खंड ८ - अध्याय १८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । कृतयुगांत अन्ययुगेंही वसतो । महर्षीनों परी तीं होतीं । कृतयुगाच्या आज्ञेंत ॥१॥
कृताचा मान राखिती । त्याचें भय त्यांच्या चित्तीं । जेथ आयुमर्यांदा होती । कृतयुगतुल्य सर्वांची ॥२॥
पापादि आचारयुक्त । ते सर्व कृतसम होत । शापादिक नरांचे होत । सफळ कृतयुग योगानें ॥३॥
पाप्यांचें वचनही होत । सुकृती लोकांसम समस्त । त्यांतला भेद एक असत । तोचि तुजला सांगतो ॥४॥
अपराधयुक्त जो नर । युगाप्रमाणें तो शापभीत न थोर । त्याची परी त्रेतायुगीं संचार । अन्य तिन्हीं युगांचा ॥५॥
परी त्रेतायुगांत । भयसंयुक्त सारे वसत । पापी तैसे सज्जन वसत । समान आयुयुक्त दोघे ॥६॥
द्वापारांत द्वापाराच्या आज्ञेंत । अन्य तिन्ही युगें राहत । त्यायोगें कर्मज फळ होत । तदाकार महर्षींनो ॥७॥
आयुरादिक द्वापार प्रमाणांत । नाना भाव त्याचे असत । तें सर्व सविस्तृत । वर्णन करणें शक्य नसे ॥८॥
कलियुगांत अन्य युगांची । अंशात्मक वसती साची । अन्य युगें आज्ञा तयाची । पाळिती जाणा निःसंशय ॥९॥
कर्मादि फळ कलियुगासम । आयुरादिकही कलि तुल्य मनोरम । सर्वही आसुरभाव रत अक्षम । शांतिप्रद योग अविचलित ॥१०॥
पापौ जन सुकृतीजन । उभयतांस सिद्धि समान । लेशमय ती होऊन । आयुष्यही कलितुल्य ॥११॥
परी जो योग वर्णिला । गणेशाचा तुम्हांला । तो चारही युगी झाला । समरूप निश्चित ॥१२॥
कृतयुगांत कर्म एक फलद । त्रेतायुगांत दसपट विशद । द्वापारांत शतपट कर्म यशद । कलियुगीं सहस्त्रगुण ॥१३॥
गणेशाच्या वरदानें होत । विक्रमही ऐशाच प्रमाणें फलयुक्त । ऐसी नाना प्रमाणें पुराणोक्त । पुराणांत कथिलीं असतीं ॥१४॥
आतां सिद्धि कैसी प्राप्त । कलियुगीं होईल सर्वार्थदा सतत । कर्मही आचारयुत । फलद कैसें झणीं व्हावें ॥१५॥
आसुर स्वभावें कलियुग । आवरण करीं सर्व जग । त्यायोगें कर्मभव फलभोग । यशयुक्त प्रभावें न होय ॥१६॥
तेव्हां कर्मंसिद्धी होण्यास । प्रथम करावा गायत्री जप खास । दश सहस्त्रवेळ या संख्येस । हितेच्छूनें सर्वदा ॥१७॥
हविष्यान्नाचें भोजन । एकभुक्त राहून । ब्रह्मचर्यव्रताचें पालन । सत्य भाषण करावें ॥१८॥
जितेंद्रिय रहावें । पवित्र आचरण ठेवावें । द्वेषादि सर्वही त्यागावें । आणखी एक पथ्य असे ॥१९॥
मनानेंही स्त्रीचिंतन । भोगास्तव न करावें स्मरण । मनीं विषय इच्छितां जाण । कर्मसिद्धी कैसी लाभे ? ॥२०॥
ऐसा स्वधर्म आचरावा । गायत्री जप तदनंतर करावा । तदनंतर कृच्छ्र्व्रताचा घ्यावा । आश्रय तेणें दोष हरती ॥२१॥
ऐसें सर्व कलिदोष जात । तेव्हां सिद्धी होय प्राप्त । कर्म करिती विधियुक्त । चारही युगीं क्षणसिद्धिद तैं ॥२२॥
आसुरस्वभावें जें घडत । तें कर्म कलियुगांत । कैसें सिद्धिप्रद होणार अनुचित । सांगावें तुम्हीं मुनिजनहो ॥२३॥
केवळ आसुर भावें केलें । जरी तें सत्कर्मही असलें । तरी हजारपट होणार भलें । आसुर स्वभाव निःसंशय ॥२४॥
सुरस्वभावें वा असुरस्वभावें । जें जें कर्म करावें । तैसें तैसें फळ लाभावें । हा तर योग्य क्रम असे ॥२५॥
ऐसें हें युगधर्माचें रहस्य । सांगितलें तुम्हांसी गौप्य । कलियुगीं संक्षेपें प्राप्य । कैसें तेंही सांगितलें ॥२६॥
जो ऐकेल वा वाचील । अथवा हें वाचून घेईल । युगाख्यान अति विमल । दोषहीन तो नर होई ॥२७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते युगप्रभावकर्मसिद्धि वर्णनं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP