मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती धौम्य चरित । दधीचीपासून मंत्र घेत । गजाननास ह्रदयांत ध्यात । मंत्रजप करी शमदमपर ॥१॥
क्रमानें योगभूमिस्थ । मलमास लागतां । मलमासव्रत । केलें त्यानें अज्ञाननाशक पुनीत । उषःस्नान करीतसे ॥२॥
विधानपूर्वक गाणेशपंचक पूजित । सदा गणपतीस स्मरत । धौम्य तो शुद्धचित्त । अमावास्येस साक्षात्कार झाला ॥३॥
गणराजास पुढयांत पाहत । मुनीश्वर तो तैं हर्षित । उठोनिया प्रणाम करित । पूजलें त्यानें भक्तिभावें ॥४॥
पुनः प्रणाम करून । स्तुति करीतसे हात जोडून । गणेशासी करीतसे नमन । सर्वसिद्धिप्रदायक ॥५॥
भक्तांसी भवसागरांत । रक्षिसी तूं भावयुक्त । अन्य जे असती विपरीत । त्यांना शासन तूं करिसी ॥६॥
धन्य मी पाहिला तुज गजानना । किती स्तवूं मीं तुज पावना । महाभागा योगेशा माझ्या मना । अत्यानंद जाहलासे ॥७॥
तुझ्या दर्शनमात्रें ज्ञानयुक्त । रचिलें स्तोत्र मी विनीत । सर्वज्ञश्रेष्ठा गणेशा तुजप्रत । नमन करितों मी श्रद्धेनें ॥८॥
योगशांतिदायकासी । शांतिरूपा हेरंबासी । अनामयासी ज्येष्ठासी ज्येष्ठपदप्रदात्यासी नमो नमः ॥९॥
ज्येष्ठांच्या ज्येष्ठरूपासी । शक्तिरूपें नामरूपात्मकासी । त्यांत आत्म्यांत रविरूपासी । समांत विष्णुरूपा नमन ॥१०॥
अव्यक्तांत महेशासी । नमन संयोगांत निजात्म्यासी । निवृत्तींत अयोगासी । कलांशानें तूंच राहसी ॥११॥
योगांत शांतिरूपासी । ब्रह्नणस्पते वंदन तुजसी । आदिमध्यान्तभेदें क्रीडापरासी । सिद्धिबुद्धिपते तुज नमन ॥१२॥
नानामायाप्रचालकासी । स्वानंदवासीसी भक्तरक्षण तत्परासी । कैसें स्तवूं मी तुजसी । वेद योगिजन जेथ शमले ॥१३॥
तेथ त्यांनींही धरिलें मौन । मी तर असें अजाण । म्हणोनि नाथा करितों वंदन । गजानना भावभक्तीनें ॥१४॥
ऐसें बोलून गणाधीशास । घाली तो साष्टांग नमस्कारास । त्याचे पाय पकडुनि सोल्हास । जयजयकार करीतसे ॥१५॥
त्यास वरती उठवून । ब्रह्मपती बोले गजानन । वर माग धौम्या मीं प्रसन्न । स्तोत्रें तुझ्या हया तोषलों ॥१६॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । त्यास सर्वसिद्धि लाभतील । नानापरीच्या या जगतीं ॥१७॥
हें स्तोत्र भक्तिविवर्धक । योगशांतिप्रदायक । जें जें वांछील तें तें दायक । ऐसा वर असे माझा ॥१८॥
गणेशाचें ऐकून वचन । धौम्य म्हणे हर्षयुक्त मन । भक्तेशा गणाधीशा विनीतमन । भक्तवत्सला त्या वेळीं ॥१९॥
प्रसन्न जरी तूं नाथा अससी । तरी उत्तम भक्ति दे मजसी । तैसीच योगशांति ज्यांत रमसी । सदासर्वदा तूं देवा ॥२०॥
गणनाथ तथास्तु म्हणती । नंतर अंतर्धान पावती । गणेशास ध्यात । चित्तीं धौम्य सदा करी पूजन ॥२१॥
तेथ ब्राह्मण बोलावून । मंत्रोच्चार करवून । स्थापिती गणेशमूर्ति मनमोहन । पूजी तीस निरंतर ॥२२॥
अकर्मकारी ते सात्त्विक । कर्मकर्ते जाणा राजस लोक । विरुद्ध कर्मकतें तामस निःशंक । ऐसें शास्त्रसंमत असे ॥२३॥
शौनक म्हणें सूताप्रत । ऐसें तीन भेदयूक्त । असती मानव समस्त । शास्त्रांत असें वर्णन असे ॥२४॥
ब्रह्मार्पण कर्म करिती । ते सात्त्विक जन मुक्त होती । सकास कर्में जे आचरती । ते फिरती राजस जन्ममृत्यूंत ॥२५॥
तामस नरकांत जाती । शिश्नोदरपरायण जे राहती । ऐशा त्रिगुणभावांत जाती । त्रिधा गतींनी त्रिविधजन ॥२६॥
तेथ तामस भावपर । ते ख्यात असे शंकर । त्यास भजती पुरुषार्थपर । महाभाग जगांत या ॥२७॥
परी तामस ते नरकांत जाती । ऐसी शास्त्राची उक्ती । तरी शिवभक्त सर्व ब्रह्मभूत होती । हें कैसें संभवावें ॥२८॥
सूत म्हणती उत्तम प्रश्न । सर्वांच्या उपकारक महान । जैसें सर्वज्ञा व्यास मुखांतून वचन । ऐकिलें तैसें सांगतों ॥२९॥
तम म्हणजे अज्ञान । गाढ झोपेंत । असतें का ज्ञान । हया अज्ञानापासून । द्विविध सर्व उत्पन्न होतें ॥३०॥
सात्विक तें आंतर स्वप्न । जागृत बाहय राजस मोहन । त्यांचें मूल स्वरूप म्हणून । शंकरास तामस म्हणती ॥३१॥
क्षणोक्षणी रजःसंस्थ । अवस्था विविधात्मिका असत । सात्त्विक निर्मितो पालक ख्यात । तामस त्यात लीन करी ॥३२॥
म्हणोनि शौनका हें जगत । जाहलें तीन गुणांनीं व्याप्त । गर्भाधानापासून शोभत । मरणापर्यंत हें सारे ॥३३॥
कर्म अकर्मं विकर्म । त्रिगुणसंयुक्त हें मनोरम । कर्मयोगाचे हे गुण परम । कथिले तुजला विप्रेशा ॥३४॥
शंभु मुख्य सुरन जाणावे । शंकरभक्त पावती शंभूप्रत सारे । आतां ऐक मलमास माहात्म्य बरवें । वैश्य होता शम नावाचा ॥३५॥
मालव देशाचा तो निवासी । मलमात माहात्म्य ऐकून तयासी । गणेशभक्ति चित्तासी । उपजून करी हें उत्तम व्रत ॥३६॥
मलमास लागतां उषःकालीं स्नान । करून स्मरे गजानन । त्या स्मरणानंतर कार्यपर होऊन । मनन करी गणाधिपाचें ॥३७॥
एके दिवशी रात्रीं मार्गांत । वैश्यास त्या निद्रा लागत । तेव्हां त्यास भक्षिण्या येत । दहा भ‍तें महाबळी ॥३८॥
त्याच वेळीं जाग येत । शम त्या दहा भूतांस पाहत । गणनायकास मनांत । स्मरण करी आपुल्या तैं ॥३९॥
म्हणे स्वातंरी देवा गणेशा । करुणानिधे परेशा । रक्षण करी आतां भक्तेशा । हया प्रेतात्म्यांच्या हातून ॥४०॥
मलमासाचे सप्त दिवस उरले । जरी आत्तांच मरण आलें । तरी व्रत भग्न होऊन जे केले । ते प्रयत्न व्यर्थ होतील ॥४१॥
मलमास होता समाप्त । मारवी मजला तूं जरी तें इष्ट । मीं असे सांप्रत व्रतसंस्थ । रक्षण करी दयानिघे ॥४२॥
मलमास व्रत तो आचरित । हें त्या भूतांस समजत । तैं तीं सर्व भयाकुल होत । पूर्वजन्म स्मरण झालें ॥४३॥
तीं रडूं लागलीं विनीत । होऊन त्या वैश्यास नमित । तें पाहून होत विस्मित । विचारी तो त्या महाबळांसी ॥४४॥
कां ऐसें दुःख करतां । मज सांगा तुमचीं कथा । प्रेतें म्हणती पूर्वजन्म आतां । सांगतों तुज आमुचा ॥४५॥
त्या जन्मीं होतों ब्राह्मण । परी अनाचारपरायण । म्हणून मृत्यूनंतर दारूण । यमयातना भोगिल्या ॥४६॥
त्या परम दारूण यातना । यमगृहीं भोगून नाना । भूतयोनींत जन्मून जनां । पीडा देऊं लागलों ॥४७॥
येथ शीतोष्णादि द्वंद्वांत । पडलोम आम्हीं दुःखयुक्त । दैवयोगें भक्षिण्या तुज सांप्रत । आलों येथें गणेशभक्त ॥४८॥
तुझ्या दर्शनें स्मरण होऊन । पूर्वजन्माचें आतांपासून । मलमासव्रत पावन । आतां करी आम्हांसी ॥४९॥
गणेशस्मृतिसंयुक्त । स्नान करिसी तूं सतत । एक स्नानाचें पुण्य आम्हांप्रत । देई वैश्या दयाळा ॥५०॥
त्यायोगें निष्पाप होऊं । पुनर्जन्मातीत जाऊं । प्रेतात्म्याचें वचन ऐकून स्वभावू । प्रसन्न त्याचा जाहला ॥५१॥
तो शमवैश्य म्हणे हर्षयुक्त । दुःखयुक्त पाहून प्रेतचित्त । मलमासव्रत मीं काय करीत । नित्य स्नान मात्र केलें मी ॥५२॥
पहाटें उठून गणेशस्मरण । पूर्वक केलें मी स्नान । त्याचा महिमा अवर्णनीय म्हणून । पुराणें सप्त वर्णिती ॥५३॥
एकदां केलें नामस्मरण । त्याचें पुण्य देतों तुम्हांस पावन । त्यानेंच बंधहींन होऊन । मग करा गणेशभक्ति ॥५४॥
ऐसें बोलून त्यांस देत । एक स्नानाचें फळ त्या प्रेतांप्रत । मलमासांत गणेश स्मूतियुक्त । स्नानाचें एवढें फळ थोर ॥५५॥
नंतर गाणेशदूत येत । त्या भूतांसी घेऊन जात । स्वानंदपुरीं नें प्रेतांस त्वरित । गणेशभक्तीत ती रमलीं ॥५६॥
तेथ लंबोदरास पाहत । तेव्हां तीं होत ब्रह्मभूत । ऐसें महा आश्चर्य घडत । शौनका मलमास व्रताचें ॥५७॥
ऐसे नानाजन सिद्धि पावले । विशेषें अधिक मासी भले । ढौंढमासाचें महत्त्व आगळें । वर्णन करण्यासी असमर्थ ॥५८॥
परी संक्षेपें तुज कथिलें । श्रवणमात्रें जें सर्वदायक झालें । पाठकावाचका पाहिजे लाभलें । वांछित सारें हयायोगें ॥५९॥
इहलौकिक फळ भोगित । अंती पावे ब्रह्मरूप उदात्त । स्वानंदलाभ तया होत । मलमास व्रताचा हा प्रभाव ॥६०॥
ओमितित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मलमासमाहात्म्यवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP