मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक विनविती सूताप्रत । संक्षेपें मार्गशीर्ष व्रत । त्याचें सांगावें माहात्म्य अद्‍भुत । गणेशभक्तिप्रद सूता ॥१॥
सूत तेव्हां मुनींस सांगत । पूर्वी अंधकासुर नाम दैत्य बलवंत । तो त्रिभु वनाती जिंकित । परम दारुण शक्तिशाली ॥२॥
त्यानें दैत्यराज्य स्थापिलें । देव सारे वनांत पळाले । भयभ्रीत सारे झाले । वधार्थ उद्युक्त परी तयाच्या ॥३॥
तेव्हां ते शंभूस शरण । जाऊन करिती चिंता कथन । तितुक्यांत नारद तेथ येऊन । करुणानिधी गातसे गणेशागान ॥४॥
त्यास पाहून हर्षयुक्त । जाहले शंभुप्रमुख देव समस्त । ते दूःखशोकयुक्त । सांगती त्या महाभागासी ॥५॥
श्रीशिव नारदासी म्हणती । अंधकासुरे जिंकिलें आम्हांसि जगतीं । योगींद्रसत्तमा त्याच्या चित्तीं । पार्वतीची अभिलाषा ॥६॥
यज्ञकर्मांचा नाज्ञ झाला । त्यानें उपोषणाचा काळ ओढवला । आम्हां समस्त देवगणाला । विप्रेशा आतां रक्षी सर्वां ॥७॥
तूं सर्ववित्तम अससी । अंधकाचा वध उपाय सांग आम्हांसी । तो करूं निश्चयेसी । महामते भक्तिभावानें ॥८॥
नारद तेव्हां सांगत । जवळच मार्गशीर्ष मास असत । तो सर्व सिद्धिप्रद ख्यात । त्यात गणेशव्रत आचरावें ॥९॥
त्यानंतर व्रतप्रभावें जिंकाल । दैत्यपुंगवा त्या सबल । विघ्नेशाच्या प्रसादें निर्मळ । यांत संदेह कांहीं नसे ॥१०॥
ऐसें सांगून महायोगी नारद । गणेशगायनीं मग्न सुखप्रद । वीणावादन करी इष्टद । स्वच्छंदें गमन करता झाला ॥११॥
त्याच्या उपदेशातें स्मरून । शंकरप्रमुख देवगण । करिती मार्गशीर्ष व्रताचरण । विघ्नपासी तोषवावया ॥१२॥
गणेशपंचकाचें नित्य सेवन । करूनिया उषःस्नान । विशेषेम गणेशाचें भजन । उपोषण करून करिती ते ॥१३॥
शंकर करि अविरत ध्यान । गजाननाचें सतत चिंतन । सेवा करी एकनिष्ठ मन । भक्तिभावपूर्ण मासव्रतांत ॥१४॥
द्विजोत्तमहो ऐसें व्रत । आचरून पारणा करित । त्या मार्गशीर्ष व्रतप्रभावें संतुष्ट । जाहला गणांचा नायक ॥१५॥
शंकरास वर दान देण्यास । प्रकटला आदरें त्या स्थळास । सिद्धिबुद्धि युक्त त्या वेळेस । मूषकावरी आरूढ झो ॥१६॥
विघ्नेशास पाहून पुढयांत । शंकर त्यास प्रणास करित । शिव गणाधीशातें पूजित । मुनिगणांच्या समवेत ॥१७॥
अंग रोमांचित होऊन । शिव करी भावें वंदन । दोन्ही कर जोडून । स्तुतिस्तोत्र गातसे ॥१८॥
गणेशासी विघ्नराजासी । परेशासी ढुंढीसी । हेरंबासी पाशयुक्तासी । मूषकवाहना नमो नमः ॥१९॥
परशुपाणीस दंतभयधरास । त्रिनेत्रास शूर्पकर्णास । वीरास चंद्ररेखाधरास । सिंदूरभूषणा नमन असो ॥२०॥
रक्तांगासी हेरंबासी । महाविघ्नवारणासी । गजाननासी आदिपूज्यासी । सर्वपूज्या तुज नमन असो ॥२१॥
स्वानंदवासीसी स्वानंदमूतींसी । सर्वाकारासी ब्रह्मपतीसी । अनंतोदरभावासी । सर्वांच्या मातापित्या तुज नमन ॥२२॥
ब्रह्मभूतासी दैत्यदानवमर्दकासी । अनंतविभवासी देवासी । भक्तपालन धर्मयुक्तासी । अभक्तविनाशका तुज नमन ॥२३॥
खेळकरासी योगासी । योगनाथासी योग्यासी । योगदायीसी शांतिस्वरूपासी । सदा शांतिशांता तुज नमन ॥२४॥
तूं प्रत्यक्ष ब्रह्मणस्पति । किती करावी मी स्तुति । वेदवेदांत योगीही धरिती । मौन जेथ स्तवनीं तुझ्या ॥२५॥
आज धन्य मी देवमुनींसहित । तुझ्या पायांचे दर्शन लाभत । परात्परा सामर्थ्य दे अद्‍भुत । विघ्नेशा तुझें रूप जाणण्या ॥२६॥
ज्ञानरूप ते तुझ्यांत स्थित । अज्ञानांधकार होण्या नष्ट । भक्ति दे तुझी एकनिष्ठ । अव्यभिचारिणी जी सर्वदा ॥२७॥
ऐसें बोलून महादेव नाचत । देव ऋषींच्या समवेत । त्याला गणाधीश म्हणत । भक्तजनप्रिय त्या वेळीं ॥२८॥
माझें ज्ञानमय वज्रपंजर स्तोत्र । घेऊन दैत्येंद्रसत्तमा त्या कुपात्रा अत्र । ठार करी शंभो विजयी सर्वत्र । सर्वकाल तूं होई ॥२९॥
तुज माझ्या पादपद्मीं भक्ती । लाभेल अनन्य निश्चिती । जें जें वांछिसी तूं चित्तीं । तें तें सफळ होईल ॥३०॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र वाचील । अथवा जो नर हें ऐकेल । त्यास सर्वदा लाभ होईल । वांछिताचा निःसंशय ॥३१॥
भुक्तिमुक्ति पुत्रपौत्र लाभेल । धनधान्यादिक सर्व पावेल । भक्ति माझी दृढ होईल । श्रवणमात्रें या स्तोत्राच्या ॥३२॥
ब्रह्मभूतत्व लाभून । अंतीं होय तो मुक्त पावन । ऐसें गणेशवचन ऐकून । शिव झाला हर्षभरित ॥३३॥
गणेशासी प्रणास करून । म्हणे शिव ऐसें प्रार्थनावचन । वज्रपंजरक मज लागून । सांगावें हो गजानना ॥३४॥
जें गणपप्रिय ज्ञानमय । महा अंधकाराचें नाशक सुखमय । सांगावें सविस्तर आनंदमय । विधिपूर्वक मजलागी ॥३५॥
तेव्हां श्री गणेश सांगत । नित्यविधि करावा प्रथम भक्तियुक्त । नंतर गजानन पूजून विन्त । वज्रपंजरक स्वीकारावें ॥३६॥
जें सर्व अज्ञानविनाशन । असे जगती परम पावन । त्या गजाननाचें ध्यान । ऐशियापरी करावें ॥३७॥
त्रिनेत्रधर जो चतुर्बाहुधर । परशु आदि शस्त्रधर । गजवदन भालचंद्र नराकार । योगशांतास त्या भजतों मीं ॥३८॥
सर्वंवंद्या त्या परेशास नमन । ऐसें मानसोपचारें ध्यान करून । नमस्कार करून करावें पूजन । वज्रपंजर धारण तदनंतर ॥३९॥
बिंदुरूप वक्रतुंड रक्षण । करी ह्रदयांत राहून । चतुर्तिध देहांचें संरक्षण । तत्वाधार करो सनातन ॥४०॥
देहमोहें मी युक्त । सोऽहं स्वरूपधर देहयुक्त । मजला रक्षण करो एकदंत । भ्रमनाशक जो विशेषें ॥४१॥
महोदर देव प्रतापवंत । सदा राखो मज बोधानंद स्थित । सांख्यांस राखो सांख्येश बलवंत । असत्यांत स्थित मजलाही ॥४२॥
लंबोदर मज रक्षण करो जगांत । सत्सत्त्वांत मीं स्थित । विकट रक्षण करो परात्पर जो असत । भक्तवात्सल्यें अमृतधर ॥४३॥
आनंदांत मी नित्य स्थित । मज राखो विघ्नराज क्रीडायुक्त । समात्मक जो खेळत । नाना विघ्नांनी सर्वदा ॥४४॥
अव्यक्तांत नित्य स्थित । मजला धूम्रवर्ण राखो अविरत । सुखाकार जो सर्वपूजित । सहज प्रभू जगताचा ॥४५॥
स्वसंवेद्यांत मीं स्थित । मज राखो गणेश पुनीत । भयनायक योगभावयुक्त । ऐसी प्रार्थना करीतसे ॥४६॥
अयोगांत मी नित्य स्थित । रक्षण करो गणेश जगांत । निवृत्तिरूपधर साक्षात । समाधिसुखांत जो रत असे ॥४७॥
योगसंस्थिता मज रक्षावें । योगशांतिधरें देवें । गणाधीसें प्रसन्न भावें । सिद्धिबुद्धिसमन्वित जो ॥४८॥
पुढून गजकर्णानें रक्षावें । विघ्नहारकें कृपाभावें । आग्नेयीं याम्यी नैऋत्य दिशेस राखावें । चिंतामणीनें मजलागीं ॥४९॥
पश्चिमेस ढुंढिनें रक्षावें । वायव्येस हेरंबानें जपावें । उत्तरेला विनायकें राखावें । ईशान्येस प्रमोदानें ॥५०॥
ऊर्वंदिशेस सिद्धिपती । अधस्तात बुद्धीश राखो जगतीं । सर्वांगांत मयूरेश जगतीं । भक्तिलालस रक्षण करी ॥५१॥
कोठेंही मीं विश्वांत । तेथ योगप मज राखो सतत । परशूपाशांनी जो युक्त । वरद अभयधारक ॥५२॥
ऐसें हें गणपतीचें स्तोत्र । वज्रपंजरक नामक पवित्र । हें वाचितां विजय सुपात्र । महादेवा मिळेल ॥५३॥
जो हें वज्रपंजर धारण करित । तो कोठेंही असो जगतांत । त्यास भय मुळीं ना वाटत । नानास्वभावज कदाही ॥५४॥
जो हें पंजरस्तोत्र वाचील । अथवा नित्य ऐकेल । ईप्सित सारें त्याला मिळेल । वज्रसार देह त्याचा ॥५५॥
त्रिकाल जो पाठ करित । या वज्रपंजर स्तोत्राचे भक्त । जो गणेशच दुसरा वाटत । ब्रह्मभूत । निर्विघ्न सर्वकार्यीं जो ॥५६॥
जो हें वज्रपंजर स्तोत्र ऐकत । तो आरोग्यादींनी युक्त । गणपप्रिय तो होत । प्रसन्न सदा आनंदानें ॥५७॥
नित्य पाठें नरास लाभत । धनधान्य पशू विद्यादि समस्त । ऐहिक सुखें पुत्रपौत्रादिक निश्चित । त्यास भय जगीं नसे ॥५८॥
वज्रापासून अथवा शूलापासून । अथवा शंकरापासून । भय स्तोत्रवाचका कोठून । नित्य निर्भय तो होई ॥५९॥
जें जें मर्त्य वांछित । तैं तैं लाभें तो शाश्वत । विघ्नेश पंजरक स्तोत्र वाचित । निरंतर जो भक्तिभावें ॥६०॥
एक लक्ष वेळ वाचितां । हें स्तोत्र सिद्ध तत्त्वतां । सिद्धपंजरक ऐसा होतां । सूर्यास हेंही स्तंभन करी ॥६१॥
ब्रह्मांडास वश आणील । ऐसें बोलून गणेश अमल । अन्तर्धान पावला त्या वेळ । मुनिसत्तमा तत्क्षणीं ॥६२॥
शिव अन्य देवांसहित । मनीं जाहला हर्षभरित । स्वयं लक्ष आवृत्ती करित । यथाविधी तदनंतर ॥६३॥
सिद्धपंजरक होऊन । अंधक दैत्यासह करी युद्ध दारूण । गणेशासी मनीं ध्याऊन । त्रिशूल उगारी दैत्यावर ॥६४॥
अंधक गर्वयुक्त । त्रिशूलाघारें झाला मृत । त्यास जिंकून प्रतापवंत । स्थापी देवांसी स्वस्थनीं ॥६५॥
देव झाले भयमुक्त । विश्व सगळें धर्मयुक्त । मार्गशीर्ष व्रताचा हा प्रभाव ख्यात । पंजरक स्तोत्र लाभलें ॥६६॥
ऐसें हें अंधकनाशाचें स्तोत्र पावन । वाचील अथवा ऐकेल जो जन । त्यास गणेशप्रीती लाभून । सर्वसिद्धि प्राप्त होई ॥६७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मार्गशीर्षमासमाहात्म्ये वज्रपंजरकथनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP