खंड ८ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिव सांगती कथा । अहं असुराची ती व्यथा । शुक्राचार्य गुरूसी जाहला सांगता । वृत्तान्त सारा तो असुर ॥१॥
स्वहितार्थ विचारित । स्वामी वरदान निष्फळ होत । अमोघ अस्त्रही न चालत । ऐसें कां होई तें सांगा ॥२॥
देवपक्षाचा संरक्षणकर्ता । मायामय धूम्रवर्ण होतां । माझें अस्त्र निष्फल तत्त्वतां । कैसें झालें हा संशय असे ॥३॥
शुक्र तेव्हां त्यास म्हणत । अहं असुरा तूं अज्ञानयुक्त । मूर्खभावें मायायुक्त । धूम्रवर्णासी मानिसी ॥४॥
तूं न जाणसी गजानन । तो मायायुक्त हा आभास जाण । वस्तुतः मायाविहीन । योगाकार गणेश ॥५॥
क्रुद्ध होतां तुज मारील । धूम्रवर्ण हा महाबळ । म्हणून गणेशासी शरण या वेळ । जावें दैत्यपा सत्वरी ॥६॥
जैसी धुरामध्यें व्याप्त । वस्तू न दिसे लोकांत । तैसीच वस्तु न होत ज्ञात । गणेशरूपी शिवादींस ॥७॥
वेदरूप वर्ण होत । धूम्रासम जगतांत । अज्ञानानें अव्यक्त वाटत । धूम्रवर्णंक हा सहज ॥८॥
स्वाधीन हा परमब्रह्म । दुर्घट नसे उल्लंघन यमनियम । वरदान दिलें स्वेच्छया मनोरम । निष्फळ तें तो करूं शके ॥९॥
तोचि हा धूम्रवर्णक । सहज तोषे पावक । अविनाशी ब्रह्मपावक । तेंच मस्तक गणेशाचें ॥१०॥
नागरूप जग समस्त । देह त्याचा जाण निश्चित । धूम्रवर्ण त्यायोगें होत । देहधारी निःसंशय ॥११॥
पंचचित्तमयी बुद्धि असत । दक्षिणांगी त्याच्या पुनीत । चित्तभ्रांतिकरी सिद्धि विराजत । वामांगी त्याच्या सर्वदा ॥१२॥
यांचा स्वामी गणेशान । मायाद्वयांनी क्रीडा करी प्रसन्न । त्यास बाळा शरण जाऊन । हित आपुलें सौख्य मिळवी ॥१३॥
स्वसंवेद्ययोगानें प्राप्त । होतें दर्शन त्याचें जगांत । योग्यांस हया गणनाथाचें सतत । स्वानंदपालक तो प्रभू ॥१४॥
तुज महाराजा यश न मिळेल । सुरअसुरमय ढुंढी सबळ । त्यास शरण जाई विमल । तरीच तुझें हित असे ॥१५॥
त्यानेंच देवांस स्वर्गांत । स्थापिलें मानवांसी भूतलांवरी सुस्थित । असुरांस ठेविलें विवरांत । त्रिविध कर्म धर्मसंयुत ॥१६॥
जेव्हां स्वधर्म त्यागित । सुरासुर होऊन लोभयुक्त । तेव्हां हा विघ्नराज प्रकटत । शासन करण्या तयांचें ॥१७॥
देवांनीं जाऊन पाताळांत । जेव्हां दैत्यांस जिंकिलें इतिहासांत । तेव्हां तुज निर्मूंन करित । विघ्न उपस्थित देवांपुढें ॥१८॥
आतां धर्मंलोपे तूं झालास । वर्णाश्रम पराङमुख या समयास । उत्सुक अत्यंत देवनाशास । खलोत्तमा अहं असुरा ॥१९॥
म्हणून तुज मारण्या गजानन । अवतरला धर्मसंस्थापक महान । जरी पाळिसी स्वधर्म एकमन । तरी तुज तो न मारील ॥२०॥
त्रिविध त्रिविध भावांत । जेव्हां होते धर्म संस्थित । तेव्हां हा बुद्धिनाथ स्थित । नित्य ऐसें जाणावें ॥२१॥
म्हणून त्या गणेशासी शरण । जावें दैत्यपा हें जाणून । ब्रह्माकार सर्वत्र महान । सुरासुरांचा प्रवर्तक ॥२२॥
श्रीशिव कथानक पुढें सागती । शुक्राचें वचन ऐके हर्षितमति । अहं असुर संशय पुढतीं । सांडून म्हणे शुक्रचार्या ॥२३॥
धम्रवर्णासी शरण जाईन । गुरो तुमची आजा पाळुन । स्रारासुरमयास त्यास प्रसन्न । परी संशय मनींचा दूर करी ॥२४॥
सिद्धिबुद्धिसम माया नसत । प्रकृतियुक्त नित्य खेळत । गणेश तो सर्वपूज्य सर्वादीत । ब्रह्मनायक सर्व संमत ॥२५॥
श्रीशब्दाने तो युक्त । कैसा तो मुख्य झाला जगांत । सिद्धिबुद्धींस सोडून स्वीकारित । श्री अथवा ॐ कारासी ॥२६॥
अन्य सर्व विप्रा होत । प्रकृतिसम श्रीनें युक्त । ऐसें शास्त्रांत वर्णित । हें काय आश्चर्य तें सांगा ॥२७॥
म्हणोनि श्रीसम देवी जगांत । अन्य कोणी नसे कोणी नसे निश्चित । ती सर्वत्र वेदांत । विलसते ओंकारात्मिका सदा ॥२८॥
अंह असुराचा प्रश्न ऐकत । शुक्र तेव्हां त्यास सांगत । गकार सिद्धिरूप असत । णकार बुद्धिवाचक असे ॥२९॥
त्यांचा स्वामी गणेशान । योगाकार तो महान मायायुत ब्रह्म असून । मायेहून तें भिन्न नसे ॥३०॥
माया तीच सदा ब्रह्म । ब्रह्म तें माया अनुपम । तैसी सिद्धि बुद्धि मनोरम । गणेशचि असे दैत्यनायक ॥३१॥
एकरूप तो असत । ह्यांत संदेह कांहीं नसत । म्हणून त्यास योग म्हणत । विचक्षणा विचार करी ॥३२॥
सिद्धिबुद्धि गणेशान । ऐसें हें त्रिविध ज्ञान । योगमय विलसे पावन । ऐसें रहस्य जाणावें ॥३३॥
म्हणून सिद्धिबुद्धींची उपासना । गणेशाहून भिन्न असेना । म्हणून त्रिविध नसे ती अभिन्न । त्रिविध पूजन गणेशपूजनें ॥३४॥
प्रकृति पुरुषाकार न दिसत । वामांग प्रकृतिकार वर्तत । दक्षिणांग पुरुष असत । त्यायोगें सिद्धिबुद्धियुक्त गणेश ॥३५॥
सर्वांच्या वामभागीं प्रकृति संस्थित । गणेशाच्या उभयांगीं विराजत । एकरूपधरा माया ख्यात । सिद्धिबुद्धियुक्त परा ॥३६॥
भिन्नभोगार्थ आनंदयुक्त । सृष्टिरचण्या ती वांछित । सिद्धिच्या अंगापासून जन्मत । सर्वशोभायुक्त श्री ॥३७॥
बुद्धीच्या अंगांतून उत्पन्न ।  ओंकार प्रकृति महान । त्यांनी आचरिलें घोर तप प्रसन्न । स्वस्वज्ञान प्राप्तीसाठीं ॥३८॥
जो कोणी प्रभू सर्वोत्तम जगांत । त्यास प्रणाम ते करित । स्वमूलक मंत्र जपत । तेव्हां पाहती स्वह्रदयीं तीं ॥३९॥
मायाप्रचालक ब्रह्म प्रसन्न । स्वरूपमय तें पाहून । गणेशाचा एकाक्षर मंत्र पाहून । तेजोरूप तैं सुखावलें ॥४०॥
ह्रदयांत आपुल्या तेजयुक्त । सुखप्रद तो मंत्र पाहत । त्याच मंत्रे तोषवित । गणेशासी आदिमाये तेव्हां ॥४१॥
दिव्य सहस्त्र वर्षें जातीं । तेव्हां प्रसन्न झाला गणपती । वर देव्या तयांप्रती । सिद्धि बुद्धिसह आला ॥४२॥
नरकुंजर रूप तें पाहत । तेव्हां ओंकारप्रकृति विरचित । विचार करिती स्वह्रदयांत । गणेशकृपेनें अद्‍भुत जाणलें ॥४३॥
उग्र तपानें झालें ज्ञात । रहस्य त्या उभयतांप्रत । सिद्धिबुद्धियुक्त पाहत । सत्वर उठुनी वंदिती तैं ॥४४॥
गणेशाचें स्तोत्र म्हणती । श्रीओंकार भक्तिभावें चित्तीं । नमस्कार गणनाथासी करिती । सर्वंसिद्धिप्रदा प्रेमें ॥४५॥
सिद्धिबुद्धिपतीसी । स्वानंदपतीसी कर्तृरूपीसी । अनाथांच्या सनाथासी । सर्वनाथासी नमन असो ॥४६॥
परेशासी परपालकासी । आत्म्यांच्या अमृता तासी । विघ्नेशासी लंबोदरासी । देवदेवेशरूपा नमन ॥४७॥
देवांसी वरदात्यासी । गजाननासी ज्येष्ठराजासी । सर्वांच्या आदिपूज्यासी । अनामया ढुंढीस नमन असो ॥४८॥
नित्यासी सर्वेशासी । ब्रह्मांसी ब्रह्मप्रदासी । ब्रह्मस्वरूपासी ब्रह्मणस्पतीसी । पूर्णयोगा तुज नमन असो ॥४९॥
योगशांतिमयासी । चिंतामणि-स्वरू पासी । अनंतासी आदिरूपासी । अंतःस्थासी नमन असो ॥५०॥
गणाधीशा योगशांतिधरा ।  किती स्तवन करूं उदारा । जेथ वेदादींसही आसरा । मौनाचा घ्यावा लागला ॥५१॥
मनोवाणीमय मनोवाणीवर्जित । ऐसा उभय विरुद्ध गुणान्वित । प्रसन्न होई नाथा त्वरित । सर्वंदा गणेशा आम्हांवरी ॥५२॥
ऐसें स्तवन करून । गणाधीशास करिती वंदन । श्री ओंकार वरती उठवून । विनम्र उभीं राहिलीं ॥५३॥
त्यास श्री गणेश म्हणत । वर मागा जो मनीं वांछित । देईन उपासनें संतुष्ट । या स्तोत्रानें विशेषें ॥५४॥
हें स्तोत्र सर्वसिद्धिप्रद । वाचका श्रोत्यास विशद । नित्य होय भुक्तिमुक्तिप्रद । ब्रह्मभूयकर सर्वदा ॥५५॥
ओंकार यशानें युक्त । मजला प्रिय हें असत । पूर्ण भक्तिवर्धक निश्चित । ऐसें माझें वरदान ॥५६॥
गणेशाचें ऐकून वचन । श्री ओंकार विनीत वचन । भक्तियुक्त महान । गणेशभक्तवत्सला विनविती ॥५७॥
देवा तुझी स्थिर भक्ती । योगशांतिप्रद दे चित्तीं । संकल्पसिद्धि सामर्थ्य जगतीं । पादपद्याचें तुझ्या दास्य ॥५८॥
जैशा सिद्धिबुद्धि संमानित । केल्यास प्रभो तूं सतत । तैसेंच प्रियत्व आम्हांप्रत । गणनायका नाथा देई ॥५९॥
जगद्‍ब्रह्म हें समस्त । करी आमुच्या बळें जो निर्मित । अन्यथा नष्ट पावो समस्त । शिवविष्णू देवांस मोह होवो ॥६०॥
तुझ्या भजनानेंद होवो नष्ट । मोह आमुच्या बळें जो निर्मित । अन्यथा नष्ट पावो समस्त । शिवविष्णु देवांस मोह होवो ॥६१॥
ते आमुच्यास्तव भ्रांत । सदा होवोत यत्नयुक्त । तेव्हां गणेश त्यास म्हणत । तुमचें इच्छित सफल होवो ॥६२॥
सुदुर्लभ वरही मी देत । तुम्हीं मोहबल हें जग समस्त । सिद्धिबुद्धिनीं विविध जगत । रचिलें ब्रह्म नानाविध ॥६३॥
तेथ मीं झालों बिंबित । मोहयुक्त तें बिंब असत । नाना भावपरायण वर्तत । भक्ति माझी मोहहीन करी ॥६४॥
तुम्हीं माझ्या बिंबांत । व्हाल सर्वदा सम्मीलित । त्यायोगें महामायांनो जगांत । बंध मोक्ढ तुम्हीं कराल ॥६५॥
सिद्धिबुद्धियुक्त मीं सनातन । ब्रह्मभूत सनातन । तेथ तुमची योग्यता न चालून । मोहही न प्रभावो ॥६६॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले तेथें गजानन । त्या दोन्ही माया करिती ध्यान । तेथेंचि राहून दैत्यपा ॥६७॥
तेव्हां त्यांच्या ह्रदयांत । गणेशाचें जें बिंब पडत । त्यानें युक्त त्या सृजित । चतुर्धा हें भेदपर ॥६८॥
ब्राह्म सौख्यकारक असत । माया चार जगतांप्रत । ब्रह्मांची दो रूपें विख्यात । श्री सर्वत्र या विधीं ॥६९॥
चार जगांची ब्रह्मांची । ज्ञानरूपिणी ती साची । ओंकारात्मक माया गणेशाची । सर्वत्र असे संस्थित ॥७०॥
त्यांचा युक्त गणेशान । क्रीडा विविध करी प्रसन्न । मोहयुक्त तैसा मोहविहीन । नाना भेद परायण ॥७१॥
म्हणून सर्व जीवांत । महासुरा मोहयुक्त । मोहहीन आत्मभावांत । श्री ओंकार आदि संमत ॥७२॥
आधीं प्रकृतीचा उच्चार । मग पुरुषाचा विचार । ऐसें करी विघ्नेश्वर । दैत्यनायका तुं जाणावें ॥७३॥
गणेशाच्या नांवाचें पठन । श्री शब्दयुक्त म्हणती जन । तो ओंकारयुक्त जाण । माया द्वयाच्या खेळानें ॥७४॥
वामांगी श्री असे धरिली । दक्षिणांगीं ओंकारा जागा दिली । बिंबरूपें हीं रूपें प्रकटलीं । ब्रह्मरूपी सर्वत्र ॥७५॥
बिंब सर्वत्र भावांत । तदाकार तें होत । म्हणून शिवादी सर्व होत । ओंकार संयुत सर्वदा ॥७६॥
जीव श्री ओंकारसंयुक्त । वेदवादी ऐसें सांगत । आदिमाये ऐसे ख्यात । बिंबाधारें विचार करी ॥७७॥
म्हणून श्रीओंकार मोह सोडून । विघ्नेश्वराचें करी भजन । सिद्धिबुद्धियुक्त पूजून । नाना सौख्य पावशील ॥७८॥
ऐसें हें धूम्रवर्णांचें चेष्टित । सांगितलें त्यास शरण सांप्रत । दैत्य शांतिदास जाई त्वरित । भुक्तिमुक्तिप्रदा भक्तीनें ॥७९॥
भिन्नभावकर मायाद्वय वर्तत । श्रीओंकार नामें ख्यात । ब्रह्मभूयमयी ज्ञात । सिद्धिबुद्धि विचक्षणा ॥८०॥
ऐसें हें सर्व रहस्य कथिलें । सर्वसंमत तुज भलें । वेदगुहय जरी तुज पटलें । तरी अहं असुरा त्वरित जाई ॥८१॥
सर्वंसिद्धिप्राप्तीस्तव । शरण जाई त्यासी अपूर्व । लीन भाव ठेवूनी देव । प्रसन्न करून तूं घेईस ॥८२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते अहंकारासुरज्ञानोपदेशो नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP