मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवर्षी पुनरपि म्हणत । ब्रह्म नानाविध असे ख्यात । क्रमार्थ प्राप्तिहेतूरूप वर्तत । पात्रभेदप्रभावें ॥१॥
गणेशाचें ब्रह्मभेद । असती जगतीं सारें विशद । अग्नि इंद्र आदि शब्द । सारे ब्रह्मवाचक पुराणीं ॥२॥
त्यांपासून ब्रह्मादिक निर्माण । ब्रह्म पितामह ऐसें वचन । शंभुमुख्य देवादि श्रेष्ठ त्यापासून । वेदही झाले महामते ॥३॥
ऐसा त्यांचा प्रश्न ऐकत । तेव्हां तो मुनिशेष्ठ उत्तर देत । संशय नाशन जें असत । म्हणे ऐक येथ रहस्य ॥४॥
तत्त्वरुप असती ज्ञात । ब्रह्माकार संशयातीत । ब्रह्मादि उत्पन्न होत । देव हयापासून सुरर्षिही ॥५॥
नासिकेपासून देव अश्विन । उभय सर्व स्थित महान । ब्रह्माकार त्यापासून । पृथ्वीतत्त्व विनिसृत झालें ॥६॥
प्रकृति भूमि शब्दें ख्यात । गंध हा पुरुष ज्ञात । त्यांच्या योगें अश्विनास म्हणत । ब्रह्माकार बुधजन ॥७॥
पृथ्वीतत्त्वमय देह विलसत । तें त्रिगुणात्मक शरीर असत । ब्रह्मादींच्या शरीरापासून तें निःसून । यांत संशय काहीं नसे ॥८॥
विराट रूप पृथ्वीचें निर्माण । त्या उभयतांपासून । जाहलें हे संशयातीत असून । प्रणव जन्मला पृथ्वीदेह ॥९॥
म्हणोनि या प्रकारें ब्रह्मा ख्यात । शास्त्रवेत्ते विधि सांगत । त्यापासून विश्व समुद्‍भूत । त्यात आश्चर्य कांहीं नसे ॥१०॥
अश्चिनी कुमारांस आराधून । पृथ्वीभव भ्रम जिंकून । जल तत्त्वास्तव करी भजन । तदनंतर वरूणाचें ॥११॥
तेव्हां अश्विन देव प्रनष्ट । मुख्य वारूण ब्रह्म दृष्ट । त्यापासून हें जग इष्ट । निर्माण तेव्हां जाहलें ॥१२॥
ऐशापरी परंपरागत । ब्रह्मरूप मार्ग ख्यात । इंद्रादि तत्त्वरूपस्थ । तत्त्वांनी ते विराजती ॥१३॥
शिवादि देहरूपांत । तत्त्वधारक ते संस्थित । देव इंद्रमुख म्हणून । वर्तत । शिवादि सारें तदाधार ॥१४॥
शंभू आदि देव निर्माण । गौणमार्गें झालें म्हणून । इंद्रादीहून भिन्न । तो मार्ग मुख्य न प्रकीर्तित ॥१५॥
इंद्रादी देवेंद्री देवेंद्र निर्माण झाले । मुख्यभावें ते विलसले । शिवादीहून भिन्न ठरले । संपूर्ण कलायुक्तत्वें ॥१६॥
ऐसें सांगून तयांप्रत । महायोगी भ्रुशुंडी थांबत । देवर्षी तयास वंदन करित । म्हणती सारे हर्षानें ॥१७॥
महामुने आम्हांस संशयहीन । केलेंत आपण महान । आपण गणेशाकार रूपी प्रसन्न । त्यामुळें आश्चर्य यांत नसे ॥१८॥
देवार्षि तदनंतर स्वस्वस्थलाप्रत । परतत । गणेश्वरासी नित्य भजत ऐसें हें रहस्य शांतिप्रद ॥१९॥
ब्रह्मा म्हणे कौण्डियाप्रत । म्हणोनि भज तूं निष्ठायुक्त । गणनाथास तरी निश्चित । शांति तुजला लाभेल ॥२०॥
ऐसें बोलून त्यास देत । षडक्षर मंत्र गणेशाचा विधियुक्त । सर्वसिद्धिप्रदायक पुनीत । कौंडिण्य कथा पुढे सांगे ॥२१॥
तदनंतर ब्रह्यदेवास नमून । चिंतामणि क्षेत्रांत जाऊन । मोदें तप योग अधिष्ठान । आराधिला विघ्नेश मंत्रानें ॥२२॥
ऐसीं शंभर वर्षें जात । तेव्हां देव वरद प्रसन्न होत । आला वर देण्यास मजप्रत । सिद्धिबुद्धीनें तो युक्त तो युक्त ॥२३॥
त्यास पाहून मी चकित । वरती उठोनिया पूजित । तैसें च भक्तिभावें स्तवित । गजाननासी हर्षभरें ॥२४॥
कौथुम शाखेस अनुसरून । केलें तेव्हां मी स्तवन । मन वांछित योग देऊन । योगपति परतला स्वस्थानासी ॥२५॥
जरत्कारो मी खिन्न । तेथेच राहिलों मनीं ध्यान । केलें तयाचें भावयुक्त मन । गाणपत्य झालों पूर्णभावें ॥२६॥
त्या चिंतामणीस भजत । पत्नीसहित मी हर्षयुक्त । गणेशास प्रिय सत्यंत । दूर्वा ऐसें जाणूनिया ॥२७॥
अयुत दूर्वांनी पुजित । नित्य त्या गणेशासी श्रद्धायुक्त । माझ्या समागमें राहत । किंचित्‍शुद्धा मज म्हणे ॥२८॥
आपण हें तृणानुष्ठान आचरित । कोणत्या कारणें सांगा मजप्रत । भार्येंचें हें वचन । ऐकून तिजप्रत । संशयग्रस्त जाणूनिया ॥२९॥
तिजला गणेशाची वाटावी भक्ति । ऐसा भाव ठेवून चित्तीं । म्हणालों दूर्वा अर्पण विघ्नेशाप्रती । अत्यंत प्रिय जाण तूं ॥३०॥
दूर्वा घालिता जेवढा संतोष्त । तेवढा न द्रव्यवस्त नैवेद्यें तयास । दूर्वेशिवाय गणनायकास । उपवास घडे गे निश्चित ॥३१॥
दूर्वाहीन पूजा समस्त । नानाविधही निष्फळ होत । एक दूर्वांकुर प्रेमें अर्पित । त्याचें फळ गणनातीत ॥३२॥
म्हणोनि गणेशास भक्तियुक्त । पूजावें दूर्वा वाहून सतत । हें ऐकूनही संशय ह्रदयस्थ । दूर न झाला पत्नीचा ॥३३॥
तदनंतर एक दूर्वांकुर घेऊन । तिच्या हितार्थ तिज देऊन । म्हणालों देवेशा प्रत जाऊन । देवेंद्रासी सांग तूं ॥३४॥
विघ्नेशाच्या पूजेंत । वाहिली ही दूर्वा सतत । सुवर्ण देई समभार मजप्रत । न्यूनाधिक नको मज ॥३५॥
हें वचन माझें ऐकून । तैसें करण्याचें ठरवून । मज प्रणाम करून । देवनायकासन्निध गेली ॥३६॥
त्याने माझ्या पत्नीचा सन्मान । करूनि आगमन कारण । विचारिलें तेव्हां हितवचन । सांगितलें तिनें इंद्रासी ॥३७॥
इंद्र हर्षयुक्त तैसें करित । त्रैलोक्य घेतलें एका घटांत । तो घट एका पारडयांत । ठेविली दूर्वा दुस‍र्‍यांत ॥३८॥
तथापि दूर्वेंचें पारडें जड असत । त्याची तुलनाच न होत । तें पाहून अति खेदयुक्त । स्मरूं लागला पांच देवा ॥३९॥
ते पांच देवही स्वपुरातून । आले तेथें कार्यसिद्धिस्तव महान । सर्व दर्व स्वलोक प्रजेसहित येऊन । घटांत बसले त्या वेळीं ॥४०॥
शिव विष्णुप्रमुख अमर । बसले घटांत सत्वर । परी दूर्वेचा समभार । तोलन करणें अशक्य झालें ॥४१॥
तेव्हां मायाबलें समस्त । ब्रह्मांड लोकांसहित । घटांत स्थापिलें तरी न होत । समान वजन त्या दूर्वेचें ॥४२॥
तें पाहून भयभीत । माझ्या शापप्रभावें समस्त । आले आश्रयार्थ माझ्या आश्रमांत । अति दुःखित होऊनिया ॥४३॥
सर्वांनीं मज प्रणाम केला । नंतर विधि मज म्हणाला । तुमच्या दूर्वापूजन पुण्याईला । मुनि शार्दूला आम्हीं दास ॥४४॥
एका दूर्वेसमान नसत । ब्रह्मांडें ही समस्त । कौंडिण्यत्तमा गणेशपूजेंत । आपण जी वाहिली श्रद्धेनें ॥४५॥
एका दूर्वांकर अपणाचें फळ । चिंतामणित देऊ शके सकळ । महाभागा आम्हीं असमर्थ अबल । इच्छा तुमची पुरवावया ॥४६॥
आज्ञा करावी काय अन्य । करावें कर्म व्हावें धन्य । नित्य दासभावें मान्य । स्वामी आम्हांस करावें ॥४७॥
आमुचें पालन करावें । सुरेश्वरा आम्हां वाचवावें । त्याचें वचन ऐकून बरवें । पूजन करून म्हणे तयांसी ॥४८॥
ब्रह्मदेवा सर्वांसहित  । जाई तूं स्वपदाप्रत । मज दूर्वाफळाची आसक्ति नसत । भार्येंस्त व मीं हें नाटक केलें ॥४९॥
माझा पत्नीस बोध । व्हावा दूर्वा माहात्म्याचा विशाद । म्हणोनि समाचार द्रव्या निर्वेंश । मागितले मीं सांप्रत ॥५०॥
महादेवही मीं दास असत । क्षमा करावी मजप्रत । तेव्हां ते देवदेवेश परत जात । स्वस्वास्थानी मोदानें ॥५१॥
तेव्हांपासून माझी भार्या होत । श्रद्धेने गाणपत्य सतत तिच्यासहित मीं भजत । गणनायका नित्य नेमें ॥५२॥
चित्त स्थिरकर्ते क्षेत्र ख्यात । चिंतामणि नामे जगांत । म्हणोनि तूंही तेथ अविरत । करितां पूजन शांतिलाभा ॥५३॥
विघ्नेश्वरासी भजशील । तरी योगिवंद्य तूं होशील । ऐसें बोलून मंत्र विमल । दिला षडाक्षर गणेशाचा ॥५४॥
विधानपूर्वक मीं स्वीकारिला । प्रणाम करून त्या महाभागाला । विनये पुनरपि प्रश्न घेतला । संशय दाटून मनांत ॥५५॥
योगप्राप्तिस्तव मी झटत । तो कैसा होईल प्राप्त । या प्रश्नाचें उत्तर देत । कौंडिण्य पुढिलें अध्यायीं ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते जरत्कारुमंत्रोपदेशवर्णनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP