खंड ८ - अध्याय ३९
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ विभांडक विचारी वृत्तांत । बल्लाळास कोणती गति लाभत । गाणपत्य तो अति दुःखित । होता जो मुनिसत्तामा ॥१॥
जाजलि तेव्हां कथा सांगत । बल्लाख होता वनांत । गणनाथास मनीं स्मरत । वेलींच्या बंधनीं बद्ध तो ॥२॥
रक्तस्त्राव अविरत । होत होता सर्वांगांत । म्हणे विघ्नारि तुझें नांव ख्यात । भक्तांस विघ्न कां आणिलें ॥३॥
हें सर्वंही विपरीत । जाहले असे निश्चित । माझी भक्ति खंडण्या प्रयत्न । कां मज ऐसें पीडिसी ॥४॥
मी पूर्वीच हा देह अर्पिला । तुजला हा बळी दिला । आतां शरीराची चिन्ता मनाला । अल्पांशें ती नसे रे ॥५॥
गणेशा दयासिंधो मी भक्त । असे जरी सुदृढ भक्तियुक्त । माझा भाव तव चरणकमलांत । असेल तरी निबद्ध ॥६॥
तरी माझा पिता जो अधम । त्यानें कर्म केलें हें निर्मम । म्हणोनि शासन त्यास अनुपम । गणेशभक्तिभंजकास झालें ॥७॥
त्यास कोडाची व्याधी । व्हावी अंधत्वाची उपाधि । पोंक येऊन वाणीसंबंधी । मुकेपणा यावा त्यासी ॥८॥
पिता बधिर मूक व्हावा । माझा बंध तुटावा । विघ्नेशा तुझ्या अभक्ता व्हावा । योग्य दंड सत्वरी ॥९॥
गजाननाचा एक भक्त । बल्लाळ एवढें बोलत । त्याचे वचन मुखांतून निघत । तिकडे तैसें क्षणांत झालें ॥१०॥
तदनंतर ब्राह्मण रूप घेऊन । तेथ प्रकटला गजानन । भक्त वचनास्तव प्रेमयुक्त मन । त्वरित जाई त्या स्थानीं ॥११॥
बल्लाळ भक्तासमीप जात । बंध त्याचे सारे तोडित । त्याच्या अंगावरी फिरवित । वरद हस्त आपुला तैं ॥१२॥
तेव्हां सर्वंक्षतें बुजलीं । काया पूर्ववत जाहली । बल्लाळा खूण पटली । म्हणे हा द्विज गणेश असे ॥१३॥
उठून त्यास करी वंदन । पूजोनि स्वागत करून । स्तवन आरंभिलें कर जोडून । गणेशा तुज नमन असो ॥१४॥
संधारकासी परेशासी । सदा आनंदरूपासी । सर्वातिगासी अपारस्वरूपासी । देवाधिदेवा नमन तुला ॥१५॥
भक्तसंरक्षकासी प्रभूसी । हेरंबासी विघ्नेशासी विघ्नेशासी । परात्म्यासी ब्रह्मेशासी । महायोगदात्या तुज नमन ॥१६॥
शांतिमयासी स्वानंदवासीसी । स्वानंदें खेलकरासी । योगेशासी महोदररूपासी । सदा सन्मयकायाय नमन ॥१७॥
अव्यक्तशिरासी योगरूपासी । सर्वत्र सदा संस्थितासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिमया तुज नमन ॥१८॥
सिद्धिबुद्धिपतीसी । गजवक्त्रासी । लंबोदरासी देवासी । चतुर्बाहुधरासी मूषकध्वजासी । पाशांकुशप्रधात्या नमन तुला ॥१९॥
द्विजरूपधरासी । भक्तवत्सलभावासी । भक्तवाक्य राखण्यासी । प्रकटलास तूं तुज नमन ॥२०॥
तूंच माता पिता नाथ । तूंच मित्र तैस कुलदैवत । द्रव्य विद्यादिक समस्त । सर्वस्व माझें तूंच अससी ॥२१॥
देवा कायावाचामनानें केलें । जागृत स्वप्न सुषुप्तींत जें धरिलें । तें सर्व पाप अपराध पाहिजे केलें । क्षम्य दयानिधे हेरंबा ॥२२॥
ऐसें स्तवन करून नाचत । बल्लाळ तो भक्तियुक्त । डोळयांतून आनंदाश्रू वाहत । रोमांच उठले अंगावरी ॥२३॥
ब्राह्मणरूप गणेश म्हणत । वर माग जो ह्रदयवांछित । तो पुरवीन मी त्वरित । भक्तितुष्ट बल्लाळा मीं ॥२४॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वंसिद्धिप्रद पवित्र । पाठका वाचका सर्वत्र । होईल यांत न संशय ॥२५॥
जें जें वांछित तें तें देत । स्तुति या स्तोत्रें जो करील त्याप्रत । अंतीं सायुज्यपद देत । ऐसा वर माझा असे ॥२६॥
बल्लाळ म्हणे स्थिर भक्ति । देवा तुझा संग भावभक्ती । द्यावी जे भक्त त्यांप्रती । विमुखांसी विघ्न करावें ॥२७॥
अन्य वर मी न मागत । विनायका दास तुझा मी विनीत । तुझ्यातच निवास नियत । करी माझा विशेषें ॥२८॥
तथास्तु ऐसे गणेश म्हण्त । भक्तवत्सल बल्लाळाप्रत । तुझ्या नामें मी ज्ञात । होईन या स्थळीं भविष्यकाळीं ॥२९॥
येथे मी बल्लाळेश गणेश्वर । सर्वदा राहीन भक्तिपर । योग्यांचें रक्षण करीत ईश्वर । ऐसा वर देतों तुला ॥३०॥
पावला ब्रह्मनायका गजानन । तदनंतर तेथ देवालय पावन । अतिविशाल निर्माण झालें ॥३१॥
बल्लाळेश्वर मूर्ति त्यांत । ती रम्य मूर्ति पाहून विस्मित । मनीहर त्या देवालयांत । वंदन करून पूजी तैं ॥३२॥
तेथ पूजोपचार अकस्मात । अवकाशांतून खालीं येत । त्यायोगें विधियुक्त पूजित । वैश्यपुत्र तो बल्लाळ ॥३३॥
नित्य नियम पूर्ण करून । बैसला ध्यान लावून । तदनंतर ध्यान सोडून । हर्षित चित्तें नमन करी ॥३४॥
दिव्य ज्ञानयुक्त तो होत । स्वपर भ्रांतिहीन वर्तत । बल्लाळ गणपप्रिय अत्यंत । ऐसें अद्भुत घडले तेव्हां ॥३५॥
तेवढयांत माता तेथ येत । लोकही नगरांतील त्वरित । जमले ते सर्व अतिविस्मित । पाहून देवालय अतिभव्य ॥३६॥
तो मुक्त बल्लाळ देवळांत । बैसला त्यासी माता सांगत । वडिलांचें सर्वही वृत्त । अति दुःखमय तैं होतें ॥३७॥
तो वृत्तान्त ऐकत । गणेशद्वेष्टया ताताप्रत । मीं भेटणार नाहीं निश्चित । माते हा भाव माझा ॥३८॥
नाना जन्मांत पूर्वी झाले । मातापिता माझे भले । त्या कोणाचा अभिमान या वेळे । धरून होईल भवतारण ॥३९॥
आता आई तूं जा परतून । मी त्या दुष्टाचा पुत्र नसून । ज्यानें देवालयाचे केलें भंजन । त्याचा माझा संबंध कैसा ॥४०॥
ज्यानें देव दूर फेंकिला । भक्तिभाव ज्यानें खंडिला । मी न मानीन तयाला । माझा पिता यापुढें ॥४१॥
तें ऐकून कठोर वचन । माता होऊन शोकमान । गेली स्वगृहीं परतून । बल्लाळ मंदिरींच राहिला ॥४२॥
तदनंतर अकस्मात । तेथ ज्योतिरूप विमान अवतरत । त्यांत बसून त्वरित जात । बल्लाळ गणनायकाकडे ॥४३॥
विभांड म्हणे जाजलीप्रत । लोक सारे कर्मयंत्रित । शुभाशुभपरायण होत । शुभाशुभ कर्मांनें त ॥४४॥
तेथ योगी तो बल्लाळ । होता स्वपर भ्रमवर्जित निर्मळ । त्या कल्याण पित्याचा द्वेष प्रबळ । कैसा होता चित्तांत त्याच्या ॥४५॥
जाजलि तयास उत्तर देत । योग्यांत गणनाथाचे भक्त । श्रेष्ठ ऐसे प्रख्यात । पंडित सारे म्हणताती ॥४६॥
त्यांच्यात बल्लाळ वैश्य ज्ञात । भक्तराज तो जगांत । गणेशभजनीं जे आसक्त । ते पूज्य माननीय निरंतर ॥४७॥
जे गणेशभक्तिविपरीत । ते त्याच्या सदा अरिसम होत । म्हणून बल्लाळ वैश्यपुत्र निंदित । गणेशनिंदका स्वपित्यासी ॥४८॥
स्वतःस यातना झाल्या म्हणून । निंदिले नाहीं वरिष्ठ जन । गणेशाचा केला अपमान । म्हणोनि द्वेष त्यास वाटे ॥४९॥
विभांडक पुनरपि विचारीत । प्रश्न तेव्हां बुद्धिमंत । ज्याच्या कुळांत जन्मत । गाणपत्य सुत श्रेष्ठ ॥५०॥
त्याच्या योगें उद्धार होत । कोटिकुळांचा वंशांत । हा कल्याण वाण्याचा सुत । स्वानंदलोकीं प्रवेशला ॥५१॥
अंतीं तो बल्लाळ सायुज्य लाभत । तरी त्याचे मातापिता जगांत । पृथ्वीतळावरचि राहत । त्यांचा उद्धार कां न झाला ॥५२॥
अंतीं त्यांची गती कोणती । झाली तें सांगा सांप्रति । ही कथा ऐकून माझ्या चित्तीं । वाटतसे महदाश्चर्य ॥५३॥
जाजलि उत्तर तयास देत । गाणपत्य जन्मला कुळांत । कुलोद्धारर्थ आदरयुक्त । परी यत्न करिता गति लाभे ॥५४॥
गणनाथाप्रत जात । उद्धार कुलजांचा होत । बल्लाळाचा शाप राखण्यान करित । उद्धार त्याच्या मातापित्यांचा ॥५५॥
परी पुढच्या जन्मीं उद्धार । केला तयांचा सादर । ऐसें हें बल्लाळ माहात्म्य थोर । सांगितलें तुज संक्षेपें ॥५६॥
जो हें वाचील अथवा ऐकेल । त्यास सर्व सिद्धि लाभतील । ज्यांच्या सम कोणाचेंही न बळ । ते बल्लाळेशभक्त होती ॥५७॥
त्यांचा स्वामी गणाधीश । बल्लाळेश नामें ख्यात । विभांडा तूंही हें मुख्य व्रत । करी सत्वर भक्तिभावें ॥५८॥
चातुर्मास्य व्रत पुनीत । बल्लाळेश परायण जो करित । तो होऊन प्रसादयुक्त । योगी समर्थ होतसे ॥५९॥
तैसें व्रत तूं करितां । होशील योगबळें पूर्ण तत्त्वता । यांत संशय तुझ्या चित्ता । किंचितही नसावा ॥६०॥
बल्लाळेश्वराचें हें माहात्म्य अद्भुत । जो नर ऐके श्रद्धायुक्त । अथवा वाचील भक्तियुक्त । तो भोग भोगून ब्रह्मरूप ॥६१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते चातुर्मास्यमाहात्म्ये बल्लाळेश्वरवर्णनं नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP