श्रीगणेशाय नमः ॥
ऐसी हे दिव्यकथा गहन ॥ महापातकासी करी निर्दळण ॥ नासिकेत म्हणे ऋषि तपोधन ॥ पुढे निरुपण अवधारा ॥१॥
ऐका तया यमपुरीत ॥ म्यां देखिलां जो वृत्तांत ॥ दारुण मार्ग अति अद्भुत ॥ तोहि समस्त सांगेन ॥२॥
दुस्तर मार्ग अति कठिण ॥ सहासहस्त्र योजन प्रमाण ॥ तेणे मार्गे प्राणिगण ॥ दूत बांधोनि आणिती ॥३॥
सप्तभूमिका मार्ग सकळ ॥ निघती अग्नीचे कल्लोळ ॥ ज्वाळा धगधगीत महा विशाळ ॥ देखतां व्याकुळ प्राणिगण ॥४॥
तेथोनि मार्ग अति घोरांदर ॥ महाभयानक अंधकार ॥ चालतां प्राणियां अति दुस्तर ॥ क्लेश ये अपार दुःखदाहे ॥५॥
तेथोनि मार्ग पुढारी गहन ॥ उंच पर्वत अति विस्तीर्ण ॥ तेथे उतरतां चढतां जाण ॥ दुःख दारुण प्राणियां ॥६॥
त्यावरी लोहाचे कांटे ॥ परम तीक्ष्ण तया वाटे ॥ देखतां दृष्टी काळीज फाटे ॥ पुढे दुःख मोठे चालतां ॥७॥
तेथोनि मर्ग अति अद्भुत ॥ खतखतां लाक्षा असे उतत ॥ तेणे मार्गे यमदूत ॥ प्राणी चालविती बलात्कारे ॥८॥
तयाचेहि पुढे जाण ॥ तीक्ष्णकंटकांचे घोरारण्य ॥ मार्गे सणसणती संकीर्ण ॥ आणि संपूर्ण अंधकार ॥९॥
दारुण अंधकाराचा आवर्त ॥ माजी धूमाचा वळसा भंवत ॥ ज्वाळा तुटती अकस्मात ॥ थोर आकांत प्राणिया ॥१०॥
तेंही क्रमितां अति गहन ॥ पुढां वोढवले अति दारुण ॥ हिमेपीडती प्राणिगण ॥ शैत्य दारुण तेणे पंथे ॥११॥
सवेंचि येऊनियां जरा ॥ गिवसी प्राणियांच्या शरीरां ॥ हिंवे कांपती थरथरां ॥ पुढे शस्त्रधार मार्ग कठिण ॥१२॥
क्रूरधारांचे पर्वत ॥ एका चढवीत एका उतरित ॥ प्राणी होती हाहाभूत ॥ कोण तेथे निवारी ॥१३॥
व्याळ वृश्चिक कंटक ॥ धूमयुक्त अग्नि देख ॥ तेणे मार्गे पातकी लोक ॥ आणिती अंतक बांधोनी ॥१४॥
विनाधर्मे जो सजीव राहे ॥ कृत्याकृत्य विचार न पाहे ॥ दुर्गम मार्ग जो प्रवर्तलाहे ॥ तो निंके न साहे पुढील दुःख ॥१५॥
पापकारी जे सर्वदा ॥ जे उल्लंघिती धर्ममर्यादा ॥ तयां दोषियां भाग्यसंपदां ॥ थोर आपदा तेणे पंथे ॥१६॥
कराळ विक्राळ यमदूत ॥ भयानक अति अद्भुत ॥ धांवोनियां अति आक्रांत ॥ आणिती पतित तेणे मार्गे ॥१७॥
दीर्घलोहाचिया श्रृंखळा ॥ बांधिला दंड आणि गळा ॥ वरी मारिती लोहर्गळा ॥ आणिती विशाळा घोरमार्गे ॥१८॥
दुद्गले ताडिती अनेक ॥ घाये भूमीवरी पडती एक ॥ एक करिती महाशंख ॥ अनिवार दुःख साहवे ना ॥१९॥
शोकदुःखाकुलित भारी ॥ मूर्च्छित पडती धरणीवरी ॥ मागुती उठवोनि यमकिंकरी ॥ तीक्ष्ण प्रहारी ताडिजेती ॥२०॥
ग्रीवाबाहुपृष्ठीकडे ॥ श्रृखंळा बांधोनि पिछोडे ॥ त्यांवरी ठोकिती लोहदंडे ॥ आणिती उदंडे तेणे मार्गे ॥२१॥
नासिकेत ह्मणे महामुनी ॥ प्रत्यक्ष देखिले म्यां नयनी ॥ करिती प्राणियां थोर जाचणी ॥ क्रूरवदनी यमकिंकर ॥२२॥
भयानक रुपे अति दारुण ॥ निर्दय गांजिती प्राणिगण ॥ एक होवोनियां क्षीणप्राण ॥ पडती अचेतन निचेष्ट ॥२३॥
गळां बांधोनि काळपाश ॥ ऐसे कोट्यानुकोटी पापपुरुष ॥ यमदूत ताडिती त्यांस ॥ कासावीस होती प्राणिये ॥२४॥
श्रृंखळे बांधोनि माघारे हात ॥ वरी ताडिती यमदूत ॥ नानापरी पीडा अद्भुत ॥ तेही सकळिक सांगेन ॥२५॥
डोळां झोंबविले काळे नाग ॥ जिव्हेसी डसविला डसविला महाभुजंग ॥ व्याळवृश्चिकी सर्वांग ॥ प्राण्यांचे असे व्यापिले ॥२६॥
पायी श्रृंखळा गळा तोख ॥ बाहुपृष्ठी बांधिले देख ॥ मुद्गले मारिती अनेक ॥ नये ते दुःख बोलता ॥२७॥
वज्राहूनी हृदय कठोर ॥ कृतांतकाळाचे अवतार ॥ निर्दय करिती बिकट मार ॥ दुर्धरशस्त्रसमुदाये ॥२८॥
लहुडी पाश मुद्गल अर्गळ ॥ फरश पट्टीश आणि मुसळ ॥ काठ्या कटार त्रिशूळ ॥ घाय प्रबळ शस्त्रांचे ॥२९॥
केवळ जे कां दयाहीन ॥ शठ नष्ट आणि दुर्जन ॥ अमान्य करोनि वेदवचन ॥ पाखंडी जाण वर्ततसे ॥३०॥
नानाशस्त्रांचे दुर्धर मार ॥ हांका बोंबांचे महागजर ॥ घाये प्राणी अति जर्जर ॥ वाहे पूर रुधिराचा ॥३१॥
क्लेशाभिभूत हीनदीन ॥ प्राणी अतिभये कंपायमान ॥ दीर्घस्वरे करिती रुदन ॥ सोडवी कवण तेठायी ॥३२॥
कोणी नाही सोडविता ॥ दुरी ठेली वित्त सुत कांता ॥ तेथे सोडवावया तत्वतां ॥ धर्मापरता असेना ॥३३॥
ऐसे असतां दवडिला धर्म ॥ शेखी फळ अति दुर्गम ॥ वायां भोगिताती अधम ॥ हृदयीचा राम विसरोनी ॥३४॥
आत्मा परमात्मा एक ॥ शास्त्रमुखे हो सकळिक ॥ जाणोनि न भजती जे मूर्ख ॥ ते तेणे मार्गे देखा आणिती ॥३५॥
पापिये रडती करुणावदनी ॥ न साहवे अनिवार जाचणी ॥ विसावा न देती तेथे कोणी ॥ अर्धक्षणही तयांला ॥३६॥
ऐसे तेणे मार्गे जाण ॥ कोट्यानुकोटी प्रेतगण ॥ आणितां म्यां देखिले पूर्ण ॥ धर्मज्ञान जयां नाही ॥३७॥
यालागी मनुष्यदेही ॥ धर्मज्ञानेविण सार्थक नाही ॥ ज्ञाने निजधर्म जोडे पाही ॥ जो सोडवी समयी अंतकाळी ॥३८॥
आतां असो हे उपपत्ती ॥ धर्म अंतकाळीचा सांगाती ॥ तो दुरावितां विषयासक्ती ॥ नाही अंती सोडविता ॥३९॥
अधर्मी अज्ञानी अन्यायी ॥ अविद्वान जो सुवर्णस्तेयी ॥ धर्माधर्म ज्ञान नाही ॥ मलिन पाही सर्वदा ॥४०॥
सत्यशौचविवर्जित ॥ अभक्त आळसी सदा कुत्सित ॥ नित्य कलह हाहाभूत ॥ तो तो येत येणे पंथे ॥४१॥
मनुष्यदेह जाहलिया प्राप्त ॥ जे न विचारिती हिताहित ॥ त्यांते पीडिती यमदूत ॥ आणिती ताडित तेणे मार्गे ॥४२॥
ज्वाळाकुलित घोर पंथ ॥ गडद अंधकार धूम जेथ ॥ दूत आणिती प्राणी तेथ ॥ देखिले येतां असंख्य ॥४३॥
अति श्रांत दीनवदनी ॥ अनिवार क्षुधा मागती प्राणी ॥ करुणा भाकिती ग्लानी करुनी ॥ दया त्यां मनी उपजे ॥४४॥
काकुळती धरिती पाय ॥ दूत मारिती मुद्गलघाय ॥ महा दारुण ते बोलतां नये ॥ पातकी साहती जे दुःख ॥४५॥
घोरमार्गी बांधूनि देही ॥ त्यावरी मारिती मुद्गल घायी ॥ दूत म्हणती करिसी काई ॥ पूर्वीच नाही ठावुके ॥४६॥ श्लोक ॥
श्रृणु त्वं प्राप्य दुर्बुद्धे मानुषं जन्म दुर्लभम ॥ व्यर्थ यापितवान्मूढ न कृत्वा धर्मचिंतनम ॥१॥ टीका ॥
ऐके पापिया मूढमती ॥ दुर्लभ कर्मभूमीची प्राप्ती ॥ पावन नरदेहाची वस्ती ॥ दैवगतीने पावलासी ॥४७॥
लक्ष चौर्यायशी हिंडोन ॥ अवचट पावलासी मनुष्यजन ॥ न करितां धर्माधर्मविचारण ॥ अधर्मपणे दवडिलासी ॥४८॥
॥ श्लोक ॥ भ्रांत्या पापसक्तमनाः किमर्थं ग्लायसेऽधुना ॥ सुलभानि न दत्तानि तोयं धनतृणानि च ॥२॥
॥ टीका ॥ भवभ्रांतीने कवळिलासी ॥ पापासक्त झालासी ॥ केले कर्म भोगीतोसी ॥ वृथा येसी काकुळती ॥४९॥
नाही केले सुलभदान ॥ तोय तृण अथवा इंधन ॥ कांहीच नाही केले पुण्य ॥ जन्म अकारण का केले ॥५०॥
संध्यामात्र नाही स्नान ॥ नाही तीर्था केले गमन ॥ नाही पूजिले देव ब्राह्मण ॥ जन्म अकारण स्वये केला ॥५१॥ श्लोक ॥
कथं निस्तरसे मूढ घोरां नरकयातनाम ॥ यातनेसी ॥ यमपुरीचे वृत्तांतासी ॥ पूर्वीच नेणसी गव्हारा ॥५२॥
दारुण यमपुरीचे वर्तमान ॥ तुज कां पूर्वीच नव्हते श्रवण ॥ होवोनि शिश्नोदरपरायण ॥ स्वहित संपूर्ण चुकलासी ॥५३॥
॥ श्लोक ॥ मैथुनव्यसनासक्तास्तथा पापात्मकाः सदा ॥ कामलोकभरता नित्यं भुंजध्वे दुःखदुर्दशाम ॥४॥ टीका ॥
मैथुनासक्त विषयी वासना ॥ पापात्मे करिती कर्मे नाना ॥ करोनियां दुष्टाचरणा ॥ घोरपतना मूळ केले ॥५४॥
कामलोभाचिया आशे ॥ वरकड झालेती महादोषे ॥ धर्माचार त्यजूनियां कैसे ॥ दुःखदुर्दशा भोगितां ॥५५॥
नाही केले हिरण्यदान ॥ नाही दिधले गोदान ॥ सूर्य किंवा चंद्रग्रहण ॥ पर्व पाहोनि ब्राह्मणा ॥५६॥
तैसेचि नाही केले तप ॥ नाही जपलेती जप ॥ त्यागूनियां सत्यसंकल्प ॥ केंवी पाप आचरलेती ॥५७॥
प्रीति नाही परमपुरुषी ॥ नाही हविले अग्निमुखी ॥ नाही अतिथि केला सुखी ॥ कैसेन नरकी तराल ॥५८॥
आतां हा नरकार्णव दारुण ॥ कैसा निस्तराल आपण ॥ दारुण यमपुरीचे वर्तमान ॥ काय श्रवण नव्हते तुम्हा ॥५९॥
धर्मराज आज्ञा प्रमाण ॥ तेथे निवारुं शके कोणा ॥ नाही स्वधर्माचे रक्षण ॥ यातना दारुण केवी चुके ॥६०॥
कधी न केले श्रीगुरुभजन ॥ नाही ऐकिले वृद्धवचन ॥ मूढ नेणोनि घोरपतन ॥ भुललासी अज्ञान देहमदे ॥६१॥
मानसी धरिला गर्व ताठा ॥ स्वैर विचरलासी अधर्मवाटा ॥ वोखटे केलेरे कटकटा ॥ म्हणती पापिष्ठा यमदूत ॥६२॥
ऐसे म्हणोनि ते दोषां ॥ घोरमार्गे आणिती वेगेसी ॥ जे विसरले स्वधर्मासी ॥ सर्वस्वे पापासी वश्य झाले ॥६३॥
ब्रह्मघातकी सुरानदी ॥ स्वामिद्रोही जो दुर्बुद्धी ॥ बाळ आणि स्त्री जो वधी ॥ त्या आणिती तेणे पंथे ॥६४॥
परधन परवनिता ॥ यांचा अभिलाषी जो पुरता ॥ तोही तया घोर पंथा ॥ माजी येतां देखिला ॥६५॥
परद्रोही परापवादी ॥ शास्त्रमर्यादा जो निंदी ॥ दयाहीन जो अपराधी ॥ दुष्टबुद्धी दुरात्मा ॥६६॥
क्षेत्रवृत्ति गृहहारे ॥ पारधीकर्म अखंड करी ॥ व्यसनी मद्यमांसाहारी ॥ पापकारी जो नर ॥६७॥
ब्राह्मणजन्मामाझारी ॥ उन्मत्त मद्यपान जो करी ॥ बाळपातकी दुराचारी ॥ आणि जो करी विषप्रयोग ॥६८॥
सोडोनि वृद्धाचार आपुला ॥ नीचाचारी जो रतला ॥ अधर्माची रहाटी ज्याला ॥ तो येतां देखिला तेणे पंथे ॥६९॥
ऐसे पापकारी बहुत ॥ सत्यशौचविवर्जित ॥ अधर्मकर्मी जाहले रत ॥ ते ते येती तेणे पंथे ॥७०॥
शायशी सहस्त्र योजन जाण ॥ ऐसे त्या मार्गाचे प्रमाण ॥ तेणे पंथे पातकीजन ॥ आणिती बांधोनि यमदूत ॥७१॥
यापरी तये स्थानी ॥ अनल्प म्यां देखिले नयनी ॥ होतसे अनिवार जाचणी ॥ नाही कोणी रक्षिता ॥७२॥
ऐसा तेथील वृत्तांत ॥ ऋषींप्रती सांगे नासिकेत ॥ पुढे ऐका सावधचित्त ॥ जे जे अद्भुत देखिले ॥७३॥
नेणोनियां प्राणिगण ॥ करिती दुष्टकर्माचरण ॥ दारुण भोगिती महा पतन ॥ तें म्यां आपण देखिले ॥७४॥
वैशंपायन ह्मणे नृपनाथा ॥ परमपावन हे धर्मकथा ॥ नासिकेत सांगे ऋषिसमस्तां ॥ अपूर्वता स्वर्गीची ॥७५॥
ह्मणे तुका सुंदरदास ॥ सज्जनी दीजे अवकाश ॥ पुढील कथा अति सुरस ॥ श्रोती सावकास परिसावी ॥७६॥
॥ इति श्रीनासिकेतोपाख्याने यमपुरीमार्गवर्णनं नाम सप्तोदशोऽध्यायः ॥१७॥ ओंव्या ॥७६॥ श्लोक ॥४॥