खंड ८ - अध्याय २०
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । तदनंतर बहुत काळ करिती । उपासना सहा महिने भावभक्ती । निराहार राहूनिया ॥१॥
ते सर्वें गणेशास भजती । भक्तिभावें संतुष्ट करिती । कार्तिक मार्गशीर्ष माघ असती । वैशाख श्रावण आश्विन मास ॥२॥
गणेशाच्या ध्यानांत तत्पर । दहा वर्षें करिती तप उग्र । विघ्नेश प्रकटती तैं उदार । वर देण्यासी तयांना ॥३॥
संपूजित प्रेमें सुत । तो वरदायक त्यास म्हणत । मागा वर जे मनोवांछित । सहा महिने ते तेव्हां नमिती ॥४॥
गणेशास प्रणिपात करून । आनंदित चित्तांत होऊन । भक्तीने मान वाकवून । विघ्नेशीसी प्रार्थिती ॥५॥
सर्वेशा वर देण्या आलास । तरी ऐसा वर देई आम्हांस । आमच्या कालावधीत कार्य करणारास । बहुत पट फळ लाभवें ॥६॥
त्यायोगें आमची वेळ येता । लोक विशेषें यत्न करता । दाखवतीत सत्कर्मांची महत्ता । अधिक जेणें वाढेल ॥७॥
तुझ्या भक्तीचें आलय सतत । आम्हांसी करी देवा जगांत । गणनायका तुझे दास दोषवर्जित । कर्मापासून जे जाणती ॥८॥
श्रीगणेश तेव्हां त्यांस सांगत । अन्य महिन्यांत सत्कर्म करित । जन त्यायोगें फळ लाभत । त्याहून दसपट अधिक फळ तुमच्यांत ॥९॥
अन्य महिन्यांहून दसपद फळ । मार्गशीर्षात करिता कर्म अमल । त्याहून दशाधिक फळ । वैशाखमासीं करितां तैं ॥१०॥
वैशाखाहून दसपट कार्तिकांत । कार्तिकाहून माघांत । माघाहून अधिकमासांत । दसपट फळ वाढत असे ॥११॥
त्याहून अधिक ढौंढ मासांत । ऐसा श्रेष्ठताक्रम असत । तपानुसार व्हाल जगांत । श्रेष्ठ तुम्हीं मासांनो ॥१२॥
अधिकमासाचा देव असे । मी ढुंढिराज जात संशय नसे । ढौंढ मास नांवें ख्यात होतसे । तो महिना यापुढें सांप्रत ॥१३॥
असा चिन्हानें युक्त । श्रावण मास प्रिय मज असत । नाना सिद्धिप्रद निश्चित । अनुष्ठानकर्त्या मानवांसी ॥१४॥
श्रावणांत नाना यत्नपरायण । भाद्रपदांत चार दिन जाण । उपोषणयुक्त करी पूजन । तोषवावे मजसी सदा ॥१५॥
प्रतिपदेस प्रारंभ करून । चतुर्थीस ब्रत पूर्ण होऊन । त्या रात्री करावें जागरण । पंचमीस पारणा करावी ॥१६॥
ब्राह्मण भोजन यथाशक्ति । घालून द्यावी तयांप्रती । विपुल दक्षिणा देतां चित्ती । सर्व सुखें मिळतील ॥१७॥
अंतीं स्वानंदलोक प्राप्ती । मुख्य पाचा मासांत स्नान करिती । सर्वभावें विशेषें अनुष्ठान करिती । श्रावणांत त्याचें अधिक महत्त्वा ॥१८॥
ऐशियापरी तुम्ही मास । महाभाग व्हाल पात्र पूजेस । सत्कर्म करिती त्या जनांस । वरदान ऐसें माझें असे ॥१९॥
तदनंतर पावले अन्तर्धान । भक्तवत्सल गजानन । मासही हर्षभरित मन स्वकार्यरत जाहले तैं ॥२०॥
हे मासचरित्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास मासांचें पुण्यफळ लाभेल । गाणेश होईल तो ख्यात ॥२१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते मलमासादिमासेभ्यो वरप्रदांन नाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP