खंड ८ - अध्याय ३७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे चातुर्मासव्रत । गणेशाचें सांग आम्हांप्रत । सर्वदायक जें असत । सूता कथाश्रवणें न तृप्ती ॥१॥
सूत म्हणे पुरातन । सांगतों इतिहास पावन । श्रवणें सर्वार्थ लाभून । पुण्यसंचय होईल ॥२॥
बृहदश्व नामा ब्राह्मण ख्यात । होता महातेजस्वी तपोयुक्त । शाप देण्यास समर्थ । नाना तपप्रभावें तो ॥३॥
त्यास अंतज्ञनि शक्ति होती । शमदमाची ह्र्दयीं वसती । मीच ब्रह्म हया रीती । जाणीव होती त्याच्या मनीं ॥४॥
अंतीं शून्यमयांत । शांतियुक्त तो ब्रह्मवेत्ता संस्थित । त्याच्या आश्रमांत येत । एकदा महायोगी विभांड ॥५॥
त्यास प्रणाम करून । पूजितसे महाभागास हर्षयुक्तमन । विसावता त्यास म्हणे विनीतवचन बृहदश्व ब्राह्मण तैं ॥६॥
निरालंबमय ब्रह्म असत । सदा एकरूपधर ख्यात । धातृध्यानविहीन वर्तत । तें तत्त्व यांत न संशय ॥७॥
महाभाग्यें तुझें दर्शन । योगीश्वरा साक्षात पावन । जाहलों त्यायोगें कृतकृत्य होऊन । धन्य धन्य मीं निश्चये ॥८॥
ऐसें त्याचें ऐकून वचन । विभांड म्हणे तयालागुन । योगयुक्ताचें नैपुण्य । जाणून तो शांतिदाता ॥९॥
विभांड म्हणे मी गणेशरूप असतां । एकत्वाची न बिघडे वार्ता । निरालंबभव सौख्य तत्त्वतां । मुने कोठें वसतसे ? ॥१०॥
त्याचें तें ऐकून वचन । बृहदश्व म्हणे विस्मितमन । सुशांतिदा तरी मन । त्यास्तव लालसी कां सर्वदा ॥११॥
पूर्णशांतिप्रद मजसी । सांगा करुणानिधे तत्त्वासी । सोऽहंकाराहून परतरभावासी । न जाणतों मी कदाचन ॥१२॥
विभांड सांगे तयाप्रत । मी पूर्वीं होतों तप आचरित । तेथ इंद्रदेव पाठवित । तापोभंगार्थ सुंदर ललना ॥१३॥
नृत्यगानादि करून । मोहविण्या मज करिती गान । परी मीं दैर्यं धरून । तैसाचि बसलों व्रतस्थ ॥१४॥
तथापि त्या अप्सरा कामयुक्त । हावभाव करिती अनुरक्त । नेत्रकटाक्षें मज ताडित । तेव्हां विव्हल झालों मीं ॥१५॥
माझें वीर्य भूवरी पडलें । तुणावरी तें रुजलें । माझें मन खिन्न झालें । आश्रम आपुला सोडून गेलों ॥१६॥
तदनंतर अप्सरा समस्त । स्वर्गांत परतून जात । मी जाजलिक नाम दिप्राप्रत । जाऊन नमिलें तयांसी ॥१७॥
त्यानें माझा सन्मान करून । दिला आश्रय प्रसन्न । तेथ तपश्चर्येंत निमग्न । जाहलों मीं गणनाथाच्या ॥१८॥
त्या जाजलीस मी विचारित । आपण परमार्थवेत्ते ख्यात । अन्य देवेंद्रांस सोडून सतत । गणेशास कां पूजितां ? ॥१९॥
ऐसा प्रश्न माझा ऐकत । तेव्हां जाजालि मज म्हणत । होऊन अत्यंत दयायुक्त सांगतों सारें ऐक आतां ॥२०॥
गणेशाहून परम ब्रह्म । अन्य न वेदांत मनोरम । ब्रह्मणस्पति ऐसें तयास नाम । वेदवेत्ते देतात ॥२१॥
पूर्वी मीं तपोनिष्ठ । आचरित होतों तप सतत । त्या तपप्रभावें व्याप्त । जाहलें सर्व चराचर ॥२२॥
तैं एकदां अकस्मात । महामुनि लोमश येत । माझ्या आश्रमीं त्या वंदित । पूजिलें मी भक्तीनें ॥२३॥
तदनंतर ते लोमश मुनि । दयायुक्त होऊन मनीं । महायोगींद्रा वंदित तत्क्षणीं । विचारिती मजलागीं ॥२४॥
हया एवढया उग्र तपानें ईप्सित । कोणतें करूं पाहसी प्राप्त । योग साधिता तत्त्वज्ञ साक्षात । तूंच ब्रह्म होशील ॥२५॥
तपानें सर्व भोग लाभती । परी पुनः पतनाची राहते भीती । ऐसें वचन ऐकून प्रणती । करून पुनः मी विचारिलें ॥२६॥
योगद मार्ग कोणता असत । तो सांगावा कृपया मजप्रत । जैसें सांगाल त्यायोगें त्वरित । आचरीन मीं तो विधानोक्त ॥२७॥
मी तुमचा शिष्य विनत । सांगा उपाय योगमार्गांत । तेव्हां लोमश मज सांगत । आपुली पूर्व जीवनकथा ॥२८॥
पूर्वी मीं कर्मयोगें आचरित । मूक परी तप भावयुक्त । प्रणाम करून विचारित । ब्रह्मयासी सर्वद उपाय ॥२९॥
तेव्हां त्यानें सांगितलें । सुशांतिप्रद सार भलें । गाणेश सर्वमान्य ऐकिलें । पुराण तेव्हां मीं पुनीत ॥३०॥
तें गणेशाचें पुराण । करितां भक्तिभावें श्रवण । त्याच्या माहात्म्यें वाणी लाभून । हर्षभरित जाहलों ॥३१॥
लोमशास वंदन करून । आश्रमांत माझ्या परतून । गणेशगीता ज्ञान । समाराधून योगिवंद्य झालों ॥३२॥
तदनंतर गणेश्वर आश्रमांत । विधानपूर्वक स्थापिला पुनीता पूजाध्यानपर त्यास तोषवित । एकाक्षर मंत्र जप जपून ॥३३॥
ऐसा शंभर वर्षें जप करित । तैं विघ्नेश्वर होत । गणनायक वरद प्रकटत । वर देण्यासी मजलागी ॥३४॥
त्याचें होतां दर्शन । साष्टांग करी तया नमन । नानाविध स्तोत्रें स्तवून । तोषविलें गजाननासी ॥३५॥
श्रीगणेश तैं मज म्हणत । वर माग महाभागा ईप्सित । लोमशा तो देईन त्वरित । तुझ्या भक्तीनें संतुष्ट मीं ॥३६॥
लोमश म्हणे मज जरी जगांत । गाणपत्य एकनिष्ठ भक्तिपर सतत । अन्य कांहीं मी न याचित । मायाभ्रमात्म सर्व मिथ्या ॥३७॥
आयुष्य विपुल मीं मागत । त्यायोगें भजेन गणेशा तुज अविरत । तेव्हां गणेश मज म्हणत । भक्तवत्सल आनंदें ॥३८॥
गाणपत्यप्रिय अत्यंत । होशील तूं लोमशा सतत । कल्पाकल्पांत रोम लय पावत । एकेक तुझ्या या क्रमें ॥३९॥
असंख्य कल्पें तुझें जीवन । तदनंतर देह त्यागून । माझ्या लोकांत येऊन । मज भजशील प्रेमभरें ॥४०॥
जें जें योगीशा इच्छिसी । तें तें लाभें ल तुजसी । स्मरण करतांच कार्यासी । सकल प्रकटून करीन मी ॥४१॥
ऐसें बोलून । अंतर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । मीं त्याच्या विरहें खिन्न । नित्यपूजा परायण झालों ॥४२॥
ऐसा बहुत काळ जात । मन्वंतरही पालटत । दुसरा इन्द्र उत्पन्न होत । त्रैलोक्यावरी राज्यकर्ता ॥४३॥
विश्वकर्म्यासी बोलावून । मघवा तो बोले वचन । गृह करी शोभायुक्त निर्माण । नाना आश्चर्यकारक ॥४४॥
उपवन वाटिकादि भोगार्थ । रचल्या विश्वकर्म्यानें त्वरित । तेव्हां तो तैसे करित । दुःखयुक्त मनानें ॥४५॥
तथापि इंद्र शांत । न होत । म्हणे हा महाल आश्चर्ययुक्त । असे परी विश्वकर्म्यां सांप्रत । याहून अद्भुतत यांत हवी ॥४६॥
विश्वकर्मा होऊन खिन्न । मनांत स्मरे गजानन । इंद्रास सोडून गृहनिर्माण । अन्य देवांस्तव कधीं करावें ॥४७॥
ऐसी चिन्ता त्यास छळित । म्हणे हे इंद्रभवनकार्य समाप्त । केव्हां होणार न समजत । अन्य देवांचीं सदनें राहिलीं ॥४८॥
तदनंतर मी दैवयोगें इंद्राप्रत । एके दिनी अवचित जात । मज पुजून हर्षयुक्त । म्हणे इंद्र त्या समयीं ॥४९॥
धन्य माझें कार्यं धन्य जीवन । लोमशमुने तुमचे चरण । पाहतां वाटे धन्य पावन । आता एक प्रश्न असे ॥५०॥
आपण मस्तकीं धारण । कां केलें हें पलाशपत्र सान । लोमेश म्हणे ही खूण । नश्वररूप देहाची या ॥५१॥
हा देह कधीं पडेल । याचा भरवसा कोण देईल । म्हणोनि गृहरचनेचे श्रम अमोल । कोण घेतो सुज जगीं ॥५२॥
पाऊस उन्हा थंडी यांपासून । व्हावें संरक्षण म्हणूण । मी धरिलें हें पलाशाचें पान । हेंच माझें घर पुरंदरा ॥५३॥
ऐसें ऐकून माझें वचन । पुरंदर म्हणे मजला नमून । आपल्या शरीरावरला लोम पतन । न होईल कल्पान्तापर्यंत ॥५४॥
तेव्हां आज्ञा करावी मजप्रत । उत्तम सदन बांधवितों त्वरित । तेथ नित्य सुखांत । विप्रेशा आपण रहावें ॥५५॥
तुमचा एक केस देहावरचा पडत । तोवरी चवदा इंद्रा होऊन जात । ऐसें असतां स्वदेहाप्रत । नश्वर ऐसें का म्हणता ॥५६॥
तो ऐकून इंद्राचा प्रश्न । मी म्हणालों आनंदून । इंद्रा काय हें बोलतोस वचन । भ्रांतिप्रद योगनाशक ॥५७॥
देह हा नश्वर पाहून । कोण पंडित त्यास्तव करी प्रयत्न । योगामृतें होऊन । मीं फिरतों यदृच्छेनें ॥५८॥
सुद्युम्न संज्ञ जरातीत । इंद्रा मुंगीचा जन्म होय प्राप्त । पूर्व संस्कार योगें तुजप्रत । लाभलें हें इंद्रपद ॥५९॥
शंभर अश्वमेध यज्ञ केलेस । त्यांचें हें यज्ञफल लाभलास । परी पुनरपि तें सरता गतीस । कोणत्या तूं पावशील ? ॥६०॥
ऐसें बोलून मी देत । जातिस्मरण इंद्राप्रत । मधवा तें सर्व पाहून भयभीत । मज प्रणाम करिता झाला ॥६१॥
म्हणे जन्म मृत्यु हरण होत । ऐसा योग सांगा मजप्रत । ज्या योगें कामादिक नाश पावत । तत्क्षणीं ऐसा योग सांगा ॥६२॥
मीं लोमश तेव्हां त्यास सांगत । गणेशास भज तूं भावयुक्त । त्यायोगें योग तुज प्राप्त । होईल इंद्रा निःसंशय ॥६३॥
ब्राह्मंचा ब्रह्मरूप शांतिपरायन । सदा असे हा देव महान । इंद्र म्हणे हा नामरूपधर कोण । देव गणेश्वर सांगसी ? ॥६४॥
त्याचें योगरूप महान । मज सांगावें आपण पावन । तेव्हां मीं म्हणे इंद्रा प्रसन्न । जाहलों तुझ्य प्रश्नानें ॥६५॥
सांगतो याचें योगरूप । असे हा देव अत्यार्थें अरूप । परी घेत योगप्राप्यर्थ ल्वरूप । आदरें हा नामरूपधारी ॥६६॥
भक्तांच्या हितास्तव होत । क्रीडोत्युक हा देव नामरूपयुक्त । संप्रज्ञानमनय ख्यात । देह याचा जाण इंद्रा ॥६७॥
असंप्रज्ञातरूप गजवाचक । मस्तक त्याचें पावक । त्यांच्या संयोगें आश्चर्यकारक । गजानन रूप होत याचें ॥६८॥
भ्रांतिकरी सिद्दि असत । भ्रांतिधरा बुद्धि ज्ञात । त्यांच्या योगें ब्रह्मेश खेळत । जगांत तैसें ब्रह्मांत ॥६९॥
स्वसंवेद्य योगें दर्शन । त्याचें होतें भक्तांस पावन । त्यायोगें हा स्वानंदस्वामी म्हणून । शास्त्रवेत्ते वर्णिती ॥७०॥
गण समूहरूप वर्तत । बाह्मांतरादि योगें ख्यात । त्यांचा स्वामी हा विख्यात । गणेश्वर या विश्वांत ॥७१॥
ऐसें सांगून मी लोमश देत । गणेश षडक्षर मंत्र इंद्राप्रत । इंद्र तो विधियुक्त स्वीकारित । विनययुक्त मज नमून ॥७२॥
म्हणे श्रीगणेशाचें दर्शन । शीघ्र व्हावें मजला महान । यास्तव उपाय मन लावून । सांगावा आपण लोमशमुनें ॥७३॥
मी तेव्हां त्यास सांगत । दक्षिणायनरूप देवी रात्रि असत । त्या देवरात्रीं बारांसी नसत । कर्माधिकार भूलोकीं ॥७४॥
तै जाणून दुःखयुक्त । ती रात्र ब्रह्मदेवांस प्रार्थित । सत्कर्मयुक्त मज करावें जगांत । पितामहा नाथा यापुढें ॥७५॥
तेव्हां ब्रह्मा तिजला देत । षोडशाक्षर मंत्र पुनीत । तो स्वीकारून ती जात । उत्तम एका वनांत ॥७६॥
ध्याऊन चित्तीं गजानन । ती तप करी अति दारूण । आषाढ पौर्णिमेस एकनिष्ठ मन । तिनें तप आरंभिलें ॥७७॥
कार्तिक पूर्णिमेस प्रसन्न । जाहला तिजवरी गजानन । वर देण्या रात्रीं त्या गमन । भक्तिबद्ध तो करता झाला ॥७८॥
गणाध्यक्षास पाहत । तेव्हां ती देवरात्री वंदन करित । विविध स्तोत्रें त्यास स्तवित । भक्तिनम्र होऊनियां ॥७९॥
तेव्हां होऊन तिजवरी प्रसन्न । म्हणे तिजला गजानन । वर माग हृदयवांच्छित करीन । सफल तो देवरात्रि सत्वरी ॥८०॥
म्हणे तुझ्या चरणीं । अनन्यभक्ति देई झणीं । सत्कर्मयुक्त मज करोनी । सफल करी जीवन माझें ॥८१॥
तिची प्रार्थना ऐकून । म्हणे हर्षभरित गजानन । माझ्या चरणीं भक्ति महान । दृध तुझी होईल ॥८२॥
आषाढ पूर्णिमेपासून । कार्तिकि पूर्णिमेपर्यंत पावन । चार्तुमास्य व्रत होईल महान । धर्मनिष्ठ लोकांस हें ॥८३॥
हे दक्षिणायनतर रात्रि तुझ्यांत । हें चार्तुमास्य व्रत । सर्वसिद्धिप्रद निश्चित । होईल ऐसा वर देतों ॥८४॥
तुझ्या सहा महिन्यांस । सत्कर्मयुक्त तूं जगांत । होशील देवप्रिय अत्यंत । सत्कर्माच्या प्रभावानें ॥८५॥
विवाहादिक तुझ्या काळांत । होतील कार्यें विहित । अन्य नानाविध कर्में जगांत । देवतोषकर घडोत ॥८६॥
चातुर्मास्यव्रतें जे मज भजत । ते नर संपूर्णं वर्षव्रत फल लाभत । ऐसें बोलून अंतर्धान पावत । भक्तवत्सल श्रीगणेश ॥८७॥
देवरात्रि त्यास नमून । हर्षयुक्त मनीं होऊन । लाधली सारीं वांच्छित म्हणून । देवराजेंद्रा तूही करावें ॥८८॥
हें चातुर्मास्यव्रत अद्भुत । तेणें होशील योगयुक्त । ऐसें सांगून मीं परतत । इंद्राचा निरोप घेऊन ॥८९॥
स्वाश्रमीं येऊन । गणेशासी पूजितसें एकमान । इंद्रें विश्वकर्म्यास बोलावून । आज्ञा केली तयाला ॥९०॥
महाभागा तूं स्वगृहासी । जाई परतून याक्षणीं जैसें इच्छिसी । विश्वकर्मा मानून त्या आज्ञेसी । त्वरित परतला स्वकीयगृहा ॥९१॥
गणनाथास तो भजत । मनीं होऊन विस्मित । तिकडे इंद्र राज्यभार । सोंपवित । अन्य देवश्रेष्ठांवरी ॥९२॥
तदनंतर जात वनांत । गणेशास ह्रदयीं ध्यात । मंत्रोत्तम सदा जपत । चातुर्मास्यव्रत करी ॥९३॥
गणेशपंचकांत रत । त्या व्रतप्रभावें योगयुक्त । चित्तमोह त्या त्यागून होत । चिंतामणीशीं तन्मय ॥९४॥
तदनंतार स्वगृहीं परतत । आपुलें राज्य उत्तम करित । निःस्पृह सर्व भोगांत । सदा विघ्नेशतत्पर ॥९५॥
राज्यांत राहून परमार्थांत । महेंद्र तो मग्न असत । नित्यव्रत भक्तियुक्त । चातुर्मास्यभव करीतसे ॥९६॥
मन्वतरान्तपर्यंत । आपुलें राज्य तो भोगित । निष्कटक जें वर्तत । अंतीं स्वानंदलोकीं गेला ॥९७॥
त्यानंतर झाला ब्रह्मभूत । जाजलि ऐकून हें वृत्त । म्हणे देव कर्मफळ भोगित । नंतर पडती भूमीवरी ॥९८॥
स्वर्गांत जे कर्म करिती । तें फळहीन होतें निश्चिती । ऐसें मत पंडित सांगती । इंद्रास कैसें फळ मिळालें ॥९९॥
चातुर्मास्य व्रत स्वर्गात केलें । त्यास त्याचें फळ लाभलें । गणेशाप्रत । गमन झालें । ब्रह्मभूतत्व लाभला तो ॥१००॥
लोमश तयास उत्तर देत । जाजले तुझा प्रश्न सर्वसंमत । स्वर्गभूमींत जें कर्म घडत । तें निष्फल होय सदा ॥१०१॥
पृथ्वीवरी भरतखंडांत । येऊन देव जे कर्में करित । ते सत्फलदायी होतात । यांत संशय कांहीं नसे ॥१०२॥
कर्मभूमींत जें कर्म करिती । देव वा दानव दृढमती । प्राणिमात्र विविध निश्चिती । सफळ सारें तें सर्वदा ॥१०३॥
म्हणून मुख्यतम व्रत । विघ्नेश तत्पर तूं त्वरित । चातुर्मास्यभव पुनीत । करावें गाणेशपंचकनिष्ठ ॥१०४॥
गणेश कृमेनें सर्व जाणशील । मनांत संशय नुरेला । अंतीं तल्लीनता लाभेल । विप्रा जाजले तुजलागीं ॥१०५॥
जाजलि लोमश गुरूस नमित । नंतर स्वाश्रम सोडून जात । गणेशस्थानाप्रत । तेथ नमून व्रत करी ॥१०६॥
चातुर्मास्यीं शास्त्रसंमत । दूध पिऊन व्रत करित । तें समाप्त होतां लाभत । कृपा गजाननाची तो ॥१०७॥
प्रसन्न होऊन गणनायक प्रकटत । जाजलीस वर देण्या मुदित । त्यास पाहून वंदन करित । जाजलि स्तवी कर जोडोनी ॥१०८॥
ब्रह्मनाथासी गणेशासी । बल्लाळासी वरदात्यासी । विघ्येशासी महाविघ्ननाशकासी । परमात्म्या तुज नमन असो ॥१०९॥
भक्तांचीं विघ्नें हरणकर्त्यासी । भक्तांसी अभयदात्यासी । अभक्तांसी विघ्नकर्यासी । परात्परतरा तुज नमन ॥११०॥
सगुणासी चतुर्भुजासी । निर्गुणासी हेरंबासी । वक्रतुंडासी देवासी । एकदंतासी नमन असो ॥१११॥
महोदरासी लंबोदरासी । सर्वांच्या मातापित्यासी । स्वानंदवासीसी स्वानंदभोक्त्यासी । मायिका तुज नमन असो ॥११२॥
नाना मायाप्रचालकासी । सिद्धिबुद्धिपते तुजसी । सिद्धि बुद्धिमयासी । अमेय शक्तीसी नमन असो ॥११३॥
शक्तिहीनासी देवासी । दानवासी सर्वांकारासी । देवदानवमर्दकासी । सर्व हीना तुज नमन असो ॥११४॥
योगांत योगनाथासी । शांतीस शांतिरूपासी । ब्रह्मपते नमितों तुजसी । चिंतामणे तुज नमो नमः॥११५॥
गनाध्यक्षा कैसे करूं स्तवन । वेदादीही जेथ धरिती मौन । धन्य मी झालें तुझें दर्शन । योगरूपानें अगम्य आतां ॥११६॥
ऐसें बोलून नमित । भक्तिभावें तयाप्रत । त्यास उठवून म्हणत । भक्त वत्सस्ल गणेशान ॥११७॥
वर माग महाभागा इच्छित । देईन मी तपें तुष्ट । भक्तिभावें तूं केलेंस व्रत । त्वरित सांग काय इष्ट करूं ॥११८॥
जाजलि म्हणे तुझी स्थिर भक्ति । देई देवा गणपती । गाणपत्यपदाची प्राप्ती । योगशांतिकर मज लाभावी ॥११९॥
अन्य कांहीं मीं न याचित । गजानना एवढें मनोवांछित । तथाऽस्तु म्हणून होत । अंतर्धांन गणाधीश ॥१२०॥
जाजलि त्यास प्रणास करित । मानसीं जाहला हर्षभरित । ऐसें हें चातुर्मास्य व्रत । माहात्म्य त्याचें अकल्पित ॥१२१॥
विभांडा हें तुज सांगितलें । ज्यानें योगिवंद्यत्व मज लाभले । तेव्हांपासून नित्य नेमें केलें । वार्षिक हें चातुर्मास्य व्रत ॥१२२॥
अजूनही नित्य करित । बल्लाळेशास तोषविण्या भक्तियुक्त । तूंही विप्रा ऐसें व्रत । करावें महाअद्भुत जें ॥१२३॥
चातुर्मांस्य व्रत करून । योगिवंद्य होशील तूं जाण । ऐसें बोलून अष्टाक्षरमंत्र पावन । दिला त्यासी गणेशाचा ॥१२४॥
तो विधिपूर्वक स्वीकारित । गणराज मंत्र अति पुनीत । विनांड नित्य नेमें जपत । बल्लाळेश्वर कथा पुढिले अध्यायीं ॥१२५॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते चातुर्मास्यमाहात्म्ये विभांडव्रतो पदेशवर्णनं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP