मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सनकादिक शिवास म्हणती । गणेशकथामृत सेवून चित्तीं । तृप्ति पूर्ण न झाली सांप्रती । आणखी अवतारकथा सांगा ॥१॥
तुमच्या वदनांभोजांतून । स्त्रवली अमृतमधुर कथा पावन । जन्ममृत्युहर संपूर्ण । सर्व सौख्यकारक ॥२॥
महामते गणेशकथा सौम्य । आणखी सांगूनिया रम्य । पिपासा आमुची काम्य । शमवावी दयाळा ॥३॥
श्रीशिव तेव्हां सांगती । कलिप्रवृत्ति पर ब्रह्मदेव जाती । वैकुंठलोकीं विष्णूस स्तविती । रमानाथासी त्या वेळीं ॥४॥
ब्रह्मा आपुलें आगमन प्रयोजन । जनार्दनासी सांगे प्रसन्न । कलीस पापस्वरूपा सृजिलें उन्मन । जन त्यास सर्वदा मानतील ॥५॥
द्वापारयुगान्त जेव्हां होत । तेव्हां कलियुगाचा प्रारंभ होत । देवेशा त्याचें प्रवर्तन सांप्रत । सर्वपालका तूं करावें ॥६॥
ब्रह्मदेवाचें ऐकून वचन । केशव म्हणे त्यास खिन्न । पापरूपी महाघोर कलीचें आगमन । अभिनंदनीय न वाटे मजला ॥७॥
धर्मपालनार्थ मीं अवतार घेत । धर्मनाशकर कली ख्यात । त्याचा उदय मज अप्रिय असत । हें निश्चित मत जाण ॥८॥
तदनंतर केशवास चतुरानन । पुनरपि विचारी एक प्रश्न । बुद्धावतार तुझा कलिप्रवर्तक म्हणूक । प्रख्यात असे जजार्दना ॥९॥
ऐसी पुराणांची गाथा असत । स्वधर्मस्थ तुझ्या आश्रित । ब्रह्मदेवाचें वचन ऐकून म्हणत । निःश्वास सोडून दुःखानें ॥१०॥
कलिप्रवर्तनाचें कार्य । करणें आतां अनिवार्य । विष्णूंनी स्वीकारिलें जरी अप्रिय । अवतारकार्य म्हणोनी ॥११॥
ब्रह्मा स्वभवनीं परतला । विष्णूंनी मानसीं विचार केला । तदनंतर तपश्चर्येला । बसले विष्णु भगवान ॥१२॥
षडक्षर मंत्रानें ध्याऊन । ह्रदयांत आपल्या गजानन । दहा वर्षें तप करून । तोषविला गणाध्यक्ष ॥१३॥
गजानन होऊन प्रसन्न । प्रकटला देण्या वरदान । त्याच्या आगमनें तुष्टमन । पूजिले विघ्नपासी विष्णूनें ॥१४॥
हेरंब उपनिषदानुसार । भक्तीनें पूजी नम्रकंधार । स्तुति करी अपार । तेव्हां गजानन त्यास म्हणे ॥१५॥
महाभागा मीं कृपायुक्त । वर माग जो ह्रदयेप्सित । तुझ्या भक्तिभावें संतुष्ट । सर्वही मीं देईन ॥१६॥
गणेशाचें ऐकून वचन । विष्णु बोले कर जोडून । श्रद्धेनें त्यास नमून । गणेशा सर्व सिद्धिप्रदात्यासी ॥१७॥
श्रीविष्णु म्हणे माझ्या चित्तांत । दृढ श्रद्धा देई सतत । तुझ्या भक्तीची जी सर्वसिद्धि देत । कलियुगीं बुद्ध होईन मीं ॥१८॥
जरी अन्यथा धर्म संस्थापन । केलें असे मी एकमन । तरी कलियुगीं धर्माचें लोपन । बुद्ध होऊन मीं करावें ॥१९॥
ऐशा धर्मसंकटांत । विरुद्ध कार्याचरणांत । होणार मीं ढुंढे रत । दयानिधे सांप्रत काय करावें ॥२०॥
तुझ्या पायाचा आश्रय । मिळतां शरण मीं निर्भंय । आतां रक्षण करी तूं सदय । विघ्नेशा या कार्यांत ॥२१॥
विनायक तूं धर्मपालक । याविरुद्ध आचरणीं तारक । होई मज तूंच रक्षक । श्रीगजानन तेव्हां म्हणती ॥२२॥
विष्णू तूं करूं नको चिन्ता । कलिप्रवर्तनी दोष तत्त्वतां । तुज न लागेल धार्मिकता । कदापि तुझी न ढळेल ॥२३॥
क्रोडेस्तव मीं रचना केली । चार युगांची ही भली । माझ्या वरदानें झालीं । तीं तीं युगें युगधर्मयुक्त ॥२४॥
कलि त्यांत महापापयुक्त । मींच बुद्धया संस्थापित । माझी आज्ञा पाळण्या जगांत । होई बुद्ध तूं आदरें ॥२५॥
चित्तांत असे चिंतामणि । त्याच्या इच्छावश जग मानी । ब्रह्म नानाविध असतां मनीं । तुजला काय कर्तृत्वदोष ? ॥२६॥
वेदशास्त्रमयी वाणी निर्मित । गणेश मींच सर्वत्र सतत । माझी आज्ञा पाळी विनत । मी कर्ता हा वृथाभिमान ॥२७॥
चित्तांत तुझ्या जो अहंकार । कर्तृत्वाचा अपार । तो सोडून समग्र । कर्में मजला समर्पण करी ॥२८॥
ऐसें करितां मी सुप्रीत । गणेश्वर जीवास स्वपद देत । मी सर्व जीवांचा ईश वर्तत । विष्णूनें हें वचन मानिलें ॥२९॥
कलिक्रीडापर विष्णो तूं स्मरावें । बुद्धावतारीं माझें रूप बरवें । धूम्रवर्णं गणेशा मज भजावें । आज्ञा माझी पालन करी ॥३०॥
अधर्मयुक्त कर्म करून । तुज न पाप मज स्मरून । सुख लाभेल कर्मे अर्पून । मजला सतत जनार्दना ॥३१॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । विष्णुही हर्षयुक्त मन । महर्षींनो बुद्ध जाहला ॥३२॥
त्यानें बौद्ध शास्त्र रचिलें । मोहप्रद जें जाहलें । कलिदोष वाढण्य़ा झालें । साहाय्य त्या शास्त्राचें ॥३३॥
सनकादिक विचारित । नरकप्रद बौद्धशास्त्र कैसें असत । सर्वज्ञा तूं आम्हां प्रत । सांगावें सांप्रत कृपाळा ॥३४॥
तें जाणून मोहविहीन । होती कलियुगांत जन । श्रीशिव सांगती तें बौद्धज्ञान । नरकदायक सकलांसी ॥३५॥
वर्णाश्रमपालकांसी नरकप्रद । वर्णाश्रमहीनासी । सुखद । जीवांच्या ह्रदयीं मुक्तिप्रद । बुद्धिपति राहे साक्षात ॥३६॥
ब्रह्मांचा ईश्वरांचा असत । पंचचित्त प्रचालक अद्‍भुत । त्यास विनायक ऐसें जन म्हणत । सर्वांचा विशेष नायक जो ॥३७॥
त्याचा नायक कोणी नसत । स्वेच्छापूर्ण एकटाची वागत । सनातन हा देव अनुपम असत । नानाविध क्रीडा करी ॥३८॥
त्याच्या इच्छेनें ब्रह्म होत । नाना रूपांनीं युक्त । नाना मायाबलाश्रित । तेथ पापपुण्य कांहीं नसतें ॥३९॥
ज्ञान अज्ञान समान । तुरीय तो परम शोभन । स्वर्गादि कर्म तेथ नसून । नरकादिक संभवेल कसें ॥४०॥
ह्रदयीं बुद्धिप्रदाता । सर्वांचा जो क्रीडाकर्ता । त्यास जाणतां मोहवार्ता । कदापिही नुरे नरासी ॥४१॥
बौद्धज्ञान जनांस सांगत । चित्तास सुखप्रद तें करावें सतत । वर्णाश्रमधर्मांनीं पीडायुक्त । शरीरास वृथा न करावें ॥४२॥
त्या ब्रह्मानें विरचित । देह हा भोगण्या खचित । नाना यत्नांनी करावें सतत । शरीर पोषण म्हणोनियां ॥४३॥
शरीरास जरी कष्ट होत । तरी बुद्धि होई खेदयुक्त । त्यांत जो बुद्धिपति साक्षात । तोही दुःखित होईल ॥४४॥
ऐसा विचार करून । रहावें स्वेच्छापर पापपुण्य विहीन । सदैव देहपोषणीं निमग्न । आपुलें इष्ट तें करावें ॥४५॥
नाना पदार्थ भावांत । मन होता आकर्षित । भोगावे ते अखंडित । वर्णाश्रमधर्म त्यागूनियां ॥४६॥
जीव हिंसादिक कर्म न करणें । तृणांकुरही न तोडणें । देवपूजनादिक कर्म न आचरणें । विचारवंत आत्मज्ञांनीं ॥४७॥
स्वाहाकार न करावा । स्वधार्पणादि धर्म न आचरावा । मी ब्रह्म ऐसा असावा । आत्मविश्वास मात्र प्रीढीनें ॥४८॥
बाह्मणांना भोजनदान । कदापि न द्यावें अधर्मं मानून । सर्व प्राणिमात्र जरी समान । तरी द्विजादिक कैसे श्रेष्ठ ॥४९॥
ऐसें स्वच्छंद मतांनी युक्त । बौद्ध शास्त्र जसे नास्तिक ख्यात । महर्षींनो कलिदोष युक्त । नरकप्रद निश्चित जाणा ॥५०॥
वर्णाश्रम धर्म त्यागून । स्वच्छंद घालवावें जीवन । अहिंसा परम तत्त्व स्वीकारून । बौद्धरहस्य बाणवावें ॥५१॥
सर्वांस मोहित करित । विश्वात्मा बुद्ध कलियुगांत । कैकट देशीं विष्णु गुप्तरूपांत । मानदांनो हा कलिप्रभाव ॥५२॥
विष्णु बौद्ध बौद्धरूपांत । गणेशध्यान सतत करित । आपलें सर्व कर्म समर्पित । तयासी त्याचा आज्ञापालक तो ॥५३॥
तथापि प्रत्यक्ष पूजन न करित । विष्णु त्या बौद्ध अवतारांत । वेदाविरुद्ध मार्ग सांगत । जनांसी तैसें वागतसे ॥५४॥
कलियुगीं दुराचारी । बौद्धमायामोहित भारी । वर्णांश्रमभ्रष्ट खरोखरी । घरोघरीं होतील जन ॥५५॥
परी लेशमात्र धर्म अवशिष्ट । अधर्म त्यासही जिंकित । सदा उपोषनपीडित । तेव्हां बुद्ध काय करी ॥५६॥
विष्णुरूप बुद्ध ढुंढीस ध्याईल । तप करून अविचल । धर्मसंस्थापना करी विमल । विघ्नेशा तूं अविलंबानें ॥५७॥
तदनंतर गणेश्वर साक्षात । प्रसन्न होऊन अवतरले त्वरित । धूम्रवर्ण नामें ख्य़ात । धर्मस्थापना करील ॥५८॥
बुद्ध तेव्हां आनंदित होईल । स्थापन करून पूजन करील । विशेषें स्तवन करील । नंतर होईल अंतर्धान ॥५९॥
आपुल्या महिम्यांत विलीन । होईल विष्णु पुनरपि महान  । ऐसें हें बुद्धमाहात्म्य पावन । पठणें वाचनें भुक्तिमुक्ति देई ॥६०॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते बुद्धावतारवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP