगिते ॥५॥
ऐसी आक्रंदे राजबाळी ॥ अति संतप्त शोकानळी ॥ तंव कोणी एक ऋषि तयेवेळी ॥ आला वनस्थळी कुशहरणार्थ ॥६॥
तो विचरतां तयावनी ॥ दुरुन ऐकला शोकध्वनी ॥ अतिविस्मित जाहला मनी ॥ आला धांवोनि ते ठायी ॥७॥
दया उपजले मुनिवरा ॥ कृपेने आला सामोरा ॥ पाहे राजकन्या सुंदरा ॥ दुःखसागरामाजी पडली ॥८॥
दीर्घस्वरे करी रुदन ॥ स्वरुप सुंदर शोभायमान ॥ दिसते चित्रलेपासमान ॥ अतिसुलक्षण साजिरे ॥९॥
तो म्हणे आपुले चित्ती ॥ येथे कोण हे महासती ॥ वनी एकली शोक करिती ॥ सुंदराकृति सुकुमारा ॥१०॥
वनदेवता की सुरेश्वरी ॥ नागकन्या कीं गंधर्वकुमारी ॥ अहल्या तिलोत्तमा न पावती सरी ॥ ऐशी अतिसुंदरी येथे कोण ॥११॥
किंवा रति कामविहिन ॥ परम विव्हळ करी रुदन ॥ एकाएकी सेविले घोरवन ॥ कन्यारत्न कोणाचे ॥१२॥
अतिशोभा विराजमान ॥ दिव्यतेज अतिगहन ॥ घवघवीत स्तनयौवन ॥ सुंदरवदनी विशालाक्षा ॥१३॥
ऐसी देखोनि ते सुंदरा ॥ विस्मय झाला ऋषीवरा ॥ मुनि म्हणे तये अवसरा ॥ कवणाची हे सुंदरी ॥१४॥
तियेसी पुसे तपोधन ॥ म्हणे तूं कोणाचे कन्यारत्न ॥ एकाएकी सेवावया वन ॥ काय कारण जाहले ॥१५॥
दुःखे शोके अति संतप्त ॥ तुज कवणे टाकिले या वनांत ॥ रुदन करिसी अद्भुत ॥ काय निमित्त सांगावे ॥१६॥
दया उपजली मम मानसी ॥ म्हणूनियां पुसे तुजसी ॥ चंद्रप्रभा म्हणे त्यासी ॥ काय पुसशी ऋषिनाथा ॥१७॥
नव्हे मी गंधर्वी निशाचरी ॥ आणि नागकन्या सुरी असुरी ॥ रघुराज अयोध्यानगरी ॥ तयाची पुत्री हतभाग्य ॥१८॥
अप्रणीत मी आपण ॥ पितृगृही सुखसंपन्न ॥ करुं गेले गंगास्नान ॥ तेथे विघ्न ओढवले ॥१९॥
क्षणभरी जलक्रीडा केली तेथ ॥ तंव शरयूमाजी अकस्मात ॥ एक कमळ आले वाहत ॥ ते म्यां परिमळार्थ अवघ्राणिले ॥२०॥
सुवास घेतां नासिकाद्वारी ॥ नेणे काय गेले उदरी ॥ अकस्मात झाले गरोदरी ॥ मानी सत्य ऋषिवर्या ॥२१॥
ऐशी होतां गर्भदोषी ॥ पिता झाला परमदुःखी ॥ तेणे कोपोनि एकाएकी ॥ टाकिले मज वनाते ॥२२॥
ऐसे समूळ पूर्वकथन ॥ सांगे चंद्रप्रभा दीनवदन ॥ म्हणे हतभाग्य मी संपूर्ण ॥ निरपराधे विघ्न मज आले ॥२३॥
ऐसे ऐकोनि तियेचे वचन ॥ कृपे कळवळले त्याचे मन ॥ म्हणे मी तुज कन्येसमान ॥ पाळीन वचन सत्य मानी ॥२४॥
रघुराज अतिविख्यात ॥ असे त्रेलोक्यी कीर्तिमंत ॥ निजधर्मे तुज त्यागिले यथार्थ ॥ दोषाभिहत होवोनि ॥२५॥
आतां न करी कांही चिंता ॥ होणार ते न चुके सर्वथा ॥ तूं माझी प्रियदुहिता ॥ चाल तत्वतां आश्रमासी ॥२६॥
दुःख शोक न करी कांही ॥ मम आश्रमी सुखी राही ॥ होणार ते न चुके पाही ॥ लोकत्रयी हिंडतां ॥२७॥
ऐकोनि त्याची धर्मोक्ती ॥ परम समाधान वाटले चित्ती ॥ म्हणे तात कृपामूर्ती ॥ दैवगती भेटलासी ॥२८॥
मग उठोनि ते लावण्यराशी ॥ सवे आली आश्रमासी ॥ जाणोनि दुःखित तियेसी ॥ करिती ऋषि शांतवन ॥२९॥
ती नित्य करी गंगास्नान ॥ तपश्चर्या अनुष्ठान ॥ व्रतोपवास प्रदक्षिण ॥ रामस्मरण अहर्निशी ॥३०॥
ऋषिपन्त्यांमाझारी ॥ प्रभावती काल क्रमण करी ॥ ऐसे राया नवलपरी ॥ जाहले गर्भासी नव मास ॥३१॥
श्वास टाकितां सुंदरी ॥ गर्भ पडला नासिकाद्वारी ॥ विस्मय करिती नरनारी ॥ म्हणती हा अवतारी महापुरुष ॥३२॥
सर्वलक्षणे संपूर्ण ॥ दिव्य तेजे विराजमान ॥ महर्षि मिळून तपोधन ॥ जातक पूर्ण वर्तविले ॥३३॥
अतिसुंदर सुलक्षण ॥ दिव्य तेजे दैदीप्यमान ॥ देखोनि धाले ऋषिजन ॥ म्हणती हा संपूर्ण अवतारी ॥३४॥
॥ जन्मस्थान नासिकापथ ॥ म्हणूनि याचे नांव नासिकेत ॥ महोत्सवे मंगळ करित ॥ ऋषि समस्त मिळोनी ॥३५॥
परमाश्चर्य करिती सकळ ॥ थोर मानिती पर्वकाळ ॥ म्हणती निश्चये हे राजबाळ ॥ सकळ कुळ उद्धरिले ॥३६॥
दैवी इच्छा नाही दोष ॥ हा जन्मला अवतारी पुरुष ॥ ऐसी किर्ति करिती बहुवस ॥ म्हणती जगदीश विचित्रकर्ता ॥३७॥
मुनि म्हणे गा भारता ॥ यापरी जन्म नासिकेता ॥ पुढे काय वर्तली कथा ॥ सावधान श्रोती परिसावी ॥३८॥
पुनरपि ते रघुनंदिनी ॥ ऋषिसेवा करी अनुदिनी ॥ सावधान भगवद्भजनी ॥ संतचरणी विश्वास ॥३९॥
जयांची संतभजनी प्रीती ॥ तेही पापी पावन होती ॥ धरितां या संतांची संगती ॥ परब्रह्माप्राप्ती अनायासे ॥४०॥
संतस्वरुपे भगवंत ॥ त्यांच्या सेवे कैवल्य प्राप्त ॥ सुभाग्य धरी शुद्ध भावार्थ ॥ दुर्भाग्य देखत गुणदोष ॥४१॥
चंद्रप्रभा ऋषिसेवेसी ॥ भावे विनटली अहर्निशी ॥ तप करित लावण्यराशी ॥ दे बाळकासी स्तनपान ॥४२॥
कोणे एके दिवसी ॥ चंद्रप्रभा लागे ऋषिसेवेसी ॥ ऐसे असतां त्यासमयासी ॥ बाळ आक्रोशे रोदन करी ॥४३॥
नाही मातेचे शांतवन ॥ दीर्घस्वरे करी रुदन ॥ तंवऋषिशुश्रूषा संपादून ॥ आली आपण आश्रमासी ॥४४॥
बाळ देखोनी आक्रंदत ॥ दुःखे जाहली शोकाकुलित ॥ म्हणे तूं पूर्वकर्मे येथ ॥ झालासी प्राप्त मजलागी ॥४५॥
राजगृही सुख संपन्न ॥ सकल संपदा भोगितां आपण ॥ अकस्मात गर्भ उत्पन्न ॥ जाहले विघ्न तुझे ॥४६॥
तुझिया निमित्ते आपण ॥ वनवास भोगिला दारुण ॥ ऐसे बोलोनियां जाण ॥ करी रुदन चंद्रप्रभा ॥४७॥
पूर्वदुःखे करितां रुदन ॥ शोके जाहली क्रोधायमान ॥ म्हणे याचे निमित्ते जाण ॥ लागले दूषण मजलागी ॥४८॥
याचेन घडला वनवास ॥ याचेन जाहला उपहास ॥ बोल लागला उभयकुळास ॥ गर्भदोषनिमित्ते ॥४९॥
कोण हा पातकी दुराचारी ॥ संभवला अकस्मात उदरी ॥ निंद्यकर्म पडले शिरी ॥ निमित्ताधारी हा असे ॥५०॥
ऐसे बोलोनि ते सुंदरी ॥ रुदन करी नानापरी ॥ बाळ घेवोनि क्रोधे करी ॥ आली झडकरी गंगातीरा ॥५१॥
तृण वेष्टून तयासी ॥ गंगेमाजी सोडिले निश्चयेसी ॥ आपण येवोनि आश्रमासी ॥ ऋषिसेवेसी राहिली ॥५२॥
पूर्णनिष्ठेत अद्भुत ॥ सेवा करितां अति विनीत ॥ पुढे काय वर्तला वृत्तांत ॥ श्रोती सावचित्त परिसावा ॥५३॥
गंगेमाजी वाहत वाहत ॥ बाळका नेतसे गंगाझोत ॥ जेथे उद्दालक तप करीत ॥ आला अकस्मात त्याठायी ॥५४॥
गंगातीरी उद्दालक ॥ तप करितां अलौकिक ॥ तंव तृणे वेष्टूनियां देख ॥ आहे बाळक वाहत ॥५५॥
तृणे वेष्टिले बाळकासी ॥ गंगेमाजी देखे ऋषि ॥ उठोनियां अति त्वरेसी ॥ काढिले त्यासी बाहेर ॥५६॥
दिव्यतेजाचा उमाळा ॥ की ते लावण्याची पूर्ण कळा ॥ ऋषि देखोनि निवाला डोळा ॥ मानस मेळा हर्षित ॥५७॥
स्वये होवोनि विस्मयापन्न ॥ म्हणे कोणाचे हे पुत्रनिधान ॥ तव आठवले ब्रह्मवरदान ॥ स्नेहे करुनि कळवळला ॥५८॥
सम अवयव समान कुहर ॥ समसमान नेत्रवक्र ॥ ज्ञानी जंव पाहे ऋषिश्वर ॥ म्हणे माझा पुत्र ब्रह्मवरे ॥५९॥
अन्यथा नव्हे ब्रह्मवाणी ॥ पुत्र पावलो रन्तखाणी ॥ हर्ष न माये त्रिभुवनी ॥ आला घेवोनि स्वाश्रमी ॥६०॥
मंत्रोक्तविधिविधान ॥ कर्म उल्हासे करी आपण ॥ मेळवोनि तपोधन ॥ पूजिले ब्राह्मण यथाविधि ॥६१॥
गोदान हिरण्यदान ॥ पुत्रोद्देशे करी आपण ॥ तो सुपुत्र आश्रमी असता जाण ॥ झाले वर्तमान ते ऐका ॥६२॥
आश्रमी असतां चिरकाळ ॥ दिवसेंदिवस वाढला बाळ ॥ तंव तो जीवन्मुक्त केवळ ॥ वेदशास्त्र सकळ अभ्यासिले ॥६३॥
अंगी बाणली तपस्थिती ॥ पितृसेवेची अति प्रीती ॥ सेवा करी अहोरात्री ॥ विनयवृत्ती सर्वदा ॥६४॥
अति आल्हाद सकळांप्रती ॥ सत्य झाला ब्रह्मवरोक्ती ॥ आतां भार्या पावेन मी निश्चिती ॥ निश्चय चित्ती दृढ झाला ॥६५॥
नित्य करी गंगास्नान ॥ ध्यान धारणा अनुष्ठान ॥ देखोनि पुत्राचे अनन्य भजन ॥ समाधान झाले ऋषिवर्या ॥६६॥
पितृसेवेसी नासिकेत ॥ अहर्निशी सावचित्त ॥ पित्राज्ञा प्रतिपाळित ॥ स्वानंदयुक्त सर्वदा ॥६७॥
करुनि फळमूळांचे भोजन ॥ दोघे राहती सुखसंपन्न ॥ आतां पुढील कथानुसंधान ॥ सावधान परिसावे ॥६८॥
यापरी उद्दालकासी पुत्र प्राप्त लावण्यराशी ॥ दोघे असतां आश्रमापाशी ॥ कथा कैसी वर्तली ॥६९॥
वैशंपायन म्हणे नृपनाथा ॥ तूं पुण्यश्लोक महा श्रोता ॥ उद्दालक आश्रमी असतां ॥ पुढील कथा अवधारी ॥७०॥
तुकासुंदर रामी शरण ॥ सज्जनी द्यावे अवधान ॥ पुढील रसाळ निरुपण ॥ कथा पावन भारती ॥७१॥
इति श्रीनासिकेतोपाख्याने उद्दालकपुत्रप्राप्तिर्नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥ ओव्या ॥७१॥
॥ इति नासिकेतोपाख्याने तृतीयोऽध्याय समाप्त ॥